परंपरेला स्वीकार नकार, देतच आपण पुढे जात असतो : जयंत पवार

परंपरेला स्वीकार नकार, देतच आपण पुढे जात असतो : जयंत पवार

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार आणि लेखक जयंत पवार यांना ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी ‘खेळ’च्या जानेवारी ते जून २०१३ या अंकासाठी अभ्यासक नागनाथ बळते यांनी जयंत पवार यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत दोन भागांत पुनर्प्रसिद्ध करीत आहोत. भाग - १

पुन्हा राज्याचा दर्जा द्यावाः काश्मीरी नेत्यांची मागणी
राहुल गांधी स्पायवेअरच्या संभाव्य लक्ष्यस्थानी
‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’

नागनाथ बळते : सर, तुम्हाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

जयंत पवार : धन्यवाद!

बळते : सर, तुमची महाराष्ट्राला ओळख आहे ती नाटककार म्हणून. मात्र, तुम्हाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तो कथाकार म्हणून. या घटनेकडे तुम्ही कसं बघता?

पवार : मुळात माझ्याबाबतीत पुरस्कार मिळणं ही गोष्ट येते तेव्हा भीतीच वाटते. याचं कारण जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही एकटे असता. बाकीचे सारे काही अंतरावरून तुम्हाला बघत असतात. बघणाऱ्यांच्या भावना वेगवेगळ्या असतात. काही कौतुकाने बघत असतात, काही आश्चर्याने, काही संशयाने, काही अतिशय आनंदाने तर काही खेदाने. मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली तेव्हाच्या माझ्या भावना संमिश्र आहेत. मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर झाला होताच पण या आनंदाबरोबर आश्चर्य होतं, संकोच होता आणि भीतीही. खरं म्हणजे १९७३ साली जी.ए. कुलकर्णी यांना ‘काजळमाया’ या त्यांच्या कथासंग्रहासाठी अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर तो थेट आता २०१२मध्ये मला ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’साठी मिळाला. या दरम्यानच्या कालखंडात कथा या वाङ्मयप्रकाराकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली होती. त्याला दुय्यमत्व देण्यात आलं होतं. त्यामुळे कथेसाठीही साहित्य अकादमी पुरस्कार मिळू शकतो हे मराठीसाठी नवं होतं, त्यामुळे आश्चया वाटलं. कथेचा आणि माझा वास्ता तसा अलीकडचा, गेल्या दहा-बारा वर्षांतला आहे. या काळात मी पंधरा-सोळा कथा लिहिल्या आहेत. म्हणजे कथाकार म्हणून मी तसा या प्रांतात नवाच आहे, आणि तरीही माझ्या वाट्याला हा मोठा पुरस्कार, तोही माझ्या पहिल्याच कथासंग्रहाला आला, या गोष्टीने मी संकोचून गेलो. कारण माझ्या अवतीभोवती चांगल्या कथा लिहिणारे माझ्या आधीही होते आणि माझ्या समकालातही भरपूर आहेत. मला भीती यासाठी वाटली की मला पुरस्कार मिळाल्याने जसा अनेकांना निखळ आनंद झाला तसाच काहींना त्रासही झाला. माझ्यामुळे कुणाला त्रास होत असेल तर मी अनकम्फर्टेबल होतो. तसा झालो. अर्थात हा त्रास मला समजून घ्यायला हवा, असंही मला वाटलं. तसा मी तो समजून घेतला. तो एखाद्याला वाटणं हीही सहज गोष्ट असू शकते. अर्थात ही भावना नंतर हळूहळू माझ्यात झिरपत जाऊन मी शांत झालो.

बळते : हा पुरस्कार जर नाटककार म्हणून तुम्हाला मिळाला असता तर जास्त आनंद झाला असता का?

पवार : नाही, इतकाच आनंद झाला असता. कमी नाही की जास्त नाही. याचं कारण मी दोन्ही वाङ्मयप्रकारांत डावं-उजवं करत नाही. नाटक जसं मी एका अपरिहार्यतेतून लिहितो, ते माझ्या एक्स्प्रेशनचा भाग बनतं तशीच कथा देखील एका अपरिहार्यपणेच माझ्यातून येते. नाटकावर मी हजतकी मेहनत घेतो तितकीच कथेवर घेतो आणि नाटकाचा घाट, व्यक्तिरेखा, त्यांचे संवाद यासाठी जसा ताटकळत बसतो तसाच कथेसाठीही ताटकळत राहतो. काही कथा मी महिनोन महिने लिहीत होतो. खोडून फाडून टाकत कथेला हवा तसा आकार येण्यासाठी मी प्रत्येकवेळी झुंजतो. माझ्यासाठी काहीच सोपं नसतं, ना नाटक, ना कथा. दोन्हींचं जमणं माझ्यासाठी सारखंच आनंददायक असतं. त्यामुळे कथेपेक्षा नाटकाला पुरस्कार मिळाला असता तर…याला माझ्यालेखी फारसा अर्थ नाही. अर्थात एक खरं आहे की, अनेक लेखकांचा अभिव्यक्तीचा खास प्रांत असतो. आपलं सांगणं त्यात मावत नाही तेव्हा ते दुसरा लेखनप्रकार जवळ करतात, पण त्यावर त्यांचा जीव जडलेला नसतो पहिल्या प्रकारासारखा. अशावेळी दुसऱ्या लेखनप्रकाराचा गौरव झाला तर त्या लेखकाच्या मनात आनंदाबरोबरच विषादही भरतो. जसं ग्रेस यांच्या बाबतीत झालं.

बळते : तुमच्या काही कथा वाचल्यावर मला त्यातली अद्भुतता खूप महत्त्वाची वाटली. याला जादुई वास्तववाद म्हणता येईल काय? जादुई वास्तववाद म्हणजे काय?

पवार : जादुई वास्तववाद म्हणजेच मॅजिक रिअॅलिझमची चर्चा गेल्या वीस-पंचवीस वर्षांत आपल्याकडे जोरदार सुरू झाली ती, मार्खेजच्या कादंबऱ्यांची मोहिनी आपल्या लेखक-वाचकांवर पडायला सुरुवात झाल्यानंतर. पण अद्भुतता ही भारतीय वाङ्मयामध्ये प्राचीन काळापासून ओतप्रोत भरलेली आहे. आपल्या लोककथा, आदिवासी कथा पाहा म्हणजे तुम्हाला कळेल. मुळात कथा हा भारतीय वाङ्मयप्रकार आहे. गोष्ट सांगणे यातून तो विकसित झाला आहे. गोष्ट सांगणे म्हणजे केवळ घटिताचं कथन करणे नव्हे, तर घटिताच्या भोवतीचा मोकळा अवकाश कल्पनेने भरून  काढणे. अनेकदा ते घटितच असतं असंही नाही, ते अ-घटितही असतं. अशावेळी कल्पनाशक्ती दुथडी भरून वाहू लागते. गोष्टी सांगणं हा सर्वसामान्य लोकांचा जगण्याचा आधार आहे. मुळात ज्यांच्या हातात जगण्याची साधनं अपुरी होती, आयुष्यात अभावग्रस्तता फिन राहिली होती अशा गरीब, वंचित लोकांनी जगण्यातली ही अभावग्रस्तता, पोकळी भरून काढण्यासाठी एकमेकांना गोष्टी सांगण्याचा मार्ग जवळ केला. या लोकांजवळ कल्पनाशक्ती हीच एकमेव गोष्ट अशी होती की, जिच्याद्वारे त्यांनी अशी अद्भुत विश्वं उभी केली की त्यांतून त्यांचं मनोरंजन तर झालंच पण त्यांनी आपल्या जगण्यासाठी आत्मिकबळही मिळवलं. हे लोक डोंगरदऱ्यातं, गावकुसावर राहात होते. हे कष्टकरी होते, नाडले गेलेले, होरपळले गेलेले लोक होते. यांनी एकमेकांनाच नव्हे तर आपल्याला पिळणाऱ्यांनाही गोष्टी सांगून सांगूनच गुजारा केला. ते केवळ कठोर वास्तवाचाच सामना करत राहिले असते तर कधीच नामशेष झाले असते आणि ही भूमी विराण झाली असती. पण त्यांनी स्वतःसाठी असा अवकाश निर्माण केला की त्या कल्पनेच्या स्वप्निक साम्राज्यात ते, त्यांचे वंशज युगानुयुगे एका धुंदीत जगत आले. मी त्यांचाच वंशज आहे. पण यांनी निर्माण केलेलं कथासाहित्य गेल्या दीडदोनशे वर्षांत आपण जवळपास विसरून गेलो होतो. ब्रिटिश वासाहितक कालखंडानंतर ज्या वाङ्मयप्रकाराचा प्रभाव वाढला त्यात वास्तववाद केंद्रस्थानी होता. एकूण जगण्याचं आकलन वास्तववादी पद्धतीनं केलं गेलं. ब्रिटीशांनी आपल्याकडे शिक्षण आणलं असं आपण मानतो, त्यामुळे त्यांनी जे शिकवलं ते प्रमाण मानायची आपली धारणा राहिली. याच काळात युरोपात वास्तववादाचा प्रभाव वाढत होता. ब्रिटीशांनी आपल्याकडे शेक्सपिअर आणला. त्याचा प्रभाव आपल्यावर पडला, परंतु आपण गिरवला तो नॉवेजियन इब्सेन. इब्सेनिक वास्तववादी नाटकांचा आपल्यावर आजही दाट पगडा आहे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकात रशियात चेकॉव्ह वगैरे लोकांनी नॅचरॅलिझम आणला. दोस्तोवस्कीच्या कादंबऱ्यांचा मोठा प्रभाव जगिर पडला. आपल्याकडेही लोक वास्तववादी पद्धतीने लिहायला लागले. या पद्धतीनं वास्तवाकडे बघता येतं हे त्यांना नव्यानेच जाणवत होतं. औद्योगिकरणामुळे शहरं निर्माण होत गेली. या उद्योगधंद्यासाठी लागणारा कामगार खेड्यातून शहरात येऊ लागला. पण त्यामुळे त्याचा उद्योगव्यवसायच बदलला नाही, तर जगण्याची शैली आणि दृक्ष्टकोणही बदलला. खेड्यातल्या कृषीजीवनात एक सलगता होती. शेतात बी पेरण्यापासून ते त्याचं पीक घेण्यापर्यंत उत्पादनाच्या प्रत्येक प्रक्रियेत तो सहिागी असायचा. ही सगळी प्रक्रिया तो सलगपणे अनुभवायचा. शहरात ही साखळी तुटली. इथे कारखान्यांत उत्पादन तुकड्यातुकड्यात होत होतं. प्रत्येकाचं कम्पापर्टमेंटलायझेशन झालं होतं. मी गिरणीत काम केलंय. तिथे कापड बनण्याची जी प्रक्रिया असते ती आधी कापसाच्या गसड्यांतून कचरा काढून त्याचे रोल तयार होणं, त्या रोलपासून कापसाचे पेळू होणं, पेळूची वात होणं, त्याचा धागा बनणं, त्या धाग्यांचे उभेआडवे धागे विणून त्याचं कापड होणं, कापडावर ब्लिचिंग, डाइंग, प्रिटींग अशा प्रक्रिया होऊन छापलेलं कापड फोल्डिंग डिपार्टमेंटमध्ये येऊन तिथे त्याच्या घड्या होणं, तागे तयार होणं या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या विभागात व्हायला लागल्या. त्यामुळे असं झालं की शहरातल्या माणसाला वास्तव तुकड्या तुकड्यांत दिसायला लागलं. त्याचं जग छोटं झालं, त्यातली माणसं तुकड्यातकड्यांतून त्याच्यासमोर येऊ लागली. हे जग साहित्यात प्रतिबिंबित करणारे लेखक हे ब्राह्मण, सारस्वत आणि मुख्यत्वे प्राध्यापकी पेशातले होते. त्यांना तथाकथित सुसंस्कृतपणाच्या, प्रमाणभाषेच्या, नीतिकल्पनांच्या स्वतःच्या अशा मर्यादा होत्या. त्या उल्लंघण्याचा यशस्वी-अयशस्वी प्रयत्न अनेक लेखकांनी केला. त्यातून चांगलं वास्तववादी साहित्य आलं देखील. पण त्याचबरोबर एका मर्यादित परिघात मानवी मनाच्या खोल डोहात बुडी मारण्याचा आव आणत कृतक रीतीवादी साहित्यही जन्माला आलं. आपला अनुभव नीट लिहिता येणं, मर्यादित अनुभवावकाश शब्दांच्या फुलोऱ्यातून सजवणं म्हणजे साहित्य अशा भ्रामक समजुती पसरून कोमट आणि कुबट मध्यमवर्गीय जाणिवांचं साहित्य विपुल प्रमाणात प्रसवलं गेलं. पण ग्रामीण जगणं असं नव्हतं. त्यात अजूनही सलगता, एकसंधता बऱ्यापैकी होती आणि त्याचा अवकाशही व्यापक होता. पण तरीही वास्तववादी शैलीचा प्रभाव शहरापलीकडच्या लेखकांवरही पडून तेही त्याच पद्धतीचं लिहायला लागले. मला वाटतं, स्वातंत्र्योत्तर काळात लिहूवाचू लागलेल्या दलित आणि बहुजन समाजाला, पांढरपेशांना ठाऊक नसलेलं आपलं जगणं दाखवावसं प्रकर्षाने वाटू लागलं असणार. शहरी मध्यमवर्गीय दु:खांपेक्षा त्यांचं सोसणं, प्रतिकूल परिस्थितीत झुंजणं अधिक विदारक होतं हे खरंच, पण सर्व दु:खवेदना अंगात जिरवूनही माणसं कशामुळे उभी राहतात, या कोड्याचं उत्तर फोटोग्राफिक वास्तववादात मिळणारं नव्हतं. त्यासाठी गरज होती ती वास्तववादाची व्याख्या रुंदावण्याची. आपण जे डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकाने हुगंतो, जिव्हेने आस्वादतो, त्वचेने स्पर्शतो तेच वास्तव असतं असं मानायला मी तयार नाही. मला असं वाटतं की, मला जे जाणवतं तेही वास्तव आहे आणि जे जाणवल्यासारखं वाटतं तेही वास्तव आहे. आजच्या काळात तर वास्तव जाणून घ्यायला महाभारतातल्या संजयाची दिव्यदृष्टीच लागेल. ती आपल्याकडे नाहीच, उलट आपण जुझे सारामागूच्या कादंबरीतल्या पात्रांप्रमाणे ब्लाइंड झालो आहोत. अशा घनघोर जगण्यात कल्पनाशक्तीच माणसाला तगवते हे आपल्याला कधीतरी समजून घ्यावं लागेल. हेन्री मिलर म्हणतो, वास्तवाइतकं अद्भूत काहीच असू शकत नाही आणि पाब्लो पिकासो तर म्हणतो, एव्हरी इमॅजिनेशन इज अरिअल.

अर्थात आजच्या संदर्भांत मला अभिप्रेत असलेलं साहित्यातलं अद्भुताचं उपयोजन म्हणजे खोट्या चमत्कारांच्या भूलभालैयात, हवेत स्वच्छंद विहरणं नव्हे तर डोळ्यांना दिसणाऱ्या जगण्याच्या पलिकडची अदृश्य जगं बघण्याचा प्रयत्न करणं. प्राणीमात्र ज्या वास्तवाच्या भूमीवर उभे आहे त्याच्या खाली असलेलं त्याच्या जाणिवांचं, श्रद्धा-दु:श्रद्धांचं, त्याच्या आदिम प्रेरणांचं, त्याच्यातील अमानवीयतेचं निबीड अरण्य जाणून घेणं. हे जग भौतिक प्रश्नांभोवती फिरत असलं तरी ते अधिभौतिकतेशी जखडलेलं आहे. त्याचा शोध घेत वर दिसणाऱ्या वास्तवाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला तर जादुई वास्तववाद निर्माण होतो, अशी माझी कल्पना आहे. जागतिक साहित्यात संकुचित वास्तववादाने निर्माण केलेली कोंडी फोडण्याचं काम लॅटिन अमेरिकन साहित्यकांनी केलं. इझाबेल आयंदे या लेखिकेच्या कथा किंवा गॅहिएल गाहसाया मार्खेजच्या कादंबऱ्या वाचताना लक्षात येतं की हे वास्तवाबद्दलच बोलतात पण त्यासाठी प्रतिवास्तव तयार करतात आणि ते मांडण्यासाठी शब्दांची निवड, वाक्यांची मांडामांड, प्रतिमांची जाळी स्वतःच्या नियमांनी बनवतात. त्यांच्या आंतरसंबंधांतून बनलेली लय ही त्यांची स्वतःची असते आणि तेही एक अद्भूत असतं.  मी मुंबईत जन्मलो आणि वाढलो तरी माझ्या आधीची आई-वडिलांची पिढी ही कोकणात जन्मली आणि वाढली होती. ती पोटापाण्यासाठी मुंबईत आली तरी त्यांची मुळं कोकणातल्या मातीत होती. त्यांच्या मागून मीही मुंबईतून तळकोकणात जात राहिलो. माझं गावच होतं तिथे. माझ्या वडिलांना वाटायचं आपल्या मुलखाची माती वर्षातून एकदा तरी आपल्या पायाला लागली पाहिजे. सुटी संपून आम्ही गावाहून मुंबईला एसटीने यायला निघायचो, तेव्हा एसटीने वेग घेतल्यावर मागे राहणाऱ्या गावाकडे वळून ते आम्हा मुलांना म्हणायचे, सगळ्यांनी हात जोडून नमस्कार करा गावाला. या गावाशी त्यांचं नातं वेगळं होतं. त्यांचंच नव्हे तर मुंबईत आलेल्या माझ्या चुलत्यांचंही गावाशी असलेलं नातं अद्भुत होतं. त्यांची अधी शरीरं आणि मनं तळकोकणातच होती. कोकणात माणसं एकटीदकु टी दिसतात, पण एकटीदुकटी जगत नाहीत. लोक म्हणतात, पूवी ती मनिऑर्डरवर जगायची आणि आता बागायतीवर जगतात. हे तितकसं खरं नाही. ती भुताखेतांबरोबर, मुंजा-वेताळ-चाळेगतीबरोबर, झपाटलेल्या झाडांबरोबर, देवाच्या पडणाऱ्या-नपडणाऱ्या कौलांवर, अंगारेधुपारे, जारणमारण, कज्जेदलाली आणि न संपणाऱ्या गजालींवर जगतात. कोकणात निसर्ग प्रचंड आहे. या निसर्गाचा अर्थ न लावता येण्यातून अद्भुतता जन्म घेते. हे सगळं अद्भुत माझ्या चुलत्यांच्या, नातेवाईकांच्या रात्र रात्र चालणाऱ्या गजालींतून मी डोळे विस्फारून भिंतीला पाठ लावून ऐकत बसायचो. आमच्या घरी एक डॉक्टर यायचे. एकदम फाटका माणूस. किरकोळ दिसणारा, चुरगळलेले जुने कपडे घालणारा हा गरीब माणूस डॉक्टर कसा, असा प्रश्न मला तेव्हा पडायचा नाही. ते स्वननांचा अर्थ सांगायचे आणि माझे थोरले चुलते गंभीरपणे ऐकत बसायचे. आमच्या शेजारी एक वेडा वसंता होता. त्याला घरात डांबून ठेवायचे. पण कधीतरी तो बाहेर यायचा. एकदम धिप्पाड आणि नागडा. दाढी वाढलेली. तो बोलायला जायचा तेव्हा बैल डुरकल्यासारखा आवाज यायचा. त्याचा चेहरा पशुसारखा होता. मी त्याला ज्याम घाबरायचो. तो होता गरीब. घरातून कोणी हाक मारली की गुपचूप चालू लागायचा किंवा व्हरांड्यातल्या खिडकीतून बाहेर बघत उभे राहायचा, पण माझ्या मनात त्याची प्रतिमा अजूनही एखादं जनावर आपल्या अंगावर चालून यावं तशी आहे. चाळीत मजल्यावर संगी भारूड व्हायचं, त्याच्या नादाने आसमंत दणाणून जायचा. आम्ही पडद्याआड रंगायला बसणारे नट बघत बघता बघता माणसांचे देव नाहीतर राक्षस कसे बनायचे ते बघायचो. वडील वारकरी होते. ते आम्हा भावंडांना समोर बसवून रामायण वाचायचे, महाभारतातल्या चमत्कारिक कथा सांगायचे. पुराणातल्या गोष्टी सांगायचे. ही सगळी अद्भुतरम्यता होतीच कुठेतरी. मी उदय प्रकाशची ‘तिरिछ’ कथा वाचली (हिच्यावरही मार्खेजच्या ‘क्रॉनिकल ऑफ अ डेथ फॉरटोल्ड’चा प्रभाव आहे.), ‘छपन तोले का कमरबंद ‘वाचली, ‘वॉरन हेस्टिंग्ज का सांड’ वाचली आणि माझी खिडकी उघडली. पुढे मार्खेज वाचला, मनोहर श्याम जोशंची अफलातून ‘हरिया हरक्युलिस की हैरानी’ वाचली, हजारीप्रसाद द्विवेदिंची ‘अनामदास का पोथा’ वाचली आणि बाहेर कधीचं दबा धरून बसलेलं अद्भुत खिडकीतून भसाभस आत घुसलं.

बळते :पण तुमच्या काही कथा मात्र नेहमीच्या अर्थाने वास्तववादीच आहेत…

पवार : माझ्या सर्वच कथांचा वास्तवाशी संबंध आहे. मी वास्तवाशी सूतराम संबंध नसलेली चमत्कृतीजन्य कल्पना नाकारतो. मला माझ्या भोवतालच्या जगण्याशी त्याचं लोणचं घालता आलं तरच त्यात स्वारस्य असतं. ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ सारखी कथा तुम्ही म्हणता तशी रूढाथााने वास्तववादी म्हणावी अशीच आहे. त्यात गूढ किंवा अद्भुत असं काही नाही. ते मी ओढून ताणून आणत नाही. ‘एका रोमहर्षाक लढ्याचा गाळीव इतिहास’ बाबतही तेच म्हणता येईल. पण या कथा म्हणजे जे घडलं (वा जसं घडलं असतं) तसं सांगणं एवढंच नसतं. माझ्यादृष्टीने तो कशाचा तरी शोध असतो. त्यात माणसाच्या जगण्या-वागण्याबाबत मला काहीतरी वेगळं सापडावं लागतं. तसं सापडतं तेव्हाच कथा पुरी होते. केवळ धक्के देण्यात मला स्वारस्य नाही. माझी ‘अधांतर’, ‘माझं घर’ ही नाटकं तुम्ही म्हणता तशीच पारंपरिक अर्थाने वास्तववादी आहेत. पण मी त्यात काही तरी शोधून मांडलेलं आहे. केवळ फॉर्म म्हणून किंवा चूष म्हणून कल्पनेचे पतंग उडवणं काही बरोबर नाही. मानवी जगण्यातल्या अद्भुताचाही शोधच घ्यावा लागतो.

बळते : एके ठिकाणी तुम्ही असं म्हणालात की, भाऊ पाध्ये, विजय तेंडूलकर, भालचंद्र नेमाडे, विलास सारंग, नामदेव ढसाळ या तुमच्या आवडत्या लेखकांच्या लेखनाने तुम्ही झपाटून जाता. मला हे थोडं विसंगत वाटतं. कारण या प्रत्येकाच्या लेखनाची जातकुळी वेगळी आहे. हे सगळेच तुमच्यावर एकाचवेळी कसे काय प्रभाव टाकू शकतील? आताची पिढी आधीच्या पिढीच्या लेखनाने झपाटून जाते म्हणजे नेमकं काय होतं? हे झपाटलेपण कोणत्या स्वरूपाचं असतं, म्हणजे शैलीचं अनुकरण करणं, वैचारिक वारसा जोपासणं किंवा आणखी काही?

पवार : आधी मी काय म्हणालो होतो ते नीट सांगतो. मी असं म्हणालो होतो की, भाऊ पाध्ये, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, विलास सारंग आणि नामदेव ढसाळ यांचं माझ्या वाङ्मयीन आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या लेखक म्हणून जडणघडणीच्या काळात वेगवेगळ्या टप्प्यायांवर मी यांच्या लेखनाने झपाटून गेलो आहे. मी यांना मराठी साहित्यातली पंचमहाभूतं म्हणतो. मी या नावांचा क्रम त्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेनुसार लावला आहे, गुणवत्तेनुसार नाही. माझ्यादृष्टीने कोणीही कमीअधिक महत्त्वाचा नाही. तुम्हाला पडलेला प्रश्न साहिजक आहे, या प्रत्येकाची जातकुळी वेगळी आहे. एवढंच काय तर भाऊ पाध्ये हा या पंचकातला एकमेव अपवाद सोडला तर अन्य चारही जणांचं एकमेकांच्या मोठेपणाबद्दल बिलकुल एकमत नाही. उलट त्यांनी परस्परांवर टीकाच अधिक केली आहे. त्यांची जीवनदृष्टी, विचार करण्याची पद्धत, लेखनशैली यात भिन्नता आहे. तरीही, या सर्वाकडून मला काहीतरी मिळालेलं आहे हे खरंच आहे. हे नेमकं काय मिळालं, मी कोणता प्रभाव घेतला हे तसं नेमकेपणाने सांगणं कठीण आहे. तरीही जगण्यातल्या सर्व त्रासदायक अनुभवांना सामोरं जाताना, सगळ्या प्रकारचे अनुभव अंगावर घेऊन त्यातल्या माणसांशी तादात्म्य पावणारे भाऊ पाध्ये, तेंडुलकरांची माणसांकडे बघण्याची, घटिताचा वेगळा अन्वयार्थ लावण्याची दृष्टी, नेमाडेंचे शब्दांना वाकवत प्रचंड आवेगाने तरीही आतली करुणादृष्टी शाबूत ठेवून अनुभव मांडण्याची हातोटी, सारंगांच्या कथांतून डोकावणारी काटा आणणारी हिंसा आणि लैंगिकता, ढसाळांच्या कवितेतले प्रतिमाव्यूह आणि आवाहकता…सांगायचंच ठरवलं तर असं काही सांगता येईल, पण याच्या पलीकडेही बरंच काही आहे. मला या सगळ्यांत जाणवलेली आणि मी माझ्यात मुरवून घेतलेली एक गोष्ट मला नक्की सांगता येईल, ती म्हणजे लेखकाच्या ठायी असावी लागणारी क्रूरता, निर्दयता. लेखकाला पक्षपाती असून चालत नाही. अगदी आपल्या आवडत्या पात्राच्या बाबतीतही. कसोटीच्या क्षणी तो लाडक्या पात्रालाही एकटं सोडतो, त्याचं प्राक्तन भोगायला लावतो. तसं करताना त्याला त्रास होत असणारच. पण तो त्रासही त्याला दाखवता येत नाही, दाखवून चालत नाही. इतकी निर्दयता लेखकाकडे असेल तरच तो वाचकाच्या मनात करुणा (कम्पॅशन) निर्माण करू शकतो, हा या लेखकांचा माझ्यावरचा संस्कार आहे. बाकी शैली वगैरे आपली आपली तयार होत असते. यात अनुकरण फार काळ करता येत नाही. माझ्या बाबतीत अनुकरणाचा प्राथमिक टप्प्यावरचा काळ भार पूर्वीचं नाटकं लिहिताना येऊन गेला आहे. तसे तर हे पाचच नव्हेत तर अनेक लेखक माझ्यावर प्रभाव करून गेले आहेत. त्यात हिंदीतले मोहन राकेश आहेत, मनोहर श्याम जोशी आणि विनोदकुमार शुक्ल आहते, आपल्याकडचे अरूण कोलटकर आहेत, खानोलकर आणि सदानंद रेगेही आहेत. याशिवायही बरेच आहेत. हा प्रभाव वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळा आहे आणि मी तो जिरवलेला आहे. ह्या जिरलेल्या द्रव्यातून कोणकोणते घटक माझ्याआत गेले आणि त्यांच्या सरमिसळीतून कोणते पोर्षक घटक मला मिळाले, याचा चाटट काही मला देता यायचा नाही. तुम्ही म्हणालात की भाऊ पाध्ये, तेंडुलकर, नेमाडे, सारंग, ढसाळ यांचा एकाचवेळी प्रभाव असणं विसंगत वाटतं. पण तुम्ही असं का नाही म्हणत, माझी आस्वादक म्हणून असलेली क्षमता एकारलेली नाही! मी या सर्वांचा थोरपणा समजून घेतो. किंबहुना वेगवेगळे गुणधर्म असलेले काढे रिचवणं तब्येतीला चांगलं असतं, तसे हे काढे रिचवणं मला उपयोगी पडलेलं असू शकेल. लेखक म्हणून मी अनेक पूर्वसुरीना जसं स्वीकारलेलं आहे तसं अनेकांना नाकारलेलंही आहे. परंपरेला स्वीकार नकार देतच आपण पुढे जात असतो. आपण पूर्णपणे नवे, वेगळे, स्वायत्त कधीच नसतो.

बळते : आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. महानगरी संवेदना म्हणजे काय? भाऊ पाध्येच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये महानगरी संवेदना होती आणि तुमच्या कथेत, नाटकांतही ती आहे. भाऊंच्या कथेची प्रकृती आणि तुमचा लेखनपिंड यात मला साधर्म्य आढळतं. याविषयी काय सांगाल?

पवार : महानगरी संवेदना म्हणजे काय, याचं नेमकं उत्तर मला देता येणार नाही. कारण ग्रामीण संवेदना म्हणजे काय, आदिवासी संवेदना म्हणजे काय हे मला माहीत नाही. तरीही सांगण्याचा प्रयत्न करतो, मला जे जाणवतं ते महानगरीय. कारण मी महानगरातच वाढलो. महानगरी संवेदना म्हणजे अत्यंत तुकड्यातुकड्यात तुमच्यासमोर येणारं वास्तव. ते सलग बघता येण्याची तुमची शक्ती कमी पडते, तरीही तुम्ही ते बघण्याचा प्रयत्न करता. ज्या पद्धतीने आदिवासी वा ग्रामीण माणूस वास्तव सलगपणे बघू शकतो तसं महानगरातल्या माणसाला बघता येत नाही. तो परात्म असतो. त्याच्या हातात काहीच नसतं. तो जगण्याच्या मागे खेचला जातो, तिथे तो पोटाथी असतो. मग तो श्र्रीमंत उद्योगपती अंबानी असेल अथवा रस्त्यावरचा भिकारी असेल, परिस्थितीच त्याला खेचत नेते. दुसरं असं आहे की, या जगण्याला प्रचंड वेग आहे. त्यामागे फरफटत जाताना तुमचा अवकाश संकुचित होत जातो. जगण्याच्या वेगात स्वतःचा तोल सांभाळताना तुमची त्रेधा उडते, तुमच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. स्वतःचा स्वतःशीच होऊ न शकणारा संवाद, तो व्हावा म्हणून आपलीच चाललेली धडपड…अणखी एक मला असं जाणवतं की तुम्ही भूमिनिष्ठ असता पण त्याचवेळी भूमीपासून तुटलेले असता. आज मी इथे उत्तर मुंबईत एका टोकाला राहतो. ही वस्ती उच्च मध्यमवर्गीयांची आहे. या भागाचं गिरणगावाशी नातंच नाही. पण माझ्या बेडरूममधून पलीकडे दिसणारी लगतची वस्ती आहे तिथे कष्टकऱ्यांच्या जगण्याच्या खाणाखुणा शाबूत आहेत. बैठ्या चाळीची ही गिचमिड वस्ती. तिथे नेमाने लाऊडस्पीकर लागलेला असतो. कुणाचं तरी लग्न, कुणाचं तरी बारसं, पूजा चालूच असते. वस्ती लित असते. त्या कण्यांची कर्णर्ककश्शता रोज माझ्यावर येऊन आदळत असते. पण मला त्याचा त्रास होत नाही. अनेकदा मी नुसता बसून समोर बघत, ऐकत असतो. माझ्या मुलीला हा गोंगाट त्रासदायक वाटतो. तिला सहनच होत नाही. तिचं काहीच नातं नाही याच्याशी. माझंही तसं उरलेलं नसतंच, पण मी ते शोधत असतो. स्वतःला सांधत असतो. यातून तुटलेपणाची भावनाही गोळा होत असते. मी माझ्या राहत्या वस्तीशी एकरूप होऊ शकत नाही. ही जी उपरेपणाची भावना आहे, तुम्हाला इकडून तिकडे सतत जावं लागणं, यातून येणारी दुभंगलेपणाची, खरंतर शतभंगाची जाणीव, छिन्नमनस्कता घेऊन वावरणं आणि त्यातून सलग वास्तव शोधत राहणं, त्यातून काही विधान करता येतंय का हे पाहात राहणं हे महानगरीय लेखकाचं भागधेय आहे. महानगरी संवेदना यातूनच तयार होत असावी, असं मला वाटतं.

भाऊ पाध्ये यांचं जगणं हे कलंदर भटक्याचं जगणं आहे. त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या, बेकारी अनुभवली. ते लेखकांच्या अड्ड्यात बसले, युनियनच्या ऑफिसात बसले, सिनेमावाल्यामंध्ये वावरले, अधोविश्वात फिरले, उनाड पोरांच्यात रमले. यातून त्यांचा अनुभवाचा परिघ विस्तारत गेला. माझ्या अनुभवाचा परिघ भाऊंच्या इतका खचितच नाही. पण त्यांचे अनुभव सरळ माझ्या आतच गेले. सरसर झिरपले. त्यांना काय म्हणायचं होतं हे मला जणू आपसूकच कळलं होतं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी महानगरी जगण्याचा वेग पकडला आणि त्या जगण्याची शैली अचूक उचलली. गावपातळीवर जगताना तिथले लोककलाप्रकार त्या जगण्याशी एकजीव होऊन आलेले असतात. ती त्या माणसांची व्यक्त होण्याची शैली असते. तशी महानगराची सिनेमा ही शैली आहे. भाऊंच्या लेखनातले शब्द किंवा प्रतिमा बघा, अनुभव समोर ठेवण्याची स्टाइल बघा, ते कॅमेऱ्याच्या अँगलने सगळीकडे बघतात. माझ्यावर हा प्रभाव झालेला आहे. त्यांची निवेदन शैली ही या अनुभव घेण्याच्या पद्धतीतूनच उमलून येते. तिने झपाटलेले अनेक लोक आहेत. माझ्यासमोर समर खडसचं उदाहरण आहे. तो चांगल्या अर्थाने भाऊ पाध्येचा वंशज म्हणता येईल असा आहे. माझ्या कथा भाऊंच्या कथांपेक्षा वेगळ्या वाटेने जात राहिल्या तरी त्यांची नाळ भाऊंशीच जुळलेली आहे. शाळेत वर्गामध्ये मागच्या बेंचवर बसणारी मुलं असतात. ती अनेकदा वर्गातल्या हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांपेक्षाही हुशार असतात, पण अत्रंगपणामुळे त्यांना वर्ग चालवणाऱ्यांनी मागे ढकललेलं असतं. पण या मुलांना जगणं जास्त आणि नीट ठाऊक असतं. मला या मुलांविषयी नेहमीच आत्मीयता वाटत आली. माझ्या शालेय आयुष्यातही मी मागच्या बेंचवरच्या मुलांची सोबत केली. मला भाऊ पाध्ये हे मराठी साहित्याच्या वर्गातले मागच्या बेंचवरच्या अत्रंग पोरांचे शिरोमणी वाटतात. त्यांच्या अक्षरविश्वाच्या संगतीत राहून आयुष्य जास्त कळतं, किमान ते किती व्यापक आणि गुंतागुंतीचं आहे याचं भान येत राहातं. अशी उनाड पोरं शिक्षकांसाठी आणि असे लेखक समाजासाठी नेहमीच जोखीम होऊन राहतात. भाऊ पाध्ये हे समाजासाठी जोखीम ठरलेले लेखक होते. मी जमेल तेव्हा आणि तसं भाऊ पाध्येचं ऋण व्यक्त करीत असतो. माझ्या ‘एका रोमहर्षाक लढ्याचा गाळीव इतिहास’ या कथेतल्या बहुतेक माणसांची नावं ही भाऊंच्या कथेतल्या पात्रांची नावं आहेत. हा भाऊ पाध्येंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचाच एक भाग आहे.

नागनाथ बळते, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात पोस्ट डाॅक्टरेट फेलो म्हणून संशोधन करीत आहेत.

(लेख उपलब्ध करून देण्यासाठी ‘खेळ’चे संपादक मंगेश नारायणराव काळे यांचे आभार )

भाग २

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0