शौकत आपा : सर्जनशील कलावंत

शौकत आपा : सर्जनशील कलावंत

शबानाजी सांगतात की रंगमंच ही खूप मोठी, श्रेष्ठ अशी चीज आहे ही पहिली जाणीव मला आईने दिली आहे. ती तिचं काम इतकं सिरीयसली घ्यायची, की ती जणु तेव्हा ती भूमिका जगत असायची.

जनता संवादासाठी सरकारचे नवे मीडिया व्यवस्थापन
महाकाय जहाज हलले, ‘सुएझ’मधील कोंडी सुटली
फेसबुकच्या आँखी दास यांच्याकडून मोदींना थेट मदत

कोण होत्या शौकत कैफी?

काय होती नेमकी त्यांची ओळख?

प्रख्यात गीतकार शायर कैफी आझमी यांची पत्नी?

देश-विदेशात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी किंवा प्रख्यात सिनेमॅटोग्राफर बाबा यांची आई?

का प्रख्यात शायर गीतकार पटकथाकार जावेद अख्तर यांच्या सासूबाई?

हे सगळे तर त्या होत्याच! पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्या स्वतःही अतिशय ताकदीच्या अभिनेत्री होत्या…..

अतिशय चांगल्या माणूस होत्या. अतिशय प्रांजळ होत्या…. स्पष्टवक्ता होत्या आणि अंतर्बाह्य कलावंत होत्या

माझी त्यांची पहिलीच भेट झाली शबाना आजमी यांच्याकडे. मी मुलाखतीसाठी शबानाजींकडे गेलेली असताना त्यांनी माझी ओळख शौकत आपा यांच्याशी करून दिली शौकतजींनी त्यांचं आत्मचरित्र ‘याद कि राहगुजर’ हे मला भेट दिलं. ते मी वाचलं. ते मला प्रचंड आवडलं. मी त्यांच्या प्रेमातच पडले म्हणा ना. कारण एका सधन मुस्लिम घरात वाढलेल्या, कफल्लक पण अव्वल दर्जाचा कलावंत नवरा स्वतःहून पत्करलेल्या एका अतिशय स्वतंत्र विचाराच्या स्त्रीचं ते आत्मचरित्र होतं. त्यात कसलीही लपवाछपवी नव्हती. तो एका मोठ्या काळाचा आलेख होता. निजामाच्या आधिपत्याखालील हैदराबाद संस्थान ते स्वतंत्र भारतातील, अत्याधुनिक मुंबईतील आयुष्य असा तो पट होता, आणि त्यांनी तो तितक्याच प्रांजळपणे, कोणताही मालमसाला न लावता मांडला होता. त्यात कसलाही अभिनिवेश नव्हता. जे सोसावं लागलं त्याची खंत नव्हती. उत्कट जीवनरस मात्र पुरेपूर होता.

त्यांच्या पुढच्या प्रत्येक भेटीत मला हेच जाणवत गेलं. त्यांचं व्यक्तिमत्व अधिकाधिक उलगडत गेलं…..

नंतर एकदा माझ्या ‘माझी आई’ या स्तंभासाठी मी शबानाजींची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून शौकतजी यांचं व्यक्तिमत्व अधिकच उलगडलं.

‘आई म्हटल्यावर पहिलं काय डोळ्यासमोर येतं?’ असं विचारल्यावर शबानाजी पटकन म्हणाल्या होत्या, ‘आई म्हटलं की मला सुगंध आठवतो. हा सुगंध फक्त ती लावत असलेल्या अत्तराचा नसतो. तर तो असतो तिच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वाचा. हे व्यक्तिमत्व इतकं परिपूर्ण आहे की माझी आई हीच माझी ताकद बनली आहे. माझी विचार करण्याची शक्ती म्हणजे माझी आई आहे आणि माझी सर्जनशीलता म्हणजे माझी आईच आहे’

त्यांच्या अवघ्या दोन-तीन वाक्यांमध्ये शौकतजींचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व सामावून गेलं आहे.

शौकतजी या हैदराबादच्या एका अबकारी अधिकाऱ्याची मुलगी. त्यामुळे घराणं सधन. पण हे घराणं केवळ पैशानं सधन नव्हतं, तर मुक्त विचारांचे वारेही तिथे वाहत होते.

त्यांचे वडील स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते होते, तर आजोबा व काका कट्टर विरोधक. पण त्यांच्या वडिलांनी घरातल्या सर्वांचा विरोध पत्करून लियाकत रियासत या त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींना ३८ साली मिशन स्कूलमध्ये दाखल केलं होतं. त्या शाळेत सहशिक्षण होतं. म्हणजेच मुलींच्या बरोबरीने मुलं शिकत असत. बुरख्याचा प्रश्न तर त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या लग्नाच्या वेळेसच निकाली काढला होता. एका छोट्याशा खेड्यातील मुलीला लग्न करून आणताना त्यांनी तिचा बुरखा दिल्ली स्टेशनवरच उतरवला आणि कायमचा बॅगेत बंद केला. त्यामुळे मुलींना बुरखा वापरायला लागण्याची शक्यताच नव्हती. वडील इंग्रजी, उर्दू व तेलुगूचे उत्तम जाणकार. मुलांना शिकवणं ही त्यांची आवड तर घर उत्तम प्रकारे चालवून गरजवंतांना दानधर्म करणं ही आईची आवड.

स्वतः शौकतजींना मात्र आवड होती ती ओढण्या रंगवायची. त्यांच्याकडे कुडत्यावरील डिझाईन जसंच्या तसं ओढणीवर रंगवण्याचं कसब होतं. खरं सांगायचं तर त्यांच्या अंगात अनेक कला होत्या. चित्रकलेपासून शिवणकामापर्यंत आणि गाण्यापासून अभिनयापर्यंत…. तीच त्यांची कलावंताची दृष्टी जशी ओढण्या रंगवताना दिसून येत होती, तशीच मुंबईला रेड फ्लॅग हॉलमध्ये कम्युनमधल्या छोट्याशा खोलीत राहतानाही दिसून येत होती. लग्नापूर्वी ब्रह्मचाऱ्याची मठी असलेल्या त्या खोलीला शौकत आपांनी स्वर्ग बनवून टाकला होता. त्यांच्या साड्यांचे त्यांनी शिवलेले पडदे, साड्यांची शिवलेली सुंदर गोधडी… बँकेवर टाकून त्याचे बनवलेले आसन… कम्युन मधील सगळ्यांसाठी सगळ्यांचा एकत्र उकळणारा चहासुद्धा अल्युमिनियमच्या भांड्यात ओतून पीत असताना, कडेला तांब्याच्या पात्रात ठेवलेली आवारातील झाडांची सुगंधी फुलं….. यामुळे पैसे नसतानाही ती इवलीशी खोली सुगंधाने आणि स्वर्गसुखाने भरून जात होती.

लग्न होऊन आल्या तेव्हा त्या दिवसभर काहीच करत नसत. खोली सजवण्यात व अधे मध्ये कॉम्रेडसाठी काहीतरी खास पदार्थ बनवून त्यांच्या जीवनात आनंद भरणे एवढाच त्यांचा दिनक्रम होता. त्यात आमूलाग्र बदल घडला तो कॉम्रेड पी. सी. जोशींमुळे.

झालं असं होतं की सकाळचा चहा समारंभपूर्वक आरामात पिता यावा ही त्यांची आवड त्या कम्यूनमध्ये राहायला आल्या तरी बदलली नव्हती. हे ‘टी कोझी’चं वेड इतकं जबरदस्त होतं की कुणी कुठेही गेलं तरी त्या त्यांना त्यांच्यासाठी ‘टी कोझी’च आणायला सांगायच्या. असा त्यांच्याकडे ‘टी कोझी’चा खूप मोठा संग्रह आहे. तर कम्युनमधील सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा त्या ‘टी कोझी’ तयार करत होत्या, तेव्हा कॉम्रेड पी. सी. जोशी त्यांच्या खोलीत आले. त्यांनी विचारलं की सबंध दिवस काय करतेस? त्या शरमून म्हणाल्या काहीच नाही. त्यावर ते अतिशय मृदू आवाजात शौकतजींना म्हणाले की कम्युनिस्ट पतीची पत्नी कधी बेकार बसत नाही. तिने तिच्या पतीबरोबर पार्टीचं काम करायला हवं. पैसे कमवायला हवेत आणि नंतर जेव्हा मुलं होतील तेव्हा त्यांना उत्तम नागरिक बनवायला हवं. तरच खऱ्या अर्थाने ती कम्युनिस्ट पतीची पत्नी ठरू शकते

हे शब्द म्हणजे शौकतजी यांच्या काळजावर कायमची कोरली गेलेली एक रेघ ठरली. पण पैसे कमवायचे तर काय करणार? कारण त्या जेमतेम मॅट्रीक होत्या. त्यांनी विचार केला की आपण शाळेच्या स्नेहसंमेलनात दर वर्षी नाटकं करायचो. त्यामुळे रेडिओवरच्या नाटकात आपण भाग घेऊ शकतो. आपला आवाज चांगला आहे. चित्रपटातल्या गाण्यांत आपल्याला अगदी कोरसमध्ये जरी गायला मिळालं, तरी आपण कमावू शकतो. कैफी म्हणाले की ठीक आहे. ते त्यांना रेडिओ स्टेशनवर घेऊन गेले. तिथे दुबे नावाचे त्यांचे मित्र होते. त्यांनी यांची ऑडिशन घेतली. त्यात त्या पास झाल्या आणि रेडिओवरील नाटकात काम करण्यासाठी त्यांना जेव्हा पहिल्यांदा १० रुपये मिळाले तेव्हा तर त्यांना जो अत्यानंद झाला त्याचं वर्णन करणं कठीण आहे असं त्या सांगायच्या. नंतर एस. डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी कोरसमध्येही गायलं. त्याचे त्यांना ३० रुपये मिळाले आणि त्या अशी कामं करतात हे कळल्यावर त्यांना डबिंगची कामं मिळायला लागली. त्याचे कधी दोनशे किंवा पाचशे रुपये त्यांना मिळत. त्यानंतर के ए अब्बास यांच्या पत्नीमुळे त्या ‘इप्टा’त आल्या. इप्टा, पृथ्वी थिएटर मधून काम करत त्यांची अभिनयातील कारकीर्द बहरत गेली.

‘पृथ्वी थिएटर’, ‘इप्टा’, ‘थिएटर ग्रुप’, ‘त्रिवेणी नाट्यसंस्था’, इंडियन नॅशनल थिएटर आदी अनेक नाट्यसंस्थांची सुमारे ३० च्या आसपास नाटकं त्यांनी केली. ‘उमरावजान’, ‘सलाम बॉम्बे,’ ‘हकीकत’, ‘हीर रांझा’, ‘गर्म हवा’सारख्या १५ गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘उमरावजान’मध्ये त्यांनी साकारलेली भूमिका तर विसरुच शकत नाही अशी! तीच भूमिका नंतरच्या ‘उमरावजान’मध्ये शबानाजी यांनीही साकारली. पण त्या विलक्षण ताकदीच्या अभिनेत्री असूनही त्या शौकतजी यांच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकलेल्या नाहीत. त्याही आनंदाने व अभिमानाने हे मान्य करतात. अभिनेत्री म्हणून शौकतजी यांची ताकद जर अनुभवायची असेल तर ती भूमिका पुन्हा पुन्हा बघावी अशी आहे.

शबानाजी सांगतात की रंगमंच ही खूप मोठी, श्रेष्ठ अशी चीज आहे ही पहिली जाणीव मला आईने दिली आहे. ती तिचं काम इतकं सिरीयसली घ्यायची, की ती जणु तेव्हा ती भूमिका जगत असायची. सतत तेच संवाद बोलत असायची. तेच कपडे घालायची. माझे वडील तिच्याकडून ते संवाद पाठ करून घ्यायचे. एकदा मात्र गंमत झाली. तिचं एक नाटक होतं ‘पगली’. तिची कामं करता करता त्याचे संवाद ती म्हणत होती. धोब्याला  कपडे देताना एकदा उठून ती त्वेषाने म्हणाली, ‘उठो. गिरा दो बम के गोले’. तो घाबरला. ‘मेमसाब पागल हो गई’ म्हणून घाबरून पळत सुटला. मीही घाबरले. तेव्हा मला अब्बांनी समजावलं. ते म्हणाले, तुझी आई  पागल झालेली नाही. तू रडू नकोस. उलट तुला अभिमान वाटायला हवा की तुझ्या आईची कामावरील रंगमंचावरील निष्ठा किती श्रेष्ठ दर्जाची आहे ते बघ. ती एकही क्षण वाया घालवत नाही. मला खरंच तिचा अभिमान वाटला. अवघ्या १० दिवसांच्या तयारीवर तिने तो प्रयोग घर – नोकरी हे सगळं सांभाळून यशस्वी करून दाखवला. तिची रंगमंचावरील निष्ठा किती अतूट होती याचे असे अनेक किस्से सांगता येतील. एकदा तिच्या ‘आफ्रिका जवान परेशान’ या ए. के. हंगल यांच्या बरोबरच्या ‘इप्टा’च्या नाटकाचा हैदराबादला प्रयोग होता. त्याची फक्त ८ तिकिटं विकली गेली होती. ८ लोकांसाठी प्रयोग करण्यापेक्षा तो रद्द करावा असं तिथल्या आयोजकांचंही म्हणणं होतं.

मात्र शौकतजींनी ते मानलं नाही. त्या ८ रसिकांची कदर करण्यासाठी त्यांनी जीव ओतून तो प्रयोग केला आणि ‘शो मस्ट गो ऑन’ हा संस्कार माझ्यावर रुजला तो कायमचा. मी अभिनेत्री झाल्यावर मीही कलेशी अशीच बांधिलकी ठेवावी याबाबतही ती नेहमीच दक्ष राहिली आहे. एकदा मी झोपडपट्टीवासीयांसाठी आंदोलन केलं. आम्ही दंगल केली नसली तरी दंगलीचा आरोप ठेवून आम्हाला अटक केली गेली. त्यामुळे मी चिडले. मी जामीन घेणार नाही असा माझा निर्धार ठाम होता. त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या, ‘तुम्हारी अमृता’ या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग रद्द होण्याची कल्पनासुद्धा तिला मानवणारी नव्हती. जावेद बरोबर ती पोलीस ठाण्यावर आली आणि प्रेक्षकांप्रति कलाकार म्हणून असलेल्या माझ्या बांधिलकीची मला जाणीव करून देऊन मला जामिनावर सोडवून घेऊन गेली. चित्रीकरणाच्या वेळीही कोणीही सहकलाकार उशिरा येतो म्हणून मी उशिरा जाईन असं म्हटलं तर ते तिला चालायचं नाही. तुझी बांधिलकी निर्मात्यांशी आणि कलेशी आहे, ती तू पाळलीच पाहिजेस असं ती सांगायची.’

त्यामुळेच त्या कैफींसाठीच नव्हे तर मुलांच्यासाठीही त्यांची ताकद बनल्या. कैफींसाठी तर त्या मिजवाँसारख्या छोट्याशा खेड्यात जाऊन सामाजिक काम तर करत राहिल्याच, पण ८६ साली शबानाजी जेव्हा झोपडपट्टीवासीयांसाठी मुंबईत उपोषणाला बसल्या, तेव्हा अतिशय आजारी असतानाही जिवाचा रेटा करून त्या रोज जुहूहून कुलाब्याला उपोषणस्थळी जायच्या, घोषणा द्यायच्या आणि परत यायच्या. शबानाजी यांच्या अपरोक्ष जावेद (त्यांच्या भाषेत जादू–जावेद यांचे लाडाचं नाव) समोर रडायच्या, पण त्यांनी शबानाजी यांच्यासमोर एकदाही डोळ्यातून पाणी काढलं नाही.

शेवटी तर कैफींना त्यांच्या मिजवाँ या गावात जाऊन गावाच्या विकासासाठी काम करायचं होतं. त्यांची इच्छा मानून स्वतः वृद्धावस्थेत पोहोचलेल्या शौकतजी रेल्वेच्या थर्ड क्लासने तिथे गेल्या. तिथे राहिल्या. तिथल्या लोकांमध्ये त्यांनी काम केलं…. एकूणच ही प्रेम कहाणी अनोखी होती….. एकमेकांचे बहिश्चर प्राण असल्यासारखे ते जगले. कैफी गेल्यावर शौकत आपा एकट्या पडल्या. मुलं- जावई- सून या सगळ्या गराड्यात असूनही त्यांच्या कैफींना शोधत राहिल्या…. ‘तुमच्याशिवाय जगण्याच्या या यातना मला आणखी किती काळ सहन करायला लागणार आहेत? असा करूण सवाल करत आयुष्याचा सामना करत राहिल्या. औषधोपचारासाठी पैसे नसल्याने त्यांचं पहिलं बाळ दगावलं, पावलोपावली संघर्ष करावा लागला, अनेकदा उपासमार, कुचंबणा सहन करावी लागली तरी मनातली खंत व वेदना मनात लपवून आयुष्याचा उत्सव साजरा करत राहिल्या. इतरांच्या आनंदात आनंद मानत राहिल्या….

अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी जगण्याचा हा सोहळा संपला…. शौकत आपा दिगंताच्या प्रवासाला निघून गेल्या….

एक पर्व संपलं!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: