दुसरे महायुद्ध पेटलेले असताना हिटलरच्या नाझी सैन्याच्या नरसंहारातून स्वत:ची सुटका करून घेतलेले पोलंडचे पाच हजार नागरिक १९४२ ते १९४८ या काळात गुजरातमधील जामनगर व कोल्हापुरनजीक वळीवडे भागात निर्वासित म्हणून राहिले होते. या नागरिकांपैकी हयात असलेले काही पोलिश नागरिक व हयात नसलेल्यांचे कुटुंबिय नुकतेच कोल्हापुरात आले होते. या सर्वांनी ७३ वर्षांपूर्वीच्या आपल्या आठवणी जागवल्या.
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान नाझी जर्मनीने ज्यू नरसंहार करत पोलंडला उध्वस्त केले होते. ज्यूंच्या कत्तलीचा कॅम्प ऑशवित्झ आजही पोलंडमध्ये हिटलर या क्रूरकर्म्याचा इतिहास आपल्यापुढे जिवंत करतो. अशा उध्वस्त पोलंडमधून निर्वासितांचे मोठे लोंढे इराण, आफ्रिका, मेक्सिको, भारताकडे येऊ लागले. इराणने मोठ्या प्रमाणावर आलेल्या निर्वासितांची आपल्या देशात सोय होऊ शकत नसल्याचे कारण सांगत त्यांना अन्य देशांचा आसरा घेण्यास सांगितले. काही देशांनी या निर्वासितांना आपल्या देशात येण्यास नकार दिला. पण त्यावेळी ब्रिटीश राजवट असलेल्या भारताने मात्र या पोलंडच्या निर्वासितांना आसरा देण्याचे मानवतावादी कार्य केले होते आणि ही मदत करण्यात दोन संस्थाने पुढे होती ती म्हणजे गुजरातमधील जामनगर व महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थान.
या दोन संस्थांनी हजारो पोलिश निर्वासितांना आसरा दिला, त्यांना जगण्यास मदत दिली. १९४३च्या सुमारास कोल्हापुरात ५ हजार पोलिश निर्वासित आले आणि त्यांच्या राहण्याची सोय कोल्हापूर शहरापासून ५ किमी अंतरावर असलेल्या वळीवडे कॅम्प (सध्याचे गांधीनगर) येथे करण्यात आली होती. तिथे निर्वासितांना राहण्यासाठी बरॅक करण्यात आले होते. मुले व महिलांसाठी विशेष सोय करण्यात आली होती. कोल्हापुरच्या महाराजांनी महिलांसाठी विशेष दोन खोल्या, स्वयंपाक घर, स्नानगृह व व्हरांडा असे घर बांधून दिले होते. त्यांना लागणाऱ्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूही पुरवल्या होत्या. हे पाच हजार पोलिश निर्वासित १९४३ ते १९४८ असे पाच वर्षे वळीवडे येथे राहात होते.
या वास्तव्यात पोलिश निर्वासितांनी वळीवडेतील रस्त्यांना पोलिश नावे दिली होती. एक शाळा, दवाखाना, चित्रपटगृह व चर्चही उभे केले होते. कोल्हापुर शहरातील संगम टॉकीज नजीक पोलिशांची दफनभूमी होती.
मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर हे निर्वासित आपल्या मायदेशी निघून गेले होते.
पण वळीवडेतील ही पाच वर्षे या हजारो निर्वासितांसाठी जगण्यावरचा विश्वास वाढवणारी होती. त्यांचा आत्मसन्मान, स्वाभिमान जागृत करणारी होती. पण त्याच बरोबर माणसंच माणसाला समजू शकतात, माणसंच माणसाला आधार देऊ शकतात, वंश, भाषा, देश यापेक्षा मानवतावाद हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हेही या निमित्ताने दिसून आले.
या पाच हजार निर्वासितांना कोल्हापुरकरांनी दिलेले प्रेम व त्यांच्या वेदनेशी दाखवलेली सहृदयता आजही हयात असलेल्या ३० निर्वासितांनी व त्यांच्या पुढच्या पिढींनी विसरलेली नाही. त्यांना या ऋणातून उतरायचे नाही पण आपल्या पुढील पिढ्यांना हा इतिहास विसरूनही द्यायचा नाही, या उद्देशाने गेल्या शनिवारी २९ पोलिश नागरिक कोल्हापुरच्या दौऱ्यावर आले होते. यामध्ये हयात असलेल्या १० नागरिकांचा समावेश होता. उरलेल्यांमध्ये नव्या पिढीचे सदस्य होते. या नागरिकांच्या उपस्थितीत वळीवडे येथे वस्तूसंग्रहालय व स्मृतीस्तंभाचे उद्गाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मार्सीन प्रिझीदॅज, पोलंडचे भारतातील राजदूत ऍडम बुरक्वॉस्की, उच्चायुक्त डेमियन आयरझिक, १९३६ मध्ये कोल्हापुरात जन्म झालेल्या ८३ वर्षीय लुडमिला, वळीवडेत पाच वर्षे राहिलेले डेनिस दोन मुलींसह व अन्य नागरिक उपस्थित होते. या सर्व पोलिश नागरिकांचे स्वागत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ढोल-ताशांचा ठेका व पोलिस बँड यामुळे पोलिश पाहुणे हरखून गेले. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला होता. या पाहुण्यांचे नऊवारी साडीतील युवतींनी औक्षणही केले.
या पोलिश पाहुण्यांनी कोल्हापुर व वळीवडेतील महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली.
पन्हाळा किल्ल्यावर हे पाहुणे गेले होते. या किल्ल्यावरील अंबरखाना, तीन दरवाजा, शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा, किल्ल्याची रचना, मराठा साम्राज्याची माहिती त्यांनी घेतली. त्यांचा सत्कार पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आला.
भारत आणि पोलंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्याच्या उद्देश या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. त्यातून कोल्हापुरच्या उद्योग व पर्यटनाला मदत मिळण्याचाही हेतू होता.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात मार्सीन प्रिझीदॅज यांनी ‘रक्तरंजित अशा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आम्हाला कोल्हापुरकरांनी आश्रय दिला, इथली माणुसकी आमच्यासाठी कल्पनेपलीकडची होती. हा मानवतावादी धागा, हे संबंध यापुढेही जिवंत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलंडचे राजदूत बुराकोवास्की यांनी ‘नमस्ते कोल्हापुर’ अशी आपल्या भाषणाची सुरुवात करत उपस्थितांची दाद मिळवली. त्यांनी पुढे हिंदीमध्ये भाषण केले. आजचा क्षण आम्हा सर्वांसाठी अत्यंत बहुमोल असून भारतीयांनी आम्हाला मोठा आधार दिला अशी कृतज्ञता व्यक्त केली.
उच्चायुक्त डॅमियन यांनी मराठीतून भाषण केले. ते म्हणाले, छत्रपती घराण्याने आपुलकीने आम्हाला वागवले. इथल्या नागरिकांनी आम्हाला सर्व सहकार्य दिले. पोलंड व भारताच्या जनतेने एकत्र यावे अशी आमची भावना आहे, असे मत व्यक्त केले. त्यांनी भाषणाचा शेवट ‘जय पोलंड, जय हिंद, जय महाराष्ट्र’ असा केला.
७२ वर्षे जपलेली बांगडी
या पाहुण्यांमध्ये ८३ वर्षीय लुडमिला जॅक्टोव्हीझ यांनी अनेकांची मने जिंकली. त्या ११ वर्षांच्या असताना वळीवडेत आल्या होत्या. त्यांच्या आईने त्यांना दोन बांगड्या घातल्या होत्या. ती बांगडी आठवण म्हणून त्यांनी आजही जपली आहे. कोल्हापुर व शाहू महाराजांच्या भूमीची आठवण म्हणून मी ही बांगडी ७२ वर्षे जपली आहे असे त्या म्हणाल्या.
सध्या द. आफ्रिकेत वास्तव्यास असलेले ओल्फ यांनी आपली आठवण सांगितली. ते त्यांची बहिण क्रोस्टिनासह आले होते व वळीवडेत पाच वर्षे राहिले होते. त्यांची बहिण क्रोस्टिना आज हयात नाही पण तिची मुलगी इजाबेला कोझीयाली यांना घेऊन ओल्फ या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.
अमेरिकेत राहणाऱ्या ईव्हा क्लार्क यांचे आईवडिल ७२ वर्षांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांचे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी मी या भूमीत आल्याचे त्यांनी सांगितले.
छायाचित्र श्रेय: अभिजित गुर्जर
COMMENTS