अमेरिकेत जे घडले ते जगाला धोकादायक

अमेरिकेत जे घडले ते जगाला धोकादायक

हजारो समर्थक संसद व त्याच्या परिसरात घुसूनही तेथील सुरक्षा व्यवस्था अक्षरशः हतबल दिसून आली. जे काही पोलिस व अन्य संसद सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते तेही ट्रम्प समर्थकांचा धिंगाणा निमूटपणे पाहात होते.

प्लीज – माझा श्वास कोंडतोय..
अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट मागे का घेतले
बायडन यांनी मूलगामी अजेंडा राबवणे अत्यावश्यक

अमेरिकेच्या इतिहासात ६ जानेवारी २०२१ ही तारीख काळीकुट्ट धरली जाईल. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हजारो समर्थक पोलिसांचा बंदोबस्त मोडून अमेरिकेची संसद ‘कॅपिटल’वर चाल करून आले. त्यांनी संसदेला घेराव घातला होता. एवढे हजारो समर्थक संसद व त्याच्या परिसरात घुसूनही तेथील सुरक्षा व्यवस्था अक्षरशः हतबल दिसून आली. जे काही पोलिस व अन्य संसद सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते तेही ट्रम्प समर्थकांचा धिंगाणा निमूटपणे पाहात होते. अमेरिकेच्या इतिहासात संसदेचे काम सुरू असताना, नव्या सरकारच्या जडणघडणीवर चर्चा सुरू असताना हजारोंचा जमाव संसदेवर चाल करून येतो आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेतात हे पाहणे अमेरिकेच्या लोकशाहीतील सर्वात दुःखद प्रसंग होता. अमेरिकेचे सामर्थ्य, त्याचे वैभव व तेथील जिवंत लोकशाही एकूणच हतबल दिसून आली. अमेरिकेच्या कायदा व सुरक्षा व्यवस्था यंत्रणांनी जे काही घडले ते आपले संपूर्ण अपयश मानले. लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका सहजपणे होऊ शकतो इथपर्यंत बंदोबस्त आपण राखू शकलो नाही, हे पोलिसांना मान्य करावे लागले. ज्या सुरक्षा व्यवस्थेसाठी अमेरिका जगभर ओळखली जाते. ज्या सामर्थ्याचा अमेरिकेला गर्व आहे. तिचा नामोनिशाणा बुधवारी ट्रम्प समर्थक धुडगूस घालताना दिसत नव्हता हे चित्रच जगाने पहिल्यांदा पाहिले.

अमेरिकेच्या संसदेची स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे. अमेरिकेची संसद १२६ एकर परिसरात आहे व सुमारे २ हजाराहून अधिक पोलिस तेथील सुरक्षा व्यवस्था पाहात असतात. पण बुधवारी तेथे नेमके काय कारण घडले की एवढा हजारोंचा जमाव संसदेवर चाल करून येत असताना ही पोलिस यंत्रणा स्तब्ध कशी राहिली? संसदेपासून अगदीच जवळ ट्रम्प यांनी एक सभा घेतली होती. या सभेत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या झालेल्या निवडणुका पारदर्शी झाल्या नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी आपला पराभव झाला नसल्याचे उपस्थितांना सांगण्यास सुरवात केली. निवडणुकांतील झालेले मतदान अमेरिकेच्या लोकशाहीवरचा हल्ला आहे, असे ते आपल्या समर्थकांना सांगत होते. कॅपिटलवर चाल करू जा, आणि अमेरिकेला वाचवा अशी चिथावणीखोर भाषाही करत त्यांनी आपल्या समर्थकांना भडकावले.

अमेरिकेच्या संसदेत इलेक्टोरल मतांची मोजणी सुरू होती व तो औपचारिकपणा होता. पण हे असे होण्याच्या अगोदर सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून झालेली निवडणूक आपल्याला मान्य नाही, त्याचा निकाल मान्य नाही असे सांगत ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार व गोंधळ करणार असल्याच्या धमक्यावजा इशारे देण्यास सुरूवात केली होती. एवढे वातावरण तापलेले दिसत असूनही कॅपिटल पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्यांनी परिस्थिती पाहून अतिरिक्त पोलिसांची कुमकही मागवली नाही. शिवाय महत्त्वाच्या नॅशनल गार्डलाही एक तासाने गोंधळ हाताबाहेर गेल्यानंतर शहराच्या महापौरांनी बोलावले. गंभीर बाब अशी की, गेल्या उन्हाळ्यात ट्रम्प विरोधी आंदोलन पोलिसांनी अत्यंत निदर्यपणे हाताळले होते. त्यावेळी ट्रम्प प्रशासनाने ही आंदोलने नेस्तनाबूत करण्यासाठी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ताब्यात घेतली होती.

संसदेत हुल्लडबाजी

कॅपिटलमध्ये जमाव घुसल्यानंतर तो सैरावैर धावत सुटला. १९ व्या शतकातील ही इमारत प्रचंड मोठी असून तेथे अनेक दरवाजे, खोल्या, खिडक्या आहेत. आत शिरलेल्या जमावाने आतील कार्यालये फोडली, तावदाने फोडली, कागदपत्रे भिरकावले, फर्निचरची नासधूस केली. अनेक दंगलखोरांना कुठल्या खोलीतून कसे बाहेर पडायचे याचा रस्ता सापडत नव्हता. काही दंगलखोर सेल्फी काढत फिरत होते. अत्यंत अमूल्य अशी चित्रे, पुतळे, ऐतिहासिक कलाकुसरीच्या वस्तू या संसद इमारतीमध्ये आहेत, त्याही दंगलखोरांच्या तावडीतून सुटल्या नाहीत. एवढा हजारोंचा जमाव संसदेत शिरल्याने त्याला कसा आवर घालायचा हे पोलिसांना समजत नव्हते. पोलिसच भांबावून गेले होते. एक दंगलखोर व्यक्ती तर संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या कार्यालयात घुसला व त्याने त्यांच्या खूर्चीवर बसून स्वतःचे फोटो काढले. त्याचे पाय टेबलावर होते. एका दंगलखोराच्या हातात संघराज्याचा झेंडा होता, त्याचे छायाचित्र रॉयटर वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने योगायोगाने काढले. हा झेंडा १८६१-६५ सालच्या अमेरिकेतील गुलामगिरीच्या इतिहासाचा आठवण करून देणारा होता.

सुनियोजित दंगा

कॅपिटलच्या परिसरात ट्रम्प समर्थक जमा होणार आहेत, अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच चर्चेत आल्या होत्या. काही डेमोक्रेटीक सदस्यांनी हिंसाचार होईल अशी भीतीही बोलून दाखवली होती. पण या माहितीची खातरजमा अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनांनी केली नाही, त्यांनी कोणताही बंदोबस्त ठेवला नाही.

वास्तविक वॉशिंग्टनमध्ये एखादे जनआंदोलन होणार असेल तर त्यासंदर्भात महिनाभर अगोदर सर्व सुरक्षा यंत्रणा कामास लागलेल्या असतात. यात स्थानिक पोलिस, कॅपिटल पोलिस, सिक्रेट सर्विस, फेडरल पार्क पोलिसांचा समावेश असतो. या यंत्रणांचे प्रतिनिधी एफबीआयच्या ऑफिसमध्ये चर्चा करतात व एफबीआयच्या दिशादर्शनाने समन्वय साधला जात असतो. पण बुधवारी असा कोणताही समन्वय सुरक्षा यंत्रणांमध्ये दिसला नाही.

संसदेच्या सुरक्षिततेचा प्रश्न २०१३मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी संसद परिसरात जाळ्या लावण्याचा मुद्दा पुढे आला होता पण तो पूर्णत्वास गेला नाही. कारण काही लोकप्रतिनिधींना लोकांच्या प्रवेशाला प्रतिबंध हवा होता पण संसद इमारत ही तटबंदीसारखी वाटू नये असे त्यांना वाटत होते. त्यामुळे संसदेला तटबंदी करण्याची योजना बारगळली.

ट्रम्पच्या धमक्यांकडे दुर्लक्ष

गेल्या नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपली ताकद दाखवावी लागेल असे ट्विट केले होते. बुधवारी तर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांनी ताकद दाखवावी व सर्वांनी तो आत्मविश्वास बाळगावा असे चिथावणीखोर ट्विट केले होते.

ट्रम्प यांचे समर्थक संधीची वाट पाहात होते, असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे. हजारो ट्रम्प समर्थक वॉशिंग्टनच्या दिशेने प्रवास करत आले होते. समर्थकांचे गट वॉशिंग्टनला कसे पोहाचायचे याच्या योजना करत असल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावरील पार्लर नावाच्या एका ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मवर अशी माहिती जमा होत होती. त्यावर येणार्या माहितीवरून ट्रम्प समर्थक कॅपिटलच्या परिसरात बुधवारी एकदम जमा झाले. वॉशिंग्टनमध्ये बंदुका बाळगण्यासंदर्भात अनधिकृत फलक फडकवले गेले होते. अत्यंत कडव्या उजव्या विचारसरणीचे विविध गट पार्लरच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले. प्राउड बॉइज या एका कट्टर उजव्या गटाने आपले मोठे समर्थक वॉशिंग्टनमध्ये जमा होतील, याची ग्वाही दिली होती. या गटाचा प्रमुख एन्रिक टारिओ याला सोमवारीच एका केससंदर्भात वॉशिंग्टनमध्ये अटक झाली होती. पण त्याला मंगळवारी शहर सोडून जाण्यास सांगितले होते.

१ जानेवारीला ट्विटरवर क्यूअनॉन कॉन्स्परसी थेअरीच्या नावाखाली १४८० पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. या पोस्टमधून कॅपिटलच्या परिसरात जमा होण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशभक्तांनो जागे व्हा अशा घोषणा या पोस्टच्या माध्यमातून प्रसवल्या गेल्या होत्या.    

ट्रम्प यांच्या एकूण वर्तनाविषयी व्हाइट हाउसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: