आखिर शोले ‘क्लासिक’ क्यों है भाई

आखिर शोले ‘क्लासिक’ क्यों है भाई

१५ ऑगस्ट १९७५... १५ ऑगस्ट २०२०... ४५ वर्षे... साडेचार दशके... आणि आठ पिढ्या... (एक पिढी पाच वर्षांनी बदलते, हा हिशेब जमेस धरून) असं सारं उलटून गेलं, तरीही ‘शोले’ नावाचा सिनेमास्कोप चमत्कार आजही प्रेक्षकांवर प्रभाव राखून आहे. चार दशकांपूर्वी घडून आलेल्या ‘शोले’ नामक चमत्काराची उकल करण्याचा हा सर्वस्पर्शी प्रयत्न...

शार्जिल इमामला बिहारमधून अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
भारताची अफगाणिस्तानला पहिली अधिकृत भेट
शंकराच्या पिंडीवर बसलेला विंचू

१५ ऑगस्ट १९७५. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ प्रदर्शित झाल्याची ही तारीख. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवली. त्यांचं हे पाठ फिरवणं पुढे दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत कायम राहिलं. पण सिनेमा बघितलेल्या बहुसंख्य समीक्षकांनी हा ‘डाकूपट’ साफ नाकारला. हे खरं होतं की, ‘शोले’ तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सफाईदार सिनेमा होता. त्यात श्वास रोखून धरायला लावणारे अॅक्शन सीन होते. परंतु हे सोडता बाकी सगळा मामला तद्दन मसालेवाईक होता. १९७१मध्ये येऊन गेलेला ‘मेरा गाँव मेरा देश’ची आठवण अनेकांच्या मनात ताजी होती. ‘शोले’तल्या गब्बरचं ‘मेरा गाँव’च्या जब्बरसिंगच्या नावाशी साधर्म्य एकूणच इंटरेस्ट कमी करणारं होतं. अनेक प्रसंग परदेशी सिनेमांतून प्रेरणा घेतलेले होते. काही तर थेट जसे होते तसे उचललेले होते. धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवरून ‘सुसाट’ची धमकी देणारा सीन तर सरळसरळ अँथोनी क्विनच्या ‘सिक्रेट ऑफ सान्ता व्हिक्टोरिया’वरून घेतलेला होता. रेल्वेला समांतर धावणाऱ्या घोड्यांची दृश्ये हॉलीवूडच्या काऊबाय प्रकारातल्या सिनेमा पाहून योजण्यात आली होती. आर.डी.बर्मन हे त्या वेळचे यशस्वी संगीतकार होते, पण ‘शोले’ची गाणी त्यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी नक्कीच नव्हती. ‘मेहबूबा…मेहबूबा’ हे गाणं तर डेमिस रुसोसच्या गाण्याची सहीसही नक्कल होती. त्यात सिनेमाचा निर्माता असलेल्या जी. पी. सिप्पीने हिंसेचं दर्शन घडवणारे सीन स्वत:चं वजन वापरून सेन्सॉर बोर्डाकडून मंजूर करवून घेतल्याची सिनेमाबद्दल नकारात्मक भावना निर्माण करणारी हवा सर्वत्र तयार झालेली होती…एकूण रागरंग अपयशाकडे घेऊन जाणारा होता.

पण आज ४५ वर्षांनी आपण ‘शोले’च्या टोलेजंग यशाबाबत बोलत आहोत. आजवरच्या सगळ्यांत यशस्वी भारतीय सिनेमांत त्याचा समावेश करत आहोत. आता ‘शोले’ केवळ एक सिनेमा राहिलेला नाही, तर एक मोठी सांस्कृतिक बाजारपेठ बनलेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा एक माइलस्टोन झालेला आहे. पण हे सगळं कसं घडलं आणि कशामुळे घडलं?

हे जाणून घेण्यासाठी ‘शोले’चं तुकड्यातुकड्यात नव्हे तर पूर्ण सिनेमा म्हणून मोजमाप व्हायला हवं. कारण, ‘सम इज ग्रेटर दॅन इट्स पार्ट‌्स’. कला व्यवहारात ‘पॅकेजिंग’चं महत्त्व अनन्यसाधारण असतं. हे पॅकेजिंगचं महत्त्व त्या काळी वयाच्या तिशीतल्या रमेश सिप्पी यांनी पूर्णपणे जाणलं होतं. त्यांनी सलीम- जावेदने लिहिलेल्या तगड्या पटकथेला न्याय देण्यासाठी तितक्यात तगड्या कलावंतांची निवड केली होती. अमिताभ बच्चन आणि अमजद खान वगळता धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन आणि संजीवकुमार हे सगळेच कारकिर्दीच्या उंचीवर उभे होते. त्यांच्या क्षमता ध्यानात घेऊनच आणि मुख्यत: व्यक्तिरेखांचे स्वभाव आणि स्वभावाला जुळणाऱ्या जोड्या अशी पटकथेची बांधणी करण्यात आली होती. यातल्या विरु-जय-बसंती-राधा या सगळ्या व्यक्तिरेखांच्या आड समाजाने उभारलेल्या भिंती होत्या. मात्र त्यात संजीवकुमारने साकारलेली व्यक्तिरेखा उद्वेग, संताप व्यक्त करणारी आणि परिस्थितीतून मार्ग काढणारी अशी होती. अर्थातच विचारपूर्वक निवड केवळ मुख्य पात्रांपुरती मर्यादित नव्हती, तर विजू खोटे, लीला मिश्रा, जगदीप, असरानी, मॅकमोहन यांच्या जेमतेम काही मिनिटांच्या भूमिकांबाबतही असंच घडलं होतं. त्यात सांभाची भूमिका करणाऱ्या मॅकमोहनला तर अख्ख्या सिनेमात केवळ एकच डायलॉग होता, पण तोही अजरामर झाला होता. परंतु या सगळ्यांपेक्षा अनपेक्षितपणे उंचीवर गेला होता, तो गब्बर सिंग.

गब्बर सिंगच्या या अकल्पित लोकप्रियतेचं रहस्य कशात होतं? एक तर अमजद खान स्वत: उत्तम दर्जाचा नट होताच, पण त्याने दरोडेखोर गब्बरचा विखारीपणा असा काही अंगी मुरवला होता की, असं वाटतच नव्हतं की, तो दुसऱ्याने लिहिलेले संवाद म्हणतोय. त्याने स्वत:ची अमजद खान ही जन्मजात ओळख जणू गब्बरसिंगला देऊन टाकली होती. प्रेक्षकांसाठी गब्बर हे एक ‘सरप्राइज पॅकेज’ होतं. अमजदने हिंदी चित्रपटसृष्टीला अजरामर असा खलनायक दिला होता.

हेही मान्य करायला हवं की, ‘शोले’च्या आभाळाएवढ्या उत्तुंग यशात मार्केटिंग तंत्राचाही मोठा वाटा होता, याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. हा निर्माता-दिग्दर्शकांचा अतिआत्मविश्वास होता की, निव्वळ उद्दामपणा हे ठाऊक नाही; परंतु ‘दी ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड’ ही शोलेची टॅगलाइन होती, जी तोपर्यंत वापरण्याचं धाडस कुणी केलं नव्हतं. ‘शोले’चं पोस्टर बघणाऱ्यांच्या मनात केवळ कुतूहल निर्माण करणारं नव्हतं, तर खळबळ माजवणारंही होतं. सिनेमामधल्या डायलॉग्जच्या रेकॉर्ड‌्स जिथे कुठे सिनेमा प्रदर्शित झालेला असेल, तिथे हेतूपुरस्सर लावण्यात येत असत. ते डायलॉग ऐकायलासुद्धा लोक गर्दी करत. इतकंच कशाला, तुम्ही जिथे जावं तिथे, ‘कितने आदमी थे?’ किंवा ‘अरे ओ सांभा कितना इनाम रक्खे है सरकार हम पर? पुरे पचास हजार…’ हे संवाद कानावर पडत होते. त्या काळी अशाप्रकारे आक्रमकपणे सिनेमाची जाहिरातबाजी करण्याचा पुरेपूर मोबदला रमेश सिप्पींना मिळाला होता.

पण, ४५ वर्षे शोलेने प्रेक्षकांना पछाडण्याचं कारण काय होतं? भारतीय लोकांना गोष्टी ऐकायला आवडतात. गोष्ट सांगणारा कलेत माहीर असेल, तर ते मंत्रमुग्ध होऊन जातात. तसंच नेमकं ‘शोले’च्या बाबतीतही घडलं आहे. “शोले’च्या आधी ‘शोले’च्या नंतर हजारो सिनेमे येऊन गेले, परंतु रमेश सिप्पीने ज्या कौशल्याने आणि ज्या पॅशनने ‘शोले’ची गोष्ट सांगितली, तसं क्वचितच कुणाला साधलं. म्हणून अनेक जुने क्लासिक सिनेमे आज कंटाळवाणे वाटतात, पण ‘शोले’ अजूनही ताजातवाना वाटतो.

यशाचे रहस्य— मानसशास्त्र सांगतं, माणूस परिस्थितीमुळे गांजला की, त्याच्यामध्ये एक तर उद्दामपणा तरी येतो किंवा तो उपरोधिक तरी होऊन जातो. ‘शोले’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा प्रत्यक्ष जगण्यात अशीच काहीशी परिस्थिती होती. एका बाजूला दुष्काळामुळे भूकबळी पडत होते, दुसरीकडे सत्तेचं केंद्रीकरण होऊन भ्रष्टाचार टिपेला पोहोचला होता. अनागोंदीच्या एका क्षणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीमुळे समाजातला एक वर्ग अत्यंत आक्रमक बनला होता आणि ज्या वर्गाला आक्रमक होता येत नव्हतं, त्याची परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी उपरोधिक बनली होती. हीच आक्रमकता आणि उपरोधिकपणा लेखक सलीम-जावेद यांनी ‘शोले’तल्या एकूण एक व्यक्तिरेखांमध्ये पेरला होता. मात्र, ‘शोले’तल्या खलनायकाला छद्मीपणाची जोड देत वेगळ्या उंचीवरही नेऊन ठेवलं होतं. १९७५ ते १९८० हा भारतीय लोकशाहीचा सर्वाधिक खळबळजनक असा काळ होता आणि याच काळात ‘शोले’ उत्तरोत्तर लोकप्रिय होत जाणं, यात म्हटलं तर एक प्रकारची विसंगती होती आणि सुसंगतीही. आजूबाजूला अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थिती असताना ‘शोले’त सामान्य माणूस दिलासा शोधत होता आणि त्याला तो मिळतही होता. ८०नंतर देशात व्हिडिओ टेपचं, ९०च्या दशकात सीडी आणि केबल टीव्हीचं आणि २००० नंतर माहिती-तंत्रज्ञानाचं युग अवरतलं होतं. याच माध्यमांमुळे थिएटरपर्यंत मर्यादित असलेला ‘शोले’ घराघरांत नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचत होता. एका बाजूला रि-रनमध्ये यश मिळत असतानाच प्रसारमाध्यमांच्या प्रभावी विस्तारामुळेच ‘शोले’चं यशही प्रत्येक टप्प्यावर विस्तारत गेलं.

सिद्धार्थ भाटिया, लेखक- ज्येष्ठ पत्रकार, आणि ‘द वायर’चे संस्थापक सदस्य आहेत.

(पूर्वप्रसिद्धी दै. दिव्य मराठी-रसिक)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0