‘न भूतो…’ मॅग्नस कार्लसन!

‘न भूतो…’ मॅग्नस कार्लसन!

जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने नुकतेच आपण यापुढे जगज्जेतेपदाची स्पर्धा खेळणार नसल्याचा बुद्धिबळ विश्वाला धक्का देणारा निर्णय जाहीर केला. आपल्या निर्णयाबद्दल मॅग्नस म्हणाला की, “आता मला यात काही आनंद मिळत नाही, पाच वेळा जेतेपद मिळवून मी सर्व काही मिळवले आहे, पैसा, प्रतिष्ठा, ओळख, असंख्य चाहते, याशिवाय अनेक गोष्टींची दारं माझ्यासाठी खुली झाली आहेत. याहून जास्त मला काही नको आहे. उगीच खेळायचे म्हणून खेळत राहण्यात मला रस नाही!”

२० जुलैला, जागतिक बुद्धिबळ दिनाच्या निमित्ताने, मॅग्नस कार्लसनने जाहीर केले की तो पुढील विजेतेपद स्पर्धा खेळणार नाही, त्याने विजेतेपदावरील हक्क सोडून दिला आहे!

बुद्धिबळ विश्वात एकच खळबळ उडाली. मॅग्नसचे अनेक चाहते दुखावले गेले, त्याला शिव्याशाप देण्यापर्यंत काहींची मजल गेली, जे साहजिक होतं. लोक भावनेच्या आहारी गेले की असे प्रकार होतात.

नामवंत बुद्धिबळपटूंचीही मते अजमावली गेली त्यातल्या काहींना किंचित आश्चर्य वाटले होते काहींना धक्का बसला होता! कँडिडेट्स स्पर्धेचा विजेता यान नेपोनियाची अर्थात थोडा निराश झाला होता कारण २०२१ मधल्या पराभवाचा बदला घेण्याची त्याची संधी हिरावली गेली याचे त्याला वाईट वाटत होते. कँडिडेट्स मध्ये दुसरा आलेला चीनचा डिंग लिरेन आश्चर्यचकित झाला होता, परंतु त्याला जेतेपदाच्या संधीच्या शक्यतेने आनंदही झाला होता कारण आता सामना नेपो आणि डिंग या दोघात खेळवला जाईल. ‘आता तरी इतर खेळाडूंना संधी मिळेल’ अशी वेस्ली सो ची प्रतिक्रिया होती!

विविध प्रकारच्या गमतीशीर प्रतिक्रिया देखील उमटल्या! ही लिंक वाचून आणखी मनोरंजन होईल!

खेळाडू म्हणून मॅग्नसला समजून घेताना बुद्धिबळ सामन्यांची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे अत्यावश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला मॅग्नसच्या निर्णयामागच्या आयामांची कल्पना येणार नाही.

जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या सामन्यांचे दोन मुख्य कालखंड आहेत १८८६ ते १९४७ आणि १९४८ पासून पुढे.

१८८६ पासून ऑस्ट्रियन खेळाडू विल्हेल्म स्टेनिट्झ आणि पोलिश खेळाडू योहानेस झुकरटॉर्ट या दोघांचे म्हणणे होते, की मीच सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. दोघात सामना झाला आणि स्टेनिट्झ जिंकला. त्यावेळी कोणतीही जागतिक संघटना हे सामने घेण्यासाठी अस्तित्वात नव्हती. विजेत्याला वाटेल त्याला तो आव्हान देई किंवा ज्या कोणा खेळाडूला आपण चांगले खेळाडू आहोत असे वाटे तो विजेत्याला आव्हान देई आणि खाजगीरीतीने सामन्यासाठी लागणारे भांडवल, सर्व व्यवस्था खेळाडूंनाच उभारावी लागे. तर अशा रीतीने चाललेल्या या स्पर्धांचे विजेतेपद १८९४ साली जर्मन खेळाडू इमॅन्युएल लास्करने स्टेनिट्झकडून हिरावून घेतले आणि तिथपासून ते १९२१पर्यंत तब्बल २७ वर्षे तो जगज्जेता होता. अर्थात वर सांगितल्याप्रमाणे कोणतेही नियम वगैरे आखीव-रेखीव नसताना खाजगी कॉन्ट्रॅक्ट करून त्याप्रमाणे वाटेल तशा स्पर्धा घेऊन किंवा खेळण्याचे नाकारून हे चाललेले होते. परंतु तरीदेखील लास्करचा खेळाचा दर्जा अतिउच्च होता यात शंकाच नाही. (जाता जाता – लास्कर हा महान गणिततज्ज्ञ देखील होता. गणितात त्याने डॉक्टरेट मिळवली होती. त्याच्या दोन प्रबंधांवर आधारित मूलभूत संशोधन देखील झालेले आहे!)

१९२१ ते १९२७ असा क्युबन खेळाडू होजे कापाब्लांका विजेता होता त्याने लास्करला पराभूत केले होते. डावाच्या अंतिम टप्प्यात विलक्षण खेळ करणारा आणि अतिशय जलद खेळणारा म्हणू कापाब्लांका प्रसिद्ध होता. त्याच्या खेळाचा प्रभाव बॉबी फिशर आणि अनातोली कार्पोववर सुद्धा होता!

रशियन/फ्रेंच खेळाडू अलेक्झांडर आलेखाइनने (काही काळ तो फ्रान्सकडूनही खेळला) १९२७ साली जेतेपद पटकावले आणि तिथपासून १९४६ ला त्याचे निधन होईपर्यंत, १९३५ ते ३७ चा अपवाद वगळता, तो जगज्जेता होता. मधली दोन वर्षे डच खेळाडू मॅक्स युवे हा विजेता होता. एकूण काय तर या सगळ्या प्रकारची काही नीट व्यवस्था नव्हती. असो.

१९४८ साली फिडेची (जागतिक बुद्धिबळ महासंघ) स्थापना झाली आणि एकप्रकारे नया दौर सुरु झाला! एकामागून एक फक्त रशियन खेळाडूंची फौजच या सामन्यात दिसू लागली जेतेही तेच आणि आव्हान देणारेही तेच. मिखाईल बॉटविनिक, वासिली स्मिस्लॉव्ह, मिखाईल ताल, टायग्रान पेट्रोशिअन, बोरिस स्पास्की असे एकसे बढकर एक अतिरथी महारथी विजेतेपद मिळवत होते आणि एकूण बुद्धिबळ जगतावरची रशियाची मजबूत पकड आणखी घट्ट करत होते.

दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा कालखंड अमेरिका-रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाचा होता त्यामुळे राजकीय पटलावरती अतिशय तणावपूर्ण आणि संवेदनशील वातावरण होते. त्याचा प्रभाव जीवनातल्या सर्वच क्षेत्रांवर पडलेला होता आणि बुद्धिबळही त्याला अपवाद नव्हते. कँडिडेट्स सामने भरवणे आणि त्यातून आवाहन वीराची निवड ही प्रक्रिया फिडे पार पडत होती. यात छुपे डावपेच खेळले जात होते, अशी अनेक खेळाडूंची तक्रार होती. जसे की ठरवून बरोबरी करणे किंवा डाव हरणे जेणेकरून अंतिम सामन्यात दोन रशियन खेळाडूच येतील असे पहाणे (आजच्या भाषेत मॅच फिक्सिंग सारखा प्रकार). हे सगळे सामने बरेचदा फक्त मॉस्कोतच खेळले जात असल्याने या समजाला बळकटी मिळेल अशा अनेक घटना, निरीक्षणं खेळाडूंनी नोंदलेल्या आहेत. (आजही कास्पारोव्ह फिडेविरुद्ध अतिशय तीव्र मते बाळगून आहे. ‘रशियन गुप्तहेरयंत्रणेचे एक एक्सटेंशन म्हणजे फिडे’ असे त्याचे मत आहे! अर्थात यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी त्यावरून फिडेविरुद्धची नाराजी आणि त्यातला रशियन यंत्रणेचा हस्तक्षेप लक्षात येऊ शकतो.)

अशा सगळ्या अस्थिर परिस्थितीत १९६०-६५ च्या आसपास बॉबी फिशरचा उदय हा अमेरिकेसाठी एकप्रकारे रशियाला नमवण्याचे हत्यार सापडल्यासारखा झाला. फिशरला कँडिडेट्समध्ये खेळण्यापासून रोखण्याचे बरेच प्रयत्न रशियाकडून झाले. शेवटी १९७१मध्ये त्याने मार्क तैमानोव्ह या रशियन आणि बेन्ट लार्सन या डॅनिश खेळाडूंना प्रत्येकी ६-० असे चक्क धुवून काढले आणि तो १९७२च्या विजेतेपद स्पर्धेसाठी पात्र ठरला! (अशाप्रकारे प्रतिस्पर्ध्यांना सगळे डाव जिंकून पराभूत करण्याचा फिशरचा विक्रम अबाधित आहे आणि बहुदा तसाच राहील). फिशरच्या विजयाबद्दल त्याचे कौतुक करणारे पत्र चक्क अमेरिकन अध्यक्ष निक्सन यांनी लिहिले होते आणि त्याला जागतिक विजेतेपदासाठीच्या सामन्यात भाग घेण्यासाठी पाठिंबाही दिला होता. यावरून या सगळ्या प्रकरणातल्या राजकीय पातळीवरच्या संवेदनशीलतेची कल्पना येऊ शकेल. फिशरच्या अचाट पराक्रमाने रशियन यंत्रणा चक्रावून गेली की इतकं जबर आवाहन देणारा बॉबी फिशर आहे तरी कोण?

‘आयर्न टायग्रान’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या पेट्रोशियनला हरवून १९६९ पासून बोरिस स्पास्की त्यावेळी जेतेपदाचा मुकुट मिरवत होता. तशात फिशरने सामन्यासंदर्भात अटी घालायला सुरुवात केली. स्पर्धा मॉस्कोतच नव्हे तर रशियातच होणार नाही, या फिशरच्या पहिल्या अटीने रशियन यंत्रणेला दणका दिला. स्पर्धा अमेरिकेतही नको असे म्हणून त्याने आइसलँड या (शीतयुद्ध) तटस्थ (न्यूट्रल) देशाचा पर्याय दिला. हो ना करता शेवटी तो पर्याय मान्य झाला.

१९७२ रेकजाविक, आइसलॅंड. फिशर-स्पास्की जगज्जेतेपदाचा सामना, हा बुद्धिबळाच्या इतिहासातला मैलाचा दगड आहे. अनेक अर्थाने या सामन्याची महती जगभरात आहे. बरंच काही याबद्दल लिहिलं गेलं आहे, पुस्तकं देखील निघाली आहेत. पुष्कळ विवादास्पद आणि नाट्यपूर्ण प्रसंगांनंतर (त्यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल इतके प्रकार झाले) एकदाची ती स्पर्धा झाली आणि बॉबी फिशर जगज्जेता झाला ! रशियाबाहेर जेतेपद नेणारा पहिलाच अमेरिकन खेळाडू म्हणून फिशरचे नाव रातोरात जगभरात दुमदुमले! ‘टाइम’ मासिकाने त्याच्यावर अंक देखील काढला होता.

योगायोग म्हणजे २०२२ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे या ऐतिहासिक सामन्याचे!

(बादवे चेस डॉट कॉम ने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या सामन्यातल्या सगळ्या डावांवरती एक मालिका सुरू केली आहे. जिज्ञासूंना तिथे डाव आणि त्याच्यावरचे तज्ज्ञांचे विश्लेषण आणि इतर ऐतिहासिक माहिती वाचायला मिळेल. छान माहिती आहे. कित्येक संदर्भ नव्याने समजतात. पहिल्या डावाचा दुवा क्लिक करा.

१९७२ मध्ये झालेला स्पास्कीचा पराभव हा १९४८ पासून असलेल्या रशियन बुद्धिबळ साम्राज्याला गेलेला पहिला तडा आणि हा त्यांना जिव्हारी लागला नसता तरच नवल!

१९७५ मध्ये फिशरने २४ डावांच्या विजेतेपद सामन्याला हरकत घेतली. त्याचे म्हणणे होते की पहिला डाव जिंकणारा खेळाडू पुढच्या डावात बरोबरी करत जाण्याचा कल ठेवतो आणि प्रतिस्पर्ध्याला सामना जिंकण्याची संधी मिळत नाही. त्यापेक्षा प्रथम दहा डाव जिंकणारा खेळाडू विजेता घोषित करावा आणि ९-९ अशी बरोबरी झाली तर मात्र आधीच विजेता कायम ठेवावा. याला फिडेने मान्यता दिली नाही त्यामुळे कँडिडेट स्पर्धेचा विजेता कार्पोव बरोबर खेळण्यास फिशरने नकार दिला. आता विजेतेपद कार्पोवकडे आले आणि पुन्हा एकदा कार्पोव, कास्पारोव्ह, व्लादिमिर क्रामनिक अशी रशियन जेत्यांची मालिका २००४ पर्यंत चालूच राहिली. १९९१ मध्ये सोविएत रशियाचे तुकडे होऊन त्यांचे साम्राज्य खिळखिळे झाले होते कँडिडेट्स सामने रशियाबाहेरही भरवले जात होते त्यामुळे फिक्सिंगचा प्रकार करायला यात फारसा वाव नव्हता त्यामुळे खऱ्या अर्थाने उत्तम खेळणारा खेळाडूच जिंकेल ही शक्यता जास्त होती.

१९७२ नंतर थेट २००७ साली भारताच्या विश्वनाथ (विशी) आनंदने पहिल्यांदा विजेतेपद रशियाबाहेर नेले ते सलग २०१३ पर्यंत (मध्ये एकदा २००० सालीही तो जिंकला होता). पाच वेळा जगज्जेता असलेला विशी आनंद हा पहिला भारतीय (आशियाई) खेळाडू. त्यानंतर त्याला २०१३ मध्ये चेन्नईमध्ये हरवून मॅग्नस या पदाचा दावेदार झाला तो २०२१ पर्यंत. पाच वेळा जिंकणारा तो पहिला नॉर्वेचा (युरोपियन) खेळाडू. अशा रीतीने रशियन पोलादी पकडीतून विजेतेपदाचा मुकुट इतकी वर्षे यशस्वीरीत्या बाहेर नेण्याचे काम करणारे विशी आणि मॅग्नस हे दोन मोठे खंदे वीर निघाले! इतर देशांचे खेळाडूही जिंकू शकतात, नव्हे ते कित्येक वर्षे जेतेपद उपभोगू शकतात हा आत्मविश्वास जगभरातल्या खेळाडूंमध्ये जागवण्याचे काम या दोघांनी केले यात शंका नाही! या अर्थाने त्या दोघांची लेगसी फार मोठी आहे. रशियासारखी शंभरेक वर्षांची खेळाची आणि खेळाडूंची परंपरा आणि सरकारी यंत्रणेचा भक्कम पाठिंबा हे दोन्ही नसताना या दोघांची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगीच आहे! आज भारतात दिसणारे अगदी लहान वयातले प्रज्ञानंद, निहाल सरीन, रौनक साधवानी, गुकेश, अर्जुन एरिगेसी सारखे ग्रॅण्डमास्टर्स किंवा इंटरनॅशनल मास्टर आर. वैशाली (ही प्रज्ञानंदाची बहीण आहे), किंवा जरा आधीच्या पिढीतील कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली अशा ग्रॅण्डमास्टर्सची फौज हे सगळे विश्वनाथन आनंदच्या अथक परिश्रमाचे फळ आहे हे निर्विवाद! वयाच्या ५३ व्या वर्षीदेखील विशी त्याच उत्साहाने खेळतो आहे, नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करतो आहे!

विषय मॅग्नसचा असताना हे काय भारूड लावलंय असं वाटू शकतं परंतु ही दीर्घ पार्श्वभूमी समजून घेतल्याखेरीज आपल्याला मॅग्नसच्या खेळाचे, त्याच्या मानसिकतेचे आणि त्यायोगे निर्णयाचे महत्त्व समजणे अवघड जाईल. आतापर्यंत झालेल्या खेळाडूंपैकी सर्वश्रेष्ठ कोण? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्यावर वितंडवाद घडतात. परंतु सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ कोण? असा प्रश्न जितका संयुक्तिक नाही तितकाच हादेखील नाही असे माझे मत आहे.

लास्करपासून कार्लसनपर्यत सगळे खेळाडू वेगवेगळ्या कालखंडात झालेले आहेत. खेळाचा विकास जसजसा होत गेला, त्यातल्या वेगवगेळ्या थिअरीज, ओपनिंग्ज, मिडल गेम, एन्ड गेम यातल्या शक्यता तपासून आणि आजमावून पहिल्या गेल्या तसतसा खेळाडूंच्या खेळात बदल होत गेला. पूर्वसूरींनी घातलेल्या पायाचा आणि उभारलेल्या मजल्यांच्या समावेश यात केल्याखेरीज हे काम पुढे जाऊ शकत नाही. १९९५ नंतर तर आंतरजालाच्या प्रसारामुळे, कंप्यूटर डेटा बेसमुळे आणि पीजीएन (पोर्टेबल गेम नोटेशन) मुळे प्रत्यक्ष पट समोर न घेता किंवा समोरासमोर न बसता जगभरातून कुठूनही खेळ खेळता येणे शक्य झाले. वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगेवगेळ्या स्पर्धातून खेळलेले डाव एकाच वेळी बघता येणे शक्य होत गेल्यामुळे खेळाच्या एकूण समजूतीतच आमूलाग्र फरक पडत गेला. त्यानुसार जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेसाठी करण्यात येणाऱ्या तयारीची काठिण्यपातळी वर्षागणिक भौमितीय प्रकाराने वाढत गेली. वेगवेगळी ओपनिंग्ज, त्या ओपनिंग्जमधली वेगवेगळी व्हेरिएशन्स, त्यातले काळ्या व पांढऱ्या बाजूकडून खेळले गेलेले डाव, त्यातली हरलेल्या, जिंकलेल्या आणि बरोबरीत सुटलेल्या डावांची टक्केवारी, यात विशिष्ट खेळाडूगणिक होत गेले सर्व बदल असा सगळा पसारा अवाढव्य होत गेला.

हे सोपे वाटावे अशी परिस्थिती चेस इंजिन्सच्या शोधानंतर उद्भवली! प्रत्येक खेळीनंतर त्या खेळीची प्रतवारी, चांगल्या प्रतिखेळ्या कोणत्या व का यांचे विश्लेषणही उपलब्ध होऊ लागले. इतकेच नव्हे तर ही खेळी किती वेळा, कोणीकोणी, कोणकोणत्या सामन्यात आणि कोणाविरुद्ध खेळली आहे? का अजिबात खेळली गेलेली नाही (नॉव्हेल्टी) याचाही डेटाबेस लगे हाथ मिळायला लागला!

असा सगळा जगड्व्याळ डेटा डोक्यात ठेवून खेळायला जाणे येरा गबाळ्याचे काम नोहे! त्यामुळे दर दोन वर्षांनी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धा खेळणे, किंवा जेते असाल तर वर्षभर इतर स्पर्धा खेळणे आणि जागतिक स्पर्धेआधी किमान तीन ते सहा महिने कसून तयारी करणे. ज्यात शारीरिक तंदुरुस्ती हा देखील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो ते सांभाळणे. यामध्ये पोहोणे, टेनिस, फुटबॉल इ. सारखे खेळ, वेट ट्रेनिंग यावरही भर दिला जातो. प्रत्यक्ष बुद्धिबळाच्या तयारीसाठी दोन-तीन प्रसंगी चार सेकंड्स म्हणून ओळखले जाणारे खेळाडू तुमच्या टीममध्ये बाळगावे लागतात. हे सगळे ग्रॅण्डमास्टर्स असतात आणि खेळाचा विशेष सखोल अभ्यास आणि त्याचे विश्लेषण हा त्यांचा कामाचा भाग असतो. एवढा सगळा जामानिमा करून खेळायला जायचे आणि प्रत्यक्ष खेळ सुरू झाल्यावर भर डावात १२-१५ खेळ्यांनंतर तुमच्या तयारीबाहेर तुम्हाला जावेच लागते आणि स्वत:चा खेळ खेळावाच लागतो! तिथे पुन्हा तुम्ही एकटेच असता! या सगळ्या चक्राचा ताण प्रचंड असतो, पणाला लागलेल्या गोष्टी खूप असतात (हाय स्टेक्स).

एका ठराविक संख्येने मिळवलेल्या विजेतेपदांनंतर त्यातली थ्रिल, किंवा भरभरून आनंद देण्याची शक्ती संपुष्टात येत जाते. (काहीसं ‘लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स’ सारखं).

मॅग्नस सारख्या निर्मितीक्षम आणि कायम ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करणाऱ्या खेळाडूसाठी हे किती अवघड असेल याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी तो ५० तुकड्यांचे कोडे स्वतःहून कोणाच्याही मदतीशिवाय सोडवू शके, वयाच्या चौथ्या वर्षी तो टीनएजर मुलांसाठी असलेले लेगोज जोडू शकायचा. पाचव्या वर्षी त्याची संपूर्ण नॉर्वेच्या म्युनिसिपालिटीची टेलिफोन डिरेक्टरी पाठ होती. २०० देश, त्यांचे ध्वज, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या त्याला तोंडपाठ होती. अशा विलक्षण बुद्धिमान खेळाडूच्या मेंदूवर किती ताण असेल!

त्याच्या अफलातून स्मरण शक्तीची एक चुणूक दाखवणारा व्हिडीओ पाहा. ग्रँडमास्टर डेव्हिड हॉवेल मॅग्नसला पटावरती काही पोझिशन्स मांडून दाखवतो आणि त्याला ती कोणाच्या डावातल्या आहेत हे विचारतो. नुसते डावच नाही तर त्यातली नंतरची खेळी काय होती, कोण जिंकलं, त्याच्या आजूबाजूच्या किती गोष्टी त्याला लक्षात आहेत हे बघून आपण थक्क होतो! जरूर बघा.

जगज्जेतेपदाची स्पर्धा न खेळण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना मॅग्नस म्हणाला की, “आता मला यात काही आनंद मिळत नाही, पाच वेळा जेतेपद मिळवून मी सर्वकाही मिळवले आहे, पैसा, प्रतिष्ठा, ओळख, असंख्य चाहते, याशिवाय अनेक गोष्टींची दारं माझ्यासाठी खुली झाली आहेत. याहून जास्त मला काही नको आहे. उगीच खेळायचे म्हणून खेळत राहण्यात मला रस नाही!” तो व्यावसायिक खेळातून निवृत्त झालेला नाही फक्त जगज्जेतेपदाच्या स्पर्धेतून त्याने अंग काढून घेतले आहे.

आपल्या नेहेमीच्या नर्म विनोदी शैलीत त्याच्या मताला दुजोरा देताना विशी म्हणाला, “सुरुवातीला मला थोडं आश्चर्य वाटलं मॅग्नसच्या निर्णयाचं, पण मी पूर्णपणे समजू शकतो कारण मी देखील पाचव्या विजेतेपदानंतर कंटाळून गेलो होतो. मी हरल्यामुळे माझा प्रश्न आपोआप सुटला परंतु मॅग्नसचा थोडा प्रॉब्लेम हा आहे की तो हरतच नाहीये!”

आता लेखाच्या शीर्षकात मी ‘न भूतो..’ असं का लिहिले आहे याचे थोडे विश्लेषण करूयात.

मॅग्नससारख्या सुपरग्रॅण्डमास्टर दर्जाच्या साधारण पहिल्या ५ ते १० खेळाडूंची तयारी बऱ्याच गोष्टी ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे, ताकदवान कॉम्प्यूटर्स आणि चेस इंजिन्स मदतीला असल्यामुळे एकमेकांपेक्षा फार वेगळी नसावी. अफाट स्मरणशक्ती हा भाग देखील बऱ्याच जगज्जेत्यांच्या बाबतीत जवळपास तुल्यबळ आहे. कास्पारोव्ह, आनंद यांची स्मरणशक्ती आणि कित्येक डाव इत्यंभूत लक्षात ठेवण्याची क्षमता मॅग्नसच्या तोडीची आहे. त्याच्या डावांचं, खेळण्याच्या स्टाइलचे विश्लेषण करण्यापेक्षा इतर काही बाबींमुळे तो इतरांपेक्षा सरस ठरत असावा का हे बघण्याचा माझ्या लिखाणाचा उद्देश आहे.

मग इतर खेळाडू आणि मॅग्नस यांच्यात फरक नेमका कुठे पडत असावा? मॅग्नसच्या खेळाची, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत याचा विचार केल्यानंतर प्रकर्षाने जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे जिंकण्याची इच्छाशक्ती आणि ज्याला ‘किलर इन्स्टिंक्ट’ म्हणतात ती भावना हे त्याचं मुख्य बलस्थान आहे. कितीही तयारी करून आलात तरी फरक पडतो ते पटासमोर बसल्यानंतर तुम्ही काय धारणा ठेवून खेळता त्याने. (जगप्रसिद्ध बॉक्सर माइक टायसनचं एक वाक्य आहे “एव्हरीबडी हॅज अ प्लॅन अनटिल दे गेट पंच्ड इन माऊथ!”) प्रचंड तयारीचा भाग हा फक्त मदतीसाठी आहे आणि समोर येणाऱ्या पोझिशन्सचा अंदाज घेऊन त्याक्षणी करायचे बदल हे तुमच्या अंत:प्रेरणेवरती देखील अवलंबून असतात, हे नजरेआड न करणे महत्त्वाचे. ‘प्लेइंग इन रिअल टाइम’ हे अत्यंत गरजेचे!

दुसरी गोष्ट अशी की समोरचा खेळाडू कोण आहे याला फार महत्त्व न देता खेळणे, म्हणजे बेफिकीरपणाने किंवा समोरच्याला तुच्छता दर्शवून नव्हे परंतु अशा अर्थाने की तो जगज्जेता आहे का? त्याने आधी कोणते सामने जिंकले आहेत? त्याच्या खेळाचा इतिहास काय आहे? यापेक्षा तो आत्ता पटावर काय करतो आहे हे महत्त्वाचे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर! रोखठोक एटिट्यूड! मॅग्नसने हे बोलून दाखवले होते की, ‘मी समोरच्या खेळाडूचा दबाव घेत नाही त्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, आधीच शरणागतीच्या मानसिकतेकडे झुकता.’ आणि हे तो नुसते बोलायचे म्हणून बोलला असेल असे नक्कीच नाही. उदाहरणादाखल वयाच्या १३ व्या वर्षी त्याचा कास्पारोव्ह बरोबरचा डाव बघा. आपली खेळी झाल्यावर हा पठ्ठ्या उठून दुसऱ्यांचे डाव बघून येतोय! शेवटी डाव बरोबरीत सोडवणं भाग पाडलं त्याने कास्पारोव्हला. खेळताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव देखील बघण्यासारखे आहेत. तो नवखा आहे हे कळतं पण दबून गेलेला नाही हेदेखील समजतं! एका १३ वर्षांच्या नवशिक्या पोराने बरोबरीत डाव सोडवावा तेही आपण जगज्जेते असताना हे भलतेच झोंबणारे होते कास्पारोव्हला, तो तातडीने उठून निघून गेला!

प्रतिस्पर्धी खेळाडूचं दडपण न घेणं हा मॅग्नसच्या स्वभावाचा भाग आहे आणि तो त्यानं जाणीवपूर्वक जोपासला आहे. त्यामुळे कदाचित काहीवेळा तो किंचित उद्धट वाटू शकतो. परंतु माझ्या मते कार्लसनच्या देदीप्यमान कारकिर्दीत या मानसिकतेचा फार मोठा वाटा आहे.

तिसरं वैशिष्ट्य मला वाटतं ते असं की, अगदी बरोबरीत सुटतील असे डाव असताना कार्लसन चिवटपणाने खेळत राहतो आणि समोरच्या खेळाडूच्या धीराचा अंत बघतो. कंटाळून म्हणा किंवा जेरीला येऊन म्हणा कुठल्या तरी क्षणी प्रतिस्पर्धी बारीक बारीक त्रुटी असलेल्या दुय्यम दर्जाच्या खेळ्या करतो किंवा त्याच्यातली निकराला टेकलेली महत्त्वाकांक्षा नको त्या क्षणी जागी होते आणि तो एखादी धाडसी खेळी करू बघतो, त्याच क्षणाची वाट मॅग्नस बघत असतो. एखाद्या बिबट्याने दबा धरून बसावे आणि योग्य वेळ येताच सावजावर झडप घालावी तसा तो तुटून पडतो आणि बघता बघता डाव प्रतिस्पर्ध्याच्या हातातून निसटून जातो. काय झालं? कसं झालं? लक्षात यायच्या आधी काम तमाम!

मिसूरीतल्या सेंट लुई इथे सिंकफील्ड कपसाठी २०१८ मध्ये नाकामुराविरुद्ध खेळलेला डाव बघा. अगदी बरोबरी असलेला डाव. दोघांकडे चार चार प्यादी, एकेक हत्ती आणि वजीर. एरवी मॅग्नसने बरोबरी स्वीकारलीही असती परंतु या विशिष्ट डावाच्या वेळी फॅबियानो कारुआनापेक्षा तो अर्ध्या गुणाने मागे होता आणि विजेतेपदासाठी त्याला हा फरक भरून काढणे अटळ होते. अगदी नीरस वाटाव्या अशा खेळ्या करत करत कार्लसन इतक्या कल्पकतेने नाकामुराच्या डावात घुसतो आणि शेवटी त्याला डाव सोडायला भाग पाडतो की ज्याचं नाव ते! आणि त्याचे असे अनेक डाव आहेत.

कार्लसनसाठी “प्रयत्ने मोहोरी रगडिता डावही मिळे!” असा म्हणीत बदल करायला हरकत नसावी! (बादवे ‘मोहोरी’वर श्लेष नाहीये नाहीतर खरोखरचं तेल निघायचं!)

मला जाणवलेली त्याची चौथी खासियत म्हणजे ज्याला ‘पोकर फेस’ म्हणतात तसे भाव ठेवणे. प्रतिस्पर्ध्याची किंवा त्याची स्वतःची कितीही चांगली किंवा वाईट खेळी झाली, किंवा अप्रतिम संधी समोर दिसत असली किंवा प्रॉब्लेम येणार आहे हे दिसत असले तरी कार्लसनच्या चेहऱ्यावरचे भाव फारसे बदलत नाहीत. मानसिकदृष्ट्या हा मला मोठा मुद्दा वाटतो. कारण शेवटी हा मनाचा खेळ आहे. समोरच्या खेळाडूचे हावभाव, बॉडी लँग्वेज यावरून प्रतिस्पर्धी काहीतरी अंदाज लावायचा प्रयत्न करणारच. प्रतिस्पर्धी अंदाज बांधत राहतो पण त्याच्या हाती फारसे काही लागत नसावे. या बाबतीत नाकामुरा आणि कास्पारोव्ह एकदम विरुद्ध आहेत. सगळे काही त्यांच्या चेहऱ्यावर लख्ख लिहिलेले असते! अर्थात यामुळे ते दुय्यम दर्जाचे खेळाडू होत नाहीत ते त्याचं स्वभावगत वैशिष्ट्य आहे इतकेच!

पाचवं आणि असाधारण वैशिष्ट्य म्हणजे पराभव लवकरात लवकर मागे टाकून त्या मानसिकतेतून बाहेर पडणे, बाउंस बॅक! हे तर कार्लसनने अनेकदा सिद्ध केलं आहे. राउंडरॉबीन सामन्यात समजा त्याची अडखळत सुरुवात झाली, एखाद दुसरा डाव हरला तर तो कोसळून जात नाही, स्वतःला एकसंध मानसिक अवस्थेत तातडीने आणतो आणि पुढचे डाव एकामागोमाग एक जिंकून स्पर्धेत टिकून राहतो आणि बऱ्याचदा अव्वल स्थान पटकावतो! त्यामुळे त्याच्या एखाद-दुसऱ्या हरण्यावरून अंदाज लावू नये हे बरे “पिक्चर अभी बाकी है दोस्त!” हे तो लगेच दाखवतो!

वर्षाकाठी साधारण २०० दिवस जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरस्तीवर असलेल्या कार्लसनचं सहावं आणि अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अचाट शारीरिक तंदुरुस्ती. पाच ते सात तास एका जागी बसून डोकं लावत, क्लिष्ट डाव सोडवणं करताना जितकी शारीरिक तंदुरुस्ती जास्त असेल तितका तुमचा खेळाचा दर्जा टिकून राहणार हे निश्चित! मॅग्नसच्या दर्जाचे बुद्धिबळपटू पाच तास चालणाऱ्या डावात साधारण ६००० कॅलरीज खर्च करतात! हे सर्वसाधारणपणे आपण दिवसात खातो त्याच्या तिप्पट प्रमाण आहे! केवढी एनर्जी लागत असेल याची कल्पना करा!

फुटबॉल आणि बास्केटबॉल व्यतिरिक्त नियमित योगासने हा त्याच्या व्यायामाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे बरेचसे खाणे शाकाहारी आहे! त्याचा शेफ त्याच्या डाएटची काळजी घेतो. एखाद्या ऍथलिटच्या तोडीचे त्याचे रुटीन असते. सामने सुरू असतानाच्या दरम्यान तो कुठेही सहलीला जाणे, पार्टी करणे इत्यादी प्रकार करत नाही फक्त आणि फक्त खेळ हाच फोकस!

माझ्या मते ही सहाही वैशिष्ठ्ये त्याला इतर सगळ्या खेळाडूंपेक्षा उच्च दर्जावर नेऊन बसवतात आणि याच कारणास्तव मी ‘न भूतो..’ अशी उपाधी त्याच्या नावामागे लावली आहे.

मॅग्नस हा सध्याच्या काळातला सर्वोच्च खेळाडू आहेच. ‘ऑल टाइम ग्रेट’ म्हणतात तशाही पंक्तीत तो अर्थातच बसतो.

आपण कित्येकदा म्हणतो की कलाकाराने किंवा खेळाडूने अशा वेळी निवृत्ती घ्यावी की त्याचा किंवा तिचा खेळ वा कला अजून आपल्याला पहायला आवडत आहे. प्रेक्षकांना कंटाळा येईपर्यंत त्या स्थानाला चिकटून राहण्यात काही हशील नसते. आणि एकप्रकारे बघायला गेलं तर असा निर्णय घ्यायला धाडसही लागतं. खेळावर खरं प्रेम असलेला खेळाडूच असं करू शकतो!

शिवाय बुद्धिबळाव्यतिरिक्त त्याच्या इतरही काही आवडी आहेत ज्या त्याला इतकी वर्षे मागे सोडाव्या लागल्या आहेत उदा. तो मॉडेलिंग करतो. त्याला पोकर खेळण्यात रस आहे. फँटसी फुटबॉल या प्रकारात त्याने चांगले प्राविण्य मिळवले आहे. टेनिस, बास्केटबॉल हे देखील त्याच्या आवडीचे खेळ आहेत. तेव्हा त्याला आयुष्यात आता जे काही करायचं आहे त्यासाठी त्याला वेळ आणि मानसिक शांतता हवी असेल तर तो त्याचा हक्क आहे आणि त्यासाठी जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेतून पायउतार होणं त्याला आवश्यक वाटत असेल तर त्या निर्णयाचा आपण आदर करायला हवा.

इतर खेळाडूंना संधी मिळेल हा देखील विचार त्यामागे आहेच. ग्रँडमास्टर डिंग लिरेन हा जगज्जेतेपदाच्या शर्यतीत आलेला पहिला चिनी खेळाडू असणार आहे. यान नेपोनियाचीला हरवून तो जगज्जेता झाला तर चीनचे पुरुषांसाठीचे हे पहिलेवहिले जगज्जेतेपद असेल! किती शक्यता एका निर्णयातून जन्म घेतात!

आता मॅग्नस समोरचे ध्येय २९०० इलो रेटिंग मिळवण्याचे आहे! २०१४ साली २८८२ पर्यंत तो पोचलेलाच होता. सध्याचे त्याचे रेटिंग २८६४ च्या आसपास काहीतरी असावे. त्याने जर ते केले तर २९०० इलो साध्य करणारा तो पहिलाच मानवी खेळाडू असेल (स्टॉकफिश १३ या चेस इंजिनचे रेटिंग ३५००+ आहे!).

मॅग्नसच्या नवीन ध्येयासाठी त्याला शुभेच्छा देऊया आणि त्या वाटचालीत त्याचे उत्तमोत्तम डाव आपल्याला बघायला मिळू दे अशी आशा करूया!

संदर्भ – 

१- https://en.wikipedia.org/wiki/List_of_World_Chess_Championships

२ – https://balancethegrind.co/daily-routines/magnus-carlsen-daily-routine/

COMMENTS