व्यासमुनींची वचनपूर्ती

व्यासमुनींची वचनपूर्ती

अक्षर प्रकाशनातर्फे राजा पटवर्धन यांचे ‘महाभारताचा पुनर्शोध’ हे पुस्तक प्रकशित होत आहे. त्यातील एक प्रकरण.

बाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा
बॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन
‘नेताजींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटी हवी’

भरतवंशातील विशेष अभिजाततेचे निरूपण प्रस्तुत इतिहासात असल्यामुळे त्याला ‘महाभारत’ म्हणतात. अर्जुनाचा पणतू ‘जनमेजय’ सर्पसत्रास प्रारंभ करण्याच्या तयारीत असताना महर्षी व्यास अवतीर्ण झाले. जनमेजयाला हर्षानंद झाला.

‘कौरव, पांडव इतके ज्ञानी, पुण्यवान असूनही त्यांच्यात जीवघेणा कलह का झाला? हे व्यासमुने! तुम्ही जिवंत असूनही ही लढाई झालीच कशी?’ महर्षी व्यासांनी उपस्थित असलेल्या शिष्य वैशंपायनाला म्हटले, ‘मी रचलेला ‘जय’ नावाचा इतिहास तू सर्पयज्ञकर्मात मध्यंतराच्या वेळी, जनमेजयाला कथन कर.’ हे जनमेजया, ‘मी त्रिकालज्ञानी असूनही नियतीचा क्रम बदलण्यास समर्थ नाही.’ एवढे बोलून व्यास अंतर्धान पावले.

‘हे भरतर्षभा (म्हणजे भरतवंशीय जनमेजया), धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांची सर्वांना प्राप्‍ती व्हावी, म्हणून व्यासांनी महाभारत रचले. जे जे इतरत्र आहे, ते सर्व या ग्रंथात आहेच. जर या ग्रंथात काही आढळले नाही, तर ते कुठेही अस्तित्वातच नाही.’ वैशंपायनांनी महाभारताची अशी महती गायली. संस्कृत भाषेतला हा मूळ ग्रंथ भारतात सर्व भाषांत उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात भांडारकर प्राच्य विद्यामंदिराची संशोधित प्रत साठ वर्षांच्या तपश्चर्येचे फळ आहे. महाभारताचा काळ निश्चित करणे, हे इतिहासकार, मानववंश शास्त्रज्ञांपुढचे मोठे आव्हान आहे. भारतीय युद्ध काळाचे आकाशदर्शन व्यासांना घडले ते असे.

‘अत्यंत भयानक असा धूमकेतू पुष्य नक्षत्र व्यापून आहे. तो महाग्रह कुरूक्षेत्री जमलेल्या सैन्याचे भीषण अकल्याण करणार आहे. मघा नक्षत्रात मंगळ व श्रवण नक्षत्रात बृहस्पती वक्री आहे. सूर्यपुत्र शनी भग नक्षत्रावर आक्रमण करून त्याला पीडा देत आहे.’ अशा प्रकारच्या अनेक संदर्भांची गणिते मांडून महाभारताचा काळ संशोधक निश्चित करीत आहेत. काही विद्वानांनी तर महाभारत युद्धाची चक्‍क तारीखच जाहीर केली आहे. एक दिवस त्या तारखेचे स्वामीत्वही कुणी घेईल. काही अभ्यासू महाभारतातील वर्णनांच्या आधारे उत्खननातून पुरावे गोळा करीत असतात. महाभारतातील कथानकांवर आधारलेली चाळीसहून अधिक नाटके महाराष्ट्रात सादर झाली आहेत. ‘वस्त्रहरण’ या मालवणी फार्सचे पाच हजार चारशे प्रयोग होऊनही हाऊसफुल्‍लचे फलक लागतात. महाभारतातील भीष्म, शिखंडी, अभिमन्यू इ. व्यक्‍तिरेखांचे आजच्या काळातील व्यक्‍तींशी नाते जुळवले जाते. द्रोणाचार्यांच्या नावाने शिक्षकांचा, तर अर्जुनाच्या नावाने क्रीडापटूंचा गौरव केला जातो. भटक्या विमुक्‍त समाजात ‘एकलव्य’ हे नाव शिक्षणसंस्थांना दिले जाते. कपट कारस्थाने करणार्‍यांना धृतराष्ट्र, तर त्यागाचे प्रतीक म्हणून गांधारीचा उल्‍लेख होतो. अभिमन्यू, कर्ण, श्रीकृष्ण हे पराक्रमाशी जोडले जातात. सत्यवती, द्रौपदी या स्त्रियांचा, तर दृष्टद्युम्न, कृपाचार्य इ. पुरुषांचा अयोनिज उल्‍लेख आजही अभ्यासला जातो. व्यास, अश्वत्थामा, कृपाचार्य, परशुराम यांच्या चिरंजीवित्वाचा अर्थ आजही चर्चिला जातो. धर्मराजाच्या राजसूय यज्ञाची आठवण (भाजपा) राज्यकर्त्यांना आजही येते. ‘अर्थस्य पुरुषो दास:’, ‘इंद्राय स्वहा तक्षकाय स्वहा’, ‘राजा कालस्य कारणम्’, ‘संभवामि युगे युगे’, ‘विनाश काले विपरित बुद्धी’ इ. वचनांचा आजही उल्‍लेख होत राहतो. अत्यंत पराक्रमी महारथी शिखंडीला विनाकारण ‘तृतीयपंथी’ म्हटले जाते. सत्यवती, कुंती यांच्या कानीन (लग्‍नाआधीच्या) पुत्रांना मंदिरात स्थान मिळते. महाभारतात कौरव पांडवांच्या पराक्रमी कथांभोवती रचलेल्या शेकडो अद्भुत कथा आजही मनोरंजन करतात. मेनका विश्वामित्र यांच्या एक वर्ष सहवासातून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ चा पाया घातला गेला असावा (शकुंतला). श्रीकृष्णाने पराक्रम करून एकूण आठ राण्यांशी विवाह केला, तर मामा कंस व आतेभाऊ शिशुपाल यांचा वध केला. भीमाने दु:शासनाचे रक्‍त प्राशन केले. शंभर विधवा सुनांचे आक्रोश धृतराष्ट्र-गांधारीला ऐकत राहावे लागले. महापराक्रमी भीष्माला शिशुपालाने षंढ, तर श्रीकृष्णाला स्त्रीहंता (पुतनेचा वध) म्हणून हिणवले. या सर्व घटना आजही लिहिल्या, पाहिल्या, वाचल्या व ऐकल्या जातात. असो.

एक सर्वसामान्य समज असा आहे की, श्रीकृष्णाची शिष्टाई हा युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न होता. युधिष्ठिराने कौरव पांडवांत सख्य नांदावे व समेटच व्हावा, असा आटोकाट प्रयत्न केला. ‘इंद्रप्रस्थ द्या, संहार टाळा.’ असा पहिला प्रस्ताव पांडवांकडून मांडला गेला. त्यावर संजय कौरवांचा प्रस्ताव घेऊन आला. क्षत्रिय कुलांचा संहार टाळण्यासाठी पांडवांनी हाती भिक्षापात्र घेऊन धर्माचरणात राहावे, हा धृतराष्ट्राचा प्रेमाचा संदेश होता. धर्मराजाने राज्याऐवजी पाच गावांचा प्रस्ताव घेऊन संजयाला परत धाडले, तेव्हा श्रीकृष्णाने ‘मी स्वत: हस्तिनापूरला जातो’ अशी घोषणाच केली. द्रौपदीने समेटाची भाषा करणार्‍या पराक्रमी पतींची हतवीर्य म्हणून निर्भत्सना केली. माझा पिता, बंधू, पुत्र अभिमन्यूला सेनापती बनवून लढतील, असे द्रौपदीने कृष्णासह पांडवांना बजावले.

श्रीकृष्णाचे (नारायणी) अक्षौहिणी सैन्य घेऊन कृतवर्मा हस्तिनापूरला रवाना झालेला होता. कौरवांच्या दरबारात सशस्त्र सात्यकीसह श्रीकृष्ण हजर झाला. परशुराम, नारद, कण्व इ. ऋषींच्या समोर ‘इंद्रप्रस्थ द्या – क्षत्रिय विनाश टाळा’ हाच मुद्दा श्रीकृष्णाने ठसवून कौरवांच्या पापांचा पाढा वाचला. धृतराष्ट्राला समस्त राजांसमोर दुर्योधनाची निंदा करावी लागली. आपण असाहाय्य असल्याचे धृतराष्ट्राला कबूल करावे लागले. कृष्णाला बंदी करण्याचे उपद्व्याप दुर्योधन करू लागताच, सात्यकीने कृतवर्म्याच्या सैन्याने कौरवसभेला घेरण्याचा आदेश दिला. कृष्णाने धृतराष्ट्राला ‘राजा! तू मला बंदी करण्याची दुर्योधनाला आज्ञा देच. मग बघ, मी दुर्योधनाला सर्वांसमक्ष बंदी करून घेऊन जातो’ असे बजावले. सात्यकी व कृतवर्म्याला दोन्ही बाजूला घेऊन श्रीकृष्ण जोरजोरात हसत सभेतून निघाला. अवघे भूमंडळ डळमळल्याचा भास झाला. आकाशात ढग नसतानाही लोकांना गडगडाट व विजांचा लखलखाट दिसला. ‘श्रीकृष्णा! तुझे हे रूप मला पाहू दे! मला क्षणभर दिव्यदृष्टी दे’, धृतराष्ट्राने श्रीकृष्णाची करुणा भाकली. या विश्वरूप दर्शनानंतर श्रीकृष्ण कुंतीला भेटला. येताना कर्णाला रथात घेऊन त्याचे जन्मरहस्य कथन केले. ज्येष्ठ बंधू म्हणून राज्याभिषेकाचा मान तुझाच व द्रौपदीही सहाव्या भागात तुला प्राप्‍त होईल, अशी प्रलोभने दाखविली.

कर्ण बधला नाही. श्रीकृष्णाने निरोप दिला, ‘आजपासून सातव्या दिवशी मार्गशीर्ष अमावास्येला कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होईल.’

कुरुक्षेत्रावर दोन्ही सैन्यतळ सज्ज झाल्याचे अवलोकन करून शोकग्रस्त आणि खिन्‍न झालेल्या धृतराष्ट्रासमोर व्यास अवतीर्ण झाले. ‘तुझ्या पोटी जन्मलेला दुर्योधन हा साक्षात काळ आहे. संकट नसतानाही तू नाशाचा मार्ग पत्करला आहेस. युद्धाचा कलंक तुझ्याच माथ्यावर आहे. अजूनही पांडवांना राज्य देऊन कौरवांना शांती लाभू दे. वेदात वधाची प्रशंसा केलेली नाही.’

चर्चा, सख्य घडवून मिळवलेला विजय ‘श्रेष्ठ’ असतो. फंदफितुरी करून प्राप्‍त झालेला विजय मध्यम समजतात. युद्ध करून मिळणारा विजय अत्यंत ‘अधम’ होय. त्यालाच विनाश म्हणतात.

कृष्णशिष्टाई नंतरचा युद्ध टाळण्याचा व्यासांनी केलेला अखेरचा प्रयत्न होता. ‘पुत्रा! हा विनाश पाहायचा असेल तर तुला मी दिव्य दृष्टी देईन.’

हा संहार पाहणे मला रुचणारे नाही. तुझ्या प्रभावाने युद्धाचे वर्णन संजयाकडून ऐकायला मिळेल, असा वर दे. व्यासांनी संजयला युद्धात जखम व वेदनाही होणार नाही, याची खात्री दिली. ‘युद्ध वार्ताहर’ बनविले. परंतु शेवटी कठोरपणे बजावले – ‘जिथे धर्म तिथेच जय’, हे धृतराष्ट्रा! ‘कौरवांची व पांडवांची कीर्ती मी स्वत: पसरवीन.’ या वचनाची पूर्तता म्हणजेच महाभारत.

टीप : कौरव – पांडवांच्या युद्धात प्रचंड प्रमाणात मारले गेलेले सैन्य, हत्ती, घोडे इ. चे अवशेष फारसे मिळत नसल्याने हे युद्ध झालेच नाही, ते एक पौराणिक थोतांड आहे असे काहींचे मत आहे. सिंधपासून ओरिसापर्यंतचा व मुख्यत: उत्तर भारताच्या प्रचंड भूभागावर हे युद्ध झाले. निश्‍चित पुराव्यांसाठी अत्यावश्यक ते उत्खनन करायला पुरेसा निधीच उपलब्ध होत नसल्याने खूप अडचणी येतात असे मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

महाभारतात युद्धाचा काळ ग्रंथातील काही वचने, आकाशदर्शनाची वर्णने इ. वरून निश्‍चित करण्याचे, संशोधक प्रयत्न करतात. अशी काळनिश्चिती करण्याचा चंग बांधलेल्या विद्वानांच्यात एकमत होत नाही.

रामजन्मभूमीप्रमाणे हाही वाद न्यायालयात न्यायचा का? कुणी काहीही म्हणो, महाभारताचा भारतीय समाजमनावर प्रचंड प्रभाव आजही आहे हे कबूल करावेच लागते.

……….

महाभारताचा पुनर्शोध
राजा पटवर्धन
अक्षर प्रकाशन
किंमत : २५०
सवलत : २००

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0