कानठळ्या बसवणाऱ्या उन्मादाला थोपवताना…

कानठळ्या बसवणाऱ्या उन्मादाला थोपवताना…

एकाच नेत्याप्रती असलेल्या अंधभक्तीने इतका कळस गाठलेला आहे, की चार राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान जिन्यावरून उतरताना आपला नेता अग्रभागी होता, एवढ्यावरून आपण ‘विश्वगुरु’ बनलो, आपला नेता जगाचा तारणहार बनला या भावनेने तमाम अनुयायांनी हा क्षण या ना त्या प्रकारे साजरा केला. काहींनी हेच छायाचित्र आपले स्टेटस म्हणून ठेवले. हीच सामूहिक धुंदी परस्पर नात्यांतल्या संबंधांना सुरुंग लावताना दिसत आहे. तर्क आणि मीमांसेशी फटकून वागणारे हे समाजमन अंधभक्तीच्या नादात या देशाला आकार देणाऱ्या लोकशाही मूल्यांनाच तिलांजली द्यायला निघाले आहे...

मुसलमान परके हा लोकप्रिय समज
‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’
दक्षिणेतील मुस्लिम राजवटींचे उदारत्व

आजूबाजूचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळे पूर्वीसारखेच आहेत, त्यांच्याशी संवादाची साधनं तर दहा वर्षांपूर्वी होती त्या तुलनेत खूपच वाढली आहेत, तरीही एक प्रकारची पोकळी, एकप्रकारचा एकटेपणा गेल्या काही वर्षांपासून तीव्रतने जाणवतोय. याचं कारण तसं अगदी स्पष्ट आहे, पण कारणामागचं कारणही तेवढंच गुंतागुंतीचं आहे. नातेवाईक, मित्रमंडळींचा गोतावळा पूर्वीसारखाच असूनही जाणवणारं तुटलेपणामागचं एक ठळक कारण म्हणजे, या गोतावळ्याच्या आणि आपल्या राजकीय आकलन आणि विचारसरणीतला फरक. 

नात्यातले अवघडलेपण

एखाद्या कौटुंबिक समारंभानिमित्त जमलेल्या नातेवाईकांच्या गप्पा, व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर फॉरवर्ड केले जाणारे मेसेजेस या सगळ्यात जो अभिनिवेष, द्वेष सध्या ओसंडून वाहतोय, त्याचा भाग होण्याची अजिबात इच्छा नाही, हा एक भाग झाला. पण त्याचा प्रतिवाद करणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे, या जाणिवेतून येणारी हतबलता, एरवी बुद्धिमान व  संवेदनशील वाटणाऱ्या मंडळींचे सामाजिक, विशेषत: राजकीय, विचार एवढे टोकाचे का याचं आकलनच न झाल्यामुळे येणारी उद्विग्नता खूप मोठी आहे. या सगळ्यापासून दूर जावं म्हटलं तर कोणाकोणापासून दूर जाणार हा प्रश्न समोर येतो. हे सगळे विषय टाळून काहीतरी वेगळंच बोलत राहू म्हटलं तरी एक प्रकारचं अवघडलेपण बोचत राहतं. शेवटी उरतं काय, तर कधीच भरून निघणार नाही अशी पोकळी, कधीच दूर होणार नाही असा एकटेपणा.

कारण, आपण ज्यांच्यासाठी अतार्किक, अविचारी, विखारी, अपरिपक्व ही सगळी विशेषणं वापरतोय किंवा या आणि यासारख्या अनेक विश्लेषणांऐवजी ‘अंधभक्त’ हा एकच शब्द वापरतोय ते बहुसंख्येने आहेत, आपण अल्पसंख्य आहोत हे सत्य आहे. या एकटेपणामागचं कारण म्हटलं तर एवढं सोपं आहे. 

विखार आणि विद्वेष

अर्थात, आपल्यापेक्षा वेगळी विचारसरणी असणारे लोक यापूर्वी आजूबाजूला नव्हते का, हा साधा प्रश्न विचारून बघितला तर असं लक्षात येतं की असे लोक नेहमीच होते. आमच्या कुटुंबात गांधीवादी, कम्युनिस्ट, समाजवादी आणि अगदी हिंदुत्ववादी असे भिन्न विचारसरणीचे लोक होते. मित्रमंडळींमध्येही अर्थातच वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते. तरीही आज जे अवघडलेपण जाणवतंय, जो एकटेपणा सलतोय तो पूर्वी नक्कीच नव्हता. आज अनेक नातेवाईकांशी नातं टिकवून ठेवायचं असेल, तर काही विषय वर्ज्यच ठेवायचे ही पूर्वअट होऊन गेली आहे. ती कदाचित दहा-पंधरा वर्षांपूर्वी नव्हती. प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असणार, त्याची श्रद्धास्थानं वेगळी असणार हे गृहित धरलेलं होतं. किंबहुना, वेगळं असणं ती माणूस असल्याची खूण होती. ठराविक विचारसरणीच्या साच्यात जाऊन बसण्यापेक्षा वेगळेपणा स्वीकारण्याचे संस्कार नकळत झालेले होते. तरीही एकचालकानुवर्ती हिंदूराष्ट्र वगैरे विचार समजून घेणं पूर्वीही शक्य नव्हतं, हे तर मान्य केलं पाहिजे. पण त्याचा प्रतिवाद होऊ शकतो, काही वेगळे अनुभव आले तर कट्टर जातीयवादी लोकांचे विचार बदलू शकतात असा विश्वास कुठेतरी तग धरून होता.

निकोप वादसंवादाची जागा उन्मादाने घेतली

मात्र, गेल्या काही वर्षांत नातेवाईक, मित्रमंडळीतल्या अनेकांची पक्की होत गेलेली मतं, विचार, दृष्टिकोन बघून त्यांच्यात बदल होईल अशा आशेला जागाच राहिलेली नाही आणि हे भयावह आहे. यात आणखी एक मुद्दाही महत्त्वाचा आहे. वेगळ्या जातीच्या लोकांना कमी लेखणारे, वेगळ्या धर्माच्या लोकांचा द्वेष करणारे लोक पूर्वीपासून अस्तित्वात तर आहेतच, पण ते आपली मतं आजवर कुजबुजत्या आवाजात मांडत होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्या विचारसरणीचे लोक सत्तेत आल्यामुळे असावं कदाचित पण कुजबुजत मांडली जाणारी मतं घणाघाती आवाजात मांडली जाऊ लागली आहेत. या मतांना वास्तवाचा, तर्काचा आधार नसूनही अत्यंत स्पष्टपणे, ठामपणे ती मांडली जात आहेत. त्याचा प्रतिवाद करायचा प्रयत्न कोणी केला तर सभ्यतेची पातळी सोडून प्रत्युत्तरं दिली जाऊ लागली आहेत. आम्ही म्हणतो तेच बरोबर हा उन्माद तर आला आहेच, पण अगदी तर्काच्या कसोटीवर ते चुकीचं असलं तरी तर्काला कोण विचारतं? आम्ही सत्तेत आहोत आणि आता आम्ही कोणाचं ऐकणार नाही असं स्पष्ट बोलून दाखवण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे.

नरेंद्र मोदी नावाचा ‘विश्वनेता’ भारताला लाभला आहे आणि त्याबद्दल स्वत:ला सुदैवी समजण्याऐवजी तुम्ही मोदींवर शंका कशाला घेत बसला आहात, असा प्रश्न मला काही महिन्यांपूर्वी एका नातेवाईकाने विचारला होता. ‘काही झालं तरी त्या विदेशी बाईच्या मुलापेक्षा मोदी शंभर पटींनी बरा’ अशी टिप्पणीही या नातेवाईकाने केली होती. त्यावर मोदी यांच्या भाषणातल्या काही विसंगती मी दाखवून दिल्या, तेव्हा ‘असल्या गोष्टींना कोण विचारतं? आज बहुमत मोदींसोबत आहे आणि ते तसंच राहणार आहे. तुम्ही पुरोगामी लोक हे अॅक्सेप्ट का करत नाही’ असा भीषण युक्तिवाद त्यावर ऐकायला मिळाला होता.

यावर काय बोलावं हे मला आजही माहीत नाही. गप्प बसणं किंवा या व्यक्तीपुढे हा विषय न काढणं याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. आजवर आमच्यावर खूप अन्याय झालाय, आता मोदींच्या काळात आम्हाला चांगले दिवस येणार आहेत असा काहीसा हा पवित्रा आहे. आता यांच्यावर पूर्वी नेमका काय अन्याय झालाय आणि मोदींच्या काळात असे काय चांगले दिवस यांना दिसताहेत ते विचारण्याची सोय नाही. कारण, ते नाही दिसले तरी आम्ही मोदींनाच मत देणार असा अनाकलनीय ठामपणा त्यांच्यात आहे.  

मोदीभक्तीत लीन आप्तेष्ट

काही वर्षांपूर्वी आणखी एका कौटुंबिक समारंभात गुजरातमध्ये मोदींनी कसा विकास केलाय वगैरे चर्चा रंगली होती. गुजरातच्या तथाकथित विकासाचं मॉडेल कसं फोल आहे, याबद्दलची गुजरातमधल्या पत्रकारांनीच चालवलेली एक लेखमाला मी वाचली होती. गुजरात हे अगदी काँग्रेसच्या काळापासून कसं व्यापाराला प्राधान्य देणारं राज्य आहे, लायसन्सिंगसाठी सिंगल विंडो प्रणाली तिथे कशी खूप पूर्वीपासून आहे, परंतु, ग्रामीण भागात आजही विकास कसा पोहोचलेला नाही, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत हे राज्य कसे पिछाडीवर आहे, हे त्या लेखमालेच्या संदर्भाने सांगण्याचा प्रयत्न करून बघितला. त्यातले मुद्दे खोडून काढण्याएवढी माहिती अर्थातच कोणाकडे नव्हती, पण कोणाच्याही चेहऱ्यावरची साधी माशी हलली नाही. एक नातेवाईक मात्र म्हणाले- ‘मोदी फार काही विकास वगैरे करतील यावर माझाही विश्वास नाही. मी फक्त त्यांना एकाच कारणासाठी मत दिलं आणि देईन. ते म्हणजे ते मुसलमानांची चांगली ठासताहेत.’ आता यावरही गप्प बसण्याशिवाय काही पर्याय नव्हता. कदाचित मोदींचं समर्थन करणाऱ्या बहुतेकांच्या मनात हेच असेल, माझ्या समोरच्या व्यक्तीने निदान प्रामाणिकपणाने ते मांडलं होतं, असाही विचार मनात आला. तरीही इतिहासातले खरे-खोटे दाखले देऊन हा हिंसक विचार एवढ्या स्पष्टपणे मांडण्याचं धारिष्ट्य आपल्याकडे आलं आहे, हेही पुरेसं धोकादायक आहे.

भयावह अभिनिवेश

मुळात मुसलमान समाजाचा बागुलबुवा आपल्या मनात का आणि कसा भरवला गेलाय हेच समजून घेणं सध्या कठीण बनलं आहे. बरं, परिचयातल्या मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या आणि त्यांची ‘ठासणारे’ म्हणून मोदींवर आंधळं प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनात हा द्वेष कसा निर्माण झाला असावा हेही कळत नाही. यातल्या बहुतेक मंडळींचा मुसलमानांशी अपवाद वगळता थेट असा संपर्क आलेलाही नसेल. इतिहासातल्या अतिशयोक्त वर्णनांच्या किंवा सांगोवांगीच्या गोष्टींच्या आधारे एका संपूर्ण समाजाबद्दल मनात द्वेष भिनवून घेण्याची मानसिकता कोठून येते? संघर्षाच्या आकर्षणातून? मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय समाजाचा जगण्यातला मूलभूत संघर्ष किमान पातळीवर गेल्यामुळे हे असे काल्पनिक संघर्ष लोकांना हवेसे वाटत आहेत की काय अशी शंका येते. त्यात भारतातला मुस्लिम समाज बऱ्यापैकी निम्न आर्थिक स्तरांतला. पांढरपेशा मध्यमवर्गाच्या मनात या वर्गाविषयी एक आकस लहानपणापासूनच असतो. भाषा-वेष यांच्या भेदामुळे तो तीव्र होत जात असावा. ‘मुसलमान फार माजोरडे आणि कट्टर’ हा विचार मुस्लिमांशी प्रत्यक्ष संबंध न येताही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवला जात असावा. अर्थात हे लोक मुस्लिमांचा द्वेष करतात याचा अर्थ समस्त हिंदूंवर प्रेम करतात असा अजिबात नाही. चार हिंदू लोक एकत्र आले की ते मुस्लिमांना शिव्या देणार, चार ब्राह्मण एकत्र आले की,  मराठा-दलितादी ब्राह्मणेतरांची उणीदुणी काढणार, मग कोकणस्थ जमले की देशस्थांवर घसरणार, हेच लोक घरात आले की आपलं कुटुंब सोडून बाकीच्यांवर तोंडसुख घेणार. त्यांचं वर्तुळ हे असं लहान लहान होत जातं आणि अखेरीस स्वत:पुरतं उरतं.धार्मिक- राजकीय किंवा सामाजिक विषय आला की, हेच लोक पुन्हा समूह म्हणून एकत्र येतात, हिंसेच्या गप्पा हौतात्म्याचा मुलामा लावून मारू लागतात. तर्क वगैरे खुंटीला टांगून आपला सामूहिक अहंगंड कुरवाळत राहतात. ‘काश्मीर फाइल्स’सारख्या सिनेमाच्या निमित्ताने जो सामूहिक अभिनिवेश बघायला मिळाला, तो काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाहून भीषण होता. या अभिनिवेशाने आयुष्याच्या, कलेच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला आहे.

एकंदर असहिष्णुता अनेक स्तरांवर ठळक होत चालली आहे.  आस्तिक आणि नास्तिक हा भेद तर पूर्वीपासून आहे, पण तो व्यक्तिगत पातळीवर होता. एकाच कुटुंबात आस्तिक-नास्तिक व्यक्ती आपलं अस्तित्व राखून होत्या. आता आस्तिक असणं ही प्रदर्शनाची, गौरवाची-गर्वाची बाब होऊन गेली आहे, नास्तिकांकडे संस्कृतीबुडवे म्हणून बघितलं जाऊ लागलं आहे. गुढीपाडव्यासारख्या सणाच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा तर जास्तीतजास्त उन्मादी होत चालल्या आहेतच, पण रामनवमीसारख्या, आत्तापर्यंत बऱ्यापैकी सात्विकतेने, साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणालाही अत्यंत आक्रमक मिरवणुका काढण्यापर्यंत या समाजाची मजल गेली आहे. जय सियाराम ही प्रेमळ अभिवादनपद्धती मागे पडून जय श्रीराम’धर्मयुद्धाचे सुतोवाच करणारा नारा गावोगावी घुमू लागला आहे. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असलेलं वैविध्य यात हरवत चाललं आहे हे समजून घेण्यापुरताही विवेक आपल्यात समाज म्हणून उरलेला नाही. हे दुसऱ्या कशाचं नाही तर टोकाच्या अंधभक्तीचंच फलित आहे. आपल्या आजूबाजूचे लोक याला सहज बळी पडत आहेत, त्याचं समर्थन करत आहेत आणि आपण त्यासाठी काहीही करू शकत नाही, ही भावना त्रासदायक आहे.

टोकाचा कडवटपणा

यातली आणखी वाईट बाजू म्हणजे या मुजोर अंधभक्तीविरोधात उमटणाऱ्या (तुरळक का होईना) प्रतिक्रियांमध्येही या आक्रमकतेचं प्रतिबिंब दिसू लागलं आहे. माझ्या कुटुंबात माझ्या आईच्या माहेरचे लोक रा. स्व. संघाशी संबंधित होते. माझे आजोबा एकेकाळी संघाचे प्रचारक होते, तिथे काही मतभेद झाल्यामुळे ते संघापासून दूर झाले होते, पण विचारांनी मात्र ते हिंदुत्ववादी होते. आमच्या घरात वडील, आजोबा, आजी सगळे राष्ट्रसेवादलाशी जोडलेले, समाजवादी विचारांचे. तरीही या दोन्ही कुटुंबांत कधी कडवटपणा आला नाही. माझ्या आईचे काका नेहमी म्हणायचे की, दंगलीत हिंदू कधी पहिला वार करत नाही, संरक्षणासाठीच वार करतो वगैरे. एकदा त्यांनी दाढीला मेंदी लावली होती. त्याचदरम्यान बाबरी मशीद पाडल्यामुळे दंगली झाल्या. त्यांना कोणीतरी लाल दाढीमुळे मुसलमान समजून काठ्या मारल्या. आम्ही त्यांची त्यावरून खूप चेष्टा करत होतो. तुम्हाला मुसलमान समजून मारलं म्हणजे हिंदूंनीच केला ना पहिला वार, वगैरे म्हणत होतो. तेही हसण्यावारी न्यायचे. त्यावरून कधीच भांडणं वगैरे झाली नाहीत.

आता असे विषय काढायचा धोका नातेवाईकांमध्ये पत्करलाच जाणार नाही.

अनेक वर्षं बंद असलेल्या आईच्या माहेरच्या घरी काही महिन्यांपूर्वी जाण्याचा योग आला. लहानपणी जिथे अनेक सुट्या घालवल्या, तिथल्या वस्तू वगैरे बघून नॉस्टॅल्जिया जागा झाला होता. तेवढ्यात एका कपाटावर ‘मंदिर वही बनाएंगे’ लिहिलेलं स्टिकर दिसलं आणि एकदम अस्वस्थ व्हायला झालं. खरं तर हे स्टिकर लहानपणी नेहमीच बघितलेलं होतं. आजोबा एरवी कोणाबरोबर मंदिरात गेले, तरी हातही जोडायचे नाहीत एवढे नास्तिक होते. ‘तुम्ही तर देव वगैरे मानतच नाही, मग राममंदिर कशाला हवंय’ किंवा ‘बाबराची नोंद इतिहासात आहे, राम तर पुराणातला. मग मशीद पाडून तिथे मंदिर कशाला बांधायचं’ वगैरे प्रश्न आजोबांना वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी विचारले होते. त्यावर त्यांनी त्यांच्या परीने काही उत्तरं दिली होती. तरीही या स्टिकरकडे बघून त्यावेळी अस्वस्थ वगैरे वाटलं नव्हतं. बाबरी मशीद पाडली गेली, देशभरात दंगली झाल्या, तरीही असणार प्रत्येकाची वेगवेगळी मतं असाच दृष्टिकोन त्यावेळी होता. आज त्या तीसेक वर्षांपूर्वीच्या स्टिकरला गेल्या वर्षभरात राममंदिराबाबत चाललेल्या उन्मादाचा संदर्भ आला होता आणि ते स्टिकर लावणारी, आपल्या जवळची, व्यक्ती आपल्यापासून खरं तर खूप दूरच होती अशी भावना आली होती.

त्यावेळी त्या स्टिकरकडे बघून जे वाटलं नव्हतं, ते आज वाटतंय यामागे इतरही अनेक कारणं असावीत. ते वय कदाचित या सगळ्याचं गांभीर्य समजून घेण्याइतपत प्रगल्भ झालेलं नव्हतं हेही आहे. दुसरी एक शक्यता आणखी अस्वस्थ करणारी आहे. जे आपल्यासारखं ते चांगलं, बाकी सगळं वाईट या अंधभक्तीतल्या मूलभूत लक्षणांकडेच आपणही सरकू लागलो नाही ना? आपले विचार कितीही वेगळे असले तरी त्यापलीकडचं नातं आपल्यात आहे, हा दिलासा पूर्वी होता, तो आता नाहीसा होत चालला आहे की काय? आणि तो नाहीसा होण्याला अंधभक्तीची मानसिकता तर कारणीभूत आहेच, पण तिला प्रतिक्रिया म्हणून आपल्याही मनात अंधभक्तांबद्दल द्वेषाची भावना तर मूळ धरू लागलेली नाही? आज दोन व्यक्तींमध्ये, दोन संस्थांमध्ये सर्वत्र सुडाची, द्वेषाची भावना पसरलेली दिसते. या  द्वेषभावनेची लागण आपल्यालाही झालेली तर नाही?

कौटुंबिक समारंभांमध्ये जमणाऱ्या अंधभक्तांच्या मांदियाळीत आपली मतं न मांडणं किंवा त्यांच्या विचारांचा प्रतिवाद करणं, विषारी मेसेजेस फॉरवर्ड करणाऱ्या व्हॉट्सअॅप गृप्समधून बाहेर पडणं किंवा त्या गृपमध्येच राहून मेसेजेसना उत्तरं देणं या सगळ्याहून अंधभक्तांच्या मनातला द्वेष आपल्या मनात शिरू न देणं हेच याक्षणी महत्त्वाचं होऊन गेलंय.

देश म्हणून ही दिशा नेमकं काय सूचित करतेय? ही कशाची लक्षणं आहेत? कशाची पूर्वसूचना आहे?

सायली परांजपे, या समाज-संस्कृती आणि राजकारणाच्या अभ्यासक, अनुवादक आणि कनक बुक्स’तर्फे प्रकाशित ‘शहीद भगतसिंग’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या लेखिका आहेत.  

(१ जून २०२२ मुक्त संवाद नियतकालिकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0