‘व्यापक परिवर्तनाशी ‘अंनिस’ स्वतःला जोडू इच्छिते’

‘व्यापक परिवर्तनाशी ‘अंनिस’ स्वतःला जोडू इच्छिते’

अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस)ला ३० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘अंनिस’चा आजवरचा प्रवास, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार आणि पुढील दिशा यांविषयी समितीचे सरचिटणीस आणि पूर्णवेळ कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांच्याशी केलेली चर्चा.

एक न संपणारा प्रवास
दाभोलकर हत्या ; आरोपी विक्रम भावेला जामीन
अस्वस्थ आणि आश्वस्तही करतो ‘विवेक’!

प्रश्न – ‘अंनिस’ची स्थापना कशी आणि कधी झाली?

मिलिंद देशमुख – १९८२ साली केरळमध्ये बी प्रेमानंद यांनी या मोहिमेची सुरुवात केली. ते विवेकवादी(रॅशनलिस्ट) कार्यकर्ते होते. ते ‘अंनिस’चे प्रेरणास्थान होते असे म्हणता येईल. त्यांनी त्या काळात दौरा केला. त्यांनी केरळवरून सुरुवात करून महाराष्ट्रामध्ये आणि देशभर मोहीम केली. इथे महाराष्ट्रात डॉ. दाभोलकर, लोकविज्ञान संघटना त्यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या. अनिल अवचट यांचे ‘संभ्रम’ नावाचे पुस्तक आले. त्यातून पुढे मग दाभोलकर यांनी प्रेरणा घेऊन काम सुरु केले. नागपूर भागामध्ये श्याम मानव यांचे काम सुरु होते. पुढे एकत्रपणे काम सुरु झाले.

१९८९ साली काही मतभेद झाले आणि पुण्यातील एका एका गटाने डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची स्थापना ९ ऑगस्ट १९८९ ला झाली. डॉ. दाभोलकर यांच्या वैचारिक मांडणीमुळे पहिल्या एक-दोन वर्षांमध्ये अनेक लोक जोडले गेले.

पहिल्या काही वर्षांमध्ये भूत, भानामती, जादूटोणा अशा गोष्टींवर काम सुरु होते. लोकांना त्याचे आकर्षण होते. मला स्वतःला सर्प आणि अंधश्रद्धा याबद्दल आकर्षण होते. संमोहनाबद्दल लोकांमध्ये कुतूहल होते. श्याम मानव आणि इतर काहीजण संमोहनाचे कार्यक्रम करीत होते. त्याबद्दल शास्त्रीय माहिती देण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे मर्यादित विषय घेऊन काम सुरु झाले होते.

नंतर डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम सुरु झाल्यावर धर्म चिकित्सा या विषयामध्ये समितीने हात हस्तक्षेप केला. १९९० नंतर कर्मकांडांच्या विरोधामध्ये कालसुसंगत पर्याय द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी कोकणामध्ये आम्ही ‘शोध भुताचा, बोध मनाचा’, अशी मोहीम घेतली होती. आव्हाने, प्रतिआव्हाने सुरु झाली होती. त्यावेळी ‘अंनिस’ला आव्हान देणे हा तर हमखास कार्यक्रम झाला होता. भूताविषयी, सापांविषयी कार्यक्रम घेतले.

‘अंनिस’च्या नावामध्येच श्रद्धा असा शब्द आहे, त्यामुळे सुरुवात श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय अशी मुळापासून सुरुवात व्हायची. त्याला जोडून फलज्योतिष हा विषय यायचा. चमत्कार हा विषय लोकप्रिय झाला होता. चमत्कार आणि जादूचे प्रयोग यात काय फरक असतो, असे काम सुरु झाले होते.

असे कार्यक्रम सुरु असले, तरी आम्हाला वाटले, की किती ठिकाणी आपण पोहोचू शकतो, एक मर्यादा होती. म्हणून मग आम्ही शिक्षकांची शिबिरे घेतली. विद्यार्थ्यांची शिबिरे झाली. ज्यायोगे हे काम पुढे जाईल. याश्वान्रव चव्हाण प्रतिष्ठाननेही त्यावेळी या उपक्रमासाठी मदत केली.

शिक्षकांना आम्ही वैज्ञानिक दृष्टी कशे असते हे शिकवीत होता. प्रत्येकाला विज्ञान माहिती असते, पण वैज्ञानिक दृष्टी नसते. कार्यकारणभाव समजणे गरजेचे असते. हे विध्यार्थ्यांना सांगण्यासाठी आम्ही शिक्षकांची शिबिरे घेत होतो.

बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिक, करणी, जादूटोणा आणि अंगातील दैवी शक्ती सांगून फसवले जाण्याचे प्रकार होते, त्यावर ‘अंनिस’ने काम सुरु केले.

श्रीलंकेच्या अब्राहम कोवूर यांनीही या कामामध्ये मदत केली. कोणताही चमत्कार सिध्द करून दाखवल्यास, ५ लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी ठेवले होते. त्यांनी आव्हान देण्याची प्रक्रिया सुरु केली.

प्रश्न – संघटना म्हणून ‘अंनिस’चा विस्तार काय आहे?

देशमुख – कोणीही समितीचा सदस्य होऊ शकतो. त्यासाठी काही निकष नाही. जो अंधश्रद्धा मनात असणाराही, सदस्य होऊ शकतो. त्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी लोक येतात. ज्या ठिकाणी लोक उत्साह दाखवतात, तेथे आम्ही संपर्क शाखा तयार करतो. त्यांनी केवळ वार्तापत्र आणि पुस्तके वाचणे अपेक्षित असते. मग पुढे उपक्रमशील शाखा येते. त्यांनी काही उपक्रम करणे गरजेचे असते. त्यांनी फटाके नको, दारू नको दुध प्या, नदीमध्ये गणपती विसर्जन करू नका, होळीमध्ये पोळी टाकू नका गरिबांना द्या, सर्प प्रबोधन असे उपक्रम केले जातात. त्यानंतर क्रियाशील शाखा असते. त्यांनी दर आठवड्याला जमणे आवश्यक असते. आणि त्यापुढे जिल्ह्यात एक प्रमुख शाखा असते. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रत्येकी एक शाखा आहे. काही ठिकाणी दोन आहेत. ‘अंनिस’च्या संपूर्ण राज्यामध्ये असा एकूण ३०० शाखांचा विस्तार आहे. अंधश्रद्धा वार्तापत्र सभासद घेणारे आणि संबधीत असे एकूण २० हजार क्रियाशील सभासद आहेत. यांशिवाय अनेक लोक जोडलेले आहेत. गोवा आणि कर्नाटकात काही शाखा आहेत. दिल्लीमध्येही एक शाखा आहे. अनेक राज्यांमधून मागणी आहे.

बी. प्रेमानंद

बी. प्रेमानंद

‘अंनिस’ हा फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन (फेरा) या संघटनेचा भाग आहे. यामध्ये देशभरातील अनेक संघटना सहभागी आहेत. पंजाबमध्ये ‘तर्कशील’ आहे. विजयवाडा येथे गोऱ्हा यांचे अथेईस्ट सेंटर आहे, उत्तर प्रदेशमध्ये ‘अर्जक’ नावाची संघटना आहे. तर्कशील ही संघटना ‘अंनिस’च्या प्रेरणेतून सुरु झाली. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी पंजाबमध्ये जाऊन त्यासाठी मदत केली.

प्रश्न – विरोध कसा आणि कोणाकडून झाला? काय आक्षेप होते?

देशमुख – बुवाबाजीच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात झाल्यावर अनेक बाबा आणि बुवा विरोधात गेले. अनेक ज्योतिषी विरोधात गेले. त्यांनी विरोधी प्रचार सुरु केला. सनातन संघटना तर विविध गोष्टींमुळे सतत विरोध करीत आहेच. पूर्वी पतित पावन संघटनेने विरोध केला होता. विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती समिती, शिवसेना यांनी विरोध केला आहे. ठाण्यामध्ये श्याम मानव यांची सभा उधळली होती.

चिकित्सा सुरु झाल्यावर अनेकजण विरोधात गेले. या सगळ्यांचा मुख्य आक्षेप हा होता, की तुम्ही फक्त हिंदू धर्मावर बोलता. त्यामुळे हिंदू दुर्बल होतील. पण प्रत्यक्षात असे काहीही नाही. ‘अंनिस’ने सगळ्यांवर लक्ष ठेवले आणि सगळ्यांची चिकित्सा केली. दुसरा आक्षेप होता, की यांना बाहेरच्या देशातून पैसे मिळतात. हा अतिशय हास्यास्पद आरोप आहे. लोक घरचे खाऊन इथे काम करतात.

यांचे ऐकले तर सर्व समाज अनीतिमान होईल. देवा-धर्माचे नाही ऐकले तर कोणी कसेही वागेल, असाही एक आक्षेप होता. हे लोकांना लगेच पटते, त्यामुळे विरोध वाढत जातो. लोकांच्या अनेक वर्षांच्या काही भाकड कथांवर विश्वास असतो, त्याला आव्हान मिळाले, की विरोध होतो.

प्रश्न – विवेकवाद म्हणजे काय

देशमुख – विवेक म्हणजे विचार करण्याची शक्ती. जी केवळ मानवामध्ये आहे. माणसाच्या मेंदूमध्ये चांगले काय-वाईट काय हे समजण्याची शक्ती आहे. माणसाचा ९० टक्के मेंदू हा प्राण्यांप्रमाणेच आहे. केवळ १० टक्के मेंदू विकसित आहे. हा विकसित होणारा मेंदू अधिक विकसित होण्याची गरज असून, सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचा त्यामध्ये विचार आहे. हा विचार म्हणजे विवेकवाद. पृथ्वीचे नुकसान टाळणारा विचार. मानवतावाद हा विवेकवादाचा पुढचा टप्पा आहे.

अब्राहम कोवूर

अब्राहम कोवूर

प्रश्न – डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला?

देशमुख – डॉक्टर दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर अनेकजण मदत करण्यासाठी सभासद होण्यासाठी पुढे आले. ऑनलाइन नोंदणी मोठ्या प्रमाणावर होते. डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर अनेक गोष्टी एकदम घडल्या. आजही न्यायालयाची तारीख असताना अनेकजण येतात.

जादूटोणा विरोधी कायदा व्हावा, म्हणून समिती आणि डॉ. दाभोलकर वर्षे प्रयत्न करीत होते. मात्र त्यांची हत्या झाल्यानंतर लगेच हा कायदा झाला. हत्येनंतर किती लोकांचा समितीच्या भूमिकेला पाठींबा आहे, हे दिसून आले आणि ‘सनातन’च्या विरोधाला जागा राहिली नाही. अनेक लोक कार्यरत झाले आणि काम पुढे गेले आहे. सतत ६० महिने डॉक्टरांच्या हत्येचा तपास लागावा, म्हणून लोक सातत्याने येत होते. हत्येचा तपास करताना पुणे पोलिसांनी हलगर्जीपणा केला असे आमचे म्हणणे आहेच. त्यांनी खूप वेळ आणि शक्ती वाया घालवली.

प्रश्न – सध्या नेमके ‘अंनिस’चे काम कसे चालते?

देशमुख – अंधश्रद्धा निर्मुलन, वैज्ञानिक दृष्टीकोन, धर्मचिकित्सा, आणि विवेकवाद आणि मानवता वाद असा प्रवास आणि काम आहे. ‘अंनिस’ देव आणि धर्माच्या बाबतीत तटस्थ आहे. आम्ही कोणालाही देव आणि धर्म सोडा असे सांगत नाही. सर्व काम लोकशाही मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने पुढे गेले पाहिजे, असा समितीचा आग्रह आहे.

माणसाचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा संपल्या पाहिजेत. वैज्ञानिक दृष्टीकोन संपूर्ण जीवनामध्ये अंगिकारला पाहिजे. धर्माची कालसुसंगत चिकित्सा झाली पाहिजे. व्यापक परिवर्तनशी जोडून घेणे, हा समितीचा विचार असून, त्याच मुद्द्यांवर काम सुरु आहे.

शोषणाचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, मुलांच्या समस्या, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सगळ्यांशी ‘अंनिस’ स्वतःला जोडून घेऊ इच्छिते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: