‘विद्याताई ‘साऱ्याजणीं’च्या कायम बरोबर असतील’

‘विद्याताई ‘साऱ्याजणीं’च्या कायम बरोबर असतील’

स्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्यातून आधार देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचे नुकतेच निधन झाले. समाजमाध्यमात त्यांच्याविषयी अनेक स्नेह्यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियांतून उलगडणारे विद्याताईंचे व्यक्तीमत्त्व.

भारतीय औषधनिर्मिती उद्योगावर मोठा परिणाम
पदाचा दुरुपयोगः माजी सरन्यायाधीश रमणांविरोधात तक्रार
हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ ठार

डॉ. उज्ज्वला बर्वे – विभाग प्रमुख वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

विद्याताईंचा आणि माझा परिचय नव्हता तेव्हाही, म्हणजे त्यांच्याकडे लांबून पाहात असतानादेखील त्या आपल्या खूप जवळच्या आहेत, असं मला नेहमी वाटायचं. त्यांचं दिसणं, हसणं, ठाम विचारांची नेमक्या शब्दांत (आणि अतिशय प्रवाही मराठीत) मांडणी करणं हे सगळं सच्चं आहे, त्याला

प्रज्ञा दया पवार यांनी पोस्ट केलेला फोटो. प्रा. पुष्पा भावे, मंगला गोडबोले, प्रज्ञा दया पवार, विद्या बाळ, गौरी साळवी, गौरी देशपांडे आणि नीरजा - हैदराबाद येथे झालेल्या एका चर्चासत्रात... (१९९७)

प्रज्ञा दया पवार यांनी पोस्ट केलेला फोटो. प्रा. पुष्पा भावे, मंगला गोडबोले, प्रज्ञा दया पवार, विद्या बाळ, गौरी साळवी, गौरी देशपांडे आणि नीरजा – हैदराबाद येथे झालेल्या एका चर्चासत्रात… (१९९७)

कोणताही फसवा मुलामा दिलेला नाही, त्यात खोटा अभिनिवेश नाही, असं जाणवायचं. विद्याताईंसारखं जगणं आपल्याला जमायला हवं असं वाटायचं. त्याची सुरुवात म्हणून चष्मा लागेल तेव्हा त्यांच्यासारखी चष्म्याला दोरी बांधायची असं मी ठरवलं होतं आणि तसं केलंही. त्यांच्याविषयी इतकी आपुलकी मनात असूनही त्यांना भेटण्याचा, त्यांच्याच क्षेत्रात असूनही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मी आपणहून कधी केला नाही, हा माझा स्वभावदोष. यथावकाश त्यांच्या भेटीचा योग आलाच. माझ्या विद्यार्थ्यांना रेडिओ हा विषय शिकवत असताना त्यांनी बाहेरून खराखरा पाहुणा मुलाखतीसाठी बोलवायचा आणि आमच्या स्टुडिओत त्यांची खरीखुरी मुलाखत घ्यायची असं मी सांगत असे. पाहुणा कोण ते तुम्हीच ठरवायचं, पाहुण्याला भेटून दहा मिनिटांच्या मुलाखतीसाठी विभागात येण्याकरता त्यांना तयार करायचं, त्यांचं आवश्यक ते आदरातिथ्य करायचं वगैरे वगैरे सूचना दिलेल्या असत. बहुतेक विद्यार्थी ओळखीतल्याच लोकांना बोलवत. पण एका उत्साही मुलीनं चक्क विद्याताईंनाच बोलावलं- त्यांच्याशी ओळख देखील नसताना. तरूणांना प्रोत्साहन देण्याच्या विद्याताईंच्या अंगभूत प्रवृत्तीमुळे केवळ मुलाखत सरावासाठी त्या आल्या. मुलांच्या कामात वेळा पुढेमागे होतात, पण त्याचं काही वाटून न घेता त्या त्यांच्या मुलाखतीची वाट पाहात निवांत सगळ्यांशी गप्पा मारत बसल्या होत्या. लहानसहान गोष्टींवरून नाराज होणाऱ्या इतर पत्रकारांपेक्षा

प्रा. हरी नरके यांनी पोस्ट केलेला फोटो. सावित्री जोतिबा समता उत्सव 2017, विद्या बाळ, डा. बाबा आढाव, तीन दगडाची चूल च्या लेखिका विमल मोरे, गबाळचे लेखक दादासाहेब मोरे, नितीन पवार, गीताली वि.म.

प्रा. हरी नरके यांनी पोस्ट केलेला फोटो. सावित्री जोतिबा समता उत्सव 2017, विद्या बाळ, डा. बाबा आढाव, तीन दगडाची चूल च्या लेखिका विमल मोरे, गबाळचे लेखक दादासाहेब मोरे, नितीन पवार, गीताली वि.म.

त्या फारच वेगळ्या भासल्या. विद्याताईंच्या माझ्या मनातल्या प्रतिमेशी मी ते प्रत्यक्ष रूप ताडून पाहात होते. आणि मला प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट भासत होतं. मग वेगवेगळ्या कारणांनी गाठीभेटी होत राहिल्या. खरं तर माझी भीड चेपल्यानं मी निमित्त निर्माण करत राहिले. कधी विभागाच्या कार्यक्रमांना, कधी ‘रोटरी’त त्यांना बोलवत राहिले. महिला सबलीकरण, स्त्रीवाद, महिला पत्रकार, पत्रकारिता, इच्छा मरण, विविध कायदे, घडामोडी… विद्याताईंकडून ऐकण्यासारखे अनेक विषय मिळायचे. मी ‘अक्षरस्पर्श’ ग्रंथालयाचं काम करायला लागल्यावर विद्याताईंचा खूप जवळून सहवास मिळाला. मासिक बैठकांमधली त्यांची उपस्थिती फार आनंददायी असायची.  बैठकीच्या वेळेच्या आधीच यायचं. बैठक सुरू होईपर्यंत कुणाच्या ड्रेसचं, तर कुणाच्या वेगळ्या प्रकारच्या कानातल्या-गळ्यातल्याचं कौतुक करायचं, समोर ठेवलेल्या खाऊचा मनापासून आस्वाद घ्यायचा, नवीन काही वाचलं-पाहिलं असेल, त्याच्यावर बोलायचं आणि मग ग्रंथालयाच्या महत्त्वाच्या गोष्टींविषयी बोलणं सुरू करायचं,  ही विद्याताईंची नेहमीची पद्धत. सर्वप्रकारच्या बदलांना त्या तयार असायच्या, पण त्यातल्या अडचणी आणि त्यांमुळे होणारे फायदेतोटे यांवर नेमकं बोट ठेवायच्या. विद्याताईंना

अश्विनी सातव डोके यांनी पोस्ट केलेला फोटो. पुणे आकाशवाणीवर ईशान सरोदे आणि गार्गी डोके या मुलांनी २४ ऑगस्ट २०१७ मध्ये विद्या बाळ यांची मुलाखत घेतली होती.

अश्विनी सातव डोके यांनी पोस्ट केलेला फोटो. पुणे आकाशवाणीवर रीशान सरोदे आणि गार्गी डोके या मुलांनी २४ ऑगस्ट २०१७ मध्ये विद्या बाळ यांची मुलाखत घेतली होती.

समाजात खूप मान आहे; फारसं वाचन नसलेली, स्त्रीवादी विचारांची नसलेली व्यक्तीदेखील विद्याताईंचं मोल जाणून असते हे ग्रंथालयाच्या कामाच्या निमित्तानं अनेकदा लक्षात आलं. नुकतीच ‘मिळून सा-याजणी’च्या वर्धापनदिनानिमित्त नंदिता दासची मुलाखत झाली. त्याच्या आदल्या दिवशी विद्याताईंचा मला फोन आला, ”उद्या मोठा कार्यक्रम आहे, खूप गर्दी होईल. तर पहिल्या दोन-तीन रांगांकडे जरा लक्ष ठेव. महत्त्वाच्या व्यक्तींना जागा मिळेल असं बघ”. विद्याताईंनी फोन करून मला काहीतरी काम सांगणं यानंच मी इतकी हरखून गेले, की अगदी लहान मुलीच्या उत्साहानं मी ते काम केलं. गेला महिना दीड महिना त्या आजारी होत्या, पण मी भेटायला गेले नाही, कारण त्यांना तसं पाहणं त्यांना आवडलं नसतं आणि मलाही आवडलं नसतं. माझ्या आठवणीत राहणार आहे त्यांचं मनमोकळं हास्य, आणि त्यातून दिसणारा खरेपणा……….

……………………

चैत्रा रेडकर – प्रा. मुंबई विद्यापीठ

विद्याताईंचा साठावा वाढदिवस होता. पुण्यात कुमठेकर रोडवरच्या महात्मा फुले सभागृहात त्यानिमित्त कार्यक्रम होता. ज्येष्ठ साहित्यिक यू. आर्. अनंतमूर्ति आले होते. ते अध्यक्ष होते. बोलायला उभं राहिल्या क्षणी त्याचं पहिलं वाक्य होतं, “विद्याताई किती सुंदर आहेत ना!” विद्याताई खूप मस्त हसल्या! मग अनंतमूर्ति विद्याताईंच्या विचारातलं, कार्यातलं, स्वभावातलं आणि त्यातून माणूस म्हणून असलेलंसौंदर्य यांवर बरंच काही अर्थपूर्ण बोलले. आज विद्याताईंचं दर्शन घेताना ते सगळं आठवतं होतं. त्यांचा मृदू आणि ठाम आवाज आठवत होता. फार कमी वेळा भेटले त्यांना असं वाटतंय आता, पण भेटले की कायमच त्या नेहमी भेटत असल्यासारख्या परिचित वाटल्या.

पुण्यात परतल्यापासून पुणं सोडण्यापूर्वी पुण्यात असलेल्यांचं आता नसणं अधिकच प्रकर्षाने जाणवतंय. विद्याताईंच्या जाण्यातनं उणीवेच्या खुणा अधिकच गडद होत जाणार………

चित्रपट दिग्दर्शिका सावनी विनिता यांनी पोस्ट केलेला फोटो.

चित्रपट दिग्दर्शिका सावनी विनिता यांनी पोस्ट केलेला फोटो.

………………………

प्रीती करमरकर

विद्याताई

काल तुम्ही गेलात! काही माणसांशिवाय जगाची कल्पनाच आपण केलेली नसते, असा हा प्रसंग आहे.

I am still not able to fathom the depths of our loss!!

काल दुपारी वरती तुमच्या घरी गेले. तुमच्या छान अक्षरातली तुमच्या नावाची पाटी दारावर आहे. कधीही आपल्यासाठी उघडं असणारं दार आता बंद, या विचाराने गलबलून आलं. न राहवून फोटो काढला. पण तेवढ्यात जाणीव झाली, आमच्या मनातली किती बंद दारं उघडण्यात तुमचा वाटा होता; स्त्रीपुरुष विषमता, जातीपाती, धर्म इ. इ. आणि समतेचं, विवेकाचं वारं खेळतं झालं.. हा तुमचा खरा वारसा…….

……………..

गौरी जानवेकर

मी पाच वर्षांची होते, तेव्हा विद्याताई पहिल्यांदा घरी आल्या होत्या. त्यावेळी शहरातील पहिली व्यक्ती पाहिली होती. इतकं गोड, शांत, स्नेहपूर्ण बोलणंही पहिल्यांदा अनुभवलं होतं. त्यानंतर ‘नारी समता मंच’ संस्थेचा प्रकल्प गावात सुरू झाला आणि सगळ्यांच्याच अनेकदा भेटी झाल्या. बारावी झाल्यानंतर मला शिवणक्लास देऊन शिक्षण बंद करण्याचा निर्णय जवळजवळ झाल्यानंतर, किमान पदवी तरी पूर्ण करून द्यावी, हा आग्रह विद्याताई आणि साधनाताईंनी धरलेला मला आठवतंय. त्यांच्यामुळे शिकू शकले. त्या सगळ्या काळात मुलीला किती दिवस बाहेर ठेवायचं? असा धोशा आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी लावलेला असताना, नववी नंतर सगळ्या मैत्रिणींची लग्न होऊन मुलं झालेली असताना, वाईट काही होणार नाही, हा विश्वास याच सगळ्यांकडे पाहून आईला आलेला असावा.

यानंतर मंचात केलेलं काम, अनेक वर्षे ‘मिळून साऱ्याजणी’ अंकातून ताईंनी भेटत राहणं, अनेक मुद्यांसाठी स्पष्ट भूमिका घेणं, प्रत्येक क्षणी शांत, संयमी, विवेकी असणं म्हणजे काय ते अनुभवणं. मनातील ओलावा कायम ठेवून माणसांना जसे आहेत तसं स्वीकारत राहिलेलं पाहणं. आईची आणि त्यांची मैत्री इतक्या जवळून अनुभवायला मिळणं. सगळंच खूप वेगळं होतं. माझ्यासारख्या अत्यंत ग्रामीण भागातून आलेल्या अनेकांच्या, साऱ्याजणींच्या विद्याताई कायम बरोबर असतील.

……………………

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0