एका ट्विटला मोदी सरकार इतकं का घाबरलं?

एका ट्विटला मोदी सरकार इतकं का घाबरलं?

काश्मीरमध्ये कलम ३७० लागू झाल्यानंतर आपल्या देशाचे खासदार तिथे जाऊ शकले नव्हते. पण युरोपातल्या २७ खासदारांचं शिष्टमंडळ मात्र ऐन तणावाच्या वातावरणात आमंत्रित करून काश्मीरमध्ये ‘ऑल इज वेल’ आहे हे सांगायला बोलावलं होतं. मग त्यावेळी देशांतर्गत प्रश्न, आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचं काय झालं?

राज्यात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात
७ वर्षांत पेट्रोलियम करातून १४ लाख कोटी
सात खेपा, पाच कागदपत्रे आणि नकारघंटा: अधिवास प्रमाणपत्राचे दु:स्वप्न!

काश्मीरमध्ये कलम ३७० लागू झाल्यानंतर आपल्या देशाचे खासदार तिथे जाऊ शकले नव्हते. पण युरोपातल्या २७ खासदारांचं शिष्टमंडळ मात्र ऐन तणावाच्या वातावरणात आमंत्रित करून काश्मीरमध्ये ऑल इज वेल’ आहे हे सांगायला बोलावलं होतं. मग त्यावेळी देशांतर्गत प्रश्न, आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचं काय झालं

 रिहाना ही कोण आहे हे तिने भारताबद्दल ट्विट करेपर्यंत मला माहिती नव्हतं. ती किती मोठी पॉपस्टार आहे, तिचे ट्विटरवर १० कोटी फॉलोअर्स आहेत ( मोदींच्या जवळपास दुप्पट) वगैरे गोष्टी नंतरच समजल्या. ग्रेटा थनबर्ग हे नाव अधूनमधून बातम्यांमुळेच माहिती झालं आहे. पण १८ वर्षांच्या मुलीला जगाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गोष्टीत इतका रस, इतकी समज असावी ही गोष्ट मला वैयक्तिकपणे अतर्क्य वाटते. मलाला काय किंवा ग्रेटा काय एखादा अजेंडा चालवण्यासाठी असे चेहरे जाणूनबुजून पुढे केले जात असावेत, त्यापाठीमागची ताकद कुठलीतरी वेगळीच असावी. पण मुद्दा तो नाही. भारतातल्या शेतकरी आंदोलनाबद्दल रिहानानं एखादं ट्विट केलं आणि त्यानंतर जणू देशावर जणू परकीय आक्रमणच झालं आहे अशा आविर्भावात सरकार कामाला लागलं.

रिहाना अवघी ३२ वर्षांची आहे. पण तिच्या एका ट्विटनं केंद्र सरकारमधले डझनभर मंत्री, क्रिकेट, बॉलिवूडमधले सरकारधार्जिणे सेलिब्रेटी हे देशावरचं आक्रमण परतवून लावण्यासाठी मैदानात उतरले. यातल्या अनेकांनी एखाद्या विषयावर शेवटची भूमिका कधी घेतली होती हे तुम्हाला आठवणारही नाही. बरं, हे सेलिब्रेटी अमुकच विचारांचे असावेत असा आपला हट्ट नाही. पण किमान व्यक्त होताना त्यांनी स्वत:ची मतं तरी ठामपणे मांडावीत. पण या सगळ्या ट्विटची भाषा ही सरकारनं लिहून दिलेल्या चिटोऱ्यातून कॉपी पेस्ट केल्यासारखी होती. ‘वेलकम’ चित्रपटातला बैजू जसा ‘मेरी एक टांग नकली है’च्या सुरात उदयभाईच्या समर्थनासाठी धावून येतो त्याच सुरात हे सेलिब्रेटी सार्वभौमत्व, परकीय शक्ती वगैरे शब्दांची पेरणी करत ‘इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा’ नावाच्या सोशल माध्यमावरच्या मोहिमेत सहभागी झाले होते. देशभक्तीचा नवा आयकॉन अक्षयकुमारनं याची सुरूवात केली त्यानंतर अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर ही सगळी मंडळी त्यात सामील झाली. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विराट कोहली इ. क्रिकेटरही यात होते.

सीएनन या अमेरिकी वृत्तमाध्यमाच्या वेबसाइटवर दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनस्थळावर सरकार इंटरनेट बंद करत असल्याची बातमी होती. ती बातमी पोस्ट करून रिहानानं केवळ एका वाक्याचा प्रश्न विचारला होता, आपण याबद्दल बोलत का नाही? त्यानंतर आपल्याकडे ही आग लागली होती. हा आपला अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणत इतरांना त्यावर बोलायचा काय अधिकार अशी एक आरोळी सुरू झाली. काही प्रश्न हे देशांतर्गतच असतात हे अगदी खरं. पण एखाद्या देशाचा आपल्या प्रश्नात अधिकृत हस्तक्षेप तेव्हा मानला जातो, जेव्हा तिथल्या सरकारकडून काही प्रतिक्रिया, वक्तव्य येईल. इथे तर लेडी पॉपस्टारच्या एका प्रश्नानं भारत सरकारनं ‘अंतर्गत हस्तक्षेप’ ‘अंतर्गत हस्तक्षेप’ करून उर बडवायला सुरुवात केली. आपण यावर बोलत का नाही असं रिहानानं म्हटल्यावर इकडे सरकारनं बोलायला सुरुवात केली, पण शेतकरी आंदोलनावर नव्हे… तर रिहानावर बोलायला सुरुवात झाली. मग तिचं उत्पन्न किती, तिला अशी मतं मांडण्यासाठी कसे पैसे मिळतात वगैरे.

आपल्या देशातल्या प्रश्नावर कुणी बोललेलं इतकं झोंबतं तर मग आपण अमेरिकेच्या निवडणुकीत इतकं नाक कशासाठी खुपसलं होतं? अगदी सरळसरळ एका पक्षाची बाजू घेऊन ‘अब की बार ट्रम्प सरकार’चा नारा का दिला होता? त्यावेळी अमेरिकेत किमान विरोधी पक्षांनी तरी अमेरिका अगेन्सट प्रोपगंडा, सार्वभौमत्व वगैरे शब्द वापरले नव्हते का?

काश्मीरमध्ये कलम ३७० लागू झाल्यानंतर आपल्या देशाचे खासदार तिथे जाऊ शकले नव्हते, जे जाऊ पाहत होते त्यांना विमानतळावरुनच परत पाठवलं. पण युरोपातल्या २७ खासदारांचं शिष्टमंडळ मात्र ऐन तणावाच्या वातावरणात आमंत्रित करून काश्मीरमध्ये ‘ऑल इज वेल’ आहे हे सांगायला बोलावलं होतं. मग त्यावेळी देशांतर्गत प्रश्न, आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचं काय झालं? गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीत थंडी-गारठ्याची पर्वा न करता शेतकऱ्यांचं रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. त्याबदद्ल ज्यांनी तोंड उचकटलं नव्हतं त्यांनी सरकारच्या एका इशाऱ्यावर मात्र समर्थनासाठी रांग लावावी हे चित्र काही बरं नाही. जर हा धोरणात्मक बाबीतला हस्तक्षेप वाटत असेल तर सरकारनं आपल्या स्तरावर त्याला उत्तर द्यावं. त्यासाठी सेलिब्रेटी विरुद्ध देशी सेलिब्रेटी उभे करण्याचा खेळ का खेळावा?

व्यवस्थेविरोधातली लढाई लढत राहण्याचं काम सेलिब्रेटींनी करत राहावं ही देखील अपेक्षा नाही. पण किमान भूमिका घेताना आपल्या बुद्धीला जे पटतं ते त्यांनी ठामपणे मांडत राहावं इतकीच अपेक्षा. परवाच्या त्या डझनभर ट्विटमध्ये तेच तेच शब्द, एका साच्यातून काढल्यासारखे. म्हणजे सचिन तेंडुलकरच्या ट्विटमध्ये तर भारत आपल्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड करणार नाही अशी सुरुवात आहे. परकीय शक्ती केवळ वैगेरे शब्दही त्यात आहेत. हे चीनला इशारा देणार ट्विट आहे असाही काहींचा गैरसमज व्हायचा. मुळात रिहानाच्या एका ट्विटनं देशाचं सार्वभौमत्व कसं अडचणीत येतं?

आपले सेलिब्रेटी त्यांना हवं त्या मुद्द्यावर नव्हे तर सरकारला हव्या त्या मुद्यावर भूमिका घ्यायला सरसावतायत हा फरक आहे. शेतकरी आंदोलनात इंटरनेट बंद का केलं जातंय, हा प्रश्न विचारल्यावर तो देशाचा अपमान कसा होतो. आणि जेव्हा तुम्ही सरकारच्या बाजूनं उतरता, तेव्हा आपल्याच देशातल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधातही असता ही गोष्ट कशी विसरता? त्यामुळे सेलिब्रेटींच्या व्यक्त होण्यात धोका नाही तर सेलिब्रेटींना वापरुन घेण्याच्या पद्धतीत धोका आहे.

दिल्लीतलं शेतकरी आंदोलन हे अभूतपूर्व आहे. गेल्या अनेक वर्षात असं आंदोलन देशानं पाहिलेलं नाही. या आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर या ना त्या निमित्तानं होणारच होती. गंमत म्हणजे एका पॉपस्टारच्या ट्विटनं हे घडवून आणलं. रिहानानं ट्विट केल्यानंतर तिची सगळी कुंडली काहींनी मांडायला घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ट्विट करून तिला भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आपला चाहतावर्ग वाढवायचा असेलही. त्याही उद्देशानं अशा संवेदनशील विषयावर ट्विट करत असावी. पण जर सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर कदाचित इतका गदारोळ उठला नसता. पण प्रचंड बहुमताच्या सरकारनं एखाद्या ट्विटला एवढं घाबरून प्रतिक्रिया देत सुटावं?

बाकी यानिमित्तानं सेलिब्रेटींना डोक्यावर घेऊन त्यांना देव बनवणाऱ्या आपल्या भारतीय मानसिकतेचाही फोलपणा उघड झाला. ज्या लोकांच्या प्रेमावर ते इतकी प्रतिष्ठा, प्रसिद्धी अनुभवतात त्यांच्यासाठी ठाम भूमिका घेण्याइतपत ताठ कणा हे दाखवू शकत नाहीत. कुठल्याही गोष्टीत अडचणीत आलं की परकीय शक्तींचा हात असे आरोप करण्याची सरकारांची जुनी परंपरा आहे. रिहानाच्या ट्विटवरून पुन्हा या प्रश्नात राष्ट्रवाद आणण्याची कसरत सरकार करत आहे. संकटाच्या काळात राष्ट्रवाद हाच शेवटचा उपाय असतो. क्रिकेट, बॉलिवूडचा राजकारणाशी संबंध येतच राहिलेला आहे. पण आपल्या राजकारणासाठी ही क्षेत्रं दुभंगण्याचाही उद्योगही सुरू झाला आहे. जर मोदींचं नेतृत्व इतकं बलवान असेल तर त्याला अशा सेलिब्रेटींच्या प्रतिमेचा उसना आधार का घ्यावा लागतो हाही प्रश्न आहे.

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दीपिका पदुकोण काही न बोलता उपस्थिती लावून आली तरी तिच्यावर नंतर सोशल मीडियावर कशी ट्रोल धाड पडली होती, हे आपण पाहिलं आहे. नंतर सुशांत सिंह प्रकरणावरून बॉलिवडूमधल्या काही लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला. ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचीही चौकशी झाली. दीपिकाचं हे उदाहरण एरव्हीही मूग गिळून गप्प असलेल्या बॉलिवूडला आणखी गप्प करायला पुरेसं होतं. आता रिहानाच्या निमित्तानं ही शरणागती कुठल्या थराला पोहचली आहे हे उघड झालं.

प्रशांत कदम, हे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित प्रतिनिधी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0