अभिनयातील ‘देव’ हरपला

अभिनयातील ‘देव’ हरपला

चित्रपटसृष्टीमध्ये गेले अनेक दशके आपल्या कसदार अभिनयाने अढळ स्थान प्राप्त केलेले अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले. सदाबहार आणि लाघवी अभिनेता अशी ओळख असलेल्या या अभिनयातील ‘देवा’च्या कारकिर्दीवर टाकलेला प्रकाश.

कोल्हापूर हे कलाकारांचे शहर. या शहराने अनेक कलावंत चित्रपटसृष्टीला दिले. रमेश देव हे त्यातीलच एक. त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, एवढे मोठे योगदान त्यांचे आहे. एक काळ तर असा होता, की रमेश देव आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची. काही अभिनेते हे चित्रपटसृष्टीला लाभलेले मोठे वरदान आहे, असेच म्हणावे लागेल. प्रत्येकाला कोणी ना कोणी आदर्श असतो, ज्याच्याकडे पाहून आपण मोठे होण्याची स्वप्ने पाहतो. अभिनयातील सम्राट कसा असावा? अभिनयात सहजता कशी असावी? अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यांना करायला मिळालेल्या विविधांगी भूमिका आणि त्यांची त्या भूमिकेबद्दल असणारी प्रामाणिक लकब अनेकांना खूपच भावून गेली. त्यांना या क्षेत्राचे लहानपणापासून कुतूहल आणि आकर्षण वाटत होते. आपणही इतर अभिनेत्यांप्रमाणे असेच काहीतरी वेगळे करून दाखवायचे की, जेणेकरून प्रेक्षक आपल्याला ओळखतील, असे त्यांचे मत होते. त्यामुळे अभिनयाकडे ते गंभीरपणे पाहायला लागले. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा विविध रूपात यशस्वी ठरलेले, मराठी तसेच हिंदी चित्रपटात नावाजलेले एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व म्हणजेच चिरतरुण अभिनेते रमेश देव.

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी, १९२९ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते मूळचे राजस्थान येथील जोधपूर या गावचे. त्यांचे घराणे ठाकूर आहे. राजश्री शाहू महाराज यांच्यामुळे ते ‘देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, “तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात.” तेव्हापासून ‘देव’ हे नाव रूढ झाले. रमेश देव यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे चाहते होते. एकदा छोट्या रमेशला घेऊन पृथ्वीराज कपूर यांच्या सेटवर घेऊन गेले होते. त्यावेळी सेटवर काम करणार्‍या छोट्या मुलाकडून दिग्दर्शकाचे समाधान होईना, तेवढ्यात त्यांचे लक्ष छोट्या रमेशकडे गेले. त्यांनी विचारले, “बेटा, तू काम करणार का?” छोट्या रमेशने होकार दिला व हेच त्यांचे चित्रपटसृष्टीतील पहिले काम. मात्र, त्यांनी लगेचच अभिनयाची सुरुवात केली नाही. त्यांनी काही नाटकांमध्ये कामे केली. १९५१ मध्ये ‘पाटलाची पोरं’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली.

रमेश देव यांनी नायकाच्या भूमिका केल्याच; पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. ‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीय! मराठीत यापूर्वी खलनायक रुबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ‘ग्लॅमर’ मिळवून दिले. तरीही त्यांनी स्वतःला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा ‘सर्जा’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला.

अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखर मनापासून रंगवला. रमेश देव या व्यक्तीमध्ये उत्कृष्ट नायक होण्यासाठी लागणारे सौंदर्य, मेहनत, अभिनय कौशल्य अशा सर्वच गोष्टी आहेत. रमेश देव त्यांच्या पत्नी सीमा देव यांच्याबरोबर त्यांची जोडी अनेक चित्रपटांमध्ये दिसली. या जोडीने अनेक चित्रपटांत नायक व नायिका या भूमिकेत काम केले आहे. ‘दोस्त असावा तर असा’, ‘भिंगरी’ हे त्यांचे चित्रपट गाजले. स्वतःच्या निर्मिती संस्थेद्वारे त्यांनी ‘सर्जा’ हा चित्रपट काढला. तसेच त्यांचा ‘जेता’ हा एक चित्रपट उत्तम होता. चित्रपटात काम करताना त्यांनी नेहमीच खुशमिजाज, आशादायी व्यक्तिमत्त्वे साकारली आहेत. ‘देवघर’, ‘भिंगरी’, ‘भैरवी’, ‘आधी कळस मग पाया’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘एक धागा सुखाचा’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘प्रेम आंधळं असतं’, ‘सोनियाची पावले’, ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘येरे माझ्या मागल्या’, ‘आलिया भोगासी’, ‘आई मला क्षमा कर’, ‘राम राम पाव्हणं’, ‘अवघाची संसार’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘सात जन्माचे सोबती’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘आलंय दर्याला तुफान’, ‘दोस्त असावा असा’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी रंगविलेल्या भूमिका रसिकांच्या मनावर आजही भुरळ घालतात. त्यांचा साधेपणा, एक साधी सरळ स्माईल, प्रेमळ स्वभाव आणि अभिनयातली सहजता या सर्व गोष्टी रसिकप्रिय आहेत. खलनायक कसा रुबाबदार असू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या डोळ्यातील तेज अभूतपूर्व होते.

त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसमवेत काम केले. कलाक्षेत्रात आल्यानंतर तुम्ही हळूहळूच स्वतःचं अनुभवाने समृद्ध होत असता. काळ सारखा बदलत असतो. जे जेव्हा काही वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत आले, तेव्हा तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक आहे. त्यामुळे तेव्हाचे नियम आज लागू होणार नाहीत. प्रत्येकाचे काम येथे स्वतःलाच करावे लागते. अधिकाधिक चांगले काम कसे करता येईल याचाच विचार करत राहावा. अजूनही रमेश देव हे कुठल्याच त्यांच्या भूमिकेवर खूश झालेले नाहीत. असा त्यांचा हा प्रवास अजूनही सुरूच आहे, असे अगदी हक्काने सांगणारे रमेश देव हे खरोखरच अभिनयाचे सम्राट आहेत. हिंदीमध्ये त्यांनी ‘मोहब्बत इसको कहते है, ‘लव्ह अ‍ॅण्ड मर्डर’, ‘जीवन मृत्यू’, ‘जादूटोना’, ‘जनम जनम का साथ’, ‘भोलाभाला’, ‘दादा’, ‘दहशत’, ‘खुद्दार’, ‘दौलत’, ‘निश्चय’ व ‘कानून कानून है’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचे चौफेर रंग दाखविले.

अभिनयाच्या क्षेत्रात अनेक जण आपले पाय रोवू पाहतात. त्यातले सगळेच यशस्वी होतात, असे नाही. आपल्याकडे अजूनही अभिनयाकडे करिअरसाठीचे क्षेत्र म्हणून पाहिले जात नाही. असे असूनही घरच्यांनी या क्षेत्रात जाण्यासाठी रमेश देव यांना पाठिंबा दिला. अभिनयात करिअर करत करताना चित्रपटसृष्टीच्या अफाट महासागरात आपला मुलगा कितपत तग धरेल, अशी चिंता त्यांच्या पालकांना वाटत होती. पण, त्यांच्या घरी याच्या उलट परिस्थिती होती. घरी अभिनयाचा कोणताही वारसा नसला, तरी रमेश देव यांच्या वडिलांनी नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिले आणि आत्मविश्वासही दिला. ‘रमेश देव यांना वास्तववादी कामे करायला आवडतात. दिलेल्या भूमिकेत ते थेट घुसतात. त्यामुळेच ते त्या भूमिकांना योग्य न्याय देतात. कुठल्याही भूमिकेबद्दल सांगायचं ठरलं, तर “एखाद्या भूमिकेत आपण मनापासून शिरलं की सगळं आपोआप जमतं. फक्त आपली आपल्या कामावर श्रद्धा हवी, असे रमेश देव हक्काने सर्वांना सांगत असत. अनेक मालिकांचा व चित्रपटांचा त्यांच्या आयुष्याच्या चढत्या आलेखासाठी हातभार होता. अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या मदतीमुळे या क्षेत्रात त्यांना भक्कमपणे पाय रोवता आले. अभिनयाची उपजत आवड, यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात रमेश देव यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या असल्या, तरी अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, असे ते नेहमी म्हणत होते. जिद्द व मेहनतीच्या भरवशावर अभिनेता म्हणून प्रस्थापित होऊन त्यांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले होते. रमेश देव यांनी ‘प्यार के दो नाम, एक राधा एक श्याम’, ‘डोली सजा के’ यांसारख्या काही हिंदी मालिकांमध्ये काही वर्षांपूर्वी अभिनय केला होता. अनेक मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकिर्द चांगलीच गाजलेली आहे. अशा या सदाबहार अभिनेत्याला मनापासून श्रद्धांजली.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS