डॅनी अमेरिकेत परतला !

डॅनी अमेरिकेत परतला !

निरंकुश सत्तावादी, हुकूमशहा किंवा निवडणूक लढवून आलेले हुकूमशहा आणि एकाधिकार चालवणारे सत्ताधीश यांचा सर्वाधिक डोळा असतो तो पत्रकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. पत्रकारांना गप्प बसवण्याचे हरएक उद्योग सध्या भारतासह जगभरात ठिकठिकाणी केले जात आहेत. त्यातला सोपा उपाय म्हणजे तुरुंगात टाकणे.  

निरंकुश सत्तावादी, हुकूमशहा किंवा निवडणूक लढवून आलेले हुकूमशहा आणि एकाधिकार चालवणारे सत्ताधीश यांचा सर्वाधिक डोळा असतो तो पत्रकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. पत्रकारांना गप्प बसवण्याचे हरएक उद्योग सध्या भारतासह जगभरात ठिकठिकाणी केले जात आहेत. त्यातला सोपा उपाय म्हणजे तुरुंगात टाकणे.

डॅनी फेन्स्टर या अमेरिकी पत्रकारालाही म्यानमारच्या हुकुमशाही सरकारने सहा महीने गजाआड केले आणि पुढची ११ वर्षे किंवा अधिक काळ आतच ठेवण्याचा विचार होता. पण अमेरिकी सरकारने खटपट केली आणि डॅनी अखेर अमेरिकेत नुकताच परतला.

डॅनी फेन्स्टर हा अमेरिकेत जन्मलेला आणि अर्थातच अमेरिकन पत्रकार आहे. तो म्यानमारमधील  ‘फ्रंटियर म्यानमार’ या स्थानिक वृत्त मासिकाचा व्यवस्थापकीय संपादक आहे.

म्यानमारमध्ये १ फेब्रुवारीला यावर्षी सत्तापालट झाला. लोकशाही सरकार उलथवून टाकून सैन्याने सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर अनेक जणांना अटक करण्यात आली. फेन्स्टर हा एकमेव परदेशी पत्रकार आहे, ज्याच्यावर देशद्रोह आणि संबंधित आरोप लष्करी अधिकाऱ्यांनी लावले आणि त्याला त्यासाठी ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

वॉशिंग्टनमधील नॅशनल प्रेस क्लबने मात्र फेन्स्टरला अटकेदरम्यान यावर्षीचा ‘जॉन ऑबुचॉन प्रेस फ्रीडम’ पुरस्कार जाहीर केला आणि म्यानमारच्या सत्तेला एकप्रकारे आव्हानच दिले.

मिशिगनमध्ये डेट्रॉईटचे उपनगर हंटिंग्टन वूड्समध्ये फेन्स्टरचा जन्म इ.स. १९८४ मध्ये झाला आणि तो तिथेच लहानाचा मोठा झाला. बर्टन एलिमेंटरी स्कूल, नोरुप मिडल स्कूल आणि बर्कले हायस्कूलमध्ये त्याचे शिक्षण झाले. कोलंबिया कॉलेज शिकागो येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि वेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून क्रिएटीव्ह रायटींगमधून त्याने पदव्युत्तर पदवी घेतली.

फेन्स्टरने सुरवातीला डेट्रॉईट आणि लुईझियानामधील वृत्तपत्रांसाठी काही काळ काम केले. २०१८ मध्ये तो म्यानमारमध्ये आला. ‘म्यानमार नाऊ’ या वृत्त संस्थेमध्ये त्याने पत्रकार आणि कॉपी एडिटरम्हणून २०१९ मध्ये काम सुरू केले. तो तिथेच जुलै २०२० पर्यंत काम करत होता. ऑगस्ट २०२० मध्ये तो ‘फ्रंटियर म्यानमार’मध्ये रुजू झाला होता.

‘फ्रंटियर म्यानमार’ हे ‘ब्लॅक नाइट मीडिया कंपनी लिमिटेड’च्या मालकीचे यंगून येथे प्रकाशित होणारे मासिक आहे. इंग्रजी मासिक, इंग्रजी वेबसाइट आणि बर्मी भाषेतील वेबसाइटद्वारे ‘फ्रंटियर म्यानमार’ प्रामुख्याने स्थानिक राजकारणावर भर देते. २०१२ मध्ये म्यानमारमधील थेन सेनच्या सरकारने देशाची दडपशाही सेन्सॉरशिप व्यवस्था रद्द केल्यापासून, म्यानमारमध्ये नव्याने माध्यमांचा उदय झाला. त्यामध्ये फ्रंटियर हे जुलै २०१५ हे पहिले खाजगी अर्थसहाय्य असणारे इंग्रजी भाषेतील माध्यम सुरू झाले.

‘फ्रंटियर’चे बरेच कर्मचारी म्यानमारमधील इतर प्रमुख वृत्तसंस्थांमधून आले आहेत. थॉमस कीन, मासिकाचे मुख्य संपादक आहेत. फ्रंटियरला अनेक प्रादेशिक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात ह्युमन राइट्स प्रेस अवॉर्ड आणि सोसायटी ऑफ पब्लिशर्स इन एशिया अवॉर्ड यांचा समावेश आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये, म्यानमारच्या सैन्याने सत्तापालट केला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली. फेन्स्टर अगोदर काम करत असलेल्या ‘म्यानमार नाऊ’चा प्रकाशन परवाना मार्चच्या

तुरुंगातून सुटताना सैनिकांच्या समोर कागदपत्रांवर सह्या करताना डॅनी.

तुरुंगातून सुटताना सैनिकांच्या समोर कागदपत्रांवर सह्या करताना डॅनी.

सुरुवातीला रद्द करण्यात आला. ‘म्यानमार नाऊ’ गुप्तपणे काम करीत राहिले.

५४ दशलक्ष लोकसंख्या असलेला आशियाई देश म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सैन्याने बंड घडवून आणले. लष्कराने लोकशाही समर्थक आंदोलकांविरूद्ध क्रूर कारवाई सुरू केली असून सतत हिंसाचार सुरू आहे. रस्त्यावर निदर्शने सुरू असून, एका अधिकार गटाच्या दावयानुसार किमान १२६० लोक आत्तापर्यंत मारले गेले आहेत आणि १२०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

१ फेब्रुवारीच्या सत्तापालटात लष्कराने डॉ आंग सान स्यू की यांचे लोकशाही सरकार बरखास्त केले आणि सत्ता काबीज केल्यापासून ते रस्त्यावरील निदर्शने आणि विरोधी नेत्यांवर कठोर कारवाई करत आहे. १ फेब्रुवारी २०२१ च्या पहाटे, ज्या दिवशी संसदेचे अधिवेशन होते, त्या दिवशी म्यानमारच्या लष्कराने आंग सान स्यू की आणि सत्ताधारी पक्षाच्या इतर सदस्यांना ताब्यात घेतले. लष्कर प्रमुख मिन आंग हलाईंग यांनी आपण सत्ता स्वीकारल्याचे जाहीर केले आणि एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली. देशांतर्गत प्रवास आणि इलेक्ट्रॉनिक संवाद यंत्रणा प्रतिबंधित केल्या आणि सीमा बंद करण्यास सुरुवात केली.

लोकशाही वादी नेत्या आंग सान स्यू की आणि राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आणि लष्कराने त्यांच्यावर विविध आरोप दाखल करण्यास सुरुवात केली.

आंग सान स्यू की यांच्यावर चाललेली न्यायालयीन सुनावणी देखील लोकांसाठी बंद आहे आणि न्यायालयाने तिच्या वकिलांना या केसबद्दल मीडियाशी बोलू नये असे आदेश दिले आहेत. नुकतीच न्यायालयाने आंग सान स्यू की यांना एका खटल्यात ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

‘म्यानमार नाऊ’ ही म्यानमार येथील वृत्तसंस्था आहे. ‘म्यानमार नाऊ’तर्फे बर्मी आणि इंग्रजी भाषेत लेख आणि बातम्या ऑनलाइन न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातात. एजन्सीतर्फे देशभरात ५० पेक्षा

जास्त राष्ट्रीय आणि स्थानिक अनेक वृत्तसंस्थांना मोफत सेवा दिली जाते. सप्टेंबर २०१९ मध्ये ‘म्यानमार नाऊ’ची वाचकसंख्या ३ लाख ५० हजार इतकी होती आणि त्यांच्याकडे ३० पत्रकारांची टीम होती. भ्रष्टाचार, बालकामगार, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय यासह अनेक मुद्द्यांवर सखोल वृत्त अहवाल देण्यासाठी ही वृत्तसेवा प्रसिद्ध आहे.

‘म्यानमार नाऊ’ची स्थापना २०१५ मध्ये थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनने म्यानमारच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर सखोल आणि स्वतंत्र पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी केली. एजन्सीचे नेतृत्व स्वे विन यांच्याकडे आहे. वृत्तसेवा सुरू झाल्यापासून, स्वे विनसह अनेक ‘म्यानमार नाऊ’च्या अनेक  पत्रकारांना लष्करी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी धमक्या दिल्या आहेत आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही केले आहेत. ८ मार्च २०२१ रोजी, म्यानमार लष्करी सैनिकांनी म्यानमार नाऊच्या मुख्यालयावर छापा टाकला.

त्यानंतर २४ मे २०२१ रोजी फेन्स्टर डेट्रॉईटमध्ये असणाऱ्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघाला होता. ‘यांगून’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो विमानात बसण्याची वाट पाहत होता, तेंव्हा फेन्स्टरला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि त्याला कुप्रसिद्ध इनसेन तुरुंगात ठेवण्यात आले.

विमानतळावर न्यू मेक्सिकोचे गव्हर्नर बिल रिचर्डसन आणि डॅनी फेन्स्टर अमेरिकेत परतल्यावर.

विमानतळावर न्यू मेक्सिकोचे गव्हर्नर बिल रिचर्डसन आणि डॅनी फेन्स्टर अमेरिकेत परतल्यावर.

फेन्स्टरवर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला. खोटी आणि प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा गुन्हा लावण्यात आला. भारतात जसा यूएपीए हा कायदा लावून अनेक कार्यकर्ते आणि पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात येत आहे, त्याच प्रमाणे म्यानमारमध्ये बेकायदेशीर संघटन कायदा आहे. हा कायदा वसाहत काळातील आहे. तो यापूर्वी राजकीय कार्यकर्ते आणि विरोधी गटांबद्दल वार्तांकन करणार्‍या पत्रकारांवर खटला चालवण्यासाठी वापरण्यात आला आहे. हा कायदा लावला म्हणजे लोकांना आणि पत्रकारांना लांब ठेऊन खटला चालवता येतो. या कायद्याच्या कलम १७ / १ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने अगोदर ‘म्यानमार नाऊ’मध्ये केलेल्या कामाच्या संदर्भात त्याच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले.

फेन्स्टरने जामीनासाठी अर्ज केला, पण ३ नोव्हेंबरला न्यायालयाने जामीन फेटाळला. अधिकाऱ्यांनी त्याच्यावर इमीग्रेशन कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा नव्याने लावला.

१२ नोव्हेंबरला मिलिटरी न्यायालयाने फेन्स्टरला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. फेन्स्टरचा खटला तुरुंगात चालला होता. कोणत्याही नातेवाईक किंवा सार्वजनिक सदस्यांना उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. निकाल जाहीर होताच त्याला अश्रू अनावर झाले, असे त्याच्या वकिलाने झाव आंग यांनी सांगितले.

ज्यू समुदायाने २८ नोव्हेंबरला मेनोराह या ज्यू समुदायाच्या वार्षिक समारंभात ज्योत पेटवण्याचा बहुमान फेन्स्टरला देऊन त्याचे शहरात स्वागत केले

ज्यू समुदायाने २८ नोव्हेंबरला मेनोराह या ज्यू समुदायाच्या वार्षिक समारंभात ज्योत पेटवण्याचा बहुमान फेन्स्टरला देऊन त्याचे शहरात स्वागत केले

माहिती मंत्रालयाने पुरवलेली संपादकांची कालबाह्य यादी हा मुख्य पुरावा होता. त्यांच्या वकिलाने त्यांच्या फ्रंटियर म्यानमारमधील रोजगाराची नोंद आणि त्यांचे कर विवरणपत्र सादर केले, परंतु फेन्स्टर दोषी नसल्याचा बचावाचा युक्तिवाद न्यायालयाने नाकारला.

शेवटी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्र संघातील माजी राजदूत आणि न्यू मेक्सिकोचे गव्हर्नर बिल रिचर्डसन यांनी म्यानमारमध्ये म्यानमारच्या लष्कराचे कमांडर इन चीफ जनरल मिन आंग हलाईंग यांच्याशी समोरासमोर वाटाघाटी केल्यावर १५ नोव्हेंबर रोजी, फेन्स्टरला तुरुंगातून सोडण्यात आले. पण परत अमेरिकेमध्ये जाण्याच्या अटीवरच.

अजूनही हे अस्पष्ट आहे, की  फेन्स्टरच्या बदल्यात म्यानमारच्या लष्करी सत्तेला अमेरिकेने नेमके काय आश्वासन दिले आहे. पण लष्कराच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये असे म्हंटले आहे, की रिचर्डसन आणि म्यानमारशी संबंध असलेल्या दोन जपानी संस्थांचे प्रतिनिधी, निप्पॉन फाऊंडेशनचे अध्यक्ष योहेई सासाकावा आणि हिदेओ वातानाबे यांच्या विनंतीवरून फेन्स्टर यांना “मानवतावादी कारणास्तव” सोडण्यात आले आहे.

‘फ्रन्टियर’ने फेन्स्टरला त्याच्या तुरुंगवास आणि खटल्यादरम्यान पाठिंबा दिला होता. त्यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. ‘फ्रन्टियर’ने फेन्स्टरच्या सुटकेचे स्वागत केले आणि मुख्य संपादक थॉमस कीन म्हणाले, “डॅनी शेवटी तुरुंगातून बाहेर आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.”

सत्तापालटानंतर १२० हून अधिक पत्रकारांना अटक करण्यात आली असून, सुमारे चार डझन अजूनही तुरुंगात आहेत. अमेरिकेतील आणखी एक पत्रकार नॅथन माउंग यांना मार्चमध्ये अटक करण्यात आली आणि दोन महिन्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

आणि अखेर फेन्स्टर अमेरिकेत परतला. त्याच्या मित्रांनी आणि जगभरातल्या अनेक लोकांनी फेन्स्टरला सोडण्यासाठी सोशल मिडियावर मोहीम चालवली होती. फेन्स्टरला अभिवादन करण्यासाठी डेट्रोईटमधील ज्यू समुदायाने २८ नोव्हेंबरला मेनोराह या ज्यू समुदायाच्या वार्षिक समारंभात ज्योत पेटवण्याचा बहुमान फेन्स्टरला देऊन त्याचे शहरात स्वागत केले आणि आपण त्याच्याबरोबर आहोत, असा संदेश दिला.

COMMENTS