अतिदुर्गम जव्हार तालुक्यात ड्रोनद्वारे लस पुरवठा

अतिदुर्गम जव्हार तालुक्यात ड्रोनद्वारे लस पुरवठा

जव्हार स्टेडियम ते प्राथमिक आरोग्य केंद्र झापमधील अंतर २५ कि.मी आहे. जिथे रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे एक तासाचा कालावधी लागतो तिथे ड्रोनच्या सहाय्याने केवळ ९ मिनिटात कोविशिल्ड लसीचे ३०० डोस प्राथमिक आरोग्य केंद्र झाप येथे पाठविण्यात आले.

‘सरकारच्या विनंती’वरून तेजस्वी सूर्यांचे ट्विट काढले
भारतीय इंजिनिअरच्या मदतीने सापडले विक्रम लँडरचे अवशेष
भीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला!

मुंबई: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे कोविड प्रतिबंधक लस पुरवठा करण्यास गुरुवारी सुरूवात झाली. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हा नाविन्यपूर्ण प्रयोग असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

जव्हार स्टेडियम ते प्राथमिक आरोग्य केंद्र झापमधील अंतर २५ कि.मी आहे. जिथे रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे एक तासाचा कालावधी लागतो तिथे ड्रोनच्या सहाय्याने केवळ ९ मिनिटात कोविशिल्ड लसीचे ३०० डोस प्राथमिक आरोग्य केंद्र झाप येथे पाठविण्यात आले. एवढेच नव्हे तर यातून लगेचच ३०४ नागरिकांचे लसीकरण देखील करण्यात आले. हा नावीन्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने ब्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब आणि आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने पूर्ण केला. यामुळे लसीची शीतसाखळी अबाधित राखणे, प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळ आणि श्रमाची बचत होण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचविता येईल. यामुळे शीतसाखळी अबाधित राहील. तसेच प्रवासादरम्यान वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपणाकरिता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे विनाअडथळा व अत्यंत कमी वेळेत सहज शक्य होईल.

या उपक्रमामुळे राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणास गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लू इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आयआयएफएल फाऊंडेशनच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘महाराष्ट्राचे नेहमीच पहिले पाऊल

दरम्यान, ड्रोनद्वारे लस पुरवठा प्रयोगाचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे ठाकरे यांनी अभिनंदन केले. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर प्रथमत: अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच आपले पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतूकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट अधिक प्रशस्त आणि सोपी झाल्याचेही मुख्यमंत्री यांनी म्हटले.

ड्रोनच्या सहाय्याने झालेली लस वाहतूक हे एक पथदर्शी उदाहरण आहे, या बरोबरच भविष्यात औषध, रक्त पुरवठ्यासह अवयव प्रत्यारोपणाच्या कामालाही एक नवी दिशा मिळणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0