चेंजमेकर ‘ नंदीग्राम’

चेंजमेकर ‘ नंदीग्राम’

मार्च महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम पुन्हा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे सहकारी शुभेन्दू अधिकारी यांनी ममता यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आणि याच नंदीग्राममध्ये मोठा मेळावा घेऊन ममतांविरुद्ध शंख फुंकला.

जामिया प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि अहमदिया
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर

नंदीग्राम.. या नावातच विलक्षण जादू आणि अविश्वसनीय ताकद आहे. पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकीत नंदीग्राम हे चेंजमेकर ठरलेले आहे. आणि या निवडणुकीतही नंदीग्राम यशापयशाचा कौल देणार आहे.

आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पण त्याआधीच नंदीग्रामला स्वातंत्र्य मिळाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच नंदीग्रामच्या आंदोलनाने ब्रिटिशांना नामोहरम केले होते. १९४२ मध्येच महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने येथे ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये सतीश चंद्र, सुशीलकुमार धारा, अजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे नंदीग्राम आधीच ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यात आला होता. त्यामुळे नंदीग्रामला दोनदा स्वातंत्र्य मिळाले आहे. आणि हेच नंदीग्राम पश्चिम बंगालच्या राजकारणात सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आता मार्च महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम  पुन्हा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे सहकारी शुभेन्दू अधिकारी यांनी ममता यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आणि याच नंदीग्राममध्ये मोठा मेळावा घेऊन ममता विरुद्ध शंख फुंकला. शुभेन्दू अधिकारी यांनी मेळावा घेण्याआधी ममता यांनी नंदीग्राम येथे जाहीर सभा घेऊन डागडुजी करण्याचा प्रयत्न केला.

आता नंदीग्राम आणि शुभेन्दू अधिकारी आणि ममता याना सत्ता प्राप्त होणे या तीन एकाच माळेच्या तीन कडा आहेत. यासाठी थोडे मागे म्हणजे २००७मध्ये जावे लागेल.

नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत जमीन अधिग्रहण मोहीम तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. यावेळी काही मोठ्या कंपन्यांना यामध्ये हजारो एकर जागा स्वस्त दरात अथवा फुकटात देण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षातर्फे करण्यात आला. येथील हल्दीयाचे त्यावेळेचे खासदार लक्ष्मण शेठ यांच्या नेतृत्वाखाली ‘हल्दीया डेव्हलपमेंट अथोरिटी’  अंतर्गत जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली. आणि यानंतर एकच आगडोंब उसळला. याप्रसंगी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. १४ मे २००७ मध्ये झालेल्या या रक्तरंजित संघर्षात १४ जणांची हत्या झाली. आणि हेच कारण सत्ता पालटण्यात महत्त्वपूर्ण ठरले.

वास्तविक पश्चिम बंगालवर अनेक वर्षे डाव्यांची एकहाती सत्ता होती. त्यांना सत्तेतून खेचणे खूपच अवघड. पण नंदीग्राम हे निमित्त ठरले. या आंदोलनाचे नेतृत्व त्यावेळेच्या विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी केले होते. पण या आंदोलनाचा खरा हिरो होता तो म्हणजे शुभेन्दू अधिकारी.

ममता यांची अनेक वर्षांची साथ सोडून अधिकारी हे भाजपमध्ये दाखल झाले. नंदीग्रामच्या भूमीतूनच त्यांनी ममता यांची एकहाती सत्ता उलथवून लावण्याची शपथ घेतली आहे. नंदीग्राममध्ये २००७ मध्ये झालेल्या आंदोलनात बंगालमधील लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत सहभागी झाले होते. हीच मोट अधिकारी बांधण्याच्या तयारीत आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी या निवडणुकीत २९४ पैकी किमान २०० जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी भूमी निवडली ती नंदीग्रामची. परिवर्तन आणि बदल याची नांदी ठरलेली ही भूमी या निवडणुकीतही आपली परंपरा कायम ठेवते का हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: