हो ची मिन्ह: राजा आणि संत

हो ची मिन्ह: राजा आणि संत

हो ची मिन्ह या महान व्हिएतनामी नेत्याच्या ५० व्या स्मृतीदिनी त्याचे जीवन आणि कार्य यांची ओळख करून देणारा लेख.

आरोग्यखात्यातील परीक्षांमध्ये उघड गैरप्रकार
उत्तर भारतात उष्म्याची लाट
काश्मीर अशांत, जनतेची निदर्शने

फेब्रुवारी १९५८मध्ये, हो ची मिन्ह भारतात आले होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे स्वागत करताना त्यांना “एक महान क्रांतिकारक आणि जिवंतपणीच दंतकथा बनलेला महानायक” म्हटले होते. या सप्टेंबरमध्ये “आपल्या काळातील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या” या नेत्याचा ५० वा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने हा महान नेता घडला कसा आणि कशामुळे इतका लोकप्रिय नेता बनला त्याचा हा आढावा.

हो ची मिन्ह यांचा जन्म १८९० सालचा, म्हणजेच युरोपियन देश आफ्रिकेसाठी लढण्यात, त्या खंडाचे विभाजन करून वसाहती स्थापण्यात गुंग होते आणि आशिया खंडावरची त्यांची पकड आणखी घट्ट करत होते त्या काळातला. एका छोट्या व्हिएतनामी खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि लहान असतानाच फ्रेंच राजवटीच्या विरोधातल्या कारवाया आणि शेतकऱ्यांच्या बंडांशी त्यांची ओळख झाली होती. त्यांनी फ्रेंचांचे अमानुष क्रौर्यही पाहिले होते, ज्याबद्दल नंतरच्या काळात त्यांनी तपशीलवार लिहिले.

आपल्या लोकांची मुक्ती कशात आहे हे जाणून घेण्याची त्यांची अतीव इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या २१ व्या वर्षी ते एका स्टीमर जहाजावर स्वैपाकी म्हणून काम करू लागले. ते जगभर फिरले, अनेकवेळा त्यांनी आपले नाव बदलले आणि सतत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकडे जाणारा मार्ग कोणता त्याचा शोध घेत राहिले. त्यांनी आफ्रिका आणि आशिया खंडातल्या अनेक बंदरांना, अल्जीरिया, सेनेगल, भारत आणि मोरोक्को या देशांना भेटी दिल्या, तिथल्या स्थानिक परिस्थितींचा अभ्यास केला. या सगळ्याच देशांमध्ये वसाहतवादाचे शोषण पाहून त्यांच्या दृष्टिकोनावर खूपच परिणाम झाला.

कालांतराने ते फ्रान्समध्ये आले, तिथे त्यांनी विविध नोकऱ्या केल्या आणि फ्रेंच समाजवादी पक्षात सामील झाले. तिथे त्यांना फ्रेंच डाव्या चळवळीतले अनेक लोक भेटले, ते देशांतर्गत समाजवादाबद्दल बोलत असत, आणि त्यांच्याबद्दल त्यांना वैयक्तिक सहानुभूती असे. मात्र फ्रेंचांच्या वसाहतवादाबद्दल त्यांची भूमिका डळमळीत असे. हो ची मिन्ह यांनी तिथे फ्रेंच वसाहतवादाचे स्वरूप उघड करणारी आणि फ्रेंच क्रांतीच्या तथाकथित आदर्शांचे प्रत्यक्षातचे स्वरूप काय आहे ते दाखवून देऊन त्यावर कडकडून टीका करणारी पत्रके वाटली.  नंतर ‘Civilisation That Kills – मारून टाकणारी संस्कृती’ या शीर्षकाच्या आणि ‘श्वेतवर्णीय कृष्णवर्णीयांना कसे सुसंस्कृत बनवत आले आहेत – इतिहासाच्या पुस्तकांमध्ये न सांगितलेली काही कृत्ये’ अशा उपशीर्षकाच्या एका लेखामध्ये त्यांनी ही टीका अधिक सविस्तर मांडली आहे.

काळ्या लोकांचा हा खंड “चर्चच्या आशीर्वादाने” आणि “आजच्या वसाहतवादी प्रशासकांद्वारे कर्तव्यबुद्धीने केल्या जाणाऱ्या खुनांमुळे” “रक्ताने माखला आहे” असे आपले निरीक्षण त्यांनी नोंदवले. आफ्रिका खंडातल्या लोकांच्या तसेच अमेरिकेतील काळ्या लोकांच्या शोषणामुळे त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. ते म्हणाले होते:

“कृष्णवर्णीय सर्वात पीडित आणि सर्वात शोषित मानवी वंश आहे. भांडवलशाहीचा प्रसार आणि नव्या जगाचा शोध याचा तातडीचा परिणाम म्हणून गुलामगिरीचा पुनर्जन्म झाला, जी निग्रोंसाठी एक सजा होती आणि मानवजातीसाठी एक कलंक!”

त्यांनी काळ्या लोकांवरील अत्याचारांबद्दल सविस्तर आकडे आणि तथ्यांसहित लिहिले, ते या विषयावरचा ज्ञानकोश म्हणूनच ओळखले जात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला आफ्रिकेतील परिस्थिती आणि त्या खंडाचे जगातील एक विशिष्ट स्थान या गोष्टींचा त्यांच्या जडणघडणीत मोठा प्रभाव होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.

लेनिन आणि गांधी 

हो ची मिन्ह यांची तुलना अनेकदा इतर दोन जागतिक स्तरावरील नेत्यांशी केली जाते, गांधी आणि लेनिन. त्यालाही एक अर्थ आहे. २० व्या शतकातल्या इतर कुणाहीपेक्षा हो ची मिन्ह हे दोन महत्त्वाच्या जागतिक क्रांतिकारी चळवळींच्या केंद्रस्थानी होते: रशियन क्रांती आणि वसाहतवादविरोधी संघर्ष. गांधींचा त्यांच्यावर प्रत्यक्ष प्रभाव कमी होता, मात्र तेही गांधींप्रमाणेच नैतिकता आणि साधेपणा यावर भर देणारे होते.

भारतावरील इंग्रजांचे राज्य आणि भारताचा वसाहतवादविरोधी लढा यांच्याबद्दल अर्थातच त्यांना चांगली जाणीव होती. भारताची तुलना त्यावेळच्या व्हिएतनाममधील परिस्थितीशी करताना ते एकदा म्हणाले होते, “तिकडे तुमचे एक महात्मा गांधी आहेत, इकडे मी महात्मा गांधी आहे.” आणखी एकदा, “मी आणि इतर काहीजण क्रांतिकारी आहोत, पण तरीही आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींचे शिष्य आहोत,” असेही ते म्हणाले होते.

लेनिन यांचा हो ची मिन्ह यांच्यावर खूपच जास्त थेट प्रभाव होता. १९२० साली, कॉमिन्टर्नच्या दुसऱ्या काँग्रेसने राष्ट्रीय प्रश्नाबाबत लेनिनचा दृष्टिकोन प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये लेनिन यांनी कम्युनिस्टांनी पूर्वेकडच्या सर्व राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळींना का पाठिंबा दिला पाहिजे हे मांडले होते. या निबंधाचा हो ची मिन्ह यांच्यावर मोठा प्रभाव होता आणि त्यांचे नंतरच्या काळातील कार्य त्यावरच आधारलेले होते.  त्यांनी पूर्वेकडच्या लोकांसाठी लेनिन किती महत्त्वाचे आहेत त्यावर अनेकदा लिहिले आहे. त्यांच्या मुक्तीच्या चळवळींना पाठिंबा देणाऱ्या या देशाबद्दल आणि त्याच्या नेत्याबद्दल त्यांना मनापासून आदर आणि प्रेम होते. त्यांनी लिहिले आहे:

“वासाहतिक जनतेबद्दलच्या सर्व पूर्वग्रहांची ठामपणे निर्भर्त्सना करणारे लेनिन ही पहिली व्यक्ती होती. अनेक युरोपियन आणि अमेरिकन कामगारांच्या मनातही हे पूर्वग्रह खोलवर रुजलेले होते.”

यामुळे हो ची मिन्ह लेनिनवादाकडे खेचले गेले. त्यांनी वसाहतवादविरोधी आणि साम्राज्यवादविरोधी लढे म्हणजे समाजवाद आणि साम्यवादाकडच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे मांडले. १९२३ मध्ये ते मॉस्कोला गेले आणि कॉमिन्टर्नसाठी त्यांनी काम केले. मॉस्कोमध्ये ते भारतीय क्रांतिकारक एम. एन. रॉय यांना भेटले, ज्यांनी दुसऱ्या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय आणि वासाहतिक प्रश्नाबाबत लेनिनबरोबर वादविवाद केला होता. दोघांनी मॉस्कोमध्ये सोसायटी ऑफ ऑप्रेस्ड पीपल्स ऑफ एशिया या संस्थेमध्ये एकत्र काम केले. व्हिएतनाम आणि भारतातील लढ्यांमधील समानतेचाच तो एक परिपाक होता.

अमेरिकन साम्राज्यवाद आणि वसाहतवादविरोधी एकता 

नंतर या एकतेची अनेक रूपे दिसली. १९४७ च्या जानेवारीमध्ये, भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, ऑल इंडिया स्टुडन्ट्स फेडरेशनने एक दिवस व्हिएतनाम दिवस म्हणून जाहीर केला होता. कोलकात्यामध्ये मोठे आंदोलन झाले होते, पोलिसांनी आंदोलन चिरडण्यासाठी गोळीबारही केला होता. दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आणि रणमित्र सेन नावाच्या एका विद्यार्थ्याला पायावर गोळी लागली होती.

भारतात व्हिएतनामला मिळणारा हा पाठिंबा नेत्यांच्या स्तरावरही होता. १९५४ मध्ये व्हिएतनामने फ्रेंचांवर विजय मिळवला त्यानंतर तिथे भेट देणाऱ्या पहिल्या काही परदेशी पाहुण्यांमध्ये नेहरूही होते.

नेहरूंसाठी आणि दोन्ही लढायांमधील समान धाग्यांबद्दल हो ची मिन्ह यांनी कविताही लिहिली होती “You are in jail, I am in prison…
We communicate without words,
Shared ideas link you and me.”

हो ची मिन्ह यांनी १९५५ मधल्या बांडुंग संमेलनातही भाग घेतला आणि १९५८ मध्ये त्यांनी भारताला भेट दिली. त्यांनी अगदी अनौपचारिकपणे भारतातील विविध स्तरांतील लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या एका सभेत रणमित्र सेन हे श्रोत्यांमध्ये आहेत हे समजल्यानंतर ते स्टेजवरून खाली उतरून त्यांच्याकडे गेले आणि त्यांना आपुलकीने जवळ घेतले.

व्हिएतनाम युद्धाच्या काळात, भारतातही मोठी निदर्शने झाली. विशेषतः कोलकातामध्ये एका रस्त्याला हो ची मिन्ह सारणी असे नाव देण्यात आले. १९५८ मध्ये ते भारतात आले असता प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचीही त्यांनी भेट घेतली होती. अमृता प्रीतम यांनी त्याबाबत एक हृदयस्पर्शी कविताही लिहिली होती:

“Who is this King, Who is this Saint?…
From the land of Vietnam, today a wind has come to ask
Who dried the tears from the eyes of my History?”

व्हिएतनामी लोक आणि नेतृत्वाने फ्रेंच वसाहतवाद आणि अमेरिकन साम्राज्यवाद यांच्या विरोधातल्या युद्धात अनन्यसाधारण शौर्याचे प्रदर्शन केले. अमेरिकेने क्रूरपणे व्हिएतनामवर बाँबवर्षाव केला आणि रासायनिक शस्त्रांचाही प्रयोग केला. हो ची मिन्ह यांना यात आश्चर्य वाटले नाही, कारण “अमेरिकन संस्कृती”चे वास्तव त्यांना माहीत होते. आफ्रिकन अमेरिकन लोकांना तिथे कसे वागवले जाते याची त्यांना चांगली जाणीव होती. मार्टिन ल्यूथर किंग ज्यु. यांनी अमेरिकेने व्हिएतनामवर लादलेल्या या युद्धाबाबत कठोर टीका करताना म्हटले होते:

“आपण आपल्या समाजाने ज्यांना पंगू करून ठेवले आहे असे काळे लोक घेऊन त्यांना आठहजार मैल दूर दक्षिणपूर्व आशियातल्या मुक्तीसाठी लढायला पाठवत आहोत. अशी मुक्ती जी दक्षिणपश्चिम जॉर्जियामध्ये आणि पूर्व हारलेममध्ये त्यांना स्वतःलाच मिळत नाही!”

आज, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जागतिक भांडवलशाहीचे तथाकथित स्थैर्य संपुष्टात आले आहे. अनेकजण बेचैन आहेत आणि जगापुढच्या प्रचंड मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्ग शोधत आहेत. त्यांच्याकरिता हो ची मिन्ह हा एक असा प्रकाश आहे, जो व्हिएतनामपुरताच नाही तर त्यापलिकडच्या सर्वांसाठी पथदर्शी आहे. तो तसेच एक मोठे आव्हान तुमच्यासमोर उभे करतो: एका नवीन संस्कृतीची निर्मिती करण्याचे!

अर्चिष्मान राजू हे रॉकफेलर युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे संशोधक आहेत. 

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: