रशियाचे युक्रेनवर आक्रमण

रशियाचे युक्रेनवर आक्रमण

रशियाने गुरुवारी सकाळी अखेर युक्रेनवर आक्रमण केले. गुरुवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सरकारी टीव्हीवर देशाला उद्देशून एक भाषण केले. या भाषणात त्यांन

गिग कामगारांची परिस्थिती निर्णायक टप्प्यावर
उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक
ट्रू कॉलरद्वारे खाजगीपणाचा भंग

रशियाने गुरुवारी सकाळी अखेर युक्रेनवर आक्रमण केले. गुरुवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सरकारी टीव्हीवर देशाला उद्देशून एक भाषण केले. या भाषणात त्यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास या प्रदेशावर रशियाच्या लष्कराकडून कारवाई सुरू झाल्याचे जाहीर केले. २०१४ पासून डोनबासमधील काही भागावर रशियाचे समर्थन असणाऱ्या बंडखोर गटांचा कब्जा आहे. पण पुतीन यांनी आपल्या भाषणात युक्रेनचा कोणताही प्रदेश ताब्यात घेणार नाही असेही स्पष्ट केले. आमची लष्करी कारवाई ही स्वसंरक्षणासाठी असून कोणतीही परदेशी शक्ती या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचे आढळल्यास त्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी युक्रेनच्या सैन्याने आपली शस्त्रास्त्रे खाली टाकावीत व सैन्य माघारी बोलवावे अशी धमकी दिली होती. पण युक्रेनने आपणही कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सज्ज असल्याचे जाहीर केल्याने रशिया-युक्रेन युद्ध अटळ ठरले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांनीही आपल्या देशवासियांना आवाहन करताना युक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देईल अशी धमकी दिली. त्यांनी देशात मार्शल लॉ ही पुकारला. काही क्षेपणास्त्रे रशियाच्या लष्करी तळांवर, लष्करी विमानतळांवरही डागली गेल्याचे जेलेन्स्की यांनी सांगितले. पण रशियाच्या संरक्षण खात्याने युक्रेनचे हे दावे फेटाळले.

पण रशियाच्या युक्रेनची राजधानी कीव्ह व क्रामातोर्स्कवर हल्ले केल्याची माहिती आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले. त्याचबरोबर युक्रेनचे लष्करी तळ, निप्रो व खार्कीव येथील लष्करी मुख्यालय, विमानतळ व लष्करी गोदामांवर रशियाने हल्ले केल्याचे बीबीसीचे म्हणणे आहे. रशियाचे सुमारे दोन लाख सैन्य युक्रेनच्या सीमेवर अनेक दिवसांपासून तैनात आहे. गुरुवारी रशियाच्या रणगाड्यांनी युक्रेनच्या पूर्व, दक्षिण व उत्तर सीमा ओलांडल्या. रशियाच्या सैन्याची एक तुकडी बेलारुसमधून युक्रेनच्या उत्तरेकडील चेर्निहाइव भागात शिरली असल्याचा युक्रेनचा दावा आहे. बेलारुस हा रशियाचा मित्र देश आहे.

रशियाचे सैन्य लुहान्स्क, खार्विक व क्रिमियाच्या खेरसन प्रदेशातही घुसले असल्याची माहिती आहे.

दरम्यान या संघर्षात १८ जण ठार झाल्याची माहिती आहे. युक्रेनने रशियाची लष्करी विमाने व ५० सैनिकांना ठार मारल्याचाही दावा केला आहे. तर रशियाने युक्रेनच्या लष्कराचे ११ हवाई तळ व ७० हून अधिक लष्करी तळ नष्ट केल्याचा दावा केला आहे. या दाव्यांचीही पुष्टी झालेली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: