टेक सम्राटांच्या साम्राज्यावर अंकुश

टेक सम्राटांच्या साम्राज्यावर अंकुश

अमेरिकन काँग्रेसने नुकतेच गूगल, अॅपल, फेसबुक व अ‍ॅमेझॉन या जगातील चार बलाढ्य कंपन्यांच्या सीईओंना बोलावून त्यांच्यावर अविश्वासदर्शक सुनावणी केली. अमेरिकेतील अविश्वास दर्शक कायदे हे व्यापार-उदीमांचे नियमन करण्यास पुरेसे आहेत की नाहीत हे समजून घेणे हा एक उद्देश या ऐतिहासिक सुनावणीचा होता.

वैयक्तिक दृष्ट्या, कोणत्याही क्षेत्रात, व्यवसाय तसेच व्यापार-उदिमात कोणाकडे किती पैसा, यश, सत्ता किती आणि किती काळ असावी याची ढोबळमानाने मानके किंवा दंडक नाहीत. जगभर हे जितके वर्धिष्णू होत असेल तितके चांगले असा एक समज अजूनही आहे. त्यामुळेच या सगळ्यांचा सदैव चढता आलेख असावा असा मानदंड, असे वातावरण जगातील मोठ्या व्यवस्थापन संस्था, सगळी स्टॉक मार्केट्स, सगळे उद्योगजगत यांनी यशस्वीरित्या रुजवले आणि एकंदरीत समाजमानसाने ते अंधपणे स्वीकारले.

सतत वर्धिष्णू होणारी अतिश्रीमंती आणि सामर्थ्य यावर कुणी फारसे आक्षेप घेतले गेले नाहीत किंवा त्यावर प्रश्न विचारले नाहीत. नाही म्हणायला जगातील मूठभर अतिश्रीमंत लोकांकडे जवळजवळ ६८ ते  ९८ टक्के मालमत्ता आहे अशी वेगवेगळी आकडेवारी मधूनमधून येत असते. फोर्ब्स मासिक तर फॉर्च्यून 500 कंपन्या, तसेच जगातील अतिश्रीमंत यांची यादी अनेक वेळा प्रसिद्ध करत असते. एकंदरीत पैसा, मालमत्ता, सामर्थ्य आणि सत्ता वगैरे जरी वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळासारखे झाली तरी त्यातील अतिरेक आणि त्यामुळे होणारी गळचेपी, अन्याय तसेच दबावामुळे होणारी कोंडी याकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागले होते. हे सगळे असेच सुरू राहणार कायम असे वाटत असतांनाच २९ जुलैला अमेरिकेत एक असाधारण गोष्ट घडली.

अमेरिकन सिनेटचे शक्तीशाली टेक कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान

त्या दिवशी अमेरिकन काँग्रेसने म्हणजे सगळ्या डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन नेत्यांनी मिळून जगातील चार सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीईओंना म्हणजेच अल्फाबेटचे (गूगलची मूळ कंपनी) सुंदर पिचाई, अॅपलचे टिम कूक, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि अ‍ॅमेझॉनचे जेफ बिझोज यांना बोलावून त्यांच्यावर अविश्वासदर्शक सुनावणी केली. त्यात त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती तर करण्यात आली, अनेक आरोप केले गेले आणि उलट तपासणी देखील केली गेली.

महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेतील अविश्वास दर्शक कायदे हे व्यापार-उदीमांचे नियमन करण्यास पुरेसे आहेत की नाहीत हे समजून घेणे हा एक उद्देश या ऐतिहासिक सुनावणीचा होता.

एरवी या चारही सीईओंचा मोठा दबदबा. जगातील अतिश्रीमंत ते आहेतच त्याचबरोबर अतिशय नावाजलेले, अमर्याद व्यापारी सत्ता असलेले, अतिशक्तीशाली आणि अत्यंत प्रभावी धुरीण आहेत.

या अतिशक्तीशाली धुरिणांवर सगळ्या नेत्यांचा असा प्रश्नांचा भडिमार तेही असे प्रत्यक्ष कोट्यवधी लोकांनी बघणे हेच मुळी ऐतिहासिक आहे. हे चौघे आणि त्यांच्या कंपन्याची एकत्रित किंमत ५ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच ५ पद्म डॉलर्सच्या आहेत – त्यात जगातील अतिश्रीमंत व्यक्तींचा (बिझोज आणि झुकरबर्ग) यांचा समावेश आहे. या सुनावणीच्या दरम्यान हे चौघेही असे सांगत होते की ते आणि त्यांच्या कंपन्या या काही फार मोठ्या आणि सामर्थ्यवान नाहीत. आता याला विनय म्हणावे की सरळ सरळ पळवाट किंवा धूळफेक? ते असेही म्हणाले की आमच्यावर कारवाई करावी असे आम्ही काहीच “आक्षेपार्ह” करत नाही.

त्यामुळेच या सुनावणीचे प्रमुख डेविड सिसिलिनी म्हणाले की ही मंडळी आणि त्यांच्या कंपन्या यांच्याकडे प्रचंड पैसा, सत्ता आहे, इंटरनेट, मोबाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी संबंधित तंत्रज्ञानावर त्यांचीच मक्तेदारी आहे. त्यामुळे त्यांचे वागणे आणि व्यवहार हा एकाधिकारशाही आणि मक्तेदारीचा झाला आहे. ते असेही म्हणाले की “आपल्या देशाचे स्थापनकर्ते देखील कुणा राजापुढे झुकले नाहीत”. रिपब्लिकन डेविड मॅकाबी म्हणाले की “तेव्हा आपण सुद्धा या ऑनलाइन साम्राज्यांच्या शहेनशाहांपुढे का झुकावे?” ते पुढे हेही म्हणले की या कंपन्यावर निर्बंध घालणे तसेच त्यांचे नियमन करणे हे आवश्यक झाले आहे.

पूर्ण तयारी आणि अभ्यास करून आलेले नेते

एक वर्षाहून अधिक काळ सिसिलिनी आणि त्यांची टीम या चारही कंपन्यांचा तपास करत आहेत. त्यांनी हजारो लोकांच्या मुलाखती घेतल्या असून जवळ जवळ १३ लाख कागदपत्रे गोळा केली आहेत. त्यांच्या टीममध्ये लिना खान नावाच्या विधी तज्ज्ञ आहेत. त्यांनी अमेझोनची अर्थसत्ता आणि सामर्थ्यावर कायद्याच्या अंगाने बरेच संशोधनात्मक लिखाण केले आहे.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा मार्क झुकरबर्गवर ५ कोटी अमेरिकी नागरिकांच्या गोपनीय महितीचा गैरवापर करण्याचा आरोप होता आणि अशीच सुनावणी झाली होती तेव्हा तेथील राजकीय नेत्यांचे तंत्रज्ञानविषयक अज्ञान आणि एकंदरीत अंधार सगळ्या जगाने टीव्हीवर पाहिला. झुकरबर्ग यांनी त्यांना कसे व्यवस्थित गुंडाळले हे देखील पाहिले.

या सुनावणीत मात्र सगळे नेते इतका अभ्यास करून आणि तयारीने आले होते की त्यांनी या चौघांना कोंडीत पकडणारे प्रश्न विचारत त्यांचा घाम काढला. बिझोजने कबूल केले की त्यांनी स्वत:च्या कंपनीची उत्पादने इतर विक्रेत्यांची माहिती बेकायदा घेऊन जबरदस्त नफा कमावला आहे.

या सुनावणीत या चौघांच्या कंपन्यांवर सत्तेचा गैरवापर केला तसेच तंत्रज्ञान आणि इतर गैरवाजवी मार्गांचा वापर करून स्पर्धकांना संपवणे किंवा टिकणे अशक्य केले आहे असे आरोपही केले. नेत्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर द्यायला हे सगळे सीईओ कसे टाळाटाळ करत होते, प्रश्न कसे टोलवत होते, किती खुबीनी प्रश्नांना बगल देत होते, आम्ही सगळे कसे अमेरिकन जनतेच्या भल्यासाठी करत आहोत, आम्ही प्रचंड रोजगार निर्माण करतो असली राजकीय छापाची गुळगुळीत उत्तरे देत होते. इंटरनेट तंत्रज्ञानावर आधारित चिनी कंपन्या आता असंख्य आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणे आणि त्यांना आटोक्यात आणण्याचे महत्त्वाचे काम या कंपन्या करतात आहेत असेही एक धुरीण म्हणाले. अनेक चिनी कंपन्यांशी व्यावहारिक साटंलोटं असूनही चिनी कंपन्यांना कसे आवर घालत आहोत असेही एकाने बिनदिक्कत संगितले. हे चौघेही किती अवघडलेले होते, त्यांचा सात्विक संताप होत होता तसेच अगदीच विकेट देण्याच्या बेतात ते आले तेव्हा आम्ही याविषयी तुम्हाला सगळी माहिती देऊ अशी पळवाट त्यांनी कशी काढली हे सगळे कोट्यवधी लोकांनी टीव्हीवर पाहिले.

शक्तीशाली टेक कंपन्यांची मक्तेदारी, त्यांची साम्राज्ये आणि त्यांच्यावरील आरोप

अॅपल ही नाविन्यपूर्ण संगणक, इंटरनेट आणि अनेक माध्यमे, त्याचे तंत्रज्ञान एकत्र आणणारी कंपनी. तसेच विक्रीच्या बाबतीतही त्यांनी फार चलाख स्ट्रॅटेजी आणली. संस्थापक स्टीव्ह जॉब्सने तंत्रज्ञान आणि डिझाईन मधील सौंदर्य, नजाकत, देखणेपणा यांची अशी काही सांगड घातली की त्यांची सगळी उत्पादने अजूनही जगभरातील लोक रांगा लावून ती विकत घेतात. जगभर फक्त अॅपलचीच उत्पादने वापरणारे कोट्यवधी ‘भक्त’ आहेत.अॅपलचे सीईओना त्यातल्या त्यात कमी प्रश्न विचारले गेले.

किती प्रश्न विचारले गेले ३५
आरोप अॅप स्टोअरसाठी काम करणार्‍या डेवलपर्सबरोबर कंपनीचे वर्तन ठीक आहे का?

तुमची स्वत:ची उत्पादने आली की तुम्ही स्पर्धकांची उत्पादने स्टोअरवरून काढता.

एअर बीएनबी आणि इतर कंपन्यांकडून तुम्हाला कमिशन का हवे आहे? मात्र अ‍ॅमेझॉनकडून तुम्ही कमिशन घेत नाही. तुम्ही दोघे मिळून एकमेकांचा फायदा करून देत आहात.

 

समर्थन आम्ही सगळ्यांशी समानतेने वागतो. कुणावर दमदाटी करत नाही.

त्या विशिष्ट अॅपमध्ये काहीतरी प्रॉबेल्म होता.

अॅपलचा हा नियम आहे की जो कुणी त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करेल त्याने कमिशन द्यायलाच हवे.

डेव्हलपर्स आणि विक्रेते यांच्यात स्पर्धा तीव्र आहे. आणि प्रत्येक जण धडपडतो आहे.

उत्तरे कशी टोलवली आमची कंपनी इतकी मोठी नाही. (३ वेळा)

अमेरिकेचे भले आम्ही करतो आणि इच्छितो. (६ वेळा)

आमच्याबद्दल चिंता वाटून काय उपयोग? आमचे स्पर्धक तसेच चिनी कंपन्यांचे वर्चस्व आले तर काय होईल याचा विचार करा. (१३ वेळा)

आम्ही तुम्हाला कळवतो. (३ वेळा)

फेसबुक हे अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया माध्यम. अन्न, वस्त्र, निवार्‍या इतकेच माणसाला संवाद साधणे, एकमेकांच्या संपर्कात राहणे, आपल्या रोजच्या जगण्यातील सुखदु:खाच्या क्षणांविषयी बोलणे, फोटो-व्हीडिओ दाखवणे हे आवश्यक आहे हे ओळखले आणि इतिहास घडवला. ही कंपनी जेव्हा सुरू केली तेव्हा पोरगेलासा असणारा मार्क झुकरबर्ग आता जगातील एक अतिश्रीमंत व्यक्ति आहे. गेल्या १४ वर्षात अफाट वाढलेली ही कंपनी एक मोठी तंत्रज्ञान कंपनी म्हणून मान्यता पावली आहे. या कंपनीने व्हाट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि अनेक उत्तम कंपन्या विकत घेतल्या आहेत. अतिमहत्त्वाकांक्षी आणि कंपनीचा उत्कर्ष सातत्याने दशकपेक्षा अधिक काळ करणारी ही कंपनी.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना सगळ्यात जास्त प्रश्न विचारून धारेवर धरले गेले.

किती प्रश्न विचारले गेले ६२
 

मुख्य आरोप

इन्स्टाग्राम हे आपले सगळ्यात धोकादायक स्पर्धक आहेत अशा आशयाच्या तुमच्या ईमेल्स आहेत. पुढे तुम्ही त्यांना स्पर्धेतून बाद करण्यासाठी विकत घेतले. खरे तर तुम्ही त्यांचे स्पर्धक म्हणून काम करायला हवे होते.
समर्थन ज्यावेळी आम्ही विकत घेतले तेव्हा त्यांना अनेक स्पर्धक होते. तसेच आम्ही प्रचंड गुंतवणूक केली त्यामुळेच इन्स्टाग्राम आज यशस्वी आहे. हे यश म्हणजे खरी अमेरिकन यशोगाथा आहे.
 

 

 

उत्तरे कशी टोलवली

आमची कंपनी इतकी मोठी नाही. (२ वेळा)

अमेरिकेचे भले आम्ही करतो आणि इच्छितो. (७ वेळा)

आमच्याबद्दल चिंता वाटून काय उपयोग? आमचे स्पर्धक तसेच चिनी कंपन्यांचे वर्चस्व आले तर काय होईल याचा विचार करा. (६ वेळा)

आम्ही तुम्हाला कळवतो. (७ वेळा)

अ‍ॅमेझॉन या कंपनीने इ-कॉमर्सद्वारे अगदी दंतमंजन, मीठापासून तर कपडे, चपला-बूटपासून मोबाईल, पुस्तके आणि हजारो गोष्टींची विक्री करण्याचा सोपा “प्लॅटफॉर्म” उपलब्ध करून देऊन इतकी क्रांती केली की या कंपनीचा मालक हा जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ति बनला आहे.

किती प्रश्न विचारले गेले ५९
आरोप तुम्हाला असे वाटत नाही का की असंख्य लहान उद्योगांना आता अ‍ॅमेझॉनवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही?

तुमच्या कडील अनेक तज्ज्ञ इतर उत्पादनांची माहिती तुमच्या प्लॅटफॉर्मवरून घेतात आणि त्यांच्यापेक्षा सरस उत्पादने करून त्या स्पर्धकांना स्पर्धेतून बाद करता.

ऑनलाइन विक्रीच्या मार्केटमधील ७५% वाटा तुमचा आहे.

समर्थन तसे अजिबात नाही. लहान उद्योगांना अनेक पर्याय आहेत. आमचा मात्र सर्वोत्तम पर्याय आहे.

आमच्याकडे विक्रीला ठेवून सगळ्यांना फायदाच झाला आहे. तोटा नाही.

७५% मार्केट शेअर असणे हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही अतिशय कष्ट घेतले आहेत.

उत्तरे कशी टोलवली आमची कंपनी इतकी मोठी नाही. (१ वेळा)

अमेरिकेचे भले आम्ही करतो आणि इच्छितो. (३ वेळा)

आमची काळजी करून नका. आमचे स्पर्धक तसेच चिनी कंपन्यांचे वर्चस्व आले तर काय होईल याचा विचार करा. (१० वेळा)

आम्ही तुम्हाला कळवतो. (३ वेळा)

गुगल या कंपनीविषयी तर सगळ्यांना माहीतच आहे. हवी ती माहिती क्षणात उपलब्ध करून देणारा या सगळ्या टेक कंपन्यांचा आणि समस्त जनांचा हा गुरु आहे. माहितीच्या शोधात ९२% मक्तेदारी गुगलची आहे. त्यांची अनेक उत्पादने अशी आहेत की ज्याच्या शिवाय कुठलेही काम करता येणार नाही. इंटरनेट म्हणजे गुगल हे समीकरण अजून अबाधित आहे!

गूगलच्या सुंदर पिचाई यांना देखील अनेक फिरक्या घेणार्‍या प्रश्नांना सोमोरे जावे लागले.

किती प्रश्न विचारले गेले ६१
 

 

 

मुख्य आरोप

गुगलचा जाहिरातींचा प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे अनेक ऑनलाइन सर्विस देणार्‍यांना त्रास होतो.

इतर वेबसाइटवरील माहिती तुम्ही गोळा करता त्यामुळेच गुगल सर्चच्या चौकटीत तुम्ही ग्राहकांना ठेवता.

तुमची माहिती शोधण्याची ताकद वापरून तुम्ही स्पर्धकांना पुरते गारद केले आहे.

तुम्ही पेंटागॉनच्या ड्रोन फुटेजवरील  प्रोजेक्टवर काम करण्यास नकार दिला मात्र चिनी मिलिटरीसाठी तुम्ही काम करता.

 

 

समर्थन

गुगलवरील जाहिरातीचा प्लॅटफॉर्म हा सगळ्यांसाठी सारखा आहे.

आम्हाला देखील अनेक स्पर्धक आहेत. अगदी अ‍ॅमेझॉनवरील शोध हे देखील आमचे स्पर्धक नाहीत का?

आम्ही चिनी मिलिटरीसाठी काम करत नाही.

 

 

उत्तरे कशी टोलवली

आमची कंपनी इतकी मोठी नाही. (३ वेळा)

अमेरिकेचे भले आम्ही करतो आणि इच्छितो. (११ वेळा)

आमची काळजी करून नका. आमचे स्पर्धक तसेच चिनी कंपन्यांचे वर्चस्व आले तर काय होईल याचा विचार करा. (८ वेळा)

आम्ही तुम्हाला कळवतो. (१३ वेळा)

 

अविश्वास दर्शक सुनावणीची राजकीय बाजू

अमेरिका एकंदरीत स्वातंत्र्य आणि हक्क प्रिय असणारा हा देश. इथे कशालाही आडकाठी नाही. सगळ्याचे हक्क अबाधित आहेत अगदी वॉल स्ट्रीटवरही असे अभिमानाने सांगणारा हा देश. मात्र या चार कंपन्या जेव्हा त्यांच्या साम्राज्यामुळे, ताकदीमुळे जेव्हा अनेक लहान मोठ्या कंपन्यांना संपवू लागल्या, त्यांच्या हक्कांची गळचेपी करू लागल्या आणि महत्त्वाचे म्हणजे सशक्त स्पर्धेचा काटा मोडू लागल्या तेव्हा अमेरिकन नेते जागे झाले.

मुख्य म्हणजे सगळ्या नेत्यांना असे वाटते की व्यापाराचे तसेच अर्थसत्तेचे असे एकत्रीकरण हे स्पर्धात्मक मुक्त अर्थव्यस्थेच्या विरुद्ध आहे. अमेरिकेत एकंदरीत शिकागो अर्थकारणाच्या विचारधारेचा पगडा आहे. या विचारधारेनुसार सगळे काही “ग्राहकांच्या भल्यासाठी आहे” असे म्हटले की राजमान्यता पावते यालाच अनेकांचा रास्त विरोध आहे. त्यामुळेही या कंपन्यांच्या अनिर्बंध सत्तेला आळा घालायलचा हवा यावर त्यांचे एकमत दिसते आहे.

एकंदरीत तंत्रज्ञानाची पंढरी मानली जाते ती सिलिकॉन व्हॅली. ती लिबरल विचारधारेची आहे. येथील अनेक कंपन्या आणि या चार साम्राज्यवादी कंपन्या माहितीचा मुक्त संचार होऊ देत नसून विशेषत: उजवा विचार ते पोचू देत नाही किंवा त्यांना हवी तशी माहिती ते गाळतात  असे रिपब्लिकन नेत्यांचा वाटते. तसेच या सगळ्या कंपन्याची व्यापारामुळे चिनी कंपन्याशी जरा जास्तच जवळीक असून या कंपन्याना पुरेसे देशप्रेम नाही असेही काही रिपब्लिकन नेत्यांना वाटते.

एरवी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर आरोप केला आहे की त्यांची वक्तव्ये सेन्सॉर केली आहेत. ट्रम्प यांचा बिझोज यांच्यावरही फार राग आहेच. ते म्हणतात की अमेरिकन पोस्टल सर्विसच्या सबसिडीमुळे बिझोज यांना फायदा झाला आहे. बिझोज यांनी वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतल्याने ट्रम्प अधिकच संतापले आहेत. एकंदरीत उजवा किंवा पुराणमतवादी विचार ते लोकांपर्यंत पोचू देत नाहीत यावर सगळ्या रिपब्लिकन नेत्यांचे एकमत आहे.

इंटरनेट तंत्रज्ञानामुळे या चारही कंपन्याकडे अर्थ व व्यापारी सत्ता एकवटली असून याच कंपन्याची जगातील सगळ्या संप्रेषण तसेच सार्वजनिक संभाषणावरही त्यांचीच मक्तेदारी आहे. त्यामुळेच या कंपन्यांच्या अनिर्बंध व्यवहारावर अंकुश ठेवणे व त्यांचे नियमन करणे आवश्यक आहे यावर सगळ्या नेत्यांचे एकमत आहे. ट्रम्प म्हणतात आहेत की या चारही कंपन्यावर लवकर निर्बंध आणा अन्यथा ते स्वत:च एका फटक्यात निर्बंध आणतील.

काही काळापूर्वी अशी सुनावणी होणे हे शक्य नव्हते. आता मात्र अतिशय अभ्यासपूर्ण तपासणी आणि सुनावणी करून अमेरिकन काँग्रेसने सगळ्यांनाच सुखद धक्का दिला आहे. सध्यातरी हे नेते म्हणतात आहेत की या कंपन्यांचे विभाजन करावे. ज्या प्रकारे तपासणी आणि सुनावणी केली गेली त्यावरून एक निश्चितच आहे की हे नेते एकत्रितपणे ठोस पावले उचलून निर्बंध आणणार आणि नियमनही करणार.

मात्र हे सोपे अजिबात नाही कारण कोरोनाच्या काळात लाखो उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असतांना या चारही कंपन्यांनी भरगोस नफा कमावला आहे. या चौघांची अर्थसत्ता आणि यांच्याकडे काम करणारे शक्तीशाली लॉबिस्ट आता काय क्लृप्त्या करतात हे बघणे रंजक ठरेल. बाकी या कंपन्यांवर थोडे तरी अंकुश आणि निर्बंध आणणे गरजेचे आहे. या बदलांसाठी तूर्तास इतकेच म्हणूया की Godspeed!

(छायाचित्र – न्यू यॉर्क टाईम्स साभार)

गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS