४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार

४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार

इचलकरंजीः "राज्य सरकारने कृषि पंप वीज जोडणी धोरण २०२० व त्या अंतर्गत कृषि वीज बिल सवलत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पं

अनेक राज्यांमध्ये २ ते ८ तास लोडशेडिंग
वीज, इंधन, कोळशासाठी जग अस्वस्थ
नव्या विद्युत पुरवठा मसुद्यात ग्राहकाचे नुकसानच

इचलकरंजीः “राज्य सरकारने कृषि पंप वीज जोडणी धोरण २०२० व त्या अंतर्गत कृषि वीज बिल सवलत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकीत वीज बिले तपासली जातील व चुकीची सर्व वीज बिले दुरुस्त करण्यात येतील. तसेच राज्यातील सर्व प्रलंबित वीज जोडण्या त्वरीत पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आवश्यकतेनुसार सौर पंप व वीज जोडण्यांचे उद्दीष्ट वाढविण्यात येईल. शेतकरी ग्राहकांना दिवसा वीज देण्याची योजना ३ वर्षांत पूर्ण करण्यात येईल,” असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या संयुक्त शिष्टमंडळास दिले आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर व खानदेश डेव्हलपमेंट असोसिएशन यांनीही शेतकरी ग्राहकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

राज्य सरकारने वीज जोडणी धोरणांतर्गत वीज बिल सवलत योजना २०२० जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या योजनेनुसार सप्टेंबर २०२० अखेर पर्यंतची थकबाकी महावितरण कंपनीच्या वतीने निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार सप्टेंबर २०१५ अखेरच्या थकबाकी वरील सर्व विलंब आकार व सर्व व्याज रद्द करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०२० या ५ वर्षांच्या कालावधीतील थकबाकीवर कंपनीने कर्ज घेतले, त्या दराने व्याज आकारणी होणार आहे. त्यानुसार निश्चित होणारी थकबाकी पहिल्या एका वर्षात भरल्यास ५०% सवलत दिली जाणार आहे.

या योजनेचे सर्व संघटनांनी स्वागत केले. तथापि ही योजना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी दोन महत्त्वाच्या त्रुटींचे निराकरण होणे आवश्यक आहे हे शिष्टमंडळाने उर्जामंत्री व संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले आहे. राज्यातील ८०% हून अधिक शेतीपंपांची वीज बिले सरासरीने दुप्पट वा अधिक झालेली आहेत. विनामीटर शेती पंपांचा जोडभार ३ हॉर्स पॉवरऐवजी ५ हॉर्स पॉवर; ५ हॉर्स पॉवरऐवजी ७.५ हॉर्स पॉवर; ७.५ हॉर्स पॉवरऐवजी १० हॉर्स पॉवर या प्रमाणे वाढविण्यात आला आहे. मीटर असलेल्या व मीटर चालू असलेल्या शेती पंपांचे वीज बिल मीटर रिडींग न घेता सरासरी म्हणून १०० ते १२५ युनिट्स म्हणजे दुप्पट वा अधिक टाकले जात आहे. मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत, त्यांचे वरही सरासरी १०० ते १२५ युनिट्स आकारणी होत आहे. या पद्धतीने वाढलेली बिले दुरुस्त करण्यासाठी जेथे विनामीटर जोडणी आहे, तेथे खरा जोडभार तपासून त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर आहेत व सुरू आहेत, तेथे प्रत्यक्ष रिडींग घेऊन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. मीटर बंद आहेत अशा ठिकाणी मागील मीटर चालू कालावधीतील वीज वापर गृहीत धरून त्यानुसार संपूर्ण कालावधीचा वीजवापर व त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर पूर्ण काळ बंद आहे व प्रत्यक्ष वीजवापर तपासता येत नाही, अशा ठिकाणी त्या फीडरवरून दिलेली वीज व त्या फीडरवरील खरा जोडभार या आधारे सरासरी वीजवापर व त्यानुसार बिले निश्चित करण्यात यावीत, अशा मागण्या संघटना प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आल्या.

या सर्व मागण्यांना उर्जामंत्री व संबंधित अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. शेतकरी ग्राहकांची वीज बिले अचूक दुरुस्त झाली तर शेतकरी निश्चितपणे या योजनेत सहभागी होतील व त्यासाठी संघटनाही राज्य सरकारला सहकार्य करतील अशी खात्री यावेळी सर्वांनी ऊर्जामंत्री यांना दिली.

२००४, २०१४ व २०१८ या कृषि संजीवनी योजनांपैकी फक्त २००४ सालची योजना यशस्वी झाली. चुकीची व दुप्पट वीज बिले या कारणामुळेच २०१४ व २०१८ या दोन्ही योजना पूर्णपणे फसल्या हेही संघटना प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्याच बरोबर मागील सर्व योजनांमध्ये थकीत मुद्दल रकमेवरील सर्व व्याज रद्द करण्यात आले होते. यावेळी मात्र मागील ५ वर्षांचे व्याज आकारले जाणार आहे. योजना १०० टक्के यशस्वी होण्यासाठी हे ५ वर्षांचे व्याजही रद्द करण्यात यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केलेली आहे. तसेच दुस-या व तिस-या वर्षी भरलेल्या रकमेच्या ३० टक्के व २० टक्केही सवलत अत्यंत अपुरी असल्याने ती वाढवून ७५ टक्के व ५० टक्के करण्याची मागणी करण्यात आली. तथापि या दोन्ही बाबतीत ऊर्जामंत्री यांनी तपासणी करून निर्णय घेऊ असे सांगितले आहे.

या सवलत योजनेसंदर्भात शेती पंप वीज ग्राहकांनी संपूर्ण जागरूक राहणे अत्यंत मह्तत्वाचे व आवश्यक आहे. महावितरण कंपनीने दिलेल्या लिंकमध्ये ग्राहक क्रमांक टाकला की सध्याच्या बिलानुसार मिळणारी सवलत व भरावयाची रक्कम हा सर्व तपशील येणार आहे. या तपशीलानंतर शेवटी तक्रार असल्यास नोंदवा व तक्रारीचा प्रकार निवडा हा पर्याय येणार आहे. त्यामध्ये उच्च देयक, सरासरी देयक, मीटर वाचन दुरुस्ती व चुकीचा भार इ. पर्याय येणार आहेत. वीज बिल चुकीचे व जास्त आहे, अशा सर्व ग्राहकांनी योग्य पर्यायाची नोंद करणे आवश्यक आहे. अशी नोंद केली तरच स्थळ तपासणी होईल आणि बिल दुरुस्ती होईल असे गृहीत धरणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरुकपणे या ठिकाणी तक्रार नोंद करावी व स्थळ तपासणीच्या वेळी समक्ष हजर राहून व संपूर्ण माहिती देऊन आपले बिल पूर्णपणे दुरुस्त करुन घ्यावे व मगच योजनेत सहभागी होण्यास मान्यता द्यावी असे जाहीर आवाहन सर्व संघटनांच्या वतीने शेवटी सर्व शेती पंप वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.

मुंबईत मंत्रालयात झालेल्या या बैठकीस माजी खा. राजू शेट्टी, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील, रावसाहेब तांबे, मुकुंद माळी, भरत अग्रवाल, जे पी लाड, एम जी शेलार, जाविद मोमीन, समीर पाटील, पोपट मोरे, महेश खराडे, राजू शेळके, अर्जुन साळुंखे, शैलेश चौगुले, संजय बेले, भागवत जाधव इ. सर्व संघटना प्रतिनिधी तसेच महावितरणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (देयके) गडकरी, संचालक (प्रकल्प) खंडाईत व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0