‘टीआरपी’चा बळी

‘टीआरपी’चा बळी

पुण्यातील टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोविड केअर रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. हा सरकारी अनास्थेचा बळी तर आहेच, पण माध्यमांच्या अग्रक्रमाचाही प्रश्न आहे.

‘आप’चाच भाजपला करंट
‘पुरामुळे नुकसान रोखण्यासाठी कठोर निर्णय हवेत’
बोरिस जॉन्सन

सुशांत सिंगचा कसा खून झाला आहे. रिया चक्रवर्ती आता सीबीआयसमोर कधी हजर होणार. मंदीरे कधी उघडणार. घंटा आंदोलन. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचे बेछूट आरोप, राणे पिता-पुत्र आणि पंतप्रधानांचे गुणगान करणाऱ्या माध्यमांना वेळ झालाच, तर आरोग्य व्यवस्थेचे दिवाळे कसे वाजले आहे, हे सांगण्यासाठी एका पत्रकाराचा बळी जावा लागला आहे.

वेळेत सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने पांडुरंग यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने केला आहे. पांडुरंग यांच्या बहिणीने आपल्या भावाच्या मृत्यूला शासनालाच जबाबदार धरले आहे. त्या म्हणाल्या, “सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आहेत. या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरु असून प्रशिक्षित डॉक्टर्स नाहीत. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून कोविड सेंटर उभारले. मात्र, ते कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करु शकले नाहीत. त्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाला.”

पुण्यामध्ये सध्या दररोज ३५ लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मात्र मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या भागात कसे रुग्ण वाढत आहेत, हे दाखवण्यात इलेक्ट्रॉनिक मिडिया व्यस्त आहे. पुण्यामध्ये सुरुवातीपासूनच रुग्ण वाढत असताना, पुण्यातील पदाधिकारी-अधिकाऱ्यांना कोणतेही प्रश्न विचारण्यात आले नाहीत.

पांडुरंग रायकर पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्ट रोजी थंडी वाजून येणे आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. २७ ऑगस्टला त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर ते २८ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या आपल्या गावी गेले. मात्र, तिथेही त्यांना हा त्रास सुरुच होता. त्यामुळे त्यांची कोपरगावमध्ये अँटीजेन चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. कोपरगावमध्येच पुढील चांगल्या उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होण्यासाठी त्यांनी चौकशी केली. या रुग्णालयाने त्यांना ४० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले.

कोणते आहे हे रूग्णालय? अशा अनेक रुग्णालयांनी लोकांचे जगणे आणि मरणे, दोन्ही महाग केले आहे. या रुग्णालयांच्या बातम्या का येत नाहीत.

पुण्यातील खाजगी रुग्णालये मनमानी करीत असताना त्याच्या बातम्या का आल्या नाहीत. योगा करून, नेती करून कसा कोरोना घाबरला आहे, हे सांगण्यामध्ये बातम्यांचा वेळ घालवण्यात आला.

रायकर यांना रविवारी ३० ऑगस्टला रात्री रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी पुण्यात आणले. अगोदर बाणेर आणि नंतर नव्याने उभारण्यात आलेल्या जंबो कोविड रुग्णालयात त्यांना भरती केले.

या जंबो रुग्णालयाची स्थिती काय आहे? या रुग्णालयाची जबाबदारी कोणाची आहे? पुणे महापालिका, ‘पीएमआरडीए’ की राज्य सरकार? तिथे अजूनही कामे सुरू आहेत, मग रुग्णालय सुरू करण्याची, उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली?

या रुग्णालयात पुरेसे डॉक्टर्स नाहीत. शिकाऊ डॉक्टर्स आहेत. पुरेशा सुविधा नाहीत. रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती मिळत नाही. रुग्ण गेल्याची बातमीही लगेच कळत नाही, अशा बातम्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत, याची जबाबदारी कोण घेणार आहे?

पुण्यातील पत्रकार १ सप्टेंबरला दिवसभर अनेक रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी बोलून रायकर यांना व्हेंटिलेटर बेड मिळावा यासाठी प्रयत्न करीत होते. संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध झाला. मात्र, तिथे दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका पाहिजे होती.  पहाटेपर्यंत त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काही मिनिटांपूर्वी जंबो रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले की, पांडुरंग यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने निधन झाले.

पुण्यात पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या पुढे-मागे करणाऱ्या अनेक पत्रकारांनी जरी बातम्या दिल्या नाहीत, तरी पुणे महानगरपालिकेची स्वतःची काय व्यवस्था आहे, हेही या निमित्ताने उघड झाले आहे. महापालिकेकडे किती रुग्णवाहिका आहेत, कार्डियाक रुग्णवाहिका आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित  झाले आहेत.

मुळात एक केंद्रीय माहिती आणि रुग्ण दाखल करण्याची व्यवस्था नाही, हे उघड झाले आहे. उगाच डॅश बोर्ड, यॉव ट्याव बोलणाऱ्या स्मार्ट सिटी आणि अधिकाऱ्यांचे पितळ यानिमित्ताने उघड झाले आहे. कोणतेही अधिकार नसलेले पदाधिकारी आणि राजकीय लोक मास्क न घालता छोटे छोटे कार्यक्रम करून फुकट प्रसिद्धी भलेही घेतील, पण इतक्या दिवसांत पुण्याला एक सक्षम अधिकारी मिळू नये, याबद्दल चकार शब्दाने छापून आले नाही. कारण कोणत्या पोलिस अधिकाऱ्याची कुठे बदली झाली आणि त्यात विश्वास नांगरे पाटील, यांना कोणती पोस्ट मिळाली, याच्या बातम्या देण्यात माध्यमांना रस आहे.

पुणे महानगर पालिकेतर्फे आरोग्य अधिकारी आणि आयुक्तांनी भिकार लिहिलेले एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. धड मराठीही नीट नसलेल्या या पत्रकातून महापालिका कसे काम करीत आहे, हे अधिकच उघड झाले आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसलेले संपादक या परिस्थितीची जबाबदारी घेणार आहेत का? टीआरपीच्या नादी लागून किती दिवस उमद्या पत्रकारांचा बळी दिला जाणार आहे? सतत फील्डवर जा, खास बातम्या द्या, हे आग्रह कधी संपणार आहेत. बातम्या सेल करण्याचे प्रकार कधी थांबणार आहेत? यात छापील माध्यमांचे संपादकही आले. पत्रकारांना विमा मिळेल, पण माध्यम कंपन्या काय जबाबदारी घेणार आहेत? कोरोनाच्या काळात पत्रकारांसाठी काही विशेष योजना केली आहे का? मध्ये कोरोनाचे नाव करून अनेक दैनिकांनी पत्रकारांना घरी बसवले, पगार कमी केले, काहीना वस्तु विकायला लावले. तेंव्हा हे संपादक गप्प बसले होते, ते आता तरी तोंड उघडणार का, हा प्रश्न आहे, की अजूनही सगळ्या प्रश्नाला कसे उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, याचे तुणतुणे वाजवणार?  एका राजकीय पक्षाच्या तालावर नाचत सुपारी पत्रकारिता करणारे खऱ्या पत्रकारितेच्या जवळ कधी जाणार आहेत?

प्रश्न माध्यमांच्या अग्रक्रमाचा आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना सध्या कोणतेही काम नसल्याने ते आरोप करणारच. सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस यांना पुरते बदनाम करून झाले आहे. मंदिरात प्रवेश मिळाला नाही तर भक्तांचे काय बिघडते, मशीद सुरू झाली नाही तर काय होईल? पण या आणि अशा कथित टीआरपी बातम्या करण्याऐवजी जर आरोग्य व्यवस्थेवर लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती, हे माध्यमांना केंव्हा कळणार हा सध्याचा प्रश्न आहे. बाकी उद्यापासून कंगना राणावत पुन्हा सुरू आहेच!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0