वंशवादाचा विरोध हेच टोनी मॉरिसन यांचे जीवनध्येय

वंशवादाचा विरोध हेच टोनी मॉरिसन यांचे जीवनध्येय

ज्या वंशवादी हिंसांमधून ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर ही चळवळ सुरू झाली त्यांच्याबाबत त्यांनी अगोदरच इशारा दिला होता. ट्रम्प युगाने जे दमन सुरू केले त्याबाबतही त्यांनी भाकीत केले होते.

विज्ञान दिनानिमित्ताने विवेकाचा जागर करू या!
प्रत्येक जिल्ह्यात साकारणार ‘पुस्तकांचे गाव’
‘गावाबाहेर’च्या कविता

एक अद्वितीय कादंबरीकार आणि सांस्कृतिक भाष्यकर्ता टोनी मॉरिसन यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.लेखिका म्हणून त्यांची अर्ध्या शतकाची कारकीर्द १९७० साली सुरू झाली, जेव्हा त्यांच्या ११ कादंबऱ्यांपैकी पहिली, द ब्लूएस्ट आय नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांचा शेवटचा निबंधसंग्रह माऊथ फुल ऑफ ब्लडप्रसिद्ध झाला. या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी मानवी अनुभवाचे अनेक पैलू आणि अमेरिकन इतिहासातील क्षण या दोन्हींवर नवा प्रकाश टाकणारे लेखन केले.

मॉरिसन यांचा जन्म अमेरिकेतील रस्टबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातील लोरेन, ओहायो येथे झाला. त्यांचे मूळ नाव क्लोई वूफोर्ड असे होते. घरची परिस्थिती बेताचीच होती, मात्र सांस्कृतिक आणि भावनिक समृद्धी होती. त्यांचे वडील जवळच्या यूएस स्टील प्लँटमध्ये वेल्डर म्हणून काम करत होते, आणि आई आफ्रिकन मेथडिस्ट एपिस्कोपल चर्च कॉयरची महत्त्वाची सदस्य होती. त्यांचे आजी-आजोबा अलाबामा आणि जॉर्जिया येथून उत्तरेकडे स्थलांतरित झाले होते. त्यांचाही टोनी यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. संगीत, गोष्टी सांगणे आणि किंग जेम्स बायबल मधून वाचन हे त्यांच्या बालपणाचे अविभाज्य भाग होते, ज्यांचा त्यांच्या स्वतःच्या लिखाणातील नैतिकता आणि सौंदर्यशास्त्र घडवण्यात मोठा वाटा होता.

मॉरिसन यांनी १९४९-५३ या काळात वॉशिंग्टन डीसी येथील हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या कुटुंबातील महाविद्यालयात जाणाऱ्या त्या पहिल्याच होत्या. महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांना जो भेदभाव आणि वर्णद्वेष दिसला त्याने त्या हादरूनच गेल्या. त्यांनी १९५५ मध्ये कॉर्नेल येथे एमए इंग्लिश पूर्ण केले. शैक्षणिक क्षेत्रातील, प्रकाशन व्यवसायातील अनेक नोकऱ्यांनंतर १९६८ मध्ये त्या रँडम हाऊस येथे ट्रेड एडिटर झाल्या.

याच न्यू यॉर्क कार्यालयात त्यांनी सक्रियपणे अनेक काळ्या लेखकांच्या ललित वाङ्मयाला प्रसिद्धी दिली आणि अमेरिकन साहित्य विश्वात मोठा बदल घडवून आणला. यामध्ये टोनी केड बांबारा, लिऑन फॉरेस्टआणि गेल जोन्स यांचा समावेश होता. त्यांनी अँजेला डेव्हिस आणि मुहम्मद अली यांच्या आत्मचरित्रांचे संपादनही केले.

१९७७ मध्ये साँग ऑफ सोलोमन या आपल्या तिसऱ्या कादंबरीच्या यशानंतर मॉरिसन यांना पूर्णवेळ लिखाणावर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले. त्यांची ही कादंबरी १९५०-६० च्या सिव्हिल राईट्स युगावर केंद्रित आहेआणि तीबराक ओबामा यांची आवडती कादंबरी आहे.मिल्कमन डेड अशा विचित्र नावाच्या (पात्रांची नावे ही नेहमीच मॉरिसनकरिता खूप महत्त्वाची असत) नायकावरची ही कादंबरी मैत्री आणि कुटुंबाचे बंध यांच्यावर भाष्य करते.

मॉरिसन यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी बीलव्हेड, १९८७ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर फारशी प्रसिद्धी न मिळालेली, (कदाचित पुरेशी समजत नसल्यामुळे?) परंतु अत्यंत दर्जेदार अशी जाझ१९९२ मध्ये आली. प्रत्येक कादंबरीमध्ये समाजाने आणि इतिहासानेही ज्यांची उपेक्षा केली किंवा ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले अशा व्यक्ती केंद्रस्थानी आहेत.

मॉरिसन ज्यांना “विसरलेल्या आणि गायब झालेल्या” म्हणतात तशा या व्यक्ती आहेत. आणि याची सुरुवात त्यांनी आपल्या द ब्लूएस्ट आयया पहिल्या कादंबरीपासूनच केली, ज्यामध्ये त्यांनी उपेक्षित “कुरूप” काळी मुलगी, पेकोला ब्रीडलव्ह हिच्या अंत:स्थ आयुष्याचा शोध घेतला. अनेक काळ्या लोकांच्या जीवनाच्या कटू वास्तवाकडे लक्ष वेधताना, त्यांच्या सर्जनशील लवचिकतेचाही त्यांनी शोध घेतला. तसे करताना व्यापक ऐतिहासिक पट आणि त्याबरोबर स्वतंत्र व्यक्तीच्या मानसिकतेचे सखोल ज्ञान या दोन्हींची सांगड घातली.

नोबेल पुरस्कार

मॉरिसन यांना १९९३ साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले. जगभरात अनेक भाषांमध्ये त्यांचे साहित्य वाचले जाते, अभ्यासले जाते आणि नावाजले जाते. मात्र तरीही अनेक वर्षे अभ्यासक आणि प्रसारमाध्यमांनी अल्पसंख्यांक समुदायाच्या लेखिका म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले, एक वैश्विक ठसा उमटवणाऱ्या महत्त्वाच्या लेखिका म्हणून नव्हे.

अगदी आताही त्यांच्या लेखनाला “उच्च साहित्यिक” अभ्यासक्रमात सामील केले जात नाही. एकदा त्यांनीच खेदाने म्हटले होते, की त्यांचे साहित्य आफ्रिकन अमेरिकन अभ्यास विभागात, समाजशास्त्रात आणि अगदी कायदा विभागात सुद्धा शिकवले जाते. पण उच्चभ्रू विद्यापीठांच्या इंग्लिश विभागात त्याला स्थान नाही. त्यांचे ललित लेखन आणि त्यांचे असामान्य निबंध यांचे वैचारिक इतिहासात किती मोठे योगदान आहे ते अजूनही आपल्याला ओळखता आलेले नाही.

आधुनिकतेला त्यांनी प्राथमिकतेने काळ्यांचा अनुभव म्हटले. सौंदर्यवादी आणि राजकीय या दोन्हींमध्ये फरक करणे म्हणजे भ्रामक विभाजन आहे असे त्यांचे आग्रहाचे म्हणणे असे. वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांनी जाणूनबुजून आफ्रिकन संस्कृती आणि इतिहास यांना निरर्थक भासवले हे त्यांनी दाखवून दिले. हा सगळा त्यांचा महत्त्वाचा वारसा आहे.

जनतेच्या विचारवंत

त्यांनी त्यांच्या मानसन्मानांच्या जिवावर कधीच आयुष्य कंठले नाही. त्यांच्या प्रिन्सटन येथील प्राध्यापक म्हणून केलेल्या कामात, त्यांच्या २००६-०७ मध्येलूव्र येथील पाहुण्या क्यूरेटरम्हणून केलेल्या कामात, त्यांच्या निवृत्तीच्या काळात, अगदी शेवटपर्यंत त्या त्यांची पुस्तके आणि निबंध कसे वाचले जातात, समजून घेतले जातात याबाबत जागरूक राहिल्या. एक जनतेच्या विचारवंत आणि निर्भीड सामाजिक भाष्यकार म्हणून त्या कार्यरत होत्या.ज्या वंशवादी हिंसांमधून ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर ही चळवळ सुरू झाली त्यांच्याबाबत त्यांनी अगोदरच इशारा दिला होता. ट्रम्प युगाने जे दमन सुरू केले त्याबाबतही त्यांनी भाकीत केले होते.

अलीकडेचआलेल्या द फॉरेनर्स होम या माहितीपटात मॉरिसन यांनी गुलाम म्हणून आफ्रिकेतून बंदिवान करून जहाजावरून अमेरिकेमध्ये आणले जाणारे आफ्रिकन, हरिकेन कटरिनाच्या काळात न्यू ऑरलीन्स मधील काळ्या रहिवाश्यांचे अनुभव आणि सध्याचा जगभरातला स्थलांतरितांचा प्रश्न यांच्यातील साम्य शोधले आहे. अशा प्रकारचे संबंध जोडणे, आणि “घर” आणि “बेघर” यांच्याबद्दलची अस्वस्थ करणारी सत्ये उघड करून दाखवण्यासाठी त्यांच्या धारदार वक्तृत्वाचा त्यांनी केलेला उपयोग हे टोनी मॉरिसन नावाच्या या अद्भुत व्यक्तीच्या वारशाचे अचूक प्रतिक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या चित्रपटात, तसेच त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये जे अंतर्निहीत आहे, आणि त्यांच्या नोबेल पुरस्काराच्या भाषणात जे त्यांनी उघडपणे मांडले आहे, ते म्हणजे, भविष्य आपल्या हातात आहे. जगाला एक अधिक चांगली जागा बनवण्याची जबाबदारी महान कलाकारांची नाही, तर आपली आहे – वाचकांची आणि विचार करणाऱ्यांची. आपल्याला अजूनही कितीतरी काम करायचे आहे.

टेसा रॉयनॉन या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये रोदरमीयर अमेरिकन इन्स्टिट्यूट येथे टीचिंग अँड रीसर्च फेलो आहेत.

हा लेख The Conversationयेथून क्रिएटिव्ह कॉमन्स लायसेन्स अंतर्गत पुनर्प्रकाशित करण्यात आला. मूळ लेख.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0