उद्धवस्त मनांचे हुंदके

उद्धवस्त मनांचे हुंदके

युद्ध कोणाला काय देतं? या हिशेबी प्रश्नापेक्षा युद्ध कोणावर काय लादतं याचा संवेदनशीलतेनं शोध घेतला तर निरागस मनांची होरपळ तेवढी समोर येत जाते. स्थळ-काळ तेवढा बदलतो, दाहकता तीच असते. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेनयुद्धामुळे खरं तर अमेरिका-युरोप-रशिया यांच्यातल्या सत्तासंघर्षातून एकतर्फी लादल्या गेलेल्या या युद्धामुळे होरपळीच्या कितीतरी कहाण्या एव्हाना जन्माला आल्या असतील. काहींमध्ये जगण्यातली कारुण्यमयता, खिन्नमनस्कता असेल, तर काहींत जगण्याची उमेद वाढवणारी निरामयता. या पार्श्वभूमीत चित्रपट-साहित्यांतून पुढे आलेल्या मानवी कहाण्यांचा हा कोलाज...

फडणवीसांच्या विदर्भातच जलयुक्त शिवार अपयशी!
हिजाब, बुरखा, नकाब आणि किताब
मेट्रो चाचणी आरेच्या हद्दीबाहेर होणार

‘टोकियो हॉलोकॉस्ट रिसोर्स  सेंटर’  या  छोट्याशा वस्तुसंग्रहालयातील काचेच्या कपाटातील एका तपकिरी रंगाच्या मोठ्या सुटकेसकडे काही मुलं टक लावून बघत होती. त्यावर लिहिले होते, हॅना ब्रॉडी. जन्म तारीख-१६ मे१९३१. वाइजनकिंड. (जर्मन भाषेत या शब्दाचा अर्थ अनाथ.) ती सुटकेस बघताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न घोंघावत होते. ही हॅना ब्रॉडी कोण होती? ती कुठे चालली असेल? तिने सुटकेसमध्ये काय, काय भरलं असेल? तिचं नेमकं काय झालं? कारण ही सुटकेस एका कुविख्यात छळछावणीतून आलेली हाती. पन्नास वर्षांपूर्वी दूरच्या एका खंडातील ज्यू मुलांचे यातनामय जीवन त्यात बंदिस्त होते आणि जपानमधील ‘स्मॉल विंग्ज’चे छोटे सदस्य समजून घेत होते.

जगात सहिष्णुता आणि सामंजस्य नांदावं, वाढीस लागावं यासाठी एका अनामिक दानशूर व्यक्तीने ‘टोकियो हॉलोकॉस्ट एज्युकेशन रिसोर्स सेंटर’ ही संस्था स्थापन केली. युद्धातील नरसंहाराचा इतिहास जपानमधल्या विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, या उद्देशाने हे सेंटर सुरु झालं आहे. त्या सेंटरची समन्वयक फ्युमिको इशिओका हिने ठरवलं की, मुलं प्रत्यक्ष पाहू शकतील, स्पर्श करू शकतील, अशा गतकाळातील वस्तूंद्वारे त्यांना या काळ्याकुट्ट इतिहासाची दाहकता समजली पाहिजे. त्यांच्या जाणीव-नेणिवेत उतरली पाहिजे. त्याच उद्दिष्टांचा एक भाग म्हणून हॅनाची सुटकेस या सेंटरमध्ये ठेवण्यात आली होती. मनात उत्कंठा दाटून आलेल्या मुलांनी ती सुटकेस उघडून तपासली, ती पूर्णपणे रिकामी होती. तरीही मुलांचे मन त्या सुटकेस भोवती भिरभिरत होतं. त्यावरील तिच्या जन्मतारखेवरून त्यांचे अंदाज बांधणं सुरू होतं. हॅना छावणीत गेली तेव्हा ती तेरा वर्षांची असणार.. एक म्हणाली, “माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. “कोणी म्हटलं ” माझ्या मोठ्या बहिणीएवढी.” मुलांच्या भावुकतेची वेगळी झलक तिथे दिसत होती.

अशीच संवेदनशीलता मुलांच्यात निर्माण व्हावी, त्यांचं इतिहासाशी नातं जुळावं यासाठीच तर सेंटर प्रयत्नशील होतं. १९९९ मध्ये हॉलोकॉस्ट संबंधी दोनशे विद्यार्थ्यांची एक परिषद भरली होती. त्यात छळछावणीतून वाचलेल्या याफा एलियाच यांच्याशी विद्यार्थ्यांनी वार्तालाप केला. त्यावेळी एलियाच म्हणाल्या,” भविष्यात जगामध्ये शांतता निर्माण करण्याची ताकद फक्त मुलांमध्ये आहे.” दरम्यान,

कॅरेन लिवाइन हिने ‘Hanna’s Suitcase : A True Story’ हे पुस्तकं लिहिलं आहे. समाधानाची गोष्ट म्हणजे, त्याचे मराठी भाषांतर माधुरी पुरंदरे यांनी केलेलं आहे.

थोडक्यात, हॅनाची ती रिकामी ऐतिहासिक सुटकेस अनेक अदृश्य घटना, गोष्टींनी भरलेली होती. एरवी युद्धकथा या नेहमी कालवाकालव करणाऱ्या, पिळवटून टाकणाऱ्या असल्या तरी त्यात माणूस म्हणून अधिक सहिष्णू होण्याची प्रक्रिया घडवून आणण्याचीदेखील ताकद असते. शांतीसाठी त्यांनी फोडलेला टाहोच असतो तो… 

युद्धाची दाहकता

‘खूप गरम होतंय, खूप गरम होतंय’ असं किंचाळत किम फुक ही युद्धग्रस्त व्हिएतनाममधली नऊ वर्षाची मुलगी अंगावरील कपडे काढत विवस्त्र रस्त्यावर पळत सुटली. अमेरिकी विमानांतून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटामुळे ती मोठ्या प्रमाणात भाजली होती. तिच्या अंगाची लाह-लाही होत होती. तिच्या मागे इतर मुलं, सैनिक जीव तोडून बॉम्ब हल्ल्याच्या ठिकाणापासून पळत होती. त्याच रस्त्यावर युद्धाच्या घटना आपल्या कॅमेऱ्यात टिपत असलेल्या छायाचित्रकार निक यूट याने तिचा व मागून येणाऱ्या मुलांचे छायाचित्रं टिपली. पण पुढच्या क्षणी परिस्थितीचं  गांभीर्य त्याच्या लक्षात आले, तसं जवळ असलेलं पाणी त्याने किमवर ओतले. तिला व्यवस्थित गुंडाळून हॉस्पिटलमध्ये भरती करून, नीट उपचार मिळावे म्हणून जातीने लक्ष घातलं. पुढे योग्य उपचार व विविध शस्त्रक्रिया होऊन किम फुक बरी झाली. निकमुळे ती व्हिएतनाम युद्धाची नायिका ठरली. ‘नापाम गर्ल’ म्हणून तिचं ते छायाचित्र जगप्रसिद्ध झालं. (नापाम हे त्या बॉम्बचे नाव होतं.) त्या छायाचित्राला अनेक बक्षीस,सन्मान मिळाले. व्हिएतनाम युद्धातून अमेरिकेने माघार घेण्यात या छायाचित्रानं मोठी भूमिका बजावली. किम आता मोठी झाली आहे. ती म्हणते, “माझा माणुसकीवरचा विश्वास निक यूटमुळे दुणावला. नापाम बॉम्ब हा शक्तिशाली होता पण प्रेम, श्रद्धा,क्षमाशील वृत्ती यांच्यात अधिक ताकद आहे.”

दोन सेकंद जरी मुलाचं बोट आपल्या हातातून सुटलं तरी आपला जीव कासावीस होतो. युद्धात तर कित्येक लहान मुलांचा आपल्या घराशी, पालकांशी कायमस्वरूपी संपर्क सुटतो. अशा वेळी भयाण परिस्थितीचे आकलन होण्याची क्षमता नसलेली कोवळी मनं किती होरपळून जात असतील, याचा विचार देखील अस्वस्थ करणारा ठरतो. माणसाला स्तब्ध करणाऱ्या युद्धाच्या इतिहासात जेव्हा स्वतःचा बचावदेखील अवघड असताना सहृदयतेने केलेली एखादी कृती, प्रेमाचा शब्दउच्चार हा संबंध अस्तित्वाचा उच्चार केल्यासारखा वाटतो. अशाच संकटावर मात करायला लावणाऱ्या निरपेक्ष प्रेमभावनेच्या उबेतून आकारास आलेली एका अविश्वसनीय नात्याची सत्यकहाणी म्हणजे, ‘आयलो-दी डॉटर ऑफ वॉर’ हा कायमस्वरुपी स्मरणात राहिलेला सिनेमा. १९५०च्या कोरियन युद्धाच्या दरम्यान सुलेमान नावाचा तुर्की सैनिक एका भुयारामधून जात असताना त्याला एक सात वर्षांची मुलगी सियोल आपल्या आईच्या प्रेतापाशी रडत बसलेली दिसते. तो तिला आपल्या कुशीत घेतो. कँपमध्ये तिला आपल्या सोबत राहायला घेऊन जातो. कालांतराने त्या दोघांत वडील- मुलीचे नातं फुलत जातं. तो तिला आयला म्हणजे ‘चंद्राचा तुकडा’ म्हणत असतो.

सुलेमान तिच्यासाठी सर्वस्व झालेला असतो. मायदेशी परततांना सुलेमानला तिला सोबत नेण्याची परवानगी मिळत नाही. “मी तुला घ्यायला परत नक्की येईल. हे एका वडिलांचं मुलीला दिलेलं वचन आहे.” असं सांगून सुलेमान जातो. युद्धासमाप्तीनंतर सुलेमान आयलास घ्यायला कोरियात येतो. पण कागदोपत्री अनाथ असलेल्या आयलाचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही. तरीही त्याचा हा शोध थांबत नाही. हा शोध पुढे एका पत्रकार महिलेच्या मदतीने पूर्ण होतो. दरम्यान ६० वर्षांचा मोठा कालावधी सरून जातो. कोरियातील एका बागेत या दोघांची भेट होते. सियोलदेखील आपल्या वडिलांना विसरलेली नसते. दोघे एकमेकांच्या कुशीत येऊन हमशाहमशी रडतात. एका वडिलांनी आपल्या लेकीला दिलेलं वचन पूर्ण होतं. सिनेमाच्या शेवटी सुलेमान आणि सियोलच्या खऱ्याखुऱ्या भेटीची चित्रफित झळकते. उशिरा का होईना काळाच्या काळ्याकुट्ट ढगात सुलेमानला त्याचा ‘चाँद का तुकडा’ दिसतो, याचं समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही उमटल्यावाचून राहात नाही.

बॉम्बवर्षाव आणि निरागसतेची राख

परंतु, प्रत्येक बावरलेल्या, भेदरलेल्या छोट्या जीवाला सुलेमानची कुशी मिळत नाही. बालपणाची गोड गुंगी अनुभवत असताना, महत्त्वाकांक्षेने पछाडलेला राक्षस निरपराध, निष्पाप लोकांचा विशेषतः मुलांच्या मागे लागतो तेव्हा त्या मुलांची सैरभैर अवस्था ही जीवघेणी असते. मुलाचे निरागस आनंददायी भावविश्व उध्वस्त होतं. तोत्तोचान व तिच्या सवंगड्यांचे अत्यंत आवडते ठिकाण म्हणजे, त्यांची शाळा ‘तोमाई’, तीदेखील अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी. रेल्वेच्या डब्ब्यात भरणारी ही शाळा म्हणजे शिक्षणाचा अनोखा प्रयोगच जणू. रोज त्या परिसरात पक्ष्यांच्या आवाजांसोबत मुलांच्या हसण्याचे, बोलण्याचे आवाज मिसळत. झाडांच्या फाद्यांवर फुलां – पानांसारखी मुलंही हक्काने बसत असत. पण जशी अमेरिकी लष्कराची विमानं टोकियोच्या आकाशात भिरभिरू लागली तशी मुलांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पण घडायचं ते घडलंच. १९४५ मध्ये झालेल्या  बॉंम्ब वर्षावात ‘तोमाई’ आगीत जळून खाक झाली. ‘तोत्तोचान’ या पुस्तकात लेखिका म्हणते की थोड्या अवधीसाठी मिळालेल्या उर्जादायी शिक्षणाने आम्ही आज उत्तम नागरिक झालो असलो तरी ‘तोमाई’ परत होणे नाही.

२०१९ मध्ये आलेल्या जोजो रॅबीट चित्रपटातील दृश्य.

२०१९ मध्ये आलेल्या जोजो रॅबीट चित्रपटातील दृश्य.

युद्धामुळे शिक्षणापासून वंचित, अनाथ, भुकेलेली मुलं कोणत्या सकस मनोवृत्तीने उत्तम नागरिक होतील? याचा विचार कोण करतं? त्याचे दूरगामी परिणाम हे बॉम्बस्फोटापेक्षा अधिक भयावह आहेत. हे कोण लक्षात घेतं? बर्गन बेल्सन छळछावणीतून वाचलेला मुलगा प्रेतांचा खच पडलेल्या रस्त्यावरून एकटा जात असतानाचा फोटो बघितला की जाणवतं, कोणती निरागसता कोणती कोवळीक त्याच्यात उरली असेल?

बंडखोर प्रवृत्तीचा उर्दू कथालेखक सदाअद हसन मंटोची पहिली कथा ‘तमाशा’ ही खालीद या सहा वर्षाच्या मुलांच्या निरागस नजरेने जालियनवाला  हत्याकांडानंतर उद्भवलेल्या युद्धसदृश वातावरणावर बेतलेली आहे. बाहेरील वातावरण चिघळल्यामुळे अचानक खालीदला सुट्टी मिळते.त्याच्या बालमनावर हिंसेशी संबंधित बातम्यांचा परिणाम होऊन नये, यासाठी घरचे काळजी घेत असतात. संचारबंदी असून एक सभा घेतली जाणार असते. त्याबद्दलचे आलेले परिपत्रक हे तमाशाचे (नाटक) निमंत्रण आहे, असे सांगितले जाते. खालीद संध्याकाळी तमाशा बघण्यासाठी कमालीचा उत्सुक असतो. तितक्यात बंदुकीच्या गोळ्यांचा आणि पाठोपाठ किंकाळ्यांचे आवाज यायला लागतात. खिडकी समोरील रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडलेल्या मुलाला बघून खालीद रडायला लागतो. आई त्याला समजवत सांगते की, त्याने मोठी खोडी काढली असेल म्हणून शिक्षा झाली. खालीदच्या बालमनाला प्रश्न पडतो, की शाळेत छडीची शिक्षा असली तरी रक्त काढत नाही. शिक्षकांनी आपला कान जोरात पिळला होता तेव्हा अब्बांनी मुख्यध्यापकांकडे तक्रार केली होती.रात्री तो झोपण्याआधी प्रार्थना करतो की “अल्लाह मियाँ, ज्याने या मुलाला मारले त्याला चांगली शिक्षा कर आणि ज्या छडीमुळे एवढं रक्त निघालं ती छडी काढून घे. मला त्या छडीची भीती वाटते. जर तू माझं बोलणं ऐकलं नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही.. बहुदा पुढे खालीद कधीच आपल्या अल्लाशी बोलला नसेल.

छळछावण्यांतला कोंडमारा

पण हानी केवळ एकतर्फी असत नाही. कधी तरी उगारलेल्या छडीचे वळ त्यांनाही बसू शकतात. हे विदारक चित्र ‘ दी बॉय इन स्ट्रिप्ड पायजामा’ या पुस्तकावर बेतलेल्या त्याच नावाच्या चित्रपटातून दाखवलं आहे. ब्रुनो हा एका मोठ्या नाझी ऑफिसरचा मुलगा. नव्या घरात करमत नाही म्हणून फिरत फिरत छळ छावणीच्या परिसरात पोहचतो. तारेच्या कुंपणांच्या पलीकडे रेषां-रेषांचा पायजमा घातलेला एक मुलगा शमूल त्याला दिसतो. या मुलांशी त्यांची मैत्री होते. घरी येणारे शिक्षक ब्रुनोला नाझी विचार शिकवत असतात. जे ब्रूनोला बिलकुल आवडत नसतात. एकदा जगाला दाखविण्यासाठी बनवलेली छळ छावणीवरील डॉक्युमेंटरी बघतो. त्यात छावणीतील कसे चांगले, आनंदी वातावरण आहे, असे दाखवले असते. ब्रूनोला कँप म्हणजे खूपच मस्त जागा आहे, असे वाटते. त्याला त्याविषयी अधिक उत्सुकता वाटते. पुढे आईच्या आग्रहामुळे ते घर सोडून दुसरीकडे जाणार असतात, तेव्हा आकर्षणापोटी ब्रुनो शमूलच्या मदतीने कँपमध्ये रेषांरेषांचा पायजमा घालून जातो आणि त्याच दिवशी एका मोठ्या हॉलमध्ये मुलांचे कपडे उतरवून गॅस सोडला जातो. आपल्या हरवलेल्या मुलाचा शोघ घेत नाझी ऑफीसर असलेले वडील कँपमध्ये येतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. बाहेर ढिगाऱ्याने रेघारेघांचे पायजमे पडलेले असतात…

बालपणापासून एखाद्या विशिष्ट जाती-पंथाविषयी मन कलुषित करण्याचे महान कार्य मोठी माणसं अत्यंत चलाखीने करत असतात. पण प्रत्यक्षात चित्र फारचं वेगळं आहे, हे समजल्याला वेळ लागतो.( कित्येकांना ते कधीच समजत नाही.) ‘जोजो रॅबिट’ या चित्रपटात एका १० वर्षाच्या मुलावर उत्तम नाझी बनण्याचे सामाजिक दडपण, त्यासाठी होत असलेली त्याच्या मेंदूची पद्धतशीर कल्हई व घरात लपलेल्या ज्यू मुलीशी निर्माण झालेले भावबंध, असा गुंता समोर येतो. या मुलाचा हा मानसिक गोंधळ विनोदातून मांडताना, दिग्दर्शकाने हिटलरच्या दांभिकतेचा बुरखा टराटरा फाडला आहे. एका ठिकाणी तो मुलीला विचारतो की , ‘ज्यूचा अड्डा सांग, ते कुठे रहातात?’ तेव्हा ती उत्तर देते, ‘तुमच्या डोक्यात!’

‘देशभक्ती’ ही धर्मासारखीच अफूची गोळी आहे. याची जाणीव ‘ऑल क्वाएट’ ही कादंबरी आपल्याला करून देते. या जगप्रसिद्ध कादंबरीचा निवेदक म्हणतो, “कशाला उगाचच उतरवता युद्धभूमीवर आम्हा निष्पाप पोरांना? त्यापेक्षा बैलांच्या वा रेड्यांच्या झुंजीसारखी मैदाने भरवा. युद्धखोर देशातले मंत्री, नोकरशहा, राजकारणी, जनरल यांचेच कपडे काढून, त्यांना अंडरपँटवर उतरवून कुस्त्यांचा सामना तिकीट लावून घ्या. जो जिंकेल, आपण त्याला मानू. उगाचच त्यासाठी कोवळी पोरं का कापतात?” असेच एकदा काही कोवळ्या वयाचे सैनिक वाळवंटात थकून, भागून पहुडले असताना, एक सैनिक ‘विनी द पुह’ हे बालपणीचे गाणं म्हणायला सुरवात करतो, तेव्हा इतर सैनिकही ते गाणं म्हणायला सुरवात करतात.ते सर्व मनाने बालपणात जातात.. अतिशय बिकट परिस्थितीत त्या गाण्यामुळे त्यांना दिलासा मिळतो. बालपणाच्या आठवणी रमलेल्या सैनिकांची जगण्याची उमेद जागृत होते.

रायनर रिल्के म्हणाला आहे : “आपल्याकडे सांगण्यासारखं काही उरत नाही असं वाटत तेव्हा सगळं संपलेले नसतं. तुमचं बालपण तर असतंच तिथे परतून जा आणि शोधा…”

युद्धाची खुमखुमी असलेल्या सर्व शक्तिशाली सत्ताधीश लोकांनी जर असंच आपल्या बालपणाला आठवून, जगातील सर्व बालकांचे निरागस विश्व जपायचं असं ठरवलं  तर… ?

देवयानी पेठकर, चित्रपटकलेच्या आस्वादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: