‘झी’च्या सुधीर चौधरींवर गुन्हा दाखल

‘झी’च्या सुधीर चौधरींवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी आपल्या ‘डेली न्यूज अनॅलॅसिस’ (डीएनए) या टीव्ही कार्यक्रमातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न व इस्

जनतेची दिशाभूल करू नयेः रामदेवबाबांना हायकोर्टाकडून समज
चिनी मालावरील बंदी राजकीय सोयीसाठीच
महिलेला लैंगिक संबंधांबाबत नकाराचा अधिकार

नवी दिल्ली : झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी आपल्या ‘डेली न्यूज अनॅलॅसिस’ (डीएनए) या टीव्ही कार्यक्रमातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न व इस्लामचा अवमान केल्या प्रकरणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात केरळमध्ये एक वकील पी. गावस यांनी फिर्याद दाखल केली आहे. पी. गावस हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी संबंधित ऑल इंडिया यूथ फेडरेशन या संस्थेचे राज्य सचिव आहेत.

सुधीर चौधरी यांच्यावर आयपीसी१५३ अ, १५३ ब, २९५ अ, ५०२, ५०३, आयटी कायदा ६६ अ व केबल टीव्ही नियंत्रण कायदा २०१८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पी. गावस यांनी झी न्यूजचे प्रसारण बंद करावे अशीही मागणी आपल्या तक्रारीत केली आहे.

११ मार्च २०२० रोजी डीएनएवरील शोमध्ये सुधीर चौधरी यांनी ‘जमीन जिहाद’ या कार्यक्रमांतर्गत एक चार्ट दाखवून त्यातून जिहाद संदर्भात चर्चा केली होती. या शोमध्ये दाखवण्यात आलेला चार्ट ‘बॉयकॉय हलाल इन इंडिया’ या नावाच्या फेसबुक पेजवरचा असून तो इंग्रजीत आहे आणि तो पाच वर्षापूर्वीचा आहे. पण चौधरी यांनी या चार्टचे हिंदीत भाषांतर करून त्यावर कार्यक्रम केला. चौधरी यांनी या कार्यक्रमात मुस्लीम धर्मावर निशाणा साधला व समाजात धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप फिर्यादीत केला आहे.

आपला कार्यक्रम सादर करताना सुधीर चौधरी यांनी हा चार्ट कुणी तयार केला याचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी या कार्यक्रमात कट्टर व वैचारिक जिहाद असे दोन प्रकारचे जिहाद असल्याचे म्हटले होते.

वैचारिक जिहादमध्ये आर्थिक, ऐतिहासिक, मीडिया, चित्रपट व संगीत, धर्मनिरपेक्ष जिहाद असून कट्टर जिहादमध्ये लोकसंख्या, लव्ह (प्रेम), जमीन, शिक्षण, पीडित, थेट जिहाद असल्याचा त्यांनी म्हटले होते.

‘फिर्याद म्हणजे पुलित्झर’

दरम्यान केरळ पोलिसांनी आपल्या विरोधात दाखल केलेली फिर्याद हा पुलित्झर पुरस्कार असल्याची प्रतिक्रिया सुधीर चौधरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. “न पचेल असे तथ्य लोकांपुढे ठेवल्याने पुरस्कार. मीडियाला ही स्पष्ट सूचना आहे की अनेक वर्षे दाखवत असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या रेषेपुढे आपणाला जाण्यास परवानगी नाही. आणि तरीही पुढे गेल्यास आपल्याला तुरुंगात टाकले जाईल.”

या संदर्भात पी. गावस यांनी द वायरला सांगितले की, सुधीर चौधरी यांनी ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते, त्या कार्यक्रमाचा विषय देशाचा कायदा व घटनात्मक मूल्यांचे थेट उल्लंघन करणारे होते. चौधरी यांनी पत्रकारितेच्या आडून मुस्लिमांविरोधात विखारी व विषारी प्रचार केला. त्यांनी दाखवलेला चार्ट हा केवळ प्रचारतंत्राचा भाग होता आणि त्यात केलेले आरोपही तथ्यहीन होते, असे पी. गावस यांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात सुधीर चौधरी यांनी आपल्या टीव्ही कार्यक्रमात ‘कोरोना जिहाद’ असा विषय घेऊन कोरोनाची साथ एका विशिष्ट धर्माकडून देशभर पसरवली जात असल्याचा दावा केला होता. कट्टर उजव्या विचारसरणीने ‘लव जिहाद’ अशी संकल्पना जन्मास घातली होती त्यानंतर आता ‘कोरोना जिहाद’ अशी नवी संकल्पना या विचारसरणीकडून पसरवण्यात येत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: