बंडखोरांमुळे तृणमूलचे नुकसान किती?

बंडखोरांमुळे तृणमूलचे नुकसान किती?

गेल्या शनिवारी तृणमूल काँग्रेसमधील शक्तीशाली नेते समजले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशाला केंद्रीय गृहमंत्री

‘मध्य प्रदेश सरकार पाडण्यात मोदींचा हात’
‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा
‘शाहीन बाग’ला भाजपकडून कट्‌टर हिंदुत्वाचे प्रत्युत्तर

गेल्या शनिवारी तृणमूल काँग्रेसमधील शक्तीशाली नेते समजले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात एका प्रचारसभेत अधिकारी यांचा प्रवेश सोहळा धुमधडाक्यात पार पडला. अधिकारी यांनी तृणमूल पक्षाला रामराम ठोकल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले असे बोलले जात आहे.

अधिकारी यांच्या भाजपप्रवेशावर तृणमूलने लगेचच प्रतिक्रिया देत अशा पक्षांतरामुळे आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा, जनतेवर अवलंबून असलेला हा पक्ष आहे, नेते त्यांच्यामुळे तयार झाले आहेत. ममतादीदींवर लाखो पक्ष कार्यकर्त्यांचा, जनतेचा विश्वास आहे, असे मत व्यक्त केले गेले.

२०१६च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या सर्व २९४ जागांवर आपण उभे आहोत असे वक्तव्य नंदीग्राम येथे प्रचारसभेत केले होते. नंदीग्राम हा मतदारसंघ अधिकारी यांचा होता पण त्यावेळी आपण इथले उमेदवार आहोत हे सांगण्याचे धाडस अधिकारी दाखवू शकले नाहीत अशी एक प्रतिक्रिया तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अधिकारी यांच्या भाजपप्रवेशानंतर दिली. बॅनर्जी हे तृणमूलच्या ७ सदस्यीय कमिटीचे एक सदस्य आहेत. या समितीत एका आठवड्यापूर्वी अधिकारीही सामील होते.

बंगालमधील राजकीय विश्लेषक, सुवेंदू अधिकारी यांच्या भाजप प्रवेशावर गांभीर्याने मत व्यक्त करतात. सुवेंदू अधिकारी यांचा स्वतःचा एक मोठा मतदार अनेक जिल्ह्यांमध्ये तयार आहे. मुकूल रॉय व अधिकारी हे दोन नेते तृणूमूल काँग्रेसचे मोठा जनाधार असलेले नेते होते. त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे अन्य असंतुष्ट नेत्यांना ममतादिदींना आव्हान देणे शक्य झाले आहे. आता अधिकारी यांनी पक्ष सोडल्यानंतर तृणमूलमधल्या अनेक नेत्यांची भाजपप्रवेशाकडे रांग लागली आहेत.

त्यात कांताय येथील आमदार बनश्री मैती, मोतेंश्वरचे सैकत पांजा, कलनाचे बिश्वजीत कुंडू, गाजोलच्या दीपाली बिश्वास, बरद्वान पूर्वचे खासदार सुनील कुमार मंडल आदी नेत्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तृणमूलचे दोन अन्य आमदार, काँग्रेसचा एक आमदार, डाव्या पक्षांचे दोन, तृणमूलचा एक माजी खासदार व माजी मंत्री भाजपमध्ये सामील झाले आहेत. एवढेच नव्हे तर राज्यातील अनेक जिल्हापातळीवरचे नेते, पंचायत पातळीवरचे नेते, महापालिकेतील नेते भाजपकडे वळताना दिसत आहेत.

या संदर्भात रवींद्रभारती विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक सब्यसाची बसू रे चौधरी सांगतात, तृणमूलमधील सध्या सुरू असलेली बंडखोरी ही पक्षामध्ये खालून वर सुरू असलेली घुसळण आहे. अनेक नेत्यांना आपला जनमानसावर असलेला प्रभाव कमी पडत चालला आहे, असे जाणवत आहे. निवडणूक व्यूहरचनाकार  प्रशांत किशोर व त्यांच्या टीमने राज्यातील तृणमूल पक्षाची बलस्थाने, नेत्यांचा जनतेशी असलेला संपर्क, त्यांची कामे यावर आपला अहवाल पक्षाला सादर केल्यानंतर पक्षाने रचनात्मक बदल करण्यास सुरूवात केली. त्यानंतर असे पक्षांतर बघायला मिळत आले आहे. तृणमूलमधले जे काही नेते भाजपकडे जात आहेत, त्या सर्वांमुळे भाजपला केवळ फायदाच होईल असे काही म्हणता येत नाही. गेले वर्षभर अशी चर्चा होती की तृणमूल पक्ष आपल्या अनेक नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकांत तिकीटे देणार नाही. या भीतीपोटी असे पक्षांतर सुरू आहे.

तृणमूलचे जे काही नेते भाजपमध्ये गेले आहेत त्या नेत्यांचे राज्यातील काम व त्यांचे राजकारण याविषयी माहिती घेऊया..

सुनील मंडल

२०११च्या विधानसभा निवडणुकांत फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकीटावर सुनील मंडल निवडून आले होते पण २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यांना तृणमूलमध्ये आणण्याची जबाबदारी मुकुल रॉय यांची होती. २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकात सुनील मंडल तृणमूलच्या तिकीटावर निवडून आले होते. गेल्या वर्षीच्या अखेरीस ममता बॅनर्जी यांनी अनु.जातीजमाती, आदिवासी घटकावर काम करण्याचे जबाबदारी सुनील मंडल यांच्यावर टाकली होती. पण त्यांच्या कामावर नाखूष झाल्यानंतर त्यांना या कामातून मुक्त करण्यात आले. त्यामुळे काही महिने सुनील मंडल पक्ष कार्यक्रमात अभावाने दिसत आले.

दीपाली बिस्वास

मालदा जिल्ह्यातील गाजोल मतदारसंघातून २०१६मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या तिकीटावर दीपाली बिस्वास निवडून आल्या होत्या. पण लगेचच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यांच्या तृणमूल प्रवेशामागे सुवेंदू अधिकारी यांची मदत होती. त्यांचे पती रणजीत बिस्वास यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. पण पक्षाच्या पुनर्रचनेत रणजीत बिस्वास यांना माल्दा जिल्हा सरचिटणीसपद देण्यात आले, त्यामुळे ते नाराज झाले होते. खुद्ध सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये गेल्याने दीपाली यांच्याबद्दल पक्षातच संशय वाढला होता.

सैकत पांजा

पूर्व बरद्वान जिल्ह्यातील मोंतेश्वर मतदारसंघातून सैकत पांजा एका पोटनिवडणुकीत तृणमूलच्या तिकिटावर निवडून आले होते. सैकत पांजा यांना ही संधी मिळाली त्यांच्या वडिलांच्या निधनामुळे. या रिक्त जागेवर पक्ष कार्यकर्त्यांचा विरोध लक्षात घेऊनही तृणमूलच्या नेतृत्वाने सैकत यांना तिकीट दिले होते. आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या पाहून सैकत यांच्याविरोधात पक्ष कार्यकर्ते उभे राहिले आहेत. गेले काही महिने पांजा यांनीही पक्ष कार्यक्रमापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

बिस्वजीत कुंडू

२०११ कलना मतदारसंघातून कुंडू तृणमूलच्या तिकिटावर निवडून येत आहेत. पण आता त्यांना पक्षांतर्गत विरोध होत आहेत. कलनातील पंचायत समिती नेते प्रणव रॉय व कलना महापालिकेचे संचाल देव प्रसाद बाग यांनी कुंडू यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. कुंडू यांचा मतदारसंघातील प्रभावही ओसरत आहे आणि कूंडुही पक्षाच्या कार्यक्रमात सहसा सहभागी होताना दिसत नाहीत.

शिलभद्र दत्ता

मुकुल रॉय यांचे कट्टर समर्थक असलेले शिलभद्र दत्ता बराकपूर येथून निवडून आले आहेत. पण गेले वर्षभर त्यांनी पक्षापासून फारकत घेतलेली आहे. त्यांनी स्वतःच आपण तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते.

शुक्रा मुंडा

जलपायगुडी येथील नाग्राकटा मतदारसंघातील तृणमूलचे आमदार शुक्रा मुंडा यांच्या भाजपप्रवेशावर अनेकांना धक्का बसला. गेल्या आठवड्यापर्यंत ते पक्षासोबत काम करत होते. त्यांच्या कामाचे जाहीर कौतुक ममतादिदींनी केले होते. १४ डिसेंबरला अलिपूरदूर व जलपायगुडी जिल्ह्यात ममतादिदींच्या सार्वजनिक कार्यक्रमाला ते उपस्थितही होते. त्यांना काही दिवसांपूर्वी जलपायगुडी जिल्ह्याचे उपाध्यक्षही नेमले गेले होते.

बनश्री मैती

काँताय उत्तरेच्या बनश्री मैती २०११ पासून तृणमूलच्या आमदार आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्या पक्षाचे काम करत होत्या. पण नोव्हेंबरपासून त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्या पूर्वीपासून अधिकारी यांच्या निकटच्या समजल्या जात होत्या. गेल्या ७ डिसेंबरला ममतादिदी यांची प. मिदनापूर जिल्ह्यात एक सभा होती, या सभेला बनश्री मैती अनुपस्थित होत्या.

दाशरथ तिक्री

२०११च्या विधानसभा निवडणुकांत रेव्होल्यूशनरी पार्टीच्या तिकिटावर तिक्री निवडून आले होते. पण २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला व लोकसभा खासदार झाले. २०१९च्या निवडणुकांमध्ये मात्र तिक्री यांचा पराभव झाला. त्यांचा तृणमूलमध्ये चांगलाच प्रभाव होता. गेल्या शनिवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अलिपूरदूर येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली.

श्यामापदा मुखर्जी

२०११ ते २०१६ या काळात श्यामाम पदा मुखर्जी यांनी राज्यमंत्रिमंडळात काम केले होते पण २०१६च्या विधानसभा निवडणुकात त्यांचा पराभव झाला. पण त्यानंतर बिश्णूपूर महापालिकेचे संचालक त्यांनी भूषवले होते. त्यांचा पक्षातील प्रभावही कमी झाला. पण त्यांचा भाजप प्रवेश अनेक भाजप कार्यकर्त्यांना नाराज करणारा आहे. मुखर्जी यांच्या भ्रष्टाचार कारभारावर जिल्ह्यात भाजपने मोहीम उघडली होती आता त्यांना पक्षाने सामील केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा मोठा विरोध दिसून येत आहे.

मिहीर गोस्वामी

कुचबिहार दक्षिणचे तृणमूलचे आमदार मिहीर गोस्वामी यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये भाजप प्रवेश केला. पक्षपुनर्रचनेत गोस्वामी यांना फारसे स्थान नसल्यामुळे त्यांनी भाजपचा पर्याय निवडला. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे पण पक्ष कार्यक्रमात त्यांचा सहभाग अत्यल्प होता. प्रशांत किशोर यांच्या व्यूहरचनात्मक कार्यक्रमावरही गोस्वामी नाराज होते. ममतादिदींनीही गोस्वामी यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला नाही.

स्निग्नेंधू भट्टाचार्य, हे कोलकातास्थित पत्रकार व लेखक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0