साथीच्या काळात व्हर्च्युअल दुर्गापूजेचे आवाहन

साथीच्या काळात व्हर्च्युअल दुर्गापूजेचे आवाहन

जगभरात पसरलेल्या बंगाली लोकांसाठी दुर्गा म्हणजे दुर्गतीनाशिनी- सर्व दु:खांचा नाश करणारी देवी आहे. मात्र, यंदाच्या दुर्गापुजेला केवळ ९ दिवस उरलेले आहेत

दुसऱ्याच पुतळ्याला हार अर्पणः अमित शहांवर टीका
स्विमिंग सूट फोटो : प्राध्यापिकेवर ९९ कोटींचा प्रतिमा हननचा दावा
ममतांना अडचणीत आणण्यासाठी ओवेसी मैदानात

जगभरात पसरलेल्या बंगाली लोकांसाठी दुर्गा म्हणजे दुर्गतीनाशिनी- सर्व दु:खांचा नाश करणारी देवी आहे. मात्र, यंदाच्या दुर्गापुजेला केवळ ९ दिवस उरलेले आहेत आणि भारतात कोविड-१९ची साथ अजून आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे दुर्गापूजा उत्सवादरम्यान गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकेल, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

बंगाली जनतेसाठी सर्वांत महत्त्वाचा दुर्गापूजाउत्सव २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आहे. सार्वजनिकरित्या केल्या जाणाऱ्या ‘बारोवारी पुजे’चे यश हे त्यासाठी जमलेल्या गर्दीवरून मोजले जाते. कोलकात्यातच नव्हे तर पश्चिम बंगालमधील प्रत्येक जिल्ह्यात लाखो लोकांचा समुद्र रस्त्यांवर उसळतो. संध्याकाळी सहा ते रात्री ११ या काळात तर एकेका पंडालात दहा हजारांपर्यंत लोक दर्शन घ्यायला येतात. यंदा साथीच्या भीतीने नेहमीच्या २५ टक्के गर्दी जरी जमली, तरी राज्यात कोरोनाचा प्रसार प्रचंड वाढण्याचा धोका आहे.

दुर्गापूजेनंतर कोविड प्रादुर्भावाची सुनामी येऊ शकते असा इशारा जॉइंट फोरम ऑफ डॉक्टर्सने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्राद्वारे दिला आहे. केरळमध्ये सप्टेंबरमधील ओणमनंतर वाढलेल्या रुग्णसंख्येचे उदाहरण त्यांनी दिले आहे.

आत्तापर्यंतची तयारी

पश्चिम बंगाल सरकारने पूजा आयोजकांना सूचनांचा संच जारी केला आहे. या सूचना नोबेलविजेते  अभिजित बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ग्लोबल अॅडव्हायजरी कौन्सिलने निश्चित केल्या आहेत, असे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सांगितले. वायूविजनासाठी पंडाल तीन बाजूंनी खुले ठेवण्याची सूचना यात आहे. रेड रोडवर मूर्ती विसर्जनासही बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक पंडालात मास्क व सॅनिटायजरची सक्ती करण्यात आली आहे. शारीरिक अंतर राखले जाईल हे बघण्यासाठी अधिकाधिक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुजेसाठी स्थानिक अधिकाऱ्यांची आगाऊ परवानगी घेणे सक्तीचे आहे. मात्र, शहरातील एका लोकप्रिय दुकानात खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे सर्वत्र पसरलेले फोटो बघता परिस्थिती कठीण आहे याची कल्पना येते.

राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना मुख्यमंत्र्यांनी सर्व ३७,००० पूजासमित्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केल्याबद्दल टीका होत आहे. मात्र, यंदा आपण कोरोनाविषाणूला लॉकडाउनमध्ये टाकून आपण दुर्गापूजा साजरी करणार आहोत, हा महोत्सव खुल्या हवेत होतो त्यामुळे धोक्याचा नाही, असेही बॅनर्जी म्हणाल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमधील रुग्णालयांच्या क्षमता वाढवण्याच्या सूचना सरकारतर्फे अगोदरच देण्यात

आल्या आहेत.

बंगालमधील कोविडची परिस्थिती

अर्थात मुख्यमंत्र्यांचा हा आशावाद पश्चिम बंगालमध्ये कोविडला रोखू शकलेला नाही. १० ऑक्टोबरला राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येने ३,५९१ हा विक्रमी आकडा गाठला, या दिवशी ६२ जणांचा कोविडमुळे मृत्यूही झाला. राज्यातील चाचण्यांची संख्या मात्र गेल्या काही दिवसांपासून घटत चालली आहे. १४ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालमध्ये ४७,५३७ नमुने तपासण्यात आले होते. ८ ऑक्टोबर रोजी हा आकडा ४२,४४१ होता. एकंदर आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये दर दहा लाख लोकांमागे ३२,७१२ चाचण्या होत आहेत. त्यात चाचणी पॉझिटिव येण्याचा दर ३ ऑक्टोबर रोजी उपलब्ध माहितीनुसार ८ टक्के होता. याशिवाय कोलकात्यातील व अन्य जिल्ह्यांतील बहुतेक खासगी रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत.

सध्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात संख्याशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करणारे कोलकाता येथील मूळ रहिवासी सृजन सेनगुप्ता यांच्या मते राज्यातील नवीन कोविड रुग्णांची संख्या काहीशी स्थिरावलेली दिसत आहे. मात्र, दुर्गापूजेदरम्यान गर्दी झाल्यास ही वाढू शकते. केरळमध्ये कोविड रुग्णांची संख्या चांगलीच आटोक्यात आलेली असताना, ओणमनंतर ती पुन्हा प्रचंड वाढली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पूजेचे राजकारण

राज्यात मे २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात भारतीय जनता पार्टी उभी असल्याने या निवडणुका धार्मिक मुद्दयांवर लढल्या जातील अशी शक्यता दाट आहे. जनतेमध्ये धर्माच्या आधारे धृवीकरण करण्यासाठी व हिंदू मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपकडे ही एकमेव संधी आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यातील हिंदूधर्मीयांच्या सर्वांत मोठ्या सणाबद्दल फार कठोर भूमिका घेणार नाहीत. त्यांच्यावर अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाची टीका तर नेहमीच होत आलेली आहे. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या होत्या, “आम्हाला टोचण्यासाठी गिधाडे तर टपूनच बसली आहेत. आम्ही पुजेला परवानगी दिली नाही तरी आम्हालाच दोष दिला जाईल आणि पुजेला परवानगी दिल्यामुळे कोविड रुग्णांची संख्या वाढली तरीही खापर आमच्याच डोक्यावर फुटेल.”

व्हर्च्युअल दुर्गापुजा

दुर्गापुजेसारख्या सार्वजनिक उत्सवांमुळे कोविडचा प्रसार किती वाढू शकतो याबद्दल

‘वायर सायन्स’ने तीन आरोग्यसेवा तज्ज्ञांशी चर्चा केली. यापैकी एक डॉ. कुणाल सरकार हे हृदयरोगतज्ज्ञ व मेडिका हॉस्पिटल्सचे उपसंचालक आहेत, दुसरे डॉ. प्रणव चॅटर्जी आयसीएमआरमधील माजी वैज्ञानिक व जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय आरोग्य या विभागातील फेलो आहेत, तर तिसरे डॉ. बीरेश्वर सिन्हा नवी दिल्लीतील सोसायटी फॉर अप्लाइड स्टडीजचे सहाय्यक संचालक आहेत. राजकीय संधी साधण्यासाठी सार्वजनिक आरोग्याचे शस्त्र वापरले जाऊ नये असे मत तिघांनीही व्यक्त केले.

दुर्गापुजेचे पाच-सहा दिवस राज्याच्या इतिहासातील सर्वांत निर्णायक दिवस ठरू शकतील, अशा इशारा डॉ. सरकार यांनी दिला. गर्दी हे पुजेचे वैशिष्ट्य आहे आणि दमट हवामानामध्ये मर्यादित जागेत टिपेच्या आवाजात ओरडणारी भलीमोठी गर्दी अत्यंत घातक आहे. अशा परिस्थितीत विषाणू जोमाने वाढतो. गर्दी वाढल्यास मास्क निरुपयोगी ठरतील. कोणत्याही विषाणूच्या प्रसारासाठी याहून अनुकूल परिस्थिती शोधूनही सापडणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “ऑनलाइन अध्ययनाप्रमाणेच यावर्षी भक्तीही ऑनलाइन करावी. पूजा पार पाडण्यासाठी ज्या लोकांना मंडपात उपस्थित राहणे आवश्यक आहे, त्यांच्या कोविड चाचण्या करवून घ्याव्या.”  डॉ. चॅटर्जी यांनीही ऑनलाइन उत्सव साजरा करण्याची कल्पना उचलून धरली. क्रिकेट किंवा फुटबॉल सामन्यांसारख्या प्रेक्षककेंद्री इव्हेण्ट्स जर रिकाम्या स्टेडियम्समध्ये होऊ शकतात, तर दुर्गापूजा का होऊ शकणार नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर सरकारने दुर्गापूजेनंतर रुग्णसंख्येचा विस्फोट होणार हे गृहीत धरून बेड्सची संख्या, विलगीकरण केंद्रे, ऑक्सिजन पुरवठा व औषधांचा साठा वाढवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. त्याचबरोबर डॉ. चॅटर्जी यांनी आणखी एका संभाव्य संकटाचा इशारा दिला. कोविडचा फारसा प्रभाव नसलेल्या भागांतून लोक कोलकात्यातील पंडालांमध्ये काम करण्यासाठी आले आणि येथून कोविडचा प्रादुर्भाव घेऊन आपल्या गावांमध्ये परतले तर या विषाणूचा प्रसार आवाक्यात आणणे अवघड होऊन बसेल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर दुर्गापुजेदरम्यान स्वयंसेवेची जबाबदारी असलेले पोलिस कर्मचारी व एनसीसी कॅडेट्स यांना संसर्गजन्य विकारांच्या प्रसाराचे व्यवस्थापन कसे करायवयाचे याबाबत कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यांना कोरोनाची लागण झाली तर काय, त्यांना पीपीई दिली जाणार आहेत का, पीपीई घालून संपूर्ण रात्र काम करणे त्यांना शक्य होणार आहे का,  अशा अनेक समस्यांवर उपाय शोधावे लागतील, असे डॉ. चॅटर्जी म्हणाले.

ओणम उत्सवानंतर केरळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा पुनरुच्चार डॉ. सिन्हा यांनीही केला. पश्चिम बंगालमध्ये कोविड रुग्णांमधील मृत्यूचा दर १.९ टक्के (राष्ट्रीय सरासरी १.५ टक्के) आहे. ते म्हणाले, “आपल्याला नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल आणि यंदा व्हर्च्युअल दुर्गापूजा साजरी करावी लागेल.” यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहेत: पुजेच्या आयोजनासाठी अत्यावश्यक सदस्यांनीच पंडालांमध्ये पुरेशा संरक्षणासह उपस्थित राहावे; पुजेचे थेट ऑनलाइन स्ट्रीमिंग करावे; पंडालामध्ये एका वेळी जास्तीतजास्त ५० लोकांना परवानगी द्यावी; विशिष्ट पंडाल विशिष्ट भागांसाठी राखीव ठेवून गर्दी जमणार नाही याची काळजी घ्यावी; अभ्यागतांना पूर्वनिश्चित तासांमध्ये येण्यासाठी टोकन दिले जावे; ताप सर्दी आणि/किंवा खोकला झालेल्या कोणालाही पंडालात प्रवेश देऊ नये.

पूर्व भारतात, विशेषत: पश्चिम बंगालमध्ये, दुर्गापूजा हा एक सामाजिक उत्सव आहे. सर्व धर्म, जाती आणि आर्थिक स्तरांतील लोक तो साजरा करतात. व्हर्च्युअल उत्सवाची कल्पनाच अनेकांना करवणार नाही. या काळात बाहेर जाऊन गर्दीत सामील होण्याचे आकर्षण टाळणे कठीण जाईल. मात्र, सध्याचा काळ आव्हानात्मक आहे हे पुन्हा एकदा लक्षात ठेवले पाहिजे आणि कठीण वाटणाऱ्या बाबी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: