व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने: कंगवा- प्रेमाचे लुप्त झालेले प्रतीक

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने: कंगवा- प्रेमाचे लुप्त झालेले प्रतीक

ही गोष्ट आहे छत्तीसगडच्या मध्यवर्ती भागातील एका अनोख्या आदिवासी परंपरेची. साध्याशा कंगव्याच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या 'मुरीया' पुरुषांच्या प्रेमाची आणि इच्छेची...

‘पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ’
छत्तीसगढ निकालपत्रः न्याय, बंधुत्व व सारासार विवेकाची पायमल्ली
आदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल

प्रेम आणि आस्था व्यक्त करण्यासाठी कोणतेही माध्यम वर्ज्य नाही हे खरे असले तरी प्रियतमेबद्दल वाटणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि तिच्यावर छाप पाडण्यासाठी एखादा पुरुष तिला ‘कंगवा’ भेट देऊ शकतो हा विचार अत्यंत सृजनशील कवीच्या मनात सुद्धा येऊ शकणार नाही! पण छत्तीसगडमध्ये बस्तरच्या दाट जंगलातील पुरुष मात्र आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शेकडो वर्षांपासून लाकडी कंगव्याचा वापर करत आहेत.

आपले प्रेम आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी ‘कंगवा देणे’ ही छत्तीसगडमधल्या घोटुलमधील (आदिवासी तरुण-तरुणींची एकत्र भेटण्यासाठीची पारंपारिक जागा/व्यवस्था) काही शतकांपासूनची जुनी पद्धत. ही विशेषतः मुरीया जमातीमध्ये रूढ आहे.

तरुण, ज्यांना ‘चेलिक’ म्हटले जाते, त्यांना आवडणाऱ्या मैत्रिणीला, ‘मोतीयारी’ला भेट देण्याच्या लाकडी कंगव्यावर कोरीव काम करण्यासाठी तासनतासच नव्हे तर अनेक दिवस खर्च करतात. ज्या घोटुलमध्ये मुरीया तरुण-तरुणी संध्याकाळचा वेळ आणि रात्र एकत्र घालवतात त्या घोटुल परंपरेचा हा एक अविभाज्य भाग आहे. हे घोटुल त्यांना केवळ सामुदायिक जीवनाचे नियमच नाही तर त्या जीवनातील कला आणि कारागिरी तसेच अनुनय आणि लैंगिक जीवन यांचीही ओळख करून देते.

ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ आणि आदिवासी कार्यकर्ता वेरीयर एल्विन ह्याने आपल्या अभ्यासात या कंगवा बनवण्याच्या आणि अनुनयाची एक अभिव्यक्ती म्हणून तो भेट देण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथेची नोंद केली आहे.

Savaging the Civilized: Verrier Elwin, His Tribals and India (1999) या पुस्तकात इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात, तरुणांना कामव्यवहारातील कलांचे आणि सामाजिक आयुष्यातील विविध प्रथांचे शिक्षण देणारे घोटुल हे त्यांच्यामधील कलात्मक अभिव्यक्तीला सुद्धा प्रोत्साहन देणारे होते. घोटुलच्या भिंती मोतियारींच्या आणि वाघांच्या चित्रांनी सजलेल्या असत, त्यातील खांबांवर आदिवासी नृत्य किंवा प्राण्यांमधील संघर्ष कोरलेला असे. कंगवा बनवणे आणि त्यावर कोरीव काम करणे ही कला अत्यंत विकसित झालेली होती. चेलीकने आपल्या मोतायारीसाठी बनवलेले कंगवे वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या तऱ्हेचे असत. केसांसाठी तर त्यांचा वापर होत असेच पण दंड आणि पाठीवर हव्याशा गुदगुल्या करण्यासाठी सुद्धा तो वापरला जात असे. एखाद्या तरुणीकडे अनेक कंगवे असतील तर त्याचा एकच अर्थ होता, ‘तिचा प्रियकर तिच्यावर आत्यंतिक प्रेम करतोय!’

याचा अर्थ एखादा तरुण एखाद्या तरुणीसाठी अनेक कंगवे बनवू शकतो असा आहेच. पण तरुणी अनेक तरुणांकडून कंगवे घेऊन आपल्या केसांमध्ये त्याचे दिमाखदार प्रदर्शन करून आपल्यावर अनेक तरुण फिदा असल्याचा संदेश पण देऊ शकतात, असे भोपाळच्या आदिवासी लोककला अकादमीचे माजी संचालक डॉ. कपिल के तिवारी ह्यांना आढळले आहे.

छत्तीसगड मधील मुरीया जमातीतील कंगवा भेट देण्याची प्रथा, सौजन्य – मुश्ताक खान./ Sahapedia.org

कंगवे अधिक आकर्षक करण्यासाठी हे तरुण त्यावर आपल्या कुळाची खास चिन्हे (आपली ओळख देण्यासाठी) फुले, फळे, आदिवासी चित्रे एवढेच नाही स्त्रियांच्या स्तनांची आकर्षक चित्रे कोरतात. एखाद्या तरुणीकडे जितके अधिक कंगवे तितके तिच्याबद्दल असलेले आकर्षण अधिक आणि मैत्रिणींमध्ये तिचा सामाजिक दर्जा अधिक प्रतिष्ठेचा मानला जातो. त्याचबरोबर, कंगव्याचा आकार आणि त्यावरील कोरीव कामाची नजाकत ही चेलिकच्या मोतायारीवरील प्रेमाची उत्कटता व्यक्त करणारी मानली जात होती. ‘तरुणी विवाहयोग्य वयाची झाली की ती आपल्याला आवडणाऱ्या तरुणाने दिलेला कंगवा आईला देऊन आपण निवडलेला जोडीदार सूचित करते.’ डॉ. तिवारी म्हणतात.

घोटुल व्यवस्थेत झालेल्या बदलात ह्या प्रथेचा बळी गेला. बीबीसीने १९८२ मध्ये प्रदर्शित केलेल्या ‘द मुरीया’ नावाच्या माहितीपटानंतर घोटुल व्यवस्थेबद्दलही मोठे वादळ उठले. या माहितीपटामुळे घोटुलकडे राष्ट्राचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधले गेले.  त्यातून या व्यवस्थेतील अनेक जोडीदारांशी येणारे नातेसंबंध समोर आले जे ‘सुसंस्कृत समाजाच्या कक्षेबाहेर’ होते असे क्राफ्ट म्युझियमचे माजी उपसंचालक आणि सहपेडिया सल्लागार मुश्ताक खान यांनी म्हटले आहे. आजही घोटुल व्यवस्था अस्तित्वात आहे पण आदिवासी तरुणांना संध्याकाळी मनोरंजनासाठी एकत्र येण्याइतपतच, रात्री जो-तो आपल्या घरी परत जातो.

काकै, पेडीया आणि कंघी या स्थानिक नावांनी ओळखले जाणारे ते कंगवे आता भोपाळमधील भारत भवन आणि आदिवासी लोककला अकादमी आणि अशाच एक दोन वस्तुसंग्रहालयातील भिंती आणि काचेच्या कपाटातील शोभेच्या वस्तूंपुरते उरले आहेत. स्त्रीच्या सौंदर्याचे प्रतीक आणि नववधूच्या साजशृंगाराचा एक घटक असलेल्या या कंगव्याने आधुनिक प्रेमिकांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून स्थान मिळवले नसेल पण छत्तीसगडच्या आदिवासी भागात मात्र कोणे एके काळी हा साधा कंगवा प्रेमिकाच्या उत्कट आर्जवाचे आणि प्रेमिकेने केलेल्या त्याच्या निःशब्द स्वीकाराचे प्रतीक होते.

श्रुती चक्रवर्ती या भारतातील कला, संस्कृती आणि वारसा याबद्दलचे एक खुले ऑनलाईन संसाधन असलेल्या http://www.sahapedia.org येथे डिजिटल माध्यमांच्या संपादक आहेत.

हा लेख सहपीडियाच्या छत्तीसगड राज्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारश्याचे दस्तावेजीकरण करण्याच्या चालू प्रकल्पावर आधारित आहे. सहपीडिया भारतातील मोठ्या आणि वैविध्यपूर्ण वारश्याचा मल्टिमीडिया स्वरूपातील ज्ञानकोश आहे. त्यामध्ये या विषयातील अनेक विद्वान लेखन करतात आणि अनेक तज्ञांकडून ते तपासले जाते. डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या मोठ्या जनसमूहांना संस्कृती आणि इतिहासातील नातेसंबंध कल्पकतेने उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.

सदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद – वंदना अत्रे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: