वशिष्ठ नारायण सिंह – काळाच्या छायेत हरवलेला गणितज्ञ

वशिष्ठ नारायण सिंह – काळाच्या छायेत हरवलेला गणितज्ञ

आपल्याला गणिती रामानुजन यांचे चरित्र माहिती आहे. आपल्याला ‘सुपर ३०’ फेम आनंद कुमार अलीकडेच चित्रपटातून अधिक नेमकेपणाने समजले. पण रामानुजन ते आनंद कुमार या प्रवासातील भारतातील एक अदृश्य तारा स्मृतीच्या पटलावर कायमच दुर्लक्षित राहिला.

हरियाणामध्ये सापडले जोडीने पुरल्या गेलेल्या पहिल्या हडप्पन जोडप्याचे सांगाडे
कोविड-१९ लसः आयसीएमआर घाई करत आहे का?
चंद्र (अजूनही) आहे साक्षीला … नव्या शीतयुद्धाच्या !

(२ एप्रिल १९४६ — १४ नोव्हेंबर २०१९)

बिहार मधील भोजपुर जिल्ह्यातील बसंतपुर गावातील एक युवक. अगदी १७-१८ वर्षांचे पोरंच ते ! त्याला चार भावंडे. हे पोर सर्वात मोठे. शिकायला बी.एस. सी.च्या पहिल्या वर्गात. पण पूर्ण महाविद्यालयात सर्वांपेक्षा विज्ञानात फारच गती या मुलाला!

पहिल्या वर्षातच एकदा एका प्राध्यापकाबरोबर त्याचे भांडण झाले. वर्गात शिकवलेली पद्धत सोडून भलत्याच वेगळ्या मार्गाने त्याने गणिती प्रमेय सोडवले आणि शिक्षकाने त्याला चूक ठरवले. हे भांडण पुढे प्राचार्यांपर्यंत गेले. हा मुलगा बरोबर असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. एखादे गणिती कोडे किंवा शास्त्रीय प्रश्न सोडवण्याच्या विविध पद्धती असू शकतात आणि एवढ्या कमी वयात या मुलाने हे आत्मसात केल्याचे लक्षात आल्यावर प्राचार्यांना त्याचा अभिमान वाटला. गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये एवढा चुणचुणीत आणि हुशार होता हा मुलगा, की त्याला एकदम पदवीच्या म्हणजे बीएससीच्या तिसऱ्या वर्षांत प्रवेश देण्यात आला.  सन १९६४ मध्ये हा मुलगा बी. एस. सी. उत्तीर्ण झाला. त्याला थेट शेवटच्या वर्षात प्रवेश देणारे प्राचार्य होते प्रा. नागेंद्र नाथ.

पुढच्या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ कलिफॉर्निया येथील प्राध्यापक जॉन केली हे प्रा. नागेंद्र नाथ यांना भेट देण्यासाठी पाटणा येथील महाविद्यालयात आले होते. या ठिकाणी प्रा. केली यांना या मुलाच्या विज्ञान व गणितात असलेल्या अफाट झेपेबद्दल प्रा. नागेंद्र यांच्याकडून कळाले. त्यांनी या मुलाला अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी घेऊन जाऊ का म्हणून विचारणा केली.

मग काय, या पोराने मागे वळून पाहिलेच नाही. उमलत्या तारुण्यातील ज्या वयात बहुतांश मुले – मुली आपला जिल्हा, आपले राज्य ओलांडून जात नाहीत, त्या वयाच्या १९ व्या वर्षी हा मुलगा अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील युनिव्हर्सिटी ऑफ कलिफॉर्नियाच्या बर्कले कॅम्पसमध्ये जाऊन पोचला.

वशिष्ठ नारायण सिंह हा १९ वर्षांचा युवक जेव्हा बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मध्ये पोचला तेव्हा तेथे अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काची चळवळ चालू होती. त्याच वेळी ते विद्यापीठ अमेरिकेतील व्यापक सामाजिक चळवळींचे केंद्र बनले होते. त्यामध्ये व्हिएतनाम युद्ध व त्यातील हिंसेविरुद्ध असलेले आंदोलन हे प्रमुख होते. तिथेच वयाच्या २३ व्या वर्षी वशिष्ठ ने पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

त्यांनतर वशिष्ठ भारतात परतले. आय. आय. टी. कानपुर आणि भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता आणि मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या बरोबर काही महिने काम केले.  पण त्याच काळात वशिष्ठला मानसिक आजाराचा त्रास सुरु झाला. हा आजार नेमका कशामुळे सुरु झाला, यावर विविध मतांतरे आहेत. परंतु काही लोक असं म्हणतात, की त्यांचं लग्न मोडलं म्हणून त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला. हा आजार वाढतच गेला. पुढे हा आजार स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर स्वरूपात रूपांतरित झाला.

पीएच.डी. करत असताना वशिष्ठ भारतातील मित्राला पाठवलेल्या पत्रामध्ये एक गोष्ट नोंदवतात. ते म्हणतात, “माझ्यासारख्या गरीब घरातून आलेल्या मुलाला इकडची समृद्धी पाहून भलतेच आश्चर्य वाटते. यांच्याकडे गरजेपेक्षा कितीतरी अधिक गोष्टी आहेत. येथील लोक श्रीमंत आहेत आणि आपली मुले सुशिक्षित व्हावीत, यासाठी ते कोणताही प्रयत्न करायला तयार आहेत.” त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांना काही मानसिक त्रास होत असल्याचे किंवा तसे संकेत सापडत नाहीत. कोलकातामध्ये काम करत असताना त्यांना काही काळ तेथील लुंबिनी मानसोपचार रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आले होते. १९७२ मधील त्यांचे तेथील एक विद्यार्थी शशी मोहन श्रीवास्तव सांगतात, “आम्हाला ते टोपोलॉजी हा विषय शिकवायचे. त्यावेळी ते खूपच आजारी होते. ते एवढे आजारी असत की टोपोलॉजी विषयातील मूलभूत संकल्पना सुद्धा ते विसरून गेले होते.”

पुढे त्यांची तब्येत आणखी खराब झाल्यानंतर १९७६ पासून ते त्यांच्या वडिलांचे १९८७ मध्ये निधन होईपर्यंत रांची येथील केंद्रीय मानसोपचार संस्थेमध्ये उपचार घेत होते. १९९३ मध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी विशेष लक्ष घालून वशिष्ठ नारायण सिंह यांना बेंगळुरू जवळील एनआयएमएचएएनएस (NIMHANS) या संस्थेमध्ये उपचारासाठी रवाना केले.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी रसेल क्रो याने सुंदर अभिनय केलेला “अ ब्युटीफुल माईंड” हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटामध्ये सुद्धा जॉन नॅश या प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञाला स्किझोफ्रेनियाचा आजार झाला होता. स्किझोफ्रेनियानंतर त्यांच्या आयुष्यातील धडपड, संघर्ष अतिशय हळुवारपणे, संवेदनशीलपणे त्यात आला आहे. जॉन नॅश यांना १९९४ मध्ये त्यांच्या “नॅश इक्विलिब्रियम” या संशोधनासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते आणि २०१५ मध्ये त्यांना त्यांच्या “नॉनलिनीयर पार्शल डिफरनशिएशन समीकरण” साठी गणितातील सर्वात मोठे असे एबेल पारितोषिक मिळाले होते. जॉन नॅश यांच्यावर २००१ मध्ये आलेल्या “अ ब्युटीफुल माईंड” या मूळच्या सिल्व्हिया नासर यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाला अनेक ऑस्कर्स मिळाले होते.

वशिष्ठ नारायण सिंह यांचे संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील योगदान काय असा प्रश्न बरेच लोक आजकाल विचारत आहेत. जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून वयाच्या फक्त २३ व्या वर्षी पीएच. डी. प्राप्त विद्यार्थी संपूर्ण भारताने डोक्यावर घ्यावे असे कोणते काम केले यावर अनेक तर्कवितर्क करणाऱ्या बातम्या अलीकडे माध्यमांतून आल्या. काही बातम्यांत असं म्हणलं होतं, की त्यांनी आईन्स्टाईनच्या सापेक्षता संबंधित काही मूलभूत सिद्धांतांना आव्हान दिलं होतं. त्यांचं आव्हान हे गांभीर्याने घ्यावं असं म्हणायचे, तर वैज्ञानिक जगतातील कुणीही याची पुष्टी करणारे विधान मागील काही दिवसात केलेलं नाही. पण हे म्हणत असतानाच वशिष्ठ यांनी त्यांच्या पीएच.डी. मध्ये केलेलं काम मूलभूत स्वरूपाचं होतं का नाही ते पहावं लागेल. डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांचा संशोधन प्रबंध हा एकमेव असा प्रबंध आहे, जो गणितातील हिल्बर्ट स्पेसेस या संकल्पनेबद्दल सखोल छाननी करतो. हिल्बर्ट स्पेस या गणितातील संकल्पनेत अनंत मिती असलेल्या गणितीय रचनांचा विचार केला जातो. या प्रकारच्या संशोधनाचे महत्त्व एवढ्यासाठी आहे, की याला अनेक व्यावहारिक उपयोग आहेत आणि विशेष म्हणजे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल्स (QMM) म्हणजे याआधारे पुंज भौतिकशास्त्रामधील संरचनेवर अधिक प्रकाश पडतो. भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथील प्रा. देबाशिष गोस्वामी यांच्यानुसार वशिष्ठ यांनी लिहिलेल्या प्रबंधाला फक्त एकाच शोध निबंधाने संदर्भ म्हणून उद्धृत (Citation) केलं आहे. यावरून आपल्याला अंदाज येईल की वशिष्ठ यांचे संशोधन व्यापक पातळीवर वाचले गेले नाही किंवा दुर्लक्षित राहिले. त्या संशोधनाच्या दर्जाबद्दल आपण काही बोलू शकत नाही, कारण हिल्बर्ट स्पेस या संकल्पनेवर त्या काळात महत्त्वाचा प्रबंध लिहिणारे वशिष्ठ, त्यांच्या आजारपणामुळे मागे पडले, असं म्हणलं तर कदाचित त्यांच्यावर अन्याय होणार नाही.

१९६९ मध्ये चंद्रावर मानवी पाऊल ठेवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या अपोलो मिशन मधील रॉकेटचे उड्डाण होण्याच्या आधी काही तांत्रिक अडचणी आपल्या अचाट बौद्धिक क्षमतेने वशिष्ठ नारायण सिंह यांनी सोडवल्या असं त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सांगतात. ते किती खरं हे अजून सिद्ध झालं नाही परंतु जॉन नॅश प्रमाणे त्यांचे सुद्धा “अ ब्युटीफुल माईंड” होतं असं म्हणता येईल. या अनुषंगाने मानसिक आजार असणाऱ्या लोकांकडे आपण सगळे कसं पाहतो, यावर सुद्धा चर्चा व्हायलाच हवी. जेव्हा वशिष्ठ यांच्या आयुष्यातील घटनांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळायला लागले, तेव्हा त्यांच्या परिवारातील आणि त्यांच्या मित्रपरिवारातील लोकांनी सरळ त्यांना रुग्णालयाचा रस्ता दाखवला. यातील अधिक तपशील अजून हाती आलेला नाही. परंतु त्यांना उपचारांची नितांत गरज असल्यामुळेच मोठ्या नावाजलेल्या मानसोपचार केंद्रात पाठवावे लागले. परंतु ज्याप्रमाणे जॉन नॅश स्किझोफ्रेनियाच्या आजारातून तात्पुरते का होईना बरे होऊन १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात शैक्षणिक आणि संशोधन विश्वात परत आले तसे वशिष्ठ परत का येऊ शकले नाहीत, हा प्रश्न तर अनुत्तरणीय राहतोच.

या निमित्ताने आपण स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार काय आहे याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. स्किझोफ्रेनियाची लक्षणे आपण तीन प्रकारात समजू शकतो. पण या लक्षणात विविधता दिसून येते. १) वागण्यात दिसणारे बदल– स्वत:शीच हसणे व बोलणे, उगाचच हातवारे करणे, निरर्थक भटकत राहणे, स्वत:च्याच भ्रमात भटकत राहणे, आरोग्याची देखभाल न करणे, अस्वच्छ राहणे, कपड्यांचे भान नसणे, आक्रमक होणे, उगाचच कुणाला तरी घाबरणे. २) भावनिक बदल – परिस्थितीशी न जुळणारे, न शोभणारे भावनिक प्रदर्शन, चेहऱ्यावर वेडेपणाचा भाव, मख्ख चेहरा/ निर्विकार भाव, भावनांचा अनुभव स्वत:लाच जाणवत नाही, आक्रमक भाव, संशयी भाव ३) विचारांमधले बदल – असंबद्ध बोलणे, विचारात सुसूत्रता नसणे, विचारलेल्या प्रश्नांना विसंगत उत्तर देणे, दोन वाक्यांत वा कल्पनेत कुठलाच तर्कशुद्ध संबंध नसणे, त्यांच्या बोलण्याचा अर्थ न समजणे, अचानक मध्येच असंबद्ध बोलणे.

ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, “सुरुवातीच्या काळात जर स्किझोफ्रेनियासारखा आजार ओळखता आला तर उत्तम. कारण उपचारही लवकर सुरू करता येतात. जेवढे लवकर उपचार आपण सुरू करू शकू, तेवढे रुग्ण लवकर काबूत राहू शकतात. सर्वसाधारणपणे मनोविकारतज्ज्ञांकडे रुग्ण पोहोचतात तेव्हा त्यांचा आजार खूप वाढलेला असतो. काही रुग्णांमध्ये हा आजार भूकंपासारखा अचानक येऊन ठेपतो, पण सर्वसाधारणपणे बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार हळूहळू येतो. नातेवाईकांना व मित्र-मैत्रिणींना काही तरी बिनसले आहे हे कळते, पण नेमके काय ते कळत नाही. हे बदल पुढे येणाऱ्या तीव्र मानसिक आजारांची लक्षणे असतील याचा त्यांना अंदाज नसतो. या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये एकलकोंडेपणा, उगाचच वा बिनबुडाच्या गोष्टींनी मोठी चिडचिड करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, उगाचच स्वत:शीच हसणे, झोप न येणे, विचित्र बोलणे, निर्विकार राहणे इ. गोष्टींचा समावेश होतो.”

२०१० मध्ये Access Advances in Psychiatric Treatment या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षानुसार स्किझोफ्रेनिया सारखे आजार बरे होऊ शकतात पण त्यांचे प्रमाण हे खूप कमी असते. या निष्कर्षानुसार स्किझोफ्रेनियाची लक्षणे कमीत कमी असण्याचे प्रमाण जर सलग ६ महिने कायम राहिले तर सातत्यपूर्ण अशी निरोगी स्थिती राहून २०-६० % स्किझोफ्रेनियाचे रुग्ण बरे होऊ शकतात. स्किझोफ्रेनिया किंवा कोणत्याही मानसिक आजारांबद्दल आपल्याकडे जागृती खूप कमी आहे. उपचारांना कौटुंबिक आणि सामाजिक सहकार्य, वातावरणाची जोड मिळाली असती, तर कदाचित वशिष्ठ बरे सुद्धा झाले असते आणि त्यांना आपल्या पुढील करियर मध्ये त्यांचे संशोधन आणखी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवता आले असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आज जगभरात दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना हा मानसिक आजार आहे. स्किझोफ्रेनिया झालेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात मानहानी, अपमान आणि शोषण या सर्वाना सामोरे जावे लागते. त्यांच्या मानवी अधिकारांची सुरक्षा हा तर त्याहून जास्त दुर्लक्षित मुद्दा आहे. त्यासाठी एकाच वेळी वैद्यकीय उपचार आणि मानसिक आधार या दोन्हींची गरज असते. त्यांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी त्यांना सुसह्य अशी घरे, सुसह्य अशा रोजगाराच्या संधी आणि त्यांना अधिक सुखकर, आनंदी जीवन जगण्यासाठी कुशल मनुष्यबळाची पुढील काळात निश्चितच गरज लागणार आहे. पण हे सर्व करण्याआधी स्किझोफ्रेनिया बरा होऊ शकतो यावर आपण सर्वानी विश्वास ठेवायला हवा.

राहुल माने, विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0