महाराष्ट्राची ‘कला’ का नाही?

महाराष्ट्राची ‘कला’ का नाही?

महाराष्ट्राची भूमीच अशी आहे की, इथे कलांची निगुतीने निगराणी आणि जोपासना होते. इतर कुठल्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्राची रसिकता संपन्न आणि जाणकार आहे. त्यामुळेच शास्त्रीय संगीतातील अनेक नामवंत बुजुर्गांनी महाराष्ट्राची कायम सराहनादेखील केली आहे...आणि तरीही ‘महाराष्ट्राची कला’ कोणती असा, प्रश्न जेव्हा कुणी विचारतो, तेव्हा आपल्याकडे त्याचं ठोस उत्तर नसतं...

खेळ खेळत राहतो उंबरा: कवितेची आतली लय
महान चित्रकार पाब्लो पिकासो
साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

शास्त्रीय संगीत असो वा शास्त्रीय नृत्य, या कलांच्या संगोपन-संवर्धनात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आहे. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर १९व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तरेतून ख्यालगायकी शिकून महाराष्ट्रात आले आणि इथे महाराष्ट्र देशी संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. तसंच विसाव्या शतकात पं. मोहनराव कल्याणपूरकर, आचार्य पार्वतीकुमार यांसारख्या नृत्यगुरुंनी महाराष्ट्रात कथक, भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यांची पायाभरणी केली आणि आज उभा महाराष्ट्र विविध शास्त्रीय नृत्यांचं प्रशिक्षण घेत आहे.

तरीही, देशपातळीवर अभिमानाने-गौरवाने नाव घेतलं जाईल अशी एखादी संगीत-नृत्यकला महाराष्ट्रात आकारालाच आलेली नाही. राजस्थानमध्ये जसं हवेली संगीत उदयाला आलं, पश्चिम बंगालमध्ये रवींद्र संगीत आकाराला आलं, किंवा दक्षिणेकडे यल्लम्माच्या देवदासींच्या गाण्यांमधून एक वेगळी गानपरंपरा निर्माण झाली, तसं महाराष्ट्रात झालं नाही. जे गाण्याबाबत, तेच महाराष्ट्रात नृत्याबाबतही घडलं. देवदासी परंपरेने चालत आलेल्या नृत्यांनाच गायन आणि संगीताची आस्वादक-शास्त्रीय जोड देऊन भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम, कथक, मणिपुरी, कथकली या समृद्ध नृत्यकला भारतातील विविध राज्यांत जन्माला आल्या. महाराष्ट्रदेशी मात्र अशी कोणतीही नृत्यकला आकाराला आली नाही. अर्थात कोणत्याही कलानिर्मितीला आवश्यक असलेली सर्जनक्षमता महाराष्ट्राच्या मातीत नव्हती, असं नाही. उलट आदिवासी संगीतापासून लोकसंगीतापर्यंत आणि आदिवासी नृत्यांपासून लोकनृत्यांपर्यंत कितीतरी वैविध्यपूर्ण प्रयोगात्मक कला महाराष्ट्राच्या मातीत परंपरेने रुजल्या. मात्र त्यांची ‘कला’ म्हणून अधिकची वाढ होण्यासाठी जी प्रायोगिक आणि सैद्धांतिक मांडणी होणं गरजेचं होतं, ते कधीच झालं नाही… आणि याचं कारण बहुतांशी महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात दडलेलं आहे.

मध्ययुगीन इतिहासातला कलासंघर्ष

बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात यादवांचं राज्य होतं आणि यादवांच्या पदरी अनेक कला-संगीततज्ज्ञ मंडळी होती. मात्र अल्लादिन खिलजीने यादवांचा पाडाव केला आणि जणू महाराष्ट्राची कलासंपन्नता, नवनिर्माणक्षमता लयाला गेली. कारण त्या नंतरचा १८ व्या शतकापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास हा कायमच संघर्षाचा राहिलेला आहे. कुठलीही कला-कौशल्यं ही नेहमीच शांतता आणि सुबत्तेच्या काळात आकाराला येतात. तशी शांतता व सुबत्ता तब्बल सहा शतकं न लाभल्यामुळेच महाराष्ट्राची अशी एखादी कला आकाराला आली नाही… पेशवाईच्या उत्तरार्धात, म्हणजे सवाई माधवराव आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळात महाराष्ट्रात शाहिरी परंपरेला मोठा राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला. विशेष म्हणजे, शाहिरांनी रचलेल्या कवनांतून लावणीसारख्या गायनप्रकाराचा अगदी महाराष्ट्रभर उदोउदो झाला, तरीही त्यातून एखादी ठसठशीत ‘कला’ आकाराला आली नाही. वास्तविक पेशवाईच्या उत्तरार्धात आणि पेशवाईच्या अस्तानंतरही नंतरही पुण्यातील बावनखणी संगीत-गायनाची खाण होती. पुण्यातील संगीत-नृत्याचे दर्दी या बावनखणीत आवर्जून हजेरी लावायचे. मात्र या बानवखणीत कोणत्या प्रकारचं गायन-वादन आणि नर्तन व्हायचं, याची कोणत्याही प्रकारची नोंद आपल्या ऐतिहासिक कागदपत्रांत सापडत नाही. एवढा त्या काळात मराठी समाज कलांविषयी उदासीन होता.

जर बावनखणीतल्या नाच-गाण्याची नोंद राहती, तर कदाचित महाराष्ट्राचा कला वारसा सांगता आणि मिरवताही आला असता. पण तसे प्रयत्न किमान १९व्या शतकापर्यंत तरी महाराष्ट्रात झाले नाहीत आणि तत्कालीन महार-मांग-कोल्हाटी, गोंधळी, वाघ्यामुरळी यांसारख्या ज्या समूहांनी पेशवाईत नावारूपाला आलेला तमाशा किंवा लावणी कला जपण्याचा प्रयत्न केला, ती महाराष्ट्रात हीन ठरवली गेली. इतकी हीन की अगदी तिला गावकुसाबाहेरच ठेवली गेली. तथाकथित संस्कृती रक्षकांनी तिच्या नावाने नाक मुरडण्याचंच काम केलं.

लावणी आणि व्यवस्थेचे निकष

… मात्र ‘महाराष्ट्राची कला’ म्हणता येईल, अशी महाराष्ट्रात कुठली कला असेल, तर ती एकमेव लावणीच आहे! अगदी परिपूर्ण नृत्य किंवा गायनप्रकार म्हणून आकाराला येईल, असा हा कलाप्रकार महाराष्ट्रात गेली किमान तीन शतकं तरी टिकून आहे. खरंतर लावणी ही तमाशा या लोककलाप्रकाराची एक उपांग आहे आणि तरीही तिने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपलेलं आहे. मात्र आजतागायत महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेल्या लावणीला ‘कला’म्हणून शास्त्रीय साज चढवण्याचा प्रयत्न कुणी केलेला नाही आणि ज्या कुणी क्वचित केला, त्यांना धमकी दिली गेली- ‘ही महाराष्ट्राची मोकळीढाकळी लोककला आहे, तिला तशीच ठेवा.’ यातल्या ‘मोकळीढाकळी’ या शब्दाला वेगळाच वास होता. जर लावणी मोकळीढाकळी राहिली नाही, तर तिचा (लावणीचा आणि लावणीनर्तकीचा) मोकळाढाकळा आस्वाद आम्हाला घेता येणार नाही, असा गर्भित हेतू त्यामागे होता. मात्र लावणीला शास्त्रीय बाज न चढवण्यामागे असे कुणाकुणाचे अंतस्थ हेतू असले, तरी लावणीत शास्त्रीय नृत्य होण्यासाठीचे निकष खरोखरच आहेत की नाहीत, हे मात्र नक्कीच तपासून पाहिले पाहिजे. कारण कुणी कितीही स्वतःहून ठरवलं, म्हणून लावणीला शास्त्रीय नृत्याचा दर्जा प्राप्त होणार नाही. त्यासाठी संगीत नाटक अकादमीने आखून दिलेल्या निकषात तुमची नृत्यशैली बसायला हवी.

काय आहेत, हे संगीत नाटक अकादमीचे निकष? तर, संगीत नाटक अकादमीने भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ यासाठी प्रमाण मानला आहे. वास्तविक भरतमुनींनी आपल्या नाट्यग्रंथात आजच्या कुठल्याही शास्त्रीय नृत्यशैलींचा उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांनी आपल्या ग्रंथात दाक्षिणात्य, अर्धमागधी, अवंती आणि पांचाली या चार नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख केलेला आहे. या नृत्यप्रवृत्तींचा मागोवा घेतला, तर दक्षिणात्य या नृत्यप्रवृत्तीत दक्षिणेकडच्या नृत्यशैलींचा समावेश होतो. अर्धमागधी नृत्यप्रवृत्तीत आजच्या ईशान्येकडील ओडिसी, मणिपुरी किंवा शास्त्रीय नृत्यांच्या यादीत नव्याने समावेश झालेल्या सत्तारिया या नृत्याचा समावेश होऊ शकतो. अवंती किंवा पांचाली या नृत्यशैली म्हणजे, नेमक्या कोणत्या, याबद्दल मात्र संशोधकांमध्ये एकमत नाही. तसंच नाट्यशास्त्रात या नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख असला, तरी त्यांची एकच सर्वसमावेशक किंवा वेगळेपणाची व्याख्या त्यात नाही. त्यामुळे भरतमुनींनी नाट्यशास्त्रात सरसकट नृत्याविषयी जे विवेचन केलं आहे, तेच शास्त्रीय नृत्यासाठीचे निकष मानले जातात. उदाहरणार्थ भरतमुनींनी नर्तकाला (स्त्री-पुरुष दोन्ही) नट मानून त्याने आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनयातून व्यक्त झालं पाहिजे, त्याने आपल्या अंग-उपांगांचा भावप्रदर्शनासाठी वापर केला पाहिजे, त्याने आपल्या नृत्यात एकल आणि संयुक्त हस्तमुद्रांचा वापर केला पाहिजे, तसंच त्याच्या सादरीकरणात नवरसांचा (भरतमुनींनी प्रत्यक्षात आठच रस सांगितले आहेत) परिपोष असला पाहिजे, असं म्हटलं आहे, भरतमुनींनी कुठल्याही प्रकारच्या नर्तनासाठी सांगितलेले हे निकषच, आजच्या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचे निकष आहेत. याच निकषांवर भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, कथकली, मणिपुरी आणि आसामचं सत्तारिया या आठ नृत्यशैलींची आज भारतीय शास्त्रीय नृत्यांत गणना केली जात आहे.

वैषयिक रंगभोग

…आणि हेच निकष लावायचे, तर महाराष्ट्राची लावणीदेखील बहुतांशी हे सगळेच निकष पूर्ण करते. तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्राची लावणी कुठेच मागे नाही. भावप्रदर्शनासाठी लावणीनर्तिका आपल्या अंगउपांगांचा वापर करते, त्याला लावणीच्या परिभाषेत ‘अदा’ म्हटलं जातं. शास्त्रीय नर्तनात चेह‍ऱ्यावरील भावाभिव्यक्तीला ‘अभिनय’ म्हणण्याची पद्धत आहे, लावणीपरंपरेत त्याला ‘भावकाम’ म्हणतात. गोल फिरण्याला कथकच्या शास्त्रीय परंपरेत चक्री म्हटलं जातं, तर लावणीवाले तिला ‘गिरकी’ म्हणतात. शास्त्रीय नृत्यात ज्याप्रमाणे तबला किंवा घटमवर तोडे वाजवून पदन्यासातलं कौशल्य दाखवलं जातं, त्याचप्रमाणे लावणीनृत्यात ढोलकीवर तोडे वाजवून नर्तकी आपलं पदन्यासकौशल्य दाखवते. एवढंच नव्हे, तर शास्त्रीय संगीताप्रमाणेच शास्त्रीय नृत्यात जसं धीम्या आणि जलद संगीतावर नृत्याचं सादरीकरण होतं, तसंच ते लावणीतही होतं. खडी म्हणजे, उभ्याने सादर केलेली लावणी ही गतिमान नृत्यासाठी प्रसिद्ध आहे, तर बैठकीची लावणी संथ लयीतील अदाकारी सादर करते. अगदी शास्त्रीय नृत्याप्रमाणेच लावणीत हस्तमुद्राही आहेत. फक्त या हस्तमुद्रांना आजवर नाव देण्याचा प्रयत्न झालेला नाही. तसंच शास्त्रीय नृत्यातून जसं विविध रसांचं दर्शन घडवलं जातं, तसंच ते लावणीतूनही घडतं. फक्त लावणीचा कल शृंगाररसाकडे अधिक आहे. कारण ती रसिकाश्रयी कला आहे. आणि खरं सांगायचं, तर आज ज्या नृत्यशैली ‘शास्त्रीय नृत्य’ या अभिधानाला पोचल्या आहेत, त्या सा‍ऱ्याच नृत्यशैलींचा गाभा हा मूलतः शृंगाररसाचाच होता. कारण या बहुतांशी नृत्यशैली मूळच्या देवदासी नृत्याचंच परिष्कृत रूप आहे. भारतातील देवदासीपरंपरा प्राचीन आहे. देवपत्नी म्हणून त्यांना जेव्हा रोज देवासमोर, त्याची झोपायची वेळ झाली की, रंगभोग सादर करावा लागायचा, तो रंगभोग वैषयिकच असायचा. आज जरी त्याला आध्यात्मिकतेचा आणि सात्त्विकतेचा मुलामा चढवण्यात आलेला असला, तरी देवदासींचं मूळ गाणं आणि नृत्याचा आशय शृंगारिकच होता. त्याचे अनेक दाखले आजही दक्षिणेतील मूळ परंपरेत सापडतात.

शृंगारिक लावण्यांची परंपरा

महाराष्ट्रातला त्याचा एक उत्तम दाखला म्हणजे, नवरात्रीत आजही जेजुरीच्या कडेपठारावर (गडावर नव्हे), जिथे खंडोबाचं मूळ ठाणं आहे; तिथे लावणीपरंपरा जपणा‍ऱ्या कलावंत महिला जातात आणि त्याला पारंपरिक शृंगारिक लावण्या ऐकवतात. मुख्य म्हणजे, दक्षिणेकडे किंवा भारतात सर्वत्रच देवासमोर सादर होणारा रंगभोग कला म्हणूनच नावाजला गेला आणि रक्षिलाही गेला. पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र त्याला अश्लील ठरवून तो त्यागला गेला. परिणामी देवदासींचंच नृत्य पुढे शास्त्रीय म्हणून ओळखलं जायला लागलं, परंतु त्याचा शृंगाररसाचा आत्मा मात्र त्यातून काढून टाकण्यात आला. कारण तो शृंगार पांढरपेशा समाजाला मानवणारा नव्हता.

पांढरपेशांचा ताबा

हाच शृंगाररसाचा हरवलेला आत्मा लावणीला बाधक ठरू शकतो. शास्त्रीय नृत्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्वच निकषांवर लावणी कदाचित पात्र ठरेल. परंतु तिचा थेटपणा मात्र संगीत नाटक अकादमीच्या समितीवर बसलेल्यांना मान्य होणार नाही. कारण आजवर ज्या कलांना शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळालेली आहे, त्यातून प्रामुख्याने शृंगार रस वगळण्यात आलेला होता आणि आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे- हा शृंगार पांढरपेशा समाजाला मानवणारा नाही. यासंदर्भातला प्रसिद्ध नर्तिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणीदेवी अरुंडेल व जागतिक ख्यातीच्या भरतनाट्यमनर्तिका टी. बालसरस्वती अम्मा यांच्यातील वाद नृत्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. टी. बालसरस्वती या देवदासी परंपरेतून आलेल्या प्रसिद्ध नर्तिका होत्या; तर ब्राह्मण समाजात जन्माला आलेल्या रुक्मिणीदेवींनी देवदासी परंपरेतून आलेल्या नर्तक-नर्तिकांकडूनच त्यांचं मूळ देवदासीआटम शिकून घेतलं. मात्र ते जेव्हा पांढरपेशा समाजात सादर करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी त्यातील शृंगाराचा त्याग केला आणि केवळ सात्त्विक भागच सादर केला. रुक्मिणीदेवींच्या या दुटप्पीपणावरच त्यावेळी टी. बालसरस्वती अम्मा यांनी कडाडून हल्ला चढवला होता.

खरंतर शृंगारिकतेमुळेच संपूर्ण भारतात देवदासींनी परंपरेने जपलेल्या नृत्यकलेला, एकोणिसाव्या शतकात इंग्रजी शिकून बाहेर पडलेल्या शिक्षित वर्गाने बदनाम करून दूर लोटलं. आणि कालांतराने या शिक्षित समाजातील मंडळींनीच या कला शिकून त्यातला शृंगार त्यागून त्या पुन्हा लोकांसमोर आणल्या, हा एकप्रकारचा मोठा दांभिकपणाच म्हणायला हवा. आणि याच कारणासाठी महाराष्ट्रातील लावणीही एवढी वर्षं मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिली. अर्थात लावणीला शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळावी म्हणून महाराष्ट्रातून आजवर रीतसर प्रयत्न झालेले नाहीत. तसंच कला म्हणून शास्त्रीय नृत्याच्या रूपबंधात लावणीला बांधण्याचा प्रयत्नही कुणी केलेला नाही. तसा प्रयत्न झालाच, तर लावणीपुढेही पुन्हा शृंगारीकतेचं काय करायचं, हा प्रश्न उभा राहू शकतो. कारण याच कारणासाठी आंध्रप्रदेशातील विलासिनीनाट्यम या देवदासींच्या नृत्यावरही ते प्राचीन असतानाही अद्याप ‘शास्त्रीय नृत्य’ म्हणून मोहोर उमटलेली नाही.

कोलाटी आणि देवदासी समाजाची नाममुद्रा

तसंच दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर कुणी लावणीला शास्त्रीय नृत्याच्या कसोटीत बांधण्याचा प्रयत्न केला, तर ही लावणी कला आजवर ज्या समाजाने जपली, तो कोल्हाटी समाज याला मान्यता देणार का? कारण आजही तमाशा किंवा लावणी हाच या समाजाचा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जर यदाकदाचित लावणीला शास्त्रीय नृत्याचा दर्जा मिळालाच, तर त्यावरची कोल्हाटी समाजाची नाममुद्रा पुसली जाण्याचा धोकाही आहेच. देवदासींनी जपलेल्या नृत्यकलेचं आजवर तसंच झालंय. प्रांतोप्रांतीच्या देवदासींच्या नृत्यातूनच सगळ्या शास्त्रीय नृत्यकलांचा उगम झाला, मात्र त्यावरची देवदासींची नाममुद्रा सगळ्यांनीच पुसून टाकली. जणू काही या कला थेट आकाशातूनच टपकल्या.

प्रत्यक्षात भारताच्या सगळ्याच कलांच्या मुळांशी उच्चभ्रूंनी नाकारलेल्या समाजाच्या व्यथा-वेदना आहेत. या दलित समूहांनी आपल्या व्यथा-वेदना आंजारल्या-गोंजारल्या आणि आपल्या नाच-गाण्यांतून त्यावर फुंकर घातली. मात्र आज तेच नाच-गाणं आपल्या नावावर मिरवण्याची स्पर्धा तथाकथित पांढरपेशा समाजात सुरू आहे. लावणीबाबतही आज हेच म्हणता येईल. ती कोल्हाटी आणि इतर भटक्या समूहांच्या हातातून निसटत चालली आहे. त्यांनी आपला आब राखून, आपली प्रतिष्ठा राखून ही कला जपली पाहिजे. कारण त्यांच्या या लावणीनृत्यात महाराष्ट्राची ‘कला’ म्हणून प्रतिनिधित्व करण्याची कलात्मकता-गुणवत्ता आणि क्षमता निश्चित आहे!

शासनदरबारी कलाधोरणाचा अभाव

… मात्र त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आश्वासक साथीचीही गरज आहे. परंतु महाराष्ट्र शासनाकडे असं कुठलंच कलाधोरण सध्या तरी नाहीय. संशोधक-लेखक आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्याचं कलाधोरण दिल्याला तब्बल आठ-दहा वर्षं उलटून गेलीत, तरी अद्याप ते अस्तित्वात आलेलं नाही. त्यातही संगीत-चित्रकला-हस्तकला यांसारखे विषय पूर्वी किमान शालेय पातळीवर शिकवले जायचे. पण तेव्हाही नृत्यकला वंचितच होती. आजही शासनाला नृत्यकलेसंदर्भात किती आस्था आहे कुणास ठाऊक? शासनाच्या या अनास्थेमुळेच आजवर ‘महाराष्ट्राची कला’ आकाराला आलेली नाही.

मुकुंद कुळे, ज्येष्ठ पत्रकार, लोककला अभ्यासक आहेत.

‘मुक्त-संवाद’ मे-२०२१ अंकातून साभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: