कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख

कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख

राष्ट्रपती भले गुन्हेगार असो, भले क्रिमिनल आणि अमानुष असो, भले राज्यघटना धुडकावणारा असो, आम्ही त्यालाच मत देणार असं ४६ टक्के अमेरिकन अजूनही म्हणत आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना फोन केला. त्यांना विनंती केली की जो बायडन यांचा मुलगा युक्रेनमधे सक्रीय असणाऱ्या एका कंपनीत संचालक होता हे प्रकरण उकरून काढा, त्याची माहिती मला द्या. त्या बाबत जुलियानी हे माझे वकील आणि अटर्नी जनरल बार  तुमच्याशी संपर्क साधतील. ही विनंती करण्याच्या आधी अमेरिकेनं देऊ केलेली ४० कोटी डॉलरची मदत अमेरिकेनं रोखून ठेवली होती, ती पुन्हा सुरु केली.

जो बायडन हे ट्रंप यांचे येत्या निवडणुकीतले संभाव्य प्रतिस्पर्धी आहेत, ओबामा यांच्या काळात आठ वर्षं ते उपाध्यक्ष होते. बायडन यांना हरवण्यासाठी त्याना बदनाम करू शकणारी माहिती-चिखल- गोळा करण्यासाठी आपला खाजगी वकील आणि सरकारी वकीलाला ट्रंप यांनी भरीस घातलं, मदत द्यायची व त्या बदल्यात चिखल मिळवायचा असा प्रयत्न ट्रंप यांनी केला. अमेरिकन राज्यघटनेनुसार निवडणुकीसाठी परदेशांचा वापर करणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. २०१६ च्या निवडणुकीत ट्रंप यांनी रशियाकडून मिळवलेला चिखल प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यावर भिरकावला होता आणि त्या प्रकरणाची चौकशीही झाली.

ट्रंप यांचं वागणं कायद्याचं, राज्यघटनेचं उल्लंघन करणारं आहे असं ठरवून त्यांची इंपीचमेंट करण्याची प्रक्रिया अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहानं सुरु केली आहे.

तरीही ४६  टक्के मतदार ट्रंप यांच्या बाजूनं  आहेत. २०१६ च्या निवडणुकीत ट्रंप यांचे स्त्री विषयक विचार गलिच्छ आहेत,  ट्रंप राज्यघटनेला फाट्यावर मारतात हे सिद्ध झालं होतं. तरीही ट्रंप यांना ४६.१ टक्के लोकांनी मतं दिली होती. राष्ट्रपती भले गुन्हेगार असो, भले क्रिमिनल आणि अमानुष असो, भले राज्यघटना धुडकावणारा असो, आम्ही त्यालाच मत देणार असं ४६ टक्के अमेरिकन अजूनही म्हणत आहेत.

कोण आहेत ट्रंप यांचे मतदार?

एका गटात आहेत कॉलेजचं शिक्षण न घेतलेले, कामगार या वर्गात मोडणारे गोरे नागरीक. त्यातही तरूण बरेच आहेत. या लोकांना शिकायचं नाही, आपली कार्यक्षमता वाढवून स्वतःचा विकास करायचा नाही असा आरोप या लोकांवर आहे. आशियाआफ्रिकेतले लोक भरपूर शिकतात, भरपूर पैसे मिळवतात, आपल्या नोकऱ्या घेतात, श्रीमंत होतात असं या गोऱ्या लोकांचं मत आहे. म्हणूनच या लोकांचा आफ्रोआशियाई, काळे, मेक्सिकन लोकांवर राग आहे.

एक गट आहे बंदुकप्रेमींचा. अमेरिकेची लोकसंख्या आहे ३२ कोटी. अमेरिकेत वापरात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांची संख्या आहे ३९ कोटी. ३५ ते ४२ टक्के कुटुंबांत किमान एक तरी बंदुक आहे. २०१७ साली ४० हजार माणसं बंदुकीच्या गोळ्यांचा बळी झाली. ह्यूस्टनमधे शीख डेप्युटी शेरीफ संदीप धालिवाल यांचा खून एका चक्रम गोऱ्या बंदुकधाऱ्यानं केलाय. बंदुकधारी लोकांमधे ४१ टक्के लोकं रीपब्लिकन पक्षाचे (म्हणजे ट्रंप यांच्या पक्षाचे) आहेत आणि ४७ टक्के गोरे आहेत. काही काळ्यांकडंही बंदुका असतात आणि काही डेमॉक्रॅट्सकडंही बंदुका असतात. परंतू बंदुका असणाऱ्या लोकांच्यात बहुसंख्य गोरे आणि रीपब्लिकन असतात. त्यांची एक संघटनाही आहे. दर वर्षी शाळातली मुलं मारली जातात, सार्वजनिक ठिकाणी जमलेली माणसं मारली जातात. मग ओरड होते, बंदुकांवर बंदी घाला अशी मागणी होते. बंदुक संघटनेची लोकं आवाज उठवतात. बंदुक हा आपला मूलभूत अधिकार आहे,  स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकाकडं बंदुक असायलाच पाहिजे असं ते ठासून सांगतात. नागरिकाचा जीव सरकार वाचवू शकत नाही याची कबूलीच ते देत असतात. जगात इतर प्रगत देशांत आणि अप्रगत देशांत लोकांकडं बंदुका नसतात, तिथं गोळ्या घालून खून होण्याचं प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत कायच्या कायच कमी आहे. जग म्हणतं की अमेरिकन लोकं जंगली आहेत. तरीही बंदुकवाले बधत नाहीत. त्यांचा ट्रंपना कडक पाठिंबा.

कर असू नयेत, सरकारनं समाजासाठी पैसा खर्च करू नये, गरीबांसाठी वगैरे अजिबात पैसा खर्च करू नये, ज्यानं त्यानं स्वतःचं भलं पहावं असं मानणाऱ्यांचा मोठ्ठा वर्ग अमेरिकेत आहे. या वर्गातही बहुतेक गोरी   सुस्थीत मंडळी आहेत. त्यांच्यात अनेकांच्याकडं खूप   जमीन  व प्रॉपर्टी असते आणि त्यांना शिकार करायला आवडतं. प्रत्येक अमेरिकन माणसाकडं आरोग्य विमा असायला हवा आणि त्याची सोय अमेरिकन सरकारनं करावी या प्रस्तावाला या लोकांचा कडकडीत विरोध असतो. समाजात  विषमता असेल, गरीबी असेल तर गरीबांनीच आपलं आपण पाहून घ्यावं, सरकारनं त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे समाजवाद असं फार अमेरिकन लोकांना वाटतं. समाजवाद ही अमेरिकन समाजात शिवी मानली जाते. या मंडळींचा ट्रंप यांना भक्कम पाठिंबा असतो.

या सर्वांत मिळून मिसळून किंवा स्वतंत्रणे ख्रिस्ती लोकांचा एक गट असतो. कर्मठ कॅथलिक ख्रिस्ती. त्यांचा गर्भपाताला विरोध असतो. स्त्रीला गर्भपात करवून घेण्यात आनंद नसतो, अनेक वेळा फार कठीण स्थितीत त्याना गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागतो. अनेक वेळा गर्भपाताची वेळ बेजबाबदार पुरुषांमुळंही येत असते. तेव्हां परिस्थिती पाहून गर्भपाताला परवानगी द्यावी, तशी सोय अधिकृतरीत्या करावी असं समाज मानतो, जगभर. परंतू अमेरिकेतले  कर्मठ ख्रिस्ती सरसकट गर्भपाताला विरोध करतात. कॅथलिकांमधे कर्मठ नसणारी मंडळीही आहेत, ती काळानुसार बदलायला तयार आहेत. परंतू त्यांची संख्या म्हणावी तेवढी दिसत नाही. मुख्य म्हणजे कॅथलिकांमधे आता राजकीय कॅथलिक तयार झाले आहेत आणि त्यांना धर्मापेक्षा धर्माचं राजकारण करायचं असतं. त्या कॅथलिकांचा गर्भपाताला कडकडीत आणि हिंसक विरोध आहे. भारतात राजकीय हिंदू आहेत, त्यांचेच हे जत्रेत हरवलेले बंधू. यांचा ट्रंपांना पाठिंबा असतो.

राजकारणाच्या हिशोबात ही मंडळी रीपब्लिकन असतात. रीपब्लिकन म्हणजे  सनातनी, कंझर्वेटिव. साधारणपणे मुक्त अर्थव्यवस्था त्यांना हवी असते, सरकारी हस्तक्षेप त्याना मंजूर नसतो. पण या बरोबरच ही माणसं शक्यतो एकादी गोष्ट बिघडत नाही तोवर ती दुरुस्त करायची नाही या विचाराची असतात.  समाजाची घडी विस्कटायची नाही असं या लोकांना वाटतं. सामान्यतः ही माणसं अतिरेकी नसतात.  भारतात पापभिरू नावाचा एक वर्ग असतो. ही माणसं कर्मठ नसतात, प्रतिगामी नसतात, पुरोगामीही नसतात. ही माणसं सामान्यतः चाकोरीत रहाणं पत्करतात. तर अशा या कंझर्वेटिव लोकांचा ट्रंप यांना विरोध असायला हवा कारण ट्रंप सगळंच विस्कटायला निघाले आहेत. परंतू ट्रंप यांच्या धटिंगणगिरीला पुरून उरणारं कोणी त्यांच्या पक्षात नाही आणि डेमॉक्रॅटिक पक्षाबद्दल असणारा राग या दोन कारणांनी ही माणसं ट्रंप यांना सहन करत आहेत.

या सगळ्या मंडळींना आंतरराष्ट्रीय घटना, कायदा, राज्यघटना इत्यादीत रस नसतो. यातले अनेकानेक लोक कधीही अमेरिका सोडून बाहेर पडलेले नाहीत. भारतात हत्ती आणि गेंडे रस्त्यावर फिरत असतात, सापांचा सुळसुळाट असतो असं त्यांना वाटतं. शिख माणूस मुसलमान असतो असं याच नव्हे तर बहुतांश अमेरिकनाना वाटतं. ट्रंप आपल्या गटाचे आहेत येवढ्या एकाच गोष्टीसाठी ते ट्रंपना पाठिंबा देतात.

संसदेनं ट्रंपची इंपीचमेंट करणं म्हणजे काय हे त्यांना कळत नाही. इंपीचमेंट हा राजकीय डाव आहे, विरोधक ट्रंप यांना बदनाम करू पहात आहेत असं त्याना वाटतं. सामान्यतः या माणसांचं वागणं भक्तासारखं असतं, ही माणसं वर्तमानपत्रं वाचत नाहीत. भडक मजकूर देणारी पत्रं आणि वाहिन्या हेच त्यांच्या ज्ञानाचे आणि माहितीचे स्त्रोत असतात. अमेरिकेत जी काही आर्थिक स्थिरता आहे ती ट्रंप यांच्यामुळंच आहे असं त्याना वाटतं. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे, अमेरिकेचं इन्फ्रा स्ट्रक्चर मजबूत आहे यामुळंही अर्थव्यवस्था ठीक चाललीय हे त्यांच्या लक्षात येत नाही.

नाना छटांच्या या माणसांमधल्या प्रत्येक अवगुणाला ट्रंप प्रतिसाद देत असल्यानं त्या एकाच धाग्यानं ही माणसं एकत्र बांधली जातात आणि ट्रंपना मतदान करतात, अजूनही करणार आहेत.

काळे, आशियाई, मुस्लीम, मेक्सिकन, गोरे गरीब इत्यादी माणसांना बांधून ठेवणारं सूत्र आज अमेरिकन राजकारणात नाही. डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स गरीबी-विषमता-वंशद्वेष यांच्या विरोधात आवाज उठवतात. पण त्यांच्याच पक्षातले कित्येक लोक बंदुक गटात सामिल असतात. अमेरिकन निवडणुका फार महाग झाल्यात. फार पैसे लागतात. अमेरिकेतल्या श्रीमंतांकडून, कॉर्पोरेट्सकडून ते पैसे येतात. पैशाच्या दबावामुळं सँडर्ससारखे उमेदवार प्रचारात मागं पडतात. आपले रंग, मूळ देश, आपली आर्थिक स्थिती, आपले धर्म वेगळे असले तरी अमेरिकन नागरीक या नात्यानं आपले प्रश्न सारखेच आहेत ही गोष्ट लोकांना पटवण्यात डेमॉक्रॅटिक पक्षाला यश आलेलं नाही. शेवटी डेमॉक्रॅटिक पक्षातली गोरीच मंडळी आहेत, गोऱ्यामधल्या वंशद्वेषाची-परद्वेषाची एक पुसटशी छटा त्यांच्यातही असते. लोकांना जोडणारे आर्थिक-सामाजिक मुद्दे डेमॉक्रॅटिक पक्षाजवळ नाहीत. ओबामांनी धर्म, वंश, वर्ग या पलिकडं जाऊन सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र आणलं होतं. ती एक अभूतपूर्व घटना होती.  बहुदा ओबामाना निवडलं ही आपली चूकच झाली असं अमेरिकन लोकांना वाटलं, त्यांनी ट्रंपांना मतं दिली.

अमेरिका अमेरिका राहिलेली नाही. ती बदलू घातलीय. गोऱ्या कर्मठ कॅथलिकांचा देश असं अमेरिकेचं रूप आता राहिलेलं नाहीये, पुढल्या काळात ते आणखीनच बदलणार आहे. अमेरिका संक्रमण काळात आहे. ट्रंप यांचा उदय आणि प्रभाव हा त्या संक्रमण काळातला एक महत्वाचा टप्पा आहे. अमेरिका भविष्यात कुठल्या दिशेनं जाणार हे ट्रंप यांच्या ईंपीचमेंटवर आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीवर अवलंबून असेल.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS