झायराची एक्झिट

झायराची एक्झिट

झायरा कश्मीरमध्ये जन्मली आहे आणि तिच्या जन्माचे साल बघता ती कायमच अशांत वातावरणात वाढली आहे. जेव्हा सभोवताली प्रचंड अस्वस्थता, अस्थैर्य असते आणि त्याहून अधिक म्हणजे पालनकर्त्या व्यवस्थेबद्दल अविश्वास असतो, तेव्हा धर्माच्या आश्रयाला जाण्याची शक्यता खूप वाढत असावी.

हॉलीवूडचे अंधानुकरण
प्रकाशमय सणात रुपेरी पडदा अंधारातच
बॉलिवुडमधील उदयोन्मुख तारा – नरेंद्र मोदी

गेल्या चार वर्षांत मोजक्या पण उल्लेखनीय भूमिका करून प्रकाशझोतात आलेली  राष्ट्रीय पुरस्कार विजेती १९ वर्षीय अभिनेत्री झायरा वसीमने अलीकडेच आपण अभिनयाचे क्षेत्र सोडत असल्याचे फेसबुकद्वारे जाहीर केले आणि या विषयावर वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारची चर्चा जोरात सुरू झाली. झायराने चित्रपटसृष्टी सोडण्याचे कारण हा पेशा तिला तिच्या धर्मापासून दून नेत आहे, असे सांगितल्यामुळे या विषयाला अनेक पदर आणि पैलू मिळाले आहेत. अर्थातच यातल्या काही पदर-पैलूंकडे सोयीस्कर किंवा अजाणतेपणी दुर्लक्षही केले जात आहे.

मुळात हा झायराचा व्यक्तिगत निर्णय आहे. चित्रपटात अभिनय करणे आपल्या इस्लामच्या अनुसरणात आड येत आहे. त्यामुळे आपण हा निर्णय केल्याचे तिने स्पष्ट म्हटले आहे. झायराने कोणत्या धर्माचे पालन करावे, धर्मातील शिकवणीचा अर्थ कसा लावावा हा तिचा खासगी प्रश्न आहे. तरीही चित्रपटात काम करणे हे माझ्या धर्माच्या आड येत असल्याने मी ते सोडत आहे असे झायराने सोशल मीडियावरून जाहीर केल्याने यातील मुद्दयांचा विचार होणे आवश्यक झाले आहे.

मुळात झायरासाठी असे वाद नवीन नाहीत. ‘दंगल’ या चित्रपटात लहानपणीच्या गीता फोगटची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या झायराला जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (झायरा कश्मीरची रहिवासी आहे) कश्मिरी तरुणवर्गापुढील ‘रोल मॉडेल’ म्हणाल्या होत्या, त्यावरून उठलेला धुरळा आपल्याला आठवत असेल. चित्रपटासारख्या बाजारू माध्यमात काम करणारी मुलगी काश्मिरी तरुणांसाठी रोल मॉडेल कशी ठरू शकते, मुळात झायरा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलीच का येथपासून अनेक प्रश्नांपासून सुरू झालेला वादंग नंतर गलिच्छ ट्रोलिंगपर्यंत जाऊन पोहोचला होता.

आज लक्षात घेण्याची बाब म्हणजे त्यावेळीही झायराची भूमिका  गोंधळलेली होती. चित्रपटात काम करणे हे लाजीरवाणे मुळीच नाही, तर ती एक कला आहे, अशी ठाम भूमिका त्यावेळीही झायरा घेऊ शकली नव्हती. जेमतेम १६ वर्षाच्या मुलीने या ट्रोलिंगविरुद्ध निश्चयाने उभे राहावे अशी अपेक्षाही त्यावेळी कोणी केली नव्हती. मात्र, एकंदर चित्रपटात काम करण्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन यातून प्रकर्षाने समोर आला होता.

आजही झायराच्या या निर्णयाबद्दल उमटलेल्या प्रतिक्रिया अनेक गटांत विभागलेल्या आहेत. एक गट हा झायराचा पर्सनल निर्णय आहे. त्यात दुसऱ्या कोणी बोलण्याची गरज नाही असा पवित्रा घेतलेल्यांचा आहे. तिने हा निर्णय का घेतला असावा यात शिरण्याची गरज या गटाला वाटत नाही. झायराला टीकेचे लक्ष्य करू नये असे या गटाचे मत आहे.

एक गट आहे तो तिच्या निर्णयाचं तोंडभरून कौतुक करणारा. चित्रपटसृष्टीसारख्या मायावी दुनियेचे आकर्षण धर्मासाठी बाजूला ठेवण्याची परिपक्वता इतक्या कमी वयाला दाखवल्याबद्दल झायराची प्रशंसा अनेकजण करत आहेत. यात मुस्लिमधर्मीय तर मोठ्या संख्येने आहेतच पण झायरापासून हिंदू अभिनेत्रींनीही (अभिनेत्यांनी नाही, केवळ अभिनेत्रींनी) धडा घ्यावा अशा शब्दांत तिची प्रशंसा करणारे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणीही आहेत. (दोन्ही बाजूचे मूलतत्त्ववाद एकमेकांना कसे खतपाणी घालतात याचे उत्तम उदाहरण.)

आणखी एक गट आहे आहे तो अर्थातच तिचा निर्णय खुळचट आहे अशी टीका करणारा आणि याला जबाबदार धर्ममार्तंडांवर तुटून पडणारा. या गटातील काही जण गलिच्छ ट्रोलिंगपर्यंतही घसरलेले आहेत. आणखी एक गट आहे तो झायराचे निर्णयस्वातंत्र्य मान्य करून तिला व्यक्तिगत टीकेचे लक्ष्य न करणारा, तरीही कला कोणत्याही धर्माच्या आड कशी येऊ शकते, असा प्रश्न कळकळीने विचारणारा. झायराला चित्रपटात काम करणे थांबवायचे असेल तर ती स्वतंत्र आहे पण फेसबुकवर लांबलचक पोस्ट टाकून तिने चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अन्य मुस्लिमधर्मीयांवर अप्रत्यक्षपणे जी टिप्पणी केली आहे ती अनेकांना मान्य नाही. (ही फेसबुक पोस्ट झायराने टाकलेली नाही, तर तिचे अकाउंट हॅक करून टाकण्यात आली आहे अशी बातमीही मधल्या काळात आली होती.)

या सगळ्या मतमतांतरातून सोशल मीडियावरील अर्धकच्च्या चर्चांना उधाण आलेले असले तरी मुळात झायराने हा निर्णय का केला असावा, याचा विचार तिचे निर्णयस्वातंत्र्य मान्य करूनही, होणे आवश्यक आहे.

भारतातील चित्रपटसृष्टीत पूर्वीपासून अनेक मुस्लिमधर्मीय कलावंत होते आणि आहेत. त्याचप्रमाणे इस्लाम आणि कला हा विषयही दीर्घकाळापासून चर्चेत आहे. इस्लाममध्ये संगीत, नृत्य, नाट्य (आणि आणखीही बऱ्याच गोष्टी पण त्यात आत्ता पडण्याची गरज नाही) आदी मनोरंजनाची सर्व साधने ‘हराम’ समजली गेली आहेत, हे पूर्वीपासून माहीत आहे.

अल्लाहच्या उपासनेपासून दूर नेणाऱ्या या सर्व गोष्टींपासून दूर राहा अशी आवाहने मूलतत्त्ववादी मध्ययुगीन काळापासून कायमच करत आले आहेत आणि अनेक सामान्य माणसे त्याला बळीही पडत आली आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला संगीत-नाट्यादी कलांचाही जोमाने विकास होत राहिला आहे. भारतीय उपखंडात संगीत, नाट्य, चित्रपट यांसारख्या कलांना समृद्ध करण्यात जन्माने व आचरणानेही मुस्लिम असलेल्या कलावंतांचे योगदान खूप मोठे आहे. मूलतत्त्ववाद्यांच्या आवाहनांना बळी न पडता कलेच्या उपासनेत रममाण झालेल्या अनेक मुस्लिमधर्मीयांची (त्यांच्याकडे केवळ कलावंत म्हणूनच बघणे योग्य पण आज झायराच्या या निर्णयामुळे त्यांचा उल्लेख धर्माच्या अनुषंगाने केला जात आहे) उदाहरणे आपल्या समोर आहेत.

सनातन्यांचा विरोध तर यापूर्वी अनेकांना सहन करावा लागला आहे. अगदी सम्राट अकबरालाही दिन-ए-इलाहीच्या स्थापनेवरून ब्लासफेमीचा आरोप सहन करावा लागला होता. विसाव्या शतकाच्या मध्यावर सादत हुसैन मंटो, इस्मत चुगताई, फैज अहमद फैज आदी साहित्यिकांवर कुराणाचे हवाले देऊन अश्लिलतेचे आरोप झाले होते. अगदी अलीकडील काळात सलमान रश्दी, तसलिमा नसरीन आदी लेखकांविरोधात मूलतत्त्ववाद्यांनी फतवे काढले होते. या सर्वांनी याविरोधात कसा लढा दिला याचे दाखले झायराच्या संदर्भात दिले जात आहेत व ते या प्रकरणाला काही अंशी लागू आहेत.

झायराने निर्णय खरोखर स्वयंप्रेरणेने घेतलेला असेल तर गोष्ट वेगळी. मात्र, तिचे वय आणि एकूण परिस्थिती बघता यात दोन शक्यता अधिक वाटतात. एक तर तिने हा निर्णय दबावाखाली घेतला असावा किंवा हा निर्णय घेण्यासाठी पूरक विचारधारेच्या प्रभावाखाली ती आली असावी.

धर्माच्या नावाखाली निदर्शने-टीकांसारख्या प्रकारांना चित्रपटसृष्टीने अनेकदा तोंड दिले आहे पण अशा प्रकारे एखाद्या अभिनेत्रीने धर्मापासून विचलित होत असल्याचे कारण देऊन चित्रपटसृष्टी सोडण्याची ही कदाचित भारतातील पहिलीच वेळ असावी. धर्म आपल्या दैनंदिन आयुष्यात संपूर्ण ताकदीनिशी शिरू लागल्याची ही नांदी असावी.

पाकिस्तानी चित्रपट दिग्दर्शक शोएब मन्सूर यांच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या खुदा के लिए या चित्रपटात इस्लाम व कला यांच्यातील समज-गैरसमजांवर सुरेख भाष्य करण्यात आले होते. त्यात विषय संगीताचा होता पण तो चित्रपटांनाही जसाच्या तसा लागू होण्याजोगा आहे. इस्लाममध्ये कला ‘निषिद्ध’ समजल्या गेल्या आहेत असे स्पष्ट सांगणारे अनेक आयत कुराण्यात असल्याचा दावा मुल्ला-मौलवी करतात पण याचा अर्थ खोलात जाऊन तपासला तर वेगळाच निघतो हे या चित्रपटातील एक व्यक्तिरेखा मौलाना वली यांनी फार सुंदर स्पष्ट करून सांगितले आहे. धर्म आणि दैनंदिन सवयी यांत कशी भयंकर गल्लत होत आहे, हे खुद्द एका धार्मिक नेत्याच्या व्यक्तिरेखेच्या तोंडून डोळ्यात अंजन घातल्याप्रमाणे सांगितले गेले आहे.

हराम तर बाकीही खूप काही आहे, मग या मूलतत्त्ववाद्यांचा आक्षेप कलेवरच का, असा प्रश्न या चित्रपटाने मांडला होता. याचं उत्तर फारसं कठीण नाही. कलेचं वैशिष्ट्यच आहे जात-धर्म-वर्गाने निर्माण केलेल्या भिंतींपलीकडे सर्वांना घेऊन जाणे. या सगळ्या सीमा पार करण्याची ताकद फक्त कलेत आहे आणि म्हणूनच सर्व धर्मातील  सनातन्यांनी कायमच कलेचा द्वेष केला. कारण, माणसाला धर्माच्या मर्यादेत कोंडून ठेवण्यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे. मूलतत्त्ववाद्यांच्या प्रभावाखाली येऊन झायराने हा निर्णय केला असेल, तर तिने कलेला हराम ठरवणाऱ्या आयतांचा हा अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न कधी केला असेल का?

मुळात कोणत्याही धर्मग्रंथाची पारायणे करण्यास आपल्याकडे खूप प्रोत्साहन दिले जाते. मात्र, त्यातील वचनांचा अर्थ वर्तमानाच्या संदर्भात लावणे मात्र निषिद्ध असते. त्यामुळे ‘खुदा के लिए’ चित्रपटातील मौलाना वली म्हणतात त्याप्रमाणे ‘लोग हराम की कमाई जेब में डाले हलाल गोश्त की दुकान ढुंढते फिर रहे होंगे’, ही गत बहुतेकांची यापूर्वीच झालेली आहे. झायराही कदाचित याचीच बळी असावी.

झायराने दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला असेल तरी ते तेवढेच चिंताजनक आहे. यात झायराचे स्त्री असणे या मुद्द्याकडे अनेकांनी लक्ष वेधले आणि ते महत्त्वाचे आहे. मात्र, ती कश्मीरची रहिवासी आहे या बाबीवर फारसा भर दिला गेलेला नाही. या निर्णयात तिचे मुस्लिम असणे व स्त्री असणे जेवढे महत्त्वाचे आहे, त्याहून काकणभर अधिक महत्त्वाची तिची कश्मिरी पार्श्वभूमी आहे.

झायरा कश्मीरमध्ये जन्मली आहे आणि तिच्या जन्माचे साल बघता ती कायमच अशांत वातावरणात वाढली आहे. जेव्हा सभोवताली प्रचंड अस्वस्थता, अस्थैर्य असते आणि त्याहून अधिक म्हणजे पालनकर्त्या व्यवस्थेबद्दल अविश्वास असतो, तेव्हा धर्माच्या आश्रयाला जाण्याची शक्यता खूप वाढत असावी. यातूनच कदाचित धार्मिक मूलतत्त्ववाद्यांच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली येण्याचा धोका निर्माण होत असावा.

चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेल्या झायराच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियामुळे सर्वांना कळले व चर्चेला तोंड फुटले. मात्र, मूलतत्त्ववाद्यांच्या दबावामुळे किंवा प्रभावामुळे असे कितीतरी जण कलेच्या मार्गावर जाण्यापासूनच थांबवले गेले असतील. याचा विचार राज्यकर्त्यांनी, प्रशासनाने, जनतेने सर्वांनी करणे गरजेचे आहे.

गेली अनेक वर्षे कश्मीरमध्ये सत्ता उपभोगलेल्यांनी, कश्मीरला दिलेला विशेष दर्जा तात्पुरत्या स्वरूपाचा होता असे छातीठोक सांगणाऱ्यांनी आणि सारासार विचाराचे कष्ट न घेता धर्माच्या छत्राखाली जमणाऱ्यांनी सगळ्यांनीच या शक्यतेवर विचार केला पाहिजे. हा प्रश्न आज कश्मीरमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे पण तो उद्या आणखीही कुठे पोहोचू शकतो  यावरही विचार आवश्यक आहेच.

चित्रपटसृष्टी सोडणे हा तसा झायरा वसीमने तिच्यापुरता केलेला निर्णय. त्याची मुळे मात्र खूप लांबवर आणि खोलवर पसरलेली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0