Volubilis – भय, निराशा व सौंदर्याची प्रेमकथा

Volubilis – भय, निराशा व सौंदर्याची प्रेमकथा

कोविड- १९ या साथरोगामुळे जगभर अनेक प्रकारे परिणाम झाले. ठिकठिकाणच्या टाळेबंदीमुळे जगण्याची गती काहीशी थांबल्यासारखी झाली. याचा परिणाम चित्रपट क्षेत्रावरही होणे अपरिहार्य होते. चित्रपटगृह बंद होत आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याचे माध्यमही चित्रपटगृहांकडून ओटीटीकडे (Over The Top- OTT) जाताना दिसत आहे.

फेक न्यूजः इतिहास, सिद्धांत आणि भवितव्य
एलआयसीतील हिस्सेदारी विकण्याची सरकारला घाई का?
लादेन कुटुंबियांकडून राजपुत्र चार्ल्सला १० लाख पौंड देणगी

चित्रपट क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाचा भाग म्हणजे जगभरात विविध ठिकाणी होणारे चित्रपट महोत्सव ! अशा या महोत्सवातून अनेक दर्जेदार कलाकृती प्रदर्शित होतात, त्यांची समीक्षा होते, त्या पाहता येतात त्यामुळे या चित्रपट महोत्सवांचे म्हणून एक महत्त्व असते. आपल्याकडे मुंबई फिल्म फेस्टिवल तसे कान, टोरोंटो, लोकार्नो, बर्लिन इत्यादी जगभरातले चित्रपट महोत्सव या टाळेबंदीमुळे भरवणे अशक्य झाले आहे. यावर उपाय म्हणून व जगभरातील कोविड-१९ उपचारात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या संस्थांना मदत म्हणून जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव एकत्रितरीत्या “We Are One : Global Film Festival” असा २९ मे ते ७ जून दरम्यान साजरा करण्याचे ठरवण्यात आले.

एरवी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे व म्हणून मर्यादित लोकांपर्यंत पोहचणारे हे चित्रपट यावेळी YouTube वर प्रदर्शित झाले. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना ते घरी बसून पाहता आले. (महोत्सव काळात हे चित्रपट YouTube वर पाहता येतील) या महोत्सवात नुकताच ३ जूनला मराकेश फिल्म फेस्टिवलमधील बहुचर्चित Volubilis हा चित्रपट दाखवण्यात आला.

मोरोक्को मधल्या मेक्नेस शहरात या चित्रपटाची कथा घडते. अब्दुल्कादेर (मौहसीन माल्झी) हा या शहरातील एका मॉलमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करणारा तरुण असतो. आपल्या कामाप्रती त्याला आदर असतो. नुकतेच लग्न झालेले असते. मलिका (नादिया कौंदा) ही त्याची पत्नी एका ठिकाणी घरकाम करत असते. एका छोट्याशा घरात अब्दुलकादेर त्याच्या आई-वडील, पाच भाऊ-बहिणी व पत्नीसह राहात असतो. नवविवाहित पतीपत्नीमध्ये प्रेम, एकमेकांबद्दल स्वाभाविक आकर्षण असते परंतु त्यांना हवा तसा एकांत मिळत नाही. तरीही या ओढग्रस्तीच्या जीवनातही, मिळेल त्या सहवासात ते आनंदी असतात व हे सगळं अभावाचं आयुष्य मागे सोडून चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहात असतात.

हे जोडपं आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत असते ते Volubilis या प्राचीन शहराच्या अवशेषाच्या साक्षीने! मोरोक्कोसारख्या “तिसऱ्या जगाचा” भाग असणाऱ्या, धर्मविचारांचा अतिरिक्त पगडा असणारा, अल्पशिक्षित गरीब तरुणाची जी स्वभाववैशिष्ट्ये असतात ती सर्व अब्दुल्कादेरच्या व्यक्तिमत्वात असतात. फ्रेंच फ्राइजमध्ये पोर्क असते ते खाणे मुस्लिमांना निषिद्ध आहे, स्त्रियांनी मर्यादेत राहावे इत्यादी प्रकारचे त्याचे विचार सनातनी असतात. तर आयुष्याचा उन्मुक्तपणे आनंद घ्यावा असे मलिकास वाटत असते.

एका प्रसंगात हे दोघे जेव्हा भविष्याची स्वप्ने रंगवत असतात तेव्हा मलिका म्हणते, आपल्याकडे दोन कार असतील, एक तुझी व एक माझी ! तेव्हा अब्दुलकादेर म्हणतो “तुला परवाना मिळेल का?”, त्यावर मलिका चिडते. ‘मी स्त्री असल्यामुळे मला गाडी चालवण्याचा परवाना मिळणार नाही असे तुला म्हणायचे आहे का?’ असा थेट प्रश्न ती त्याला विचारते. त्यावर अब्दुलकादेर “नाही नाही..तू छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतेस ना म्हणून!” असे म्हणून वेळ मारून नेतो. या संवादातून उच्च-नीचता पाळल्या जात असलेल्या समाजात पुन्हा लिंगभावातून कार्यरत असणारी, स्त्रियांचे दुय्यमत्व कसे कायम राहील हे पाहणारी पुरुषसत्ताक विचारसरणी दिग्दर्शक फाउजी बेनसैदी अधोरेखित करतात.

या प्रसंगात पुढे मलिका म्हणते “हो, भीतीतच वाढलेय. मला भीती वाटते ती मी उपाशी राहण्याची, मी गरीब राहण्याची, माझ्याकडे नोकरी नसण्या. मला भीती वाटते जर मी कर्ज फेडू शकले नाही तर, भीती वाटते आईवडिलांची, भीती वाटते पुरुषांची आणि बॉसला भिणाऱ्या पुरुषांची..” त्या क्षणी दिग्दर्शक बेनसैदी आपल्या पात्राच्या रूपात जगभरातील स्त्रियांना उभे करत असतो. या चित्रपटाची संहिता बेनसैदीनेच लिहिली आहे.

चित्रपटाच्या मधल्या भागात अब्दुल्कादेरचा कामाच्या ठिकाणी एका उच्चभ्रू महिलेशी वाद होतो. वाद क्षुल्लक असतो. ही महिला रांगेतून न जाता आपले सामाजिक श्रेष्ठत्व दाखवत अब्दुल्कादेरच्या म्हणण्याला भीक न घालता रांग तोडते. अब्दुल्कादेर तिला समजावून सांगतो की सर्वच जण रांगेत उभे आहेत, तुम्ही रांगेत उभे राहा. तोपर्यंत अब्दुल्कादेरला ही महिला समाजातील संपन्न, राजकीयदृष्ट्या शक्तिशाली कुटुंबातील आहे, याची माहिती नसते. या महिलेशी त्याची बाचाबाची होते, त्याच्या तोंडातून या महिलेला अपशब्द उच्चारले जातात. ही महिलाही त्याच्या कानशीलात लगावून मी काय आहे हे तुला लवकरच कळेल अशी धमकी देऊन मॉलमधून जाते.

काही वेळाने अब्दुल्कादेरची नोकरी जाते, त्याची मानहानी केली जाते, त्याला महिलेच्या पतीकडून व नंतर काही जणांकडून जबर मारहाण होते. या घटनेनंतर अब्दुलकादेर व मलिका यांचे जीवनच बदलून जात्ते. अब्दुलकादेर आपली मानहानी, अपमान विसरू शकत नाही. त्यातच तो गुरफटून जातो. त्याच्या मनात अपमानाचा बदला घेण्याचे विचार घुटमळू लागतात. नोकरी गेल्याने तो अधिक अस्वस्थ होतो  त्याचा परिणाम कुटुंबाच्या उत्पनावर होतो. काही दिवस तो घरी जात नाही. तो मरून पडला असेल किंवा दारू पिऊन पडला असेल असे घरच्यांना वाटून जाते.

पण काही दिवसांनी अब्दुल्कादेर दिसल्यानंतर बायको मलिकाचा त्याच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे हा आपली व कुटुंबाची जबाबदारी टाळतोय असा समज होतो. मलिका त्याच्यापासून दूर जाते. एका प्रसंगात अब्दुल्कादेरचा मित्र मुस्तफा मलिकास सावरण्याचा प्रयत्न करतो. मलिकाच्या दूर जाण्यामुळे, कुटुंबाच्या वाताहतीमुळे अब्दुलकादेर अजूनच उद्ध्वस्त होतो. दुसरीकडे, मलिका जिच्याकडे काम करत असते ती लल्ला उच्चभ्रू असते, तिच्या आयुष्यातील एका दुखऱ्या क्षणी ती मलिकाला जवळ बसवून घेते, दोन बरे शब्द बोलते. मलिका तिला मानसिक आधार द्यायला जाते तेव्हा मात्र ती मलिकाला उडवून लावते.

पुढे बेकार अब्दुलकादेर व त्याचा मित्र मुस्तफामध्ये कादेरच्या धार्मिक विचारावरून वाद होतो. अब्दुलकादेर व मुस्तफाने एकांतात गाडीत बसलेल्या एका सधन जोडप्यास धमकावलेले असते. त्यातील मुलीचा मोबाइल मुस्तफाकडे असतो. मुस्तफा त्या मुलीकडे आकर्षित होतो. आपला मोबाइल परत मिळवण्याच्या उद्देशाने ती मुलगी मुस्तफाशी गोड बोलून त्याला भेटायला बोलावते. तिथे मुस्तफाला मारहाण केली जाते.

अब्दुलकादेर, मलिका व मुस्तफा यांच्या आयुष्याची दिशा एकसारखी झालेली असते. तिघेही एकाच अस्थिर प्रतलात दिसून येतात. बेनसैदी आपल्याला मोरोक्कन समाजातील उच्च-नीचतेचे दर्शन घडवतो. मोरोक्कोतला उच्चभ्रू वर्ग, त्याचा दुटप्पीपणा, समाजातील धनदांडगे, शक्तिशाली गट आपले वर्चस्व कायम ठेवताना समाजातील दुबळ्या व निम्न आर्थिक स्तरावर जगणाऱ्या माणसांचे “माणूसपण” कसे बेदखल करू शकतो ही वास्तवता आपल्यासमोर मांडतात.

मलिका जेथे काम करत असते त्या घराची मालकीण लल्ला नव्या शहरात राहण्यासाठी जात असते. तीही स्वतःला आयुष्यात एकाकी समजत असते. नव्या शहरात जाण्याअगोदर ती आपल्या मित्रमंडळींसाठी एक पार्टी ठेवते. या पार्टीत शहरातील सर्व उच्चभ्रू जमतात. मलिका व तिची सहकारी त्यांची सरबराई करत असतात.

या पार्टीत जमलेले लोक एक व्हिडीओ चवीने पाहात-दाखवत असतात. तो व्हिडिओ असतो मलिकाच्या नवऱ्याच्या मानहानीचा, अवमानाचा ! हा व्हिडिओ जेव्हा मलिका स्वतःच्या डोळ्याने पाहते तेव्हा ती सगळं सोडून पुन्हा अब्दुल्कादेरकडे जाते. तिला वस्तुस्थिती कळते. हे शहर सोडून आपण निघून जाऊ व दुसरीकडे आपला संसार थाटू अशी ती त्याला आर्जवे करते. कारण तो व्हिडिओ पाहताना अब्दुल्कादेरची ज्याने मानहानी केली असते ती व्यक्तीच त्या पार्टीत हजर असते. ती व्यक्ती आपण अब्दुल्कादेरला कशी धमकी दिली, त्याला कसे मरेस्तोवर मारले हे सांगत असते. त्यानंतर या पार्टीतला एकूण सूर हा अशा लोकांसोबत असेच वागले पाहिजे अशा स्वरुपाचा दिसून येतो ! मलिकाला हे सहन होत नाही, ती रागाने त्या घरातून निघून जाते. आपल्या नोकरीवर पाणी सोडते.

अखेर घरातल्यांचा निरोप घेऊन अब्दुलकादेर व मलिका शहर सोडून जायला निघतात. तो दिवस ३१ डिसेंबरचा असतो. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी फटाके फुटत असतात. ज्या टॅक्सीतून ते रेल्वेस्टेशनकडे जात असतात तो टॅक्सीवाला पाश्चात्य -ख्रिश्चन संस्कृतीमुळे आपला समाज कसा बिघडत चालला आहे, याबद्दल राग व्यक्त करत असतो. असाच राग अब्दुल्कादेरच्या मनात धुमसत असतो. टॅक्सीतून रेल्वे स्टेशनकडे जाताना अब्दुल्कादेरला वाटते आपली मानहानी करणाऱ्यास शेवटचा धडा शिकवावा आणि नव्या शहरात जावे. पण मलिका त्यास विरोध करते. आपण त्यांचे काही करू शकत नाही हे सुद्धा सांगते. परंतु अब्दुलकादेर त्या व्यक्तीच्या घरात शिरण्याचा निर्णय घेतो. त्याला मारहाण करणारी व्यक्ती भ्रष्टाचारी असल्याने त्याच्या घरातील काही फायली, कागदपत्रे मिळाल्यास त्याला कायमचे देशोधडीला लावता येईल असे त्याला वाटत असते.

३१ डिसेंबर असल्याने घरात जंगी पार्टी असते. बंगला मोठा असतो. त्या बंगल्यात अब्दुल्कादेर शिरतो. त्याला काही कागदपत्रे, त्या व्यक्तीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून घ्यायचे असतात. पण तिथे तो सापडतो. त्याला जबर मार पडतो. जखमी अवस्थेत अब्दुल्कादेर येताना मलिकाला दिसतो. तिला नेमके काय झाले ते लक्षात येते. ती त्याला घेऊन चालायला लागते.

३१डिसेंबरच्या त्या रात्री मेक्नेस शहराच्या आकाशात रंगीबेरंगी फटाके उडत असतात, जग नव्या उत्साहात, उमेदीने पुढल्या वर्षाचे आपल्या आयुष्याचे संकल्प साधत असते आणि मलिका लंगडत चालणाऱ्या अब्दुल्कादेरला पकडून नव्या शहराकडे चालत जाताना दिसते आणि येथे हा चित्रपट संपतो.

Volubilis हे स्वप्नांचे अवशेष शिल्लक असलेले प्राचीन शहर आहे. मलिका, अब्दुल्कादेरचेही चांगले जगण्याचे स्वप्न आहे. पण समाजात असलेला वर्गीय भेद  त्यांच्या चांगल्या जगण्याच्या स्वप्नांमधला खरा अडसर आहे. मलिकाला जगण्यातील आव्हाने, संघर्ष लक्षात आला आहेत, तिला धनदांडग्यांच्या राजकीय-सामाजिक वर्चस्वाचीही कल्पना आली आहे. त्यामुळे आपल्या जगण्याचा मार्ग आपल्यालाच शोधावा लागणार आहे, या निश्चयाने ती अब्दुल्कादेरला घेऊन पुढे जाते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0