किव्ह विमानतळ रशियाच्या ताब्यात

किव्ह विमानतळ रशियाच्या ताब्यात

किव्ह : युक्रेनची राजधानी किव्हमधील होस्टोमेल विमानतळ ताब्यात घेतल्याचे रशियाच्या सैन्याने सांगितले आहेत. हा विमानतळ लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून रशियाने युक्रेनच्या विरोधात युद्ध सुरू केल्यानंतर पहिल्या तासातच युक्रेनच्या सैन्याकडून या विमानतळाचा वापर सुरू झाला होता. हा विमानतळ ताब्यात घेताना घनघोर संघर्ष झाल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. या विमानतळानजीकच्या १० मजल्याच्या इमारतीवर बॉम्ब टाकण्यात आले. या बॉम्ब वर्षावात जमिनीवर सुमारे २ मीटर खोल खड्डा पडल्याची माहिती आहे. रशियाची काही संहारक क्षेपणास्त्रे किव्हच्या दिशेने तैनात करण्यात आली असून युक्रेनचा कडवा संघर्ष सुरू राहिला तर रशियाकडून क्षेपणास्त्र मारा होण्याची शक्यता आहे.

बलाढ्य रशियाच्या सैन्यापुढे युक्रेन आता बचावासाठी व आत्मसन्मानासाठी लढत आहे. किव्हमध्ये अनेक ठिकाणी शुक्रवारी गोळीबार व स्फोटाचे आवाज ऐकायला मिळत होते. किव्हचे महापौर व माजी हेवीवेट बॉक्सर विजेते विताली क्लितचोको यांनी शत्रूला आमची राजधानी हवी असून आम्ही शरणागती पत्करावी अशीही त्यांची इच्छा आहे पण आमचा संघर्ष कायम राहील असे वक्तव्य केले आहे.

शुक्रवारी सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या किव्हच्या काही भागात रशियाच्या लष्करी विमानांनी बॉम्ब टाकले. यातील मनुष्य व वित्तहानीचा अंदाज अद्याप बाहेर आलेला नाही पण रशियाचे विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा आहे.

रशियाला युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना हटवण्याची इच्छा आहे त्याच बरोबर युक्रेनच्या शस्त्रास्त्रांवर त्यांना नियंत्रण हवे आहे.

मूळ वृत्त

COMMENTS