विशाखापट्टणम : फिर्यादीत विषारी वायूचा उल्लेख नाही

विशाखापट्टणम : फिर्यादीत विषारी वायूचा उल्लेख नाही

हैदरबाद : विशाखापट्टणम येथे एलजी पॉलिमर्स या कारखान्यातून स्टायरीन या विषारी वायूची गळती होऊन ११ जणांचा मृत्यू झाला होता. पण या दुर्घटनेच्या पोलिस फिर्यादीत फक्त एका कारखान्यातून वायू गळती झाली, या वायूचा वास अत्यंत कुबट होता व हा वायू शरीरात गेल्याने नागरिकांचे मृत्यू झाले, अशी नोंद झाली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत विषारी वायूचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. शिवाय एलजी पॉलिमर्स कंपनीच्या एकाही कर्मचार्याचे नाव फिर्यादीत समाविष्ट केलेले नाही.

महत्त्वाचे म्हणजे ही दुर्घटना झाल्यानंतर राज्य सरकारने एक उच्चस्तरिय शोध समिती स्थापन केली होती व त्यांनी गोपालपट्टणम पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली होती. या फिर्यादीत पाच नागरिकांच्या मृत्यूची नोंद आहे पण जेव्हा फिर्याद दाखल करण्यात आली होती तेव्हा मृतांचा आकडा १० झाला होता.

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी स्टायरिन वायूचा उल्लेख केला होता पण तो फिर्यादीत मात्र नोंद केला गेलेला नाही.

इंडियन एक्स्प्रेसने विशाखापट्टणमचे जॉइंट इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरिज शिवशंकर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी रेड्डी यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर एलजी पॉलिमर्सचे महाव्यवस्थापक व परिचालन प्रमुख पीपी चंद्रमोहन राव यांच्यावर कारखाना सुरू करण्याची जबाबदारी होती. त्यांनी ६-७ मे रोजी कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्यक्ष दुर्घटना घडली तेव्हा ते घटनास्थळी उपस्थित नव्हते. जे २४ कर्मचारी उपस्थित होते त्यातील अर्धे कंत्राटी पद्धतीवर काम करतात. त्यापैकी काही इंजिनिअर होते, ते देखरेख करत होते पण त्यांच्याकडे वायू गळती रोखण्याचा अनुभव नव्हता.

एवढी मोठी दुर्घटना होऊनही फिर्यादीत कोणाही व्यक्तीचे नाव नसल्याबद्दल विशाखापट्टणमचे पोलिस आयुक्त राजीव कुमार मीना म्हणाले, फिर्यादीत कोणाचे नाव नसले तरी कारखाना चालू करण्याची ज्याची जबाबदारी आहे त्या प्रत्येकाची माहिती गोळा केली जात आहे. सरकारने नेमलेली उच्चस्तरिय समिती व विशेष तज्ज्ञांच्या समितीकडून या कारखान्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी होत आहे.

दरम्यान एलजी पॉलिमर्स इंडियाचे अध्यक्ष व महाव्यवस्थापक संकी जियोंग व तांत्रिक सल्लागार डोंगोसो किम डियाज यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे दोघेही दुर्घटनेवेळी कारखान्यात उपस्थित नव्हते.

९ मे रोजी एलजी पॉलिमर्स इंडियाने एक पत्रक प्रसिद्ध करून झालेल्या दुर्घटनेबद्दल व मृतांच्या प्रती शोक संवेदना व्यक्त केल होती पण मृतांच्या कुटुंबियांनी अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS