वान्काचे पत्र…

वान्काचे पत्र…

आज १२ जून आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन. बालकामगार हा ज्वलंत प्रश्न अनेक प्रश्नांशी निगडित आहे. कोंबडी आधी का अंडं ? अशा स्वरूपाचा. बालकामगारांच्या अंधाऱ्या जगात खूप भयानक प्रश्न आहे.

१५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट
येडियुरप्पा सरकार विधानसभेत उत्तीर्ण
‘वायर’ विरोधातील उ. प्रदेश पोलिसांची फिर्याद उच्च न्यायालयाकडून रद्द

श्रेष्ठ रशियन साहित्यिक अंतोन चेकॉव्ह यांची ‘वान्का’ नावाच्या नऊ वर्षांच्या एका अनाथ मुलाची हृदयस्पर्शी कथा. त्यात वान्काला काम शिकण्यासाठी मास्को शहरात एका श्रीमंत माणसाकडे त्याच्या आजोबांनी पाठवलेलं असतं. ख्रिसमसच्या रात्री मालकाचे कुटुंब आणि सर्व नोकर-चाकर चर्चमध्ये गेले असताना, मालकाच्या जुन्या पेनने, एक चुरगळलेला कागद घेऊन नऊ वर्षाचा वान्का आपल्या आजोबांना पत्र लिहितो.

पत्राचे संक्षिप्त स्वरूप :

प्रिय आजोबा,

तुम्हाला मी ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो, प्रार्थना करतो की ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो.. मला आईवडील नाहीत, बस फक्त तुम्हीच या जगात माझे आहात….

लिहिता लिहिता वान्काला आपले ६५ वर्षाचे बारीक, हसऱ्या डोळ्यांचे आजोबा आठवतात. ते एका मोठ्या श्रीमंत माणसाकडे रखवालदार असतात. ते आता काय करत असतील? हा विचार करत असताना, आपल्या गावाची त्याला आठवण येते. तिथल्या मोकळ्या हवेची, वातावरणाची.. आजोबाच्या दोन कुत्र्यांची..

तो पुढे लिहितो,

आजोबा काल रात्री मला मालकांनी खूप मारलं. माझे केस पकडून फरफटत अंगणात नेलं, त्यांच्या बेल्टने मला मारलं कारण त्यांच्या बाळाला झोका देत असताना मला झोप लागली. आणि मागच्या आठवड्यात मालकीण बाईंनी मला मासे साफ करायला सांगितले, मला जसे जमेल तसे साफ करायला लागलो तर मासा घेऊन त्याच्या तोंडाचा भाग जोरात माझ्या चेहऱ्यावर मारला..इतर नोकर माझी चेष्टा करतात.. मला गुत्यावरून दारू आणायला लावतात.. मालकांच्या वस्तू चोरायला सांगतात. आणि मालक हाताला येईल त्याने मारत असतात.. जेवायला काही मिळत नाही.. सगळ्या छान गोष्टी ते खातात, पोळीच्या तुकड्या शिवाय काही देत नाही.. भाजी, मिठाई काही नाही.. रात्री मुलगा उठला तर मला जागत त्याला झोका द्यावा लागतो, मला झोप पण मिळत नाही.

माझ्या प्रिय आजोबा, कृपा करून मला इथून घेऊन जा.. गावी न्या.. आता हे मला सहन होत नाहीये. मी हात जोडतो, पाया पडतो, मला घेऊन जा.. नाहीतर मी मरून जाईल.. लिहिताना वान्काला हुंदका येतो.. तो घाईघाईत लिहितो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. तुम्ही सांगाल ती काम करेन. मी चुकलो तर तुम्ही हवं तेवढं मारा.. पण इथं ठेवू नका.. आता सहन होत नाही.. वाटत की पायीच गावी यावं पण पायात घालायला काही नाही.. ( तिथल्या बर्फाळ प्रदेशामुळे बर्फदंश होण्याची भीती असते.)

मी मोठा झाल्यावर तुमची खूप काळजी घेईन. तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. या अभागी मुलावर दया करा.. तिकडच्या प्रेमळ मालकीण बाईंना माझ्या शुभेच्छा सांगा. त्यांनी मला लिहायला, वाचायला शिकवलं. त्यांच्या ख्रिसमस ट्री वर लटकवलेला अक्रोड माझ्यासाठी नक्की ठेवा.

आजोबा माझा बाजा कोणाला देऊ नका..

वान्का पत्र पाकिटात घालतो, जे त्याने काल गुपचूप विकत घेतल होत.. निर्विघ्नपणे पत्र लिहिता आल्याचे समाधान वान्काच्या चेहऱ्यावर येतं. तो पळत जाऊन पोस्टाच्या पेटीत पत्र टाकतो..

त्याने पत्ता लिहिला होता.

गावाकडील माझ्या आजोबांना..

घरी येऊन सोनेरी स्वप्नाच्या गुंगीत वान्का झोपी जातो.

ही कथा वाचून स्तब्ध झालेल्या मनाला, परिचित- अपरिचित असे अजून धक्के खायचे बाकी आहेत.

वान्काचे पत्र हे आज जगातील, भारतातील अनेक बालकामगारांचे मनोगत आहे. १२ जून जागतिक बालकामगार संरक्षक दिवस आहे. या बालजीवांच्या

वाट्याला आलेलं आहे, दैन्य, दुःख, दारिद्र्य आणि जीवघेणे अपार कष्ट… त्यांना ‘बालपणीचा काळ सुखाचा’ कधी अनुभवायला मिळतच नाही. जगात समानतेचा गवगवा होतो, स्वातंत्र्याचा जयघोष होतो. पण आजही बालकामगार ही समस्या आहे, तशीच आहे. या घडीला १२ दशलक्ष बालकामगार भारतात आहेत अशी आकडेवारी सांगते. या लेखात बालकामगार समिती, बालहक्क कायदा, सरकार, स्वयंसेवी संस्थाची काम वगैरे गोष्टीबाबत उहापोह केला नाही. कारण या विषयाबाबत अधिक माहिती घ्यायची इच्छा असेल तर अन्यत्र मिळेल. इथे त्यांच्या जगाचे थोडे खरेखुरे प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एखादी डॉक्युमेंटरी दृष्यस्वरूपात बघतो त्या स्वरूपात.

दृश्य-१

शहराच्या एका भागात सूर्याची किरणे धड पोहचत नाही अशा दाट वस्तीतील अंधाऱ्या खोल्यात आर्टिफिशियल ज्वेलरी, कलाकुसर असलेल्या वस्तू, स्कूलबॅग, खेळणी, अशा नानाविध वस्तू बनवणारे, सरावलेले हात.. मशीनपेक्षाही वेगाने हाताच्या होणाऱ्या हालचाली. या हातांना ‘चिमुकले हात’ म्हणण्याचे आपले धारिष्ट्य होणार नाही. कारण “चिमुकल्या” या शब्दाबरोबर येणारी निरागसता गोठून गेलेली..

डोळ्यात भकासपणा. शरीर कुपोषित.. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कामाला जुंपलेली. त्या कोंडवाड्यातच झोपायचं. आजूबाजूला कमालीची अस्वच्छता.

दृश्य : २

विविध ठिकाणचा कचरा गोळा करून, तो वेगळा केला जात आहे.. मोठ्या भट्टीत प्लॅस्टिक वितळून त्याच्या नवीन वस्तू बनवण्याचं काम सुरू आहे. जुन्या बॅटरीचे वरचे आवरण उचकटून त्यात परत नवीन रासायनिक मसाला भरून नव्या बॅटरी तयार करण्याचे काम ही मुलं करत आहेत.

असेच इंजेक्शनच्या सिरीज, सलाईनच्या बाटल्यांचे ‘नवीन पॅकिंग’ होत आहे. याला ‘रिसायकलिंग इंडस्ट्री’ म्हणतात.

‘कालिघर’ डॉक्युमेंटरीत यापेक्षा शब्दात उतरणार नाही. असे वाईट, काळं वास्तव दाखवलं आहे.

दृश्य : ३

एका छोट्या मुलीच्या मऊ केसाची वेणी घालणारी बेबीपेक्षा थोडी मोठी एक मुलगी. त्या बेबीचे केस विंचरत असताना आरशात आपल्या निस्तेज, कोरड्या केसाकडे  बघत असते. थोड्या वेळाने मेमसाब येऊन, बाहेर बसलेल्या आपल्या मैत्रिणींसाठी चहा बनवण्याचा हुकूम देतात. हॉलमध्ये बेबीचे विविध गुणदर्शन सुरू होत. ती मुलगी चहा बनवत असते. चहात साखर टाकताना साखर खाण्याची इच्छा होते. पण हिंमत होत नाही. कधी तरी भुकेमुळे बेबीचे उरलेलं बिस्कीट खाल्लं होत तर तिचा हात जोरात पिरगळला होता, दोन-तीन थोबाडीत बसल्या होत्या. बाहेर बेबी “जॉनी, जॉनी यस पापा, इटिंग शुगर, नो पापा!” म्हणत असते.…

दृश्य : ४

काडेपेटीच्या काड्यानां गुल लावण्याचे काम सुरू आहे. कागदाच्या गोल कांडीच्या आत स्फोटक दारू भरून वरती वाती लावण्याचे काम सुरू आहे. तो आहे फटाक्यांचा कारखाना. काम करणारे मुलं-मुली सर्व १० वर्षाच्या आतील. ज्यांनी मोकळी हवा घ्यायची ते सतत विषारी ‘दारुकाम’ करतात. फुफ्फुसांत सतत ते कण गेल्याने जास्त मुलं १२ वयाचे होण्याआधीच मरतात.

दृश्य :  ५

गालिच्याचं मोठं दुकान एकेक गालिच्याची किंमत १० हजार रु.पासून लाखात. एकसे बढकर एक नक्षीदार गालिचे. आत फाटक्या कपड्यात छोटी मुलं- मुली मशीनवर रंगीत धागे घेऊन गालिचे बनवत असतात. खाली मान घालून नक्षीकाम करत असतात.

दृश्य : ६

बांगड्या बनवण्याचा कारखाना. तप्त भट्टीसमोर बसून बांगड्या बनवण्याचं काम सुरू आहे. त्या तयार करताना काचेचा उकळता रस ट्रे मधून नेण्याचं काम ही छोटी मूलं करीत असतात. त्यांच्या अंगावर कुठलंही संरक्षक युनिफॉर्म नसतो. कुठला विमा नाही, कुठली आरोग्ययोजना नाही. असेच वीट भट्टी, हिऱ्याला पैलू पाडणे, दगड फोडणे, बांधकामावर विटा वाहणे, कापूस तोडणे, पिंजणे, शेतातील काम करणे, घातक रसायने हाताळणे या सर्व गोष्टीत अडकलेले कृश हात.. सुरकुतलेले हात.. अशी अनेक ठिकाणं, कारखाने, गॅरेज, घरे यात हे हात राबतात.. ॲसिडमुळे, भट्टीमुळे सतत काम केल्यामुळे ते डोळे, हात विचित्र दिसतात. डागाळलेले, जखमां झालेले, घट्टे पडलेले अकाली पडलेल्या जबादारीने ते हात, डोळे निरागस कसे राहतील? थकलेलं कुपोषित शरीर, जगण्याचा कोणताही रसरशीतपणा उरलेला नाही …

कैसे चुपचाप मर जाते हैं कुछ लोग यहाँ

जिस्म की ठंडी सी

तारीक सियाह कब्र के अंदर!

न किसी सांस की आवाज़

न सिसकी कोई

न कोई आह, न जुम्बिश

न ही आहट कोई

ऐसे चुपचाप ही मर जाते हैं कुछ लोग यहाँ

उनको दफ़नाने की ज़हमत भी उठानी नहीं पड़ती !

(गुलजार )

बालकामगार हा ज्वलंत प्रश्न अनेक प्रश्नांशी निगडित आहे. कोंबडी आधी का अंडं ? अशा स्वरूपाचा. बेकारी, गरीबी, अशिक्षित समाज, वाढती लोकसंख्या, समाजातील पैशाची लालची व्यापारीवृत्ती. स्वतः बालकाची शारीरिक, मानसिक अपरिपक्वता. आधी काय सुधारायचे ? बालकामगारांच्या अंधाऱ्या जगात खूप भयानक प्रश्न आहे यासाठी मुलं- मुली पळवणे, विकत घेणे, त्याचा गैरवापर करणे, लैंगिक अत्याचार, भीक मागण्यासाठी अंध, अपंग करणे..

एक मोठी माफिया यंत्रणा यात गुंतलेली आहे. पोलीस, राजकारणी याचे छुपे हितसंबंध आणि समाजाची कानाडोळा करण्याची वृत्ती.

१८ व्या शतकाच्या अखेरीस ग्रेट ब्रिटनमध्ये गिरण्यांच्या धुरांड्यातील काजळी साफ करण्यासाठी बालकांचा वापर केला गेला आणि स्वस्त दरात होणाऱ्या कामासाठी बालकामगार निर्माण झाले, ते आजतागायत आहेत. बालकामगारांना मागणी ही जास्त.. मागणी तसा पुरवठा. हे व्यापारी तत्व..

एकतर ही मुले मनाने कच्चे असतात, दडपशाहीने, मारहाणीने भीती दाखवून कमी पैशात जास्त काम करून मिळतं. संघटित होणं, आवाज उठणं वगैरे प्रकार होत नाहीत. आईबापांना आर्थिक आधार मिळतो. कधी कधी घर चालवण्याची संपूर्ण जबादारी त्यांच्यावर असते. बहिणीच लग्न, आजारी आईवडील. या दुष्टचक्रातून सुटका नसते.

या सर्वाचा समाजावर विपरीत परिमाण होत आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

वरकरणी जगाचा एक मोठा भाग व्यवस्थित सुरू असतांना, त्याखाली ही व्याधी हळूहळू पोखरत, भुसभुशीत करत आहे. एक अशी पिढी ज्यांचा समाजावर, कुटुंबव्यवस्थेवर किंबहुना स्वतःवर विश्वास नाही… नको त्या वयात पैशाची झालेली चुकीची ओळख, आयुष्यात असलेला कोरडेपणा, बाहेरील जगाचा झगमगाट, नको त्या पद्धतीने पोहचलेली लैंगिकता.. या सर्वांची गोळाबेरीज ती काय असणार? उद्दामपणे, अचकट -विचकट वागणारी, बोलणारी मुलं बघून धस्स होत असलं तरी त्या मागील वास्तव परिस्थिती लक्षात येत नाही. या प्रश्नांची चर्चा, परिषद एक तर पंचतारांकित हॉटेलमध्ये होते. ज्यांच्यावरती चर्चा होते ते अंधाऱ्या, कोंदट जगात जगत असतात.

यासाठी मिळणाऱ्या फंडचा विनियोग यांच्यासाठी होतोच असं नाही. भ्रष्टाचाराचा विळखा इथे पण आहेच. त्याचं बालपण थिजून गेलेलं.. त्या समस्येबाबतचा प्रश्न एखाद्या जागतिक सौंदर्य स्पर्धेतील सुंदरीला विचारला जातो, ती हसऱ्या चेहऱ्याने याचे ‘गंभीर’ व ‘आशादायी’ उत्तर  देते. या उत्तराच्या जोरावर ती विश्वसुंदरी बनते. पुढे मिळालेला मुकुट घालून, ही सुंदरी या मुलांच्याबरोबर मिसळते, त्याचं फोटो सेशन केलं जातं.

खरं तर घरातील कर्त्या स्त्री-पुरुषांना योग्य ते काम मिळून, दोन वेळेचा पोटाचा प्रश्न सुटायला हवा.

‘शेतकरी सन्मान योजने’प्रमाणे गरीब कुटुंबाला मुलाच्या कामकाजामुळे सरासरी किती पैसे मिळतात, त्याप्रमाणे सरळ बँकेत खात्यावर पैसे टाकायला हवे. अमेरिकेत गरीब कुटुंबाला प्रत्येक मुलाचे पैसे मिळतात. त्याला ‘चाईल्ड क्रेडिट’ म्हणतात. पण त्यासाठी मुलाचे शाळेत जाणे सक्तीचे आहे. या मुलांना शिक्षण हे मिळायला हवे. मुलांना शिक्षण नाही,

म्हणून कौशल्य नाही. आणि कौशल्य नाही, म्हणून गरीबी. त्यामुळे नवीन बालकामगार.. असे दुष्टचक्र कार्यरत असते.

जो पर्यंत भूक, शिक्षणाचा व कौशल्यांचा अभाव जात नाही. आरोग्य व माफक सेवा त्यांच्या पर्यत पोहचत नाही, तो पर्यत हा प्रश्न सुटणार नाही. त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी शक्य होईल.

आता तर कोरोनामुळे हा प्रश्न अधिक गंभीर होईल..

किंबहुना बालकामगारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी दाट भीती आहे. बेकारी, आर्थिक मंदीमुळे गुन्हेगारी वाढेल. त्यासाठी माफिया या मुलांचा वापर करून घेतील. मुलींचं शोषण अधिक प्रमाणात होईल..

अशा परिस्थितीत कमीत कमी आपल्यामुळे कोणा बालकांवर अन्याय होत तर नाहीये ना? याचा विचार जरी केला, या मुलांशी थोडं प्रेमाने वागलो तरी त्याचा जगण्यावरचा विश्वास तगून राहील.

खूप काही बदलायला हवं..

‘पेज थ्री’ या सिनेमात. पत्रकार कोंकणा सेन एका समाजसेविकेला आणि पोलिसांना सोबत घेऊन काही लहान मुलांना सोडवते. त्यात प्रतिष्ठित लोक अडकले असतात. त्यामुळे ती केस दाबली जाते. तिला नोकरीवरून काढून टाकलं जात. त्यावेळी अतुल कुलकर्णी हा देखील पत्रकार असतो, जो असे इशूज् नेहमी कव्हर करत असतो.

तो तिला समजावतो, “सच्चाई बताना जरूरी है लेकिन वो किस तरीके से बताई जाए ये समझ लेना उससे जादा जरूरी है।

इमानदारी के साथ साथ समझदारी होना जरूरी है.

We have to be in the system to change the system.”

वान्काचं पत्र हे जरी त्याच्या आजोबांना मिळाले नसले तरी आपल्या पर्यंत निश्चितच पोहचले आहे.

‘वान्का’च्या पत्राला काय उत्तर, कसा प्रतिसाद द्यायचा हे आता आपल्यावर आहे…

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0