राज्यामध्ये सरकार नेमके कोणाचे आहे?

राज्यामध्ये सरकार नेमके कोणाचे आहे?

भाजपच्या राज्यामध्ये असणारी तीच दमनशाही आणि पोलिसांची दंडुकेशाही आजही महाराष्ट्रात दिसत आहे, मग सरकार बदलले आहे, असे कसे म्हणायचे?

देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहीलः अजित पवार
फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत प्रसार भारती अंधारात
अजित पवारांच्या पाठींब्यातून मजबूत सरकार देणार : फडणवीस

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर काय काय झाले.

५ जानेवारीला जवाहरलाल नेहरू विद्यापीठमध्ये गुंड घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. दुसऱ्या दिवशी मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. हा २६/११ सारखा हल्ला असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात मात्र विद्यार्थी सुरक्षित असतील याची त्यांनी ग्वाही दिली. मात्र शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पोलिसाना माहित नाही का? की पोलिसांना समजलेच नाही, मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबईतील पुरोगामी कार्यकर्त्या आणि फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॅसीच्या सदस्या कुंदा प्रमिला निळकंठ जानेवारीला नंदुरबार येथे एका कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. त्यांनी ‘द वायर मराठी’ला सांगितले, की त्यांना एक महिन्यांनी कुलाबा पोलिसांनी बोलवून घेतले आणि सांगितले, की तुम्ही ६ जानेवारीला गेट वे ऑफ इंडियाला झालेल्या आंदोलनामध्ये होता. आमच्याकडे फोटो आहे. तुम्हाला अटक दाखविले आहे. त्याचा जामीन करायला या. पोलिसांनी कुंदा यांना बोलावून घेतले. कुंदा यांनी पोलिसांना नंदुरबार येथील कार्यक्रमाचा फोटो दाखवला आणि आयोजकांचे पत्र दाखवले. पोलिसांकडचे फोटो दुसऱ्याच कोणाचे होते. पोलीस म्हणाले, की ठीक आहे आपण तुमचे नाव काढून टाकू. पण त्याला प्रोसिजर करावी लागेल. त्याचवेळी अनेकजणांना अशी नावे शोधून अटक दाखविण्यात आल्याचे कुंदा याना समजले.

गेट वे ऑफ इंडियावर सध्याच्या काश्मीरच्या स्थितीवर फलकाद्वारे भाष्य करणाऱ्या मेहक प्रभू या मुलीवर मुंबईमध्ये, गुन्हा दाखल झाला.

जतीन देसाई हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. अनेक शांतता परिषदा त्यांनी आयोजित केल्या आहेत. भारत-पाकिस्तान शांतता चळवळीचे ते समर्थक आहेत. ते ६ जानेवारीला संध्याकाळी गेट वे ऑफ इंडियावर आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. त्यांनी ‘द वायर मराठी’ला सांगितले, की फेब्रुवारी महिन्यात त्यांना पोलिसांनी फोन केला आणि तुमचा आमच्याकडे फोटो आहे. बेकायदेशीर जमाव जमवण्यासारखे गुन्हे लावण्यात आले असून, जामीन देण्यासाठी या, असे पोलिसांनी त्यांना सांगितले. देसाई यांना एक स्टेटमेंट लिहून द्यावे लागले. देसाई म्हणाले, “या देशात शांततापूर्ण अहिंसक आंदोलन करण्याचा सामान्य माणसाला अधिकार आहे, की नाही?”

पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीएएच्या विरोधात मोर्चा आयोजित केला तर आयोजक विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून बसवून ठेवण्यात आले.

अलका पावनगडकर या लोकशाही आंदोलनाच्या कार्यकर्तीला ती सीएएच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रस्त्यावर सह्या गोळा करीत असताना पकडून अटक करण्यात आले. कपड्यांना धरून फरफटत नेण्यात आले आणि एक अख्खा दिवस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.

मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. शारजिलच्या समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले.

भाजपमध्येच ज्यांना अजिबात किंमत नाही असे किरीट सोमय्या ट्वीट करून मागणी काय करतात आणि पोलीस लगेच दखल घेऊन गुन्हे काय दाखल करतात! सरकार नेमके कोणाचे आहे?

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे पुण्यात आयोजित करण्यात आलेले व्याख्यान, पतित पावन संघटनेच्या धमकीमुळे रद्द करण्यात आले. कन्हैया कुमारच्या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांना पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. तेंव्हा सत्ता देवेंद्र फडणवीस यांची आणि भाजपची होती. आता मात्र सत्तेवर आव्हाड आहेत पण आव्हाड यांना मारहाण करण्यासाठी आलेल्या गँगचे सदस्य अजूनही पुण्यात असल्याचे तुषार गांधी यांच्या प्रकरणात दिसत आहे. यापूर्वी विद्यापीठामध्ये असाच एक कार्यक्रम एका नेत्याच्या धमकीमुळे रद्द करण्यात आला होता. ते लोक आजही पुण्यात सक्रीय आहेत.  पोलिसांनी मात्र कोणावरही कारवाई केलेली नाहे. पोलिसांची मानसिकता अजूनही जुन्या सरकार मध्येच आहे का?

पृथ्वीराज चव्हाण पुण्यात चिदंबरम यांच्या व्याख्यानासाठी आले होते, तेंव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी तुषार गांधी यांचे व्याख्यान रद्द करण्याच्या घटनेचा निषेध केला. निषेध? अहो सरकार तुमचे आहे, की भाजपचे? धमकी देणाऱ्या संघटनेवर अजून कारवाई कशी झाली नाही?

फिरोज मिठीबोरवाला हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानात २९ डिसेंबरला झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. ‘गेट वे’च्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांना अटक करून जामीन घ्यावा लागला. आता मुंबईबाग आंदोलन सुरु आहे, त्यामध्येही त्यांचा सहभाग आहे. त्यांना पोलिसांनी दोन नोटीस बजावल्या आहेत. त्यांनी सांगितले की या आंदोलनात येणाऱ्या अनेक महिलांना नागपाडा पोलीस नोटीस बजावत आहेत. कसेही करून मुंबईबागचे आंदोलन संपविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. नागपाडा पोलिसांना माहित नाही का, की सरकार बदलले आहे?

मुंबई बाग येथील आंदोलन कव्हर करणारे मुंबई प्रेस क्लबचे सहसचिव आशिष राजे यांना पोलिसांनी मारहाण केली. त्याचे व्हिडीओ सगळीकडे प्रसिद्ध झाले आहेत. मात्र काहीच कारवाई नाही. हे राज्य सरकार म्हणते, की आम्ही सीएएच्या विरोधात आहोत, मग पोलिसांना मुंबईबाग येथील आंदोलन का संपवायचे आहे, की पोलिसांना दिल्लीप्रमाणे  हिंसा घडवून आणायची आहे? हे पोलीस नेमके कोणासाठी काम करीत आहेत?

अनेक ठिकाणी सीएएच्या विरोधातील आंदोलनांना परवानगी दिली जात नसल्याच्या बातम्या येत आहेत.

सीएएच्या विरोधात बोलणाऱ्या आणि उबेरमधून प्रवास करणाऱ्या कवी बाप्पादित्य सरकार, यांना रोहीत गौर या कॅब चालकाने पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी सरकार यांची चौकशी केली. त्या चालकाचा मुंबई भाजपने खास सत्कार केला.

राज्यामध्ये सरकार नेमके कोणाचे आहे?

भाजपचे सरकार जाऊन, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे, असे म्हणतात. पण प्रत्यक्षात पोलीस कोणासाठी काम करीत आहेत?

राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या काळामध्येच पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि सरकार जाईपर्यंत आरोपी सापडले नाहीत. ‘सनातन’वर बंदी आली नाही. मनोहर भिडे यांच्यावर कारवाई झाली नाही. आजही सनातन मोकाट आहे. मनोहर भिडे सरळ सरळ सांगली बंदची हाक देतात, मनाला वाट्टेल तसे बोलतात आणि कारवाई होत नाही. जयंतराव पाटील, सरकार कोणाचे आहे?

एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याचा आणि पोलिसांनी संशयास्पद काम केल्याचे सांगतात. त्यावर केंद्राकडून तपास एनआयएकडे नेला जातो. राज्यात कारवाई मात्र काहीच होत नाही. मोहसीन शेखची हत्या होते. आरोपीची मिरवणूक काढण्यात येते. अनेक हत्यांचे कट तयार केले जातात. स्फोटके सापडतात. लेखक-कलाकारांना धमक्या दिल्या गेल्या. धमक्या देणारे तसेच आहेत. महाराष्ट्रातही देशभरातील तथाकथित देशभक्तीची विषवल्ली पसरत आहे. हे नव्या सरकारच्या ध्यानात आले नाहीये का? की सरकार कोणाचे आहे?

उद्धव ठाकरे यांनी एका बाजूला जुन्या सरकारमध्ये आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे काढून टाकण्याचे आदेश दिले असताना, इथे मात्र नवीन गुन्हे दाखल करण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे. पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, अजित पवार, सुप्रिया सुळे, उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ जे करीत आहेत, तेच जर महाराष्ट्रात होणार असेल, तर मग सरकार बदलले आहे, असे म्हणायचे का?

(लेखाचे छायाचित्र – नागपाडा मुंबई बाग येथे आशिष राजे याना पोलिसांची मारहाण)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: