अधिवेशनात २४ विधेयके मंजूर

अधिवेशनात २४ विधेयके मंजूर

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात २४ विधेयके संमत करण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक अशा शक्ती विधेयकाचा समावेश आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार

२० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान
अजित पवार यांना क्लीन चीट
देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहीलः अजित पवार

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात २४ विधेयके संमत करण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक अशा शक्ती विधेयकाचा समावेश आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.

पवार म्हणाले, हिवाळी अधिवेशनात एकूण २४ विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. तीन विधेयके मागे घेण्यात आली. या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली सगळीच विधेयके महत्त्वाची होती. या विधेयकांपैकी शक्ती विधेयक हे ऐतिहासिक म्हणावं लागेल. या कायद्यामुळे राज्यातील माता-भगिनींची तसेच लहान मुलांची सुरक्षितता आपण निश्चित केली आहे. राज्यातल्या महिलाशक्तीला बळ देत असताना, पुरुष वर्गावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याचा समतोल साधण्याचा प्रयत्न आपण शक्ती विधेयकात केला आहे, असे पवार यांनी सांगितले.

अधिवेशनात तीन कृषी विधेयके एकमताने मागे घेण्यात आली. अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचे विधेयक देखील महत्त्वपूर्ण आहे. अधिवेशनात ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये, असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तशी शिफारस निवडणूक आयोगाला करण्यात येत आहे. ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षण निश्चितीसाठी, महत्त्वाचा असलेला इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी, पुरवणी मागण्यांद्वारे ४३५ कोटी रुपये मंजूर केले, असे पवार यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांचे, तुळापूर येथील स्मृतीस्थळ, वढू बुद्रुक येथील स्मारक आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे. स्मारक परिसराच्या विकासासाठी १५० कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं खर्च करणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचाही विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या निधी वाटपात अन्याय केलेला नाही. वैधानिक मंडळाच्या निकषानुसारच निधीचे वितरण झाले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पिक विम्याला पर्याय शोधण्यात येत आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

गेल्या सहा दिवसांत, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या तिपटीनं वाढली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची भीती, आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याकडेही सर्वांनी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. राज्यात आणि देशात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0