म्यानमारः लष्कराविरोधात हजारो नागरिकांची निदर्शने

म्यानमारः लष्कराविरोधात हजारो नागरिकांची निदर्शने

म्यानमारमधील लष्करी राजवट हटवून तेथे लोकशाही राजवट असावी, या मागणीसाठी रविवारी हजारो नागरिक यांगूनच्या रस्त्यावर उतरले होते. गेल्या आठवड्यात अध्यक्ष आंग सान स्यू की यांची सत्ता उलथवून लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर रविवारचा सर्वात मोठा मोर्चा यांगूनमध्ये निघाला.

मोर्चेकरांच्या हातामध्ये आंग सान स्यू की यांचा पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी)चा रंग असलेले हजारो लाल फुगे होते. आंदोलक आम्हाला लष्करी राजवट नव्हे तर लोकशाही हवी अशी मागणी करत होते.

यांगूनमध्ये मोठा मोर्चा निघाल्यानंतर शहरातील सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. अनेक वाहनधारकांनी आपले हॉर्न वाजवून आंग सान स्यू की यांच्या समर्थनार्थ नारे दिले. या मोर्चाची दृश्ये फेसबुकवरून काही ठिकाणी दिसून आली.

सत्ता हाती घेतल्यानंतर लष्कराने देशात इंटरनेट बंदी व काही ठिकाणची दूरध्वनी सेवा बंद केली आहे.

यांगूनपाठोपाठ म्यानमारमधील अन्य काही शहरांमध्येही शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. यात आग्नेय म्यानमारमधील मावलमयेईन येथे सुमारे १०० जणाच्या जमावाने मोटार बाइकवरून निदर्शने केली. तर मंडाले येथे विद्यार्थी, डॉक्टर रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान शनिवारी स्यू की व त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची सुटका केल्याची अफवा पसरल्याने यांगूनच्या रस्त्यावर जमाव आला. पण स्यू की यांच्या वकिलांनी ही अफवा असल्याचे सांगितल्याने जमाव पांगला.

आतापर्यंत लष्कराने दीडशेहून अधिक नागरिकांना अटक केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS