‘बाईच्या जाती’ची जखम आणि ‘देवबाभळी’ची चिंधी

‘बाईच्या जाती’ची जखम आणि ‘देवबाभळी’ची चिंधी

एखादी कविता, एखादी कथा, एखादे दृश्य... मनात खोलवर रुतून बसते. तीन वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर अवतरलेले प्राजक्त देशमुख दिग्दर्शित सं. देवबाभळी नाटकही संवेदनशील मनांमध्ये कायमस्वरुपी रुतून बसले. तुकाराम आणि विठ्ठलाची बायको या दोघींच्याच नव्हे तर समस्त स्त्री वर्गाच्या मनाचा वेध घेत, एका तरल पातळीवर स्त्रीवादाचा उद्घोष करणाऱ्या या नाट्यकृतीच्या संदर्भाने स्त्री अस्तित्वाचा अर्थ उलगडणारा हा लक्षवेधी लेख ८ मार्च जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने..

एनएसडीपुढे उभा ‘भूमिके’चा प्रश्न
राज्यातील नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू

पडदा सरतो आणि घर सारवणाऱ्या आवलीची ओवी सुरू होते…

दारावर लोक येई, कसे माखले गं हात
सांगते मी शेण न्हाई, नवी मेंदीची ही जात…

त्या सावरणाशी समरस होऊन गाणाऱ्या शुभांगी सदावर्तेचे सूर प्रेक्षागृहात पसरतात. सांगते मी शेण न्हाई… नवी मेंदीची ही जात… गात शेणानं माखलेल्या तळव्यांकडे ओतप्रोत प्रेमाने बघणाऱ्या आवलीच्या नजरेतून मेंदीचा रंध्र-रंध्र सुखावणारा गंधाळ दरवळ पसरावा असा भास.

शेणालाही मेंदी मानणाऱ्या “ती’चं एक परिचित विश्व आपल्यापुढ्यात सुरू होतं. त्यात दुसऱ्या “ती’चा प्रवेश होतो आणि पिढ्यानुपिढ्या दडपलेला, शतकानुशतके नाकारलेला “ती’च्या घुसमटीचा एक पट प्रेक्षकांसमोर उलगडत जातो. भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकारामांना आयुष्याचे तत्त्वज्ञान गवसले, तसे मंचावरील त्या दोघींच्या संवादातून, नात्यातून प्रेक्षागृहातील प्रत्येकाला अंतर्मुख करतं. मिलिंद बोकीलांच्या “एकम’मधील नायिका तिच्या मैत्रिणीला सांगते, पुरुषांकडून बाई दारू प्यायला शिकली, सिगारेट ओढायला शिकली, पण डोंगरावरच्या गुहेत बसून चिंतन करायला नाही शिकली. प्रसाद कांबळींच्या भद्रकाली निर्मित, प्राजक्त देशमुख दिग्दर्शित “देवबाभळी’ हे नाटक प्रत्येकासाठी- विशेषत: महिलांसाठी – तुकोबाचा तो भंडाऱ्याचा डोंगर बनून येतं. डोंगरावरच्या गुहेत नाही, पण स्वत:च्या गाभाऱ्यात डोकावून चिंतन करायला लावते.

तुकारामांची पत्नी आवली (शुभांगी सदावर्ते) आणि विठोबाची रुक्मिणी – लखुबाई (मानसी जोशी) यांच्या काल्पनिक भेटीचे हे नाटक स्त्रीवादाची प्रभावी अनुभूती देत पुढे येते. “स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते’ या स्त्रियांना एकमेकींपासून अलग ठेवणाऱ्या, एकमेकींच्या “सोबती’ ऐवजी एकमेकींच्या “विरोधा’त उभ्या करणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे संकेत त्या अनुभूतीत दडलेले असतात.

एकाकीपणाच्या दुःखदायक काट्याची साक्षीदार

पंढरपुरातलं रुक्मिणीचं स्वतंत्र मंदिर आणि त्याबद्दल सांगितली जाणारी कथा हा खरं तर बाईच्या स्वतंत्र अस्तित्वाचा, श्रमाच्या मोलाचा आणि त्याची दखल घेतली जावी, यासाठी झगडण्याच्या अधिकाराचा, निर्णय घेण्याच्या सक्षमतेचा पौराणिक वारसाच. पंढरपुरातील रुक्मिणीच्या मंदिराच्या परिसरात दर्शनासाठी आलेल्या बायका फुगड्या घालतात, बांगड्या भरतात. माहेरपणाचा उत्साह आणि भगिनीभावाचा उत्सव तिथे अनुभवता येतो. तोच संयत अनुभव “देवबाभळी’ हे नाटक उभा करते. नाटककार प्राजक्तच्या मनातही “देवबाभळी’चे बीज तेथेच पडल्याचे तो सांगतो. “पहिल्यांदा पंढरपूरला गेल्यावर दोघांची मंदिरं वेगळी का, या प्रश्नावर आईने “ती रुसलीए’ हे उत्तर दिलं, तेव्हा या रुक्मिणी-आवलीच्या या भेटीची प्राजक्तला सुचलेली कल्पना स्त्रियांच्या मनातील एकाकीपणाच्या दु:खदायक काट्याची साक्षीदार आहे. प्राजक्तच्या मनातला हाच काटा या नाटकात देवबाभळी बनून आवलीच्या पायात घुसतो आणि तमाम स्त्रियांच्या एकाकीपणाच्या दु:खाची भळभळती जखम बनून सर्वांच्या मनामनात सलत राहतो.

चुलीवर भाकऱ्या थापताना आवली गात असते…

रुशी बसे वरमाय, तिचा रुसवा केवढा
म्हणे पापड वाढला, कसा वाकडा तिकडा
रुशी बसे वरमाय, तिचा रुसवा केवढा
म्हणे भाकर नको, दे चंद्र ताटात तेवढा…

बाईचे रुसणे हे सासूचा मान, पत्नीचा राग यातच बांधले गेले. इथे तर भक्ताची पत्नी आणि देवाची पत्नी दोघीही आपापल्या नवऱ्यांवर रुसलेल्या. बाईचं “रुसणं’ हे तिचं वैयक्तिक किंवा संकुचित नसतं तर स्वत:च्या अस्तित्वाची दखल घेतली जावी, या व्यापक मागणीचा भाग असतो हेदेखील कोणाची गावी नसते. कौटुंबिक हिंसाचाराबाबत स्त्रीवादी चळवळीने मांडलेली ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ ही भूमिका या रुसण्याबाबतही लागू करता येते. आवडी आणि लखुबाईप्रमाणे त्याच्या आविष्काराची वा अभिव्यक्तीची दृष्य रुपे वेगळी का असेनात. दोघींच्या रुसण्याच्या तऱ्हा निराळ्या. आपल्या श्रमाच्या मोलाची दखल न घेता, आपल्याला गृहित धरलं म्हणून रुक्मिणी रुसून स्वतंत्रपणे रानात निघून जाणारी, तर संसाराचा बोजा एकटीवर टाकणाऱ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या देवाच्या नावाने त्रागा करीत राहणारी आवली.

या नाटकासंदर्भात लिहिताना ज्येष्ठ पत्रकार-लेखिका संध्या नरे-पवार यांनी ही बाब नेमकी हेरली. त्या म्हणतात, “स्त्रीने आपला त्रास लपवायचा, दु:ख सहन करायचं ही पुरुषप्रधान व्यवस्था. या व्यवस्थेत आपला संताप व्यक्त करणारी स्त्री “कर्कशा’ ठरते. परंपरेत तुकारामाच्या आवलीची ओळख “कर्कशा’ अशीच. आवली आजवर अशी रंगवली गेली. या नाटकातही आवली तशीच आहे कर्कशा. तुकोबांना आणि त्यांच्या विठ्ठलाला बोल बोल लावणारी, नावं ठेवणारी, प्रश्न विचारणारी.. ‘पण प्राजक्तच्या ‘देवबाभळी’त हीच आवली, रुक्मिणीच्या प्रश्नांचे उत्तर बनते, तेव्हा तिचा तो कर्कश्य त्रागा जाचक वाटत नाही. आवली विठ्ठलाला शिव्या देते, तेव्हा स्वत: विठ्ठलावर रुसलेली, नाराज असूनही रुक्मिणी आवलीवर चिडते. नवऱ्याविरोधात तिसरे कुणी बोलले की नवऱ्यावरची नाराजी बाजूला ठेवून त्याच्या बाजूने उभ्या राहाणाऱ्या तमाम स्त्रियांची ती प्रतिनिधी बनते. म्हटली तर ही अद्वितीय जीवननिष्ठा, म्हटली तर पुरुषप्रधान व्यवस्थेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लादलेली अपरिहार्यतासुद्धा. 

आयुष्याच्या नकार-स्वीकारातला झगडा
देव आणि भक्तातील सीमारेषा धुसर होण्याची वारकरी सांप्रदायातील परंपरेचा बाज या नाट्यातही आहे. पांडुरंगाने सखुबाईच्या घरी दळण दळणारा पांडुरंग, कुंभाराघरी पाणी भरणारा पांडुरंग या कथांमधून देव-भक्ताचे अद्वैत मांडणाऱ्या या परंपरेचा प्रभाव यातही दिसतो. म्हणूनच आवलीच्या पायाची जखम बरी करण्यासाठी रुक्मिणी लखुबाई बनून येते. प्रत्यक्षात लखुबाईच्या मनावरील जखमांवरची खपली निघते आणि आवलीच त्यावर फुंकर घालते. रुसून वेगळी झालेली लखुबाई आवलीला विचारते, एवढा त्रास भोगते आहेस, मग घरात थांबलीस का? निघून का गेली नाहीस? त्यावर आवलीचे उत्तर फक्त लखुबाईसह सगळ्यांनाच भानावर आणते. समकालीन मराठी साहित्यविश्वातले श्रेष्ठ कथाकार म्हणून ज्यांची गणना होते, ज्यांची नाटके महानगरी जगण्यातून आकारास आलेल्या अगम्य भासणाऱ्या गुंत्यांचा उभा-आडवा छेद घेतात, ते जयंत पवार म्हणतात तसं, “आवली आणि लखुबाई शेवटी आपापल्या नवऱ्यापाशी येऊन ठेपतात, पण म्हणून त्याचा आशय पुरुषवादी होत नाही. आयुष्याला दिलला नकार आणि त्याचा आहे तसा स्वीकार यांच्यातील हा झगडा बनतो.’ आवली आणि रुक्मिणी यात निमित्त ठरतात. आपल्याला आपल्या आयुष्यातील दु:खाच्या विरोधात झगडायचंय किंवा स्वीकारून निभावत न्यायचंय हा जगभरातील तमाम स्त्रियांपुढील दोनच पर्यायांच्या त्या मर्यादा सांगतात.

 स्त्री अस्तित्वाचा झगडा आणि भगिनीभावाचा अद्भूत आविष्कार
प्राजक्त म्हणतो, “एक देवाची बायको, एक भक्ताची बायको. मुळात त्यांची ओळख म्हणजे “त्या कुणाच्या तरी बायका आहेत’. इथेच त्यांचं अधांतरी असणं दिसून येतं आणि खटकतं’. बाईच्या स्वतंत्र अस्तित्वाचा सतानत झगडा यापेक्षा वेगळा नाही. आधी कुणाची मुलगी, कुणाची बहीण, नंतर कुणाची बायको आणि शेवटी कुणाची आई… देवाची बायको असो वा भक्ताची, दोघींची ही जखम सारखीच असल्याचं नाटककार सांगतो, तेव्हा देवबाभळीचा तो काटा प्रत्येक बाईच्या काळजात घुसतोच. प्रत्येक बाईला तिच्या आणि तिच्या भोवतालच्या बायकांच्या अस्तित्वाबाबत विचार करायला लावतो. फक्त कथाबीज किंवा त्याची मांडणीही किती स्त्रीकेंद्री बघा – प्राजक्त म्हणतो, “पुराणग्रंथात उल्लेख नसला ,तरी मनातल्या मनात अनेक भेटी झाल्या असणार त्यांच्या एकमेकींशी. शोधाशोध करून शेवटी विठोबा रखुमाईच्या समोर बसलेल्या तुकोबांना बघून आवली कधीतरी विठोबाऐवजी रखुमाई शेजारी बसली असेल ना? शेवटी “बाईच्या जातीला’ हे पालुपद कितीतरी पूर्वापार चालत आलंय ते उगाच नाही!’ म्हणूनच “बाईची जात’ हे स्त्रियांना अडवणारं पालुपद ‘देवबाभळी’मध्ये स्त्रियांची ताकद बनून उभं राहातं.
प्राजक्त म्हणतो, बाई जेव्हा आपली जखम उकलून दाखवत असेल तेव्हा त्याला प्रस्तावनेची गरज भासत नसणार. आवलीची ती जखम एकट्या आवलीची राहात नाही, लखुबाईची शुश्रुषा, मदत एकट्या लखुबाईची राहात नाही, जखमेच्या वेदनेनं आणि प्रेमाच्या पान्ह्याने तमाम महिलांना एकमेकींशी आणि विश्वाशी जोडणाऱ्या भगिनीभावाचा तो अद्भूत आविष्कार ठरतो. हे नाटक फक्त जखमांबद्दल बोलत नाही, त्यावरचे उपायही सांगत राहातं. म्हणूनच तीन वर्षांपासून मराठीच नव्हे बहुभाषक नाट्य रसिकांच्या काळजाला हात घालणाऱ्या या नाटकाबद्दल प्राजक्त सांगतो, “’देवबाभळी’च्या प्रयोगानंतर भरल्या डोळ्यांनी भेटणारे तांडे नवीन नाहीत. पण हे डोळ्यातलं पाणी दु:खाचं नसतं. काहीतरी गवसल्यानंतर काठोकाठ भरल्यानंतरच्या डुचमळण्यातून ओघळलेले ते काही थेंब असतात.’  संपूर्ण नाटक पाहताना येणारा हा अनुभव खऱ्या अर्थाने खूप काही गवसण्याचा आनंद देणारा आहे.

स्त्रियांचे प्रश्न हा तर घासून गुळगुळीत झालेला विषय. त्यावरील उत्तरांचा एक तात्विक पट “देवबाभळी’ मांडते. फेसबुकच्या सीओओ आणि जगभर गाजत असलेल्या “लिन ईन’ या चळवळीच्या प्रवर्तक शेरील सँण्डबर्ग म्हणतात, महिलांच्या प्रगतीत दोन घटक अडथळे आणत असतात. एक प्रवाह बाहेरचा असतो, ज्यात सामाजिक रुढीपरंपरा, पुरुषप्रधान मानसिकतेतून आलेला संकुचित दृष्टिकोन, समाजव्यवस्था हे असते, तर दुसरा प्रवाह आतला असतो. महिलांच्या मनातले आतले असंख्य जडजंबाळ ठोकळे तिला रोखत असतात. आवली आणि लखुबाईच्या या गोष्टीतून “देवबाभळी’ हे ठोकेळे साफ करण्याचे महत्त्वाचे काम करते. माझे अस्तित्व काय, माझे दु:ख काय, त्याला सामोरे जाण्याच्या माझ्या तऱ्हा काय, खऱ्या जखमा कोणत्या, माझ्याच वाट्याला का म्हणत त्यासाठीचं कुढणं किती फसवं आणि रुसणं किती निरर्थक, याचे भान देत देत आपल्याच पदराच्या चिंधीचा उपायही सांगते.

 एकाकीपणाला भेदून जाणारा अवकाश
संपूर्ण नाटकात पांडुरंग आणि तुकोबा या दोघांच्या फक्त सावल्या असणे किंवा बँकग्राउंडला दिसणे ही कल्पनाच अचंबित करणारी. एरवी जगण्याच्या रंगमंचावर मध्यभागी वावरणाऱ्या साऱ्या पुरुषांचे जग आणि त्यांच्या मागे सावलीगत साथ देणाऱ्या बायका. नवऱ्याच्या अस्तित्वातच स्वत:च्या अस्तित्वाचे भान विरून गेलेल्या. थोड्या भानावर येतात, त्या एकाकीपणाचे दु:ख किंवा बेदखलतेच्या जखमांच्या वेदनांनी. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तो काटा खूप आतपर्यंत घुसलेला असतो. कधीकधी आपल्याच शरीराचा भागही बनून गेलेला असतो. भरल्या संसारात, व्यग्र दिनचर्येत स्त्रियांना आतून बेचैन करणारं हे एकाकीपण. मिलिंद बोकीलांच्या “एकम’मध्ये नायिकेचा स्वत:सोबतचा, मनातल्या मनात मैत्रिणीसोबत चाललेला संवादही या एकाकीपणाभोवतीच फेर धरून नाचणारा. त्यावर बोलताना एकदा एका मित्राला आश्चर्य वाटले होते. एवढं कसलं एकटं वाटतं, बायकांना, हे त्याला समजतच नव्हतं. बोकीलांच्या त्या कथेतील नायिका आणि तिच्या मैत्रिणीचा एकमेकींसोबतचा संवाद (कधी प्रत्यक्षातला, अनेकदा मनातल्या मनातला एकमेकींसोबतचा) या एकाकीपणाला छेदून जातो. प्राजक्ताने उभं केलेलं आवली आणि रुक्मिणीमधल्या नात्याचे हे विश्वही त्यापलीकडे जाऊन एक मार्ग सांगतं. तो म्हणजे, शतकानुशतके, पिढ्यानपिढ्या पाचवीला पुजलेल्या या एकटेपणाच्या, बेदखलतेच्या दु:खाच्या डोहात बुचकळत न बसता एकमेकींचा हात धरून उसळी बनून बाहेर या.

अर्थात, नाटकाच्या शेवटी आवली झोपेच्या आधीन जाते आणि लखुबाई निघून जाते, हा प्रसंगही तेवढाच निर्णायक. जखमेच्या मुद्द्यावर दोघी एक झाल्या, तरी शेवटी दोघींचे रस्ते स्वतंत्र. आवलीचे ते शेवटचे शब्द “पाऊस येवो न येवो, प्रत्येकाने आपापल्या वाट्याचं नांगरत राहावं…’ साऱ्या जखमा बधीर करीत स्त्रीपुरुषांच्या नात्यांपलीकडे जाऊन साऱ्यांनाच जगण्याच्या तत्त्वज्ञानाचं सार सांगणारं. शेणात मेंदीचा आनंद मानणारं आणि पाऊस पडत नाही म्हणून टाहो करीत बसण्यातील निरर्थकता अधोरेखित करणारं. त्यामुळेच आवलीला शांत झोप लागते. लखुबाई मात्र आपलं दु:ख कुडतडत बसते. “तुझ्या नांगरणीला पावसाची बांधिलकी नाही अन् माझा पाऊस दुसऱ्याच्या रानात कोसळतोय ते तुला कळायचं नाही’, ती म्हणते. पावसाची अपेक्षा न करता आपली जमीन आपण नांगरण्याचा पर्याय स्वीकारणारी आवली शांतपणे झोपते, तर “आपलं आभाळ आपण बांधून हक्काचा पाऊस होता आलं पाहिजे’, या हट्टावर ठाम असलेली रुक्मिणी तिच्या मार्गाने जाते. आत्मभानाच्या वाटेवर प्रत्येक बाईला पडणाऱ्या प्रश्नांची ही दोन विभिन्न उत्तरे. स्वीकारा अथवा झगडून नाकारा.

असामान्य आवलीची गाथा
“तेरी साडी से मेरी साडी सफेद कैसी’ म्हणत स्त्रियांमधील परस्पर मत्सराचे आणि स्पर्धेचे पुरुषप्रधान मानसिकतेची माध्यमे अतातायी चित्र रंगवतात. सासूविरुद्ध सून, नणंद विरुद्ध भावजय या नात्यांच्या विळ्या भोपळ्याच्या प्रतिमा घट्ट करीत, ना घरातील स्त्रियांना एकत्र येऊ देत ना घराबाहेरील. अनेकदा आई-लेक, मैत्रिणी या प्रेमाच्या नात्यांमध्येही मत्सराचा आणि द्वेषाचा मसाला भरून कथाबिजास तडका दिला जातो. एकमेकींविरोधात झुंजवत ठेवत, ज्याच्यासाठी खरं लढायचं ती लढाईच कधी विसरून जातात, तर कधी त्यासाठी उर्जाच उरत नाही. “देवबाभळी’मात्र या साऱ्याच्या पलीकडे जाते. आवलीचे प्रश्न लखुबाईचे प्रश्न बनतात आणि लखुबाईचे प्रश्न आवलीचे बनतात. लखुबाई म्हणते, “तुझी जखम वेगळी, माझी वेगळी.’ पण, आपल्याच पदराची चिंधी बांधून आपलीच जखम बरी करण्याचा या नाटकाने सुचवलेला उपाय हा तर महिलांचे आत्मभान आणि आत्मविश्वास या दोन्हीला सशक्त दिशा देणारा. म्हणूनच संध्या नरे-पवार यांना ही “आवलीची गाथा’ वाटते. त्या म्हणतात, “आवली हा समर्थ स्त्रीत्वाचा एक आविष्कार आहे. सर्वसामान्य स्त्रीमध्ये दडलेलं असामान्यत्व म्हणजे ही आवलीची गाथा आहे.’

आपल्या दु:खाचं बोचकं सोबत घेऊन रुक्मिणी आपल्या वाटेने निघून जाते आणि नवऱ्याच्या शोधात रानात हरवलेली आवली स्वत:लाच गवसल्याच्या समाधानाने शांत-नितळ होते. मग प्रश्न पडतो, आवलीची जखम बरी झाली की लखुबाईच्या जखमेवरच्या खपल्या निघल्या? जगाला मुक्ती देणारा पांडुरंगही त्याच्या पत्नीला दु:खाच्या डोहातून मुक्त करू शकला नाही की त्याचा भक्त तुकोबाही. बाईपणाच्या जखमांवर तुमचा तुम्हालाच इलाज करायचाय. त्यासाठी या वाटेवर कधी आवली बनून तर कधी लखुबाई म्हणून भेटणाऱ्या अनेकींना एकमेकांच्या सांगाती होत आपापल्या पदरांची चिंधी शोधायची आहे.

अर्थातच, ‘देवभाबळी’चा हा सांगावा बाईमाणसाचे आत्मिक बळ द्विगुणीत करणारा आहे…

(लेखिका दै. ‘दिव्य मराठी’त वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. स्त्री प्रश्नांचा विविधांगी अभ्यास असलेल्या राऊत यांची ‘कोरडी शेतं, ओले डोळे’, ‘कुंभमेळाः एक दृष्टिक्षेप’, धगधगती मुंबई-अनुवादित, आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

 १ मार्च २०२१, मुक्त-संवाद (महिलादिन विशेषांक) साभार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0