केरळमध्ये झिका विषाणू आढळले

केरळमध्ये झिका विषाणू आढळले

केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झिका विषाणूंचे रुग्ण आढळले असून, केंद्र सरकारने निरीक्षणासाठी टीम पाठवली आहे.

केरळ सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला
केरळमधील हत्तीणीला कोणी मारले?
मुस्लिम स्वातंत्र्यवीरावरील चित्रपटावरून केरळमध्ये वाद

केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झिका विषाणूंचे रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यन्त या विषाणूचा संसर्ग झाल्याचे १५ रुग्ण आढळले आहेत. केरळ प्रशासनाने राज्यामध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून, केंद्र सरकारने तज्ज्ञांची एक टीम निरीक्षणासाठी पाठवली आहे.

केंद्रीय टीममध्ये ६ सदस्य असून ही टीम परिस्थितीचा आढावा घेणार असून, राज्य सरकारला मदत करणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. केरळमधील १४ जणांचे अहवाल चाचणीसाठी पुण्यातील विषाणू प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. त्यात सर्व प्रथम एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

“झिका विषाणूचे काही रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. तिथल्या स्थितीचा अंदाज आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी सहा तज्ज्ञ सदस्यांची एक टीम केरळमध्ये पाठवण्यात आली आहे.”, असे लव अग्रवाल यांनी दिल्लीमध्ये सांगितले.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सरकारने त्वरीत कार्यवाही सुरू केल्याचे सांगितले. “राज्यातील सर्व जिल्ह्यांना झिका व्हायरसबाबत सूचना दिल्या आहेत. एडीस जातीचे मच्छर चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. त्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि इतर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”, असे जॉर्ज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान केरळ शेजारच्या कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, राज्याच्या सीमांवर तपासणी सुरू करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: