अपघात, पिस्तुल चोरण्याचा प्रयत्न मग एनकाउंटर

अपघात, पिस्तुल चोरण्याचा प्रयत्न मग एनकाउंटर

कुख्यात गुंड विकास दुबेचा एनकाउंटर होण्याअगोदर त्याच्या ५ साथीदारांचेही एनकाउंटर झाले होते. त्यात दुबेच्या टोळीचा कणा मोडून काढण्यात आला पण सर्व एनकाउंटरमध्ये साध्यर्म्य आढळून येते.

एन्काउंटर, झुंडशाहीच्या ‘न्याया’ला ५० टक्के पोलिसांचे समर्थन
शोपियन एन्काउंटरः मुलाचे शव द्या; वडिलांची मागणी
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा

नवी दिल्लीः कुख्यात गुंड विकास दुबे याचे शुक्रवारी पहाटे उ. प्रदेश  पोलिसांनी एनकाउंटर केले. या एनकाउंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुबेला उज्जैन येथून कानपूरला घेऊन येत असताना वृत्तवाहिनीच्या गाड्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला होता पण या प्रवासात अचानक रस्त्यावरची वाहतूक थांबवून प्रसार माध्यमांच्या गाड्या लांबवर रोखत पोलिसांनी दुबेचे एनकाउंटर केले.

दुबेला ठार मारण्याअगोदर ३ जुलै ते ९ जुलै दरम्यान त्याच्या टोळीतील पाच गुंडांचेही उ. प्रदेश पोलिसांनी एनकाउंटर केले आहे. ही एनकाउंटर संशयास्पद अशी आहेत. कारण एनकाउंटर झालेल्या गुंडांनी कधीकाळी पोलिसांना मदत केली आहे, माहिती पुरवली आहे. त्यात दुबे याचे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याने प्रश्न अधिक गडद होत चालले आहेत.

अतुल दुबे व प्रेम प्रकाश पांडे

विकास दुबे याने ३ जुलैला रात्री कानपूरनजीक बिकरू या गावात ८ पोलिसांचे एनकाउंटर केल्यानंतर दुसर्या दिवशी अतुल दुबे व प्रेम प्रकाश पांडे यांचे एनकाउंटर करण्यात आले. हे एनकाउंटर दुबेने केलेल्या एनकाउंटरच्या ठिकाणापासून केवळ ६ किमी अंतरावर होते.

अतुल दुबे हा विकास दुबेचा जवळचा नातेवाईक होता तर प्रेम प्रकाश हा मामा होता. या दोघांच्या एनकाउंटरबाबत अधिक माहिती मिळत नाही.

अमर दुबे

८ जुलैला सकाळी अमर दुबेला हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात ठार मारण्यात आले. अमर दुबे हा विकास दुबेचा भाचा व अंगरक्षक होता. तो बिकरू घटनेत सामील होता व त्याच्यावर ५० हजार रु.चे इनाम लावण्यात आले होते.

उ. प्रदेश पोलिसचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार अमर दुबेला उ. प्रदेशच्या विशेष पोलिस पथकाला हमीरपूरनजीक मुदाहा गावात ठार मारले. तो या गावात लपल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. तो घरातून बाहेर येत नव्हता. नंतर चोहोबाजूंनी त्याला घेरल्यानंतर चकमकीत तो जखमी झाला व रुग्णालयात तो उपचारादरम्यान मरण पावला. या घटनेत दोन पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

बाहुआ ऊर्फ प्रवीण दुबे

विकास दुबेचा हा जवळचा साथीदार होता. त्याच्यावर ५० हजार रु.चा इनाम होते. त्याला इटावा येथे ९ जुलैला मारले.

इटावाचे पोलिस उपअधिक्षक अशोक तोमर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार पहाटे ३ वाजता ३ शस्त्रास्त्रधारी व्यक्तींनी एक स्वीफ्ट डिझायर गाडी लुटली. ही गाडी पोलिसांनी तासाभरानंतर शोधली. नंतर पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला, त्यात चकमक होऊन प्रवीण दुबे जखमी झाला. इस्पितळात नेल्यावर तो मृत घोषित करण्यात आला. मेल्यानंतर तो प्रवीण दुबे असल्याचे पोलिसांना कळाले.

कार्थिक ऊर्फ प्रभात मिश्रा

९ जुलैला सकाळी प्रभात मिश्रा याला उ. प्रदेश पोलिसांनी ठार मारले. १० जुलैला विकास दुबेला जसे ठार मारले तशाच स्वरुपाचे एनकाउंटर प्रभात मिश्राचे आदल्या दिवशी करण्यात आले होते. मिश्रा फरिदाबाद येथून ७ जुलैला अटक करण्यात आली होती. त्याचा रिमांडही घेतला होता. पण कानपूरला येत असताना त्याचा एनकाउंटर करण्यात आला.

प्रभात मिश्राला घेऊन येणारी गाडी मध्येच बंद पडली. त्यानंतर मिश्राने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याने एका पोलिसाचे पिस्तुल खेचण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला अशी माहिती एडीजीपी कुमार यांनी दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: