झोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी

झोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी

स्मृती इराणी यांना आपल्या मुलीला झालेल्या वेदना निश्चित जाणवल्या असतील. ट्रोल्सकडून सर्रास महिलांना लक्ष्य करताना जी अभद्र भाषा वापरली जाते त्यावरही त्या चिंतन करतील काय? ट्रोल्सना पोसणाऱ्या राजकीय नेत्यांना, पक्षांना त्या सुनावतील काय याचे उत्तर काळच देईल.

गांधी – जगण्याचा मार्ग
नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपुढे बळी पडलेला पक्ष
जेएनयूत गुंडांचा ४ तास धुडगूस, विद्यार्थ्यांना जबर मारहाण

काळ मोठा महान असतो तो सर्वांना पुरून उरतो. तो कोणाला कसा सामोरा येईल हे कुणी सांगू शकत नाही. आपण जे पेरतो तेच उगवत जातं हे सूत्र सर्वंकष लागू पडतं आणि ते ही सर्व बाबतीत! अगदी सोशल मीडियावरच्या ट्रोल राक्षसाच्या बाबतीतही!

मुद्दा ट्रोलचा आहे म्हटल्यावर कालपरवा घडलेली एक महत्त्वाची घटना डोळ्यासमोर येणं साहजिक आहे. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी ‘इन्स्टाग्राम’वरच्या त्यांच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना भाजपच्या रणरागिणी असंही म्हटलं जातं. विरोधी पक्षाचा हल्ला आक्रमकपणे परतावून लावण्यात त्यांचं विशेष कसब आहे.

झालं असं की स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवरती त्यांची कन्या जोइश इराणी हिच्यासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. तसं तर कामकाजाव्यतिरिक्त त्या विरंगुळ्याच्या, आपल्या कुटुंबीयांसोबतचे क्षण, फुरसतीतले क्षण, काही फिरकी घेणाऱ्या काही गमतीशीर फोटोंही पोस्ट करतात. असंच शेअरिंग त्यांनी आपली झोइश कन्येसोबत केलं होतं. त्यांनी मुलीसोबतच्या फोटोखाली त्यांनी कॅप्शन लिहिली – ‘ही मुलं अशीच नाटकं करत असतात पण आपण काहीच करू शकत नाही…फक्त हसतो.’ या फोटोला त्यांनी #siyapa आणि #teenagetantrums असे हॅशटॅगही वापरले. या फोटोला हजारो लाइक्स मिळाले. स्मृती इराणींच्या फॉलोअर्सना हा फोटो खूप आवडला. इतक्या व्यस्ततेतून मुलीसाठी वेळ दिल्यानं फॅन्सही खूश होते. पण ट्रोल्सनी मामला बिघडवला.

त्यांच्या त्या पोस्टवरून त्यांची कन्या जोइश हिला तिच्या सहाध्यायी मित्रांनी आणि परिचितांनीच ट्रोल करण्यास सुरुवात केली. फोटोमधील तिचे लुक्स कसे आहेत यावरून शेरेबाजी झाली. फोटोमध्ये तिची हेअरस्टाइल अतिशय वाईट असल्याचं सांगितले गेले. इतकेच नव्हे तर एका मित्राने पुढचं पाऊल टाकत जोइशला डिवचण्यासाठी अन्य मित्रांनीही एकत्रितरित्या पुढं यावं असं आवाहनही केलं. यामुळं जोइशला तिचे वर्गमित्र चिडवू लागले. तिला वाईट वाटलं. तिनं ती पोस्ट डिलीट करण्याची विनंती आई स्मृती इराणी यांना केली. आपल्या मुलीला दुःख झालं आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतील की काय या भावनेतून स्मृती यांनी ती पोस्ट इन्स्टावरून नुकतीच हटवली.

त्यानंतर त्यांनी ट्रोलर्ससाठी एक पोस्ट केली. आपल्या लेकीला ट्रोल करणाऱ्यांना दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं. लेकीच्या सांगण्यावरून तो फोटो डिलीट करणाऱ्या स्मृती यांनी या खेपेस दुसरा फोटो अपलोड केला. या फोटोसोबतही त्यांनी कॅप्शन लिहिलं. ज्याद्वारे ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं. त्या लिहितात – “माझ्या मुलीसोबतचा सेल्फी मी डिलीट केला होता. त्याचं कारण म्हणजे काही आगाऊ मुलं तिला तिच्या लूकवरून चिडवत होते. इतकंच नाही तर आपल्या आईसोबतच्या सेल्फीत ती कशी दिसते हे सर्वांनी बघा असं सांगत सुटले होते. माझ्या मुलीने मला तो फोटो हटवण्यास सांगितला. मी फोटो डिलीट केला कारण मी तिला रडताना पाहू शकत नाही. नंतर मला जाणीव झाली की फोटो डिलीट करून मी त्या मुलांना प्रोत्साहनच देत आहे. मिस्टर झा (कमेंट करणारा मुलगा), माझी मुलगी स्पोर्ट्सपर्सन आहे. तिच्या विक्रमाची लिमका बुकमध्ये नोंद आहे. शिवाय कराटेमध्ये तिने ब्लॅक बेल्ट मिळवला असून, वर्ल्ड चॅम्पियन्सशीपमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. ती खूपच प्रेमळ आणि सुंदर आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, तिच्याबद्दल जे बोलायचं आहे ते बोला, ती पुन्हा लढेल, ती जोईश इराणी आहे आणि मला गर्व आहे की मी तिची आई आहे”.. स्मृती इराणी यांच्या या पोस्टलाही सोशल मीडियावर लाईक मिळताहेत.

अनेकांनी स्मृती इराणींनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करत आहेत आणि करायलाही हवं, कारण आपल्या मुलीच्या स्वाभिमानास ठेच पोहोचवणाऱ्या आणि तिला दुखावणाऱ्या प्रतिक्रिया कुणालाही नको असतात. स्मृती इराणी यांनी ज्या खंबीरतेने मुलीची पाठराखण केली त्याचं कौतुकच व्हायला हवं. खेरीज ज्या टवाळखोरांनी त्यांच्या मुलीस दुखावलं त्यांना अद्दलही घडायला हवी याबाबत कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. ही झाली एक बाब.

याच संदर्भात या आठवड्यात घडलेली आणखी एक घटना म्हणजे मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला केलं गेलेलं अश्लील आणि अर्वाच्च्य भाषेतलं ट्रोलिंग! केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्या व्हिडिओत तिने आपले सर्व फॉलोअर्स हे मराठी नसून हिंदी इंग्लिश देखील आहेत असे सांगत व्हिडिओमध्ये हिंदीत बोलणार असल्याचे सांगितले आणि ती हिंदीत बोलत असल्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल करायला सुरूवात केली. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर करून तिला मराठीची लाज वाटत असल्याची टीका व अश्लाध्य विधाने करून तिला ट्रोल केले. त्यावर तिने नुकतेच व्हिडिओच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. इतकेच नाही तर मराठीची शाळा देखील घेतली. ‘तुमची मराठी भाषा इतकी कमकुवत आहे का, की माझा रेप केल्याशिवाय तिला तिचे सुवर्ण दिवस लाभणार नाही आहेत?’ असा सवाल केतकीनं व्हिडिओत केला.

केतकीच्या ज्या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली त्यात तिने मराठी भाषिकांना अप्रत्यक्षपणे उचकवले होते त्यामुळे मराठी अस्मितेचे ‘झेंडे’ फडकावणाऱ्या पक्षांनी आणि विचारधारांनी तिला जाहीर विरोध केला होता. याचं प्रतिबिंब कमेंटसमध्ये आणि केतकीच्या प्रत्युत्तरातही उमटलं होतं. __aayuushh__ (आयुष ठाकुर) या युजरची कमेंट अशी आहे – “इतरांच्या चुका काढत बसू नकोस, नीट सांगितलं अस्त आधीच्या व्हिडिओमध्ये तरी चाललं अस्त की, उगीच कशाला झेंडे फडफडाऊ नका आणि बाकीचं आवरायचं. तू अॅक्टर आहेस, सामान्य लोकांचे *critics* येणारच आहेत. तू सांगायचं नाही आम्ही झेंडे फडफडवयचे की नाही ते. ते आम्ही आमचं बघून घेऊ, आणि कोण बोललं अस्त तुला तर त्यानंतर बोलायचं होतं ना. आम्हाला आहे अभिमान आमच्या मातृ भाषेचा. तू खूप बॉलिवूड ची हेरॉईन आहेस ना. मराठीच वाणी मुले पुढे आलीयेस, तुझ्या काढणं असं बोलणं अपेक्षित नाही…’

ट्रोल झालेल्या केतकीने त्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर अशा ट्रोलर्सना शिक्षा मिळावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली. केतकीसोबत अभिनेता दिगंबर नाईक, सुशांत शेलार आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेदेखील उपस्थित होत्या. तिच्या भेटीनंतर लगेच सक्रीय होत फडणवीस यांनी सोशल मीडियावरून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली. आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केतकीने दिलेल्या निवेदनामध्ये होती. विशेष बाब म्हणजे केतकीने नंतर कृष्णकुंजवरतीही धाव घेतली. तिथून सावध प्रतिक्रिया आली. केतकीवर ट्रोल करताना जी भाषा वापरली त्याला मनसेचा विरोध आहे मात्र तिने व्हिडीओतून मराठी हिंदीविषयी व्यक्त केलेल्या मतांशी कदापिही सहमती नाही अशी भूमिका घेतली गेली. यावरचं ‘मातोश्री’चं मौन सूचक होतं.

मुळात केतकीला ज्यांनी ट्रोल केलं ते महाराष्ट्र माझा या बाण्याचे आणि मराठीच्या वापराचा आग्रह धरणाऱ्या विचारधारेतले लोक होते. यात तथाकथित सुशिक्षित मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी केतकीसाठी वापरलेली भाषा कोणताही सभ्य सुजाण माणूस कुठंही वापरू शकणार नाही इतकी दर्जाहीन होती.

‘ट्रोल’ या शब्दाचा ऑक्सफोर्ड डिक्शनरीतला अर्थ असा आहे – “someone who leaves an intentionally annoying message on the internet, in order to get attention or cause trouble. a message that someone leaves on the internet that is intended to annoy people: A well-constructed troll will provoke irate or confused responses from flamers and newbies.’

इंटरनेटवरती एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक दिलेला असा मेसेज की ज्या द्वारे लक्ष वेधून घेता येतं आणि इच्छित व्यक्तीस त्रासही देता येतो. व्यवस्थितरित्या उभारणी केलेल्या ट्रोल्सद्वारे एखाद्यास नामोहरम करता येतं वा गोंधळात टाकता येतं.

आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ काहीच द्यायचे नाही व आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पोस्टवर जाऊन त्यांना आडवं लावायचं, मुद्द्यापासून पोस्ट भरकटवायची, पोस्टकर्त्यावर हीन दर्जाची टीकाटिप्पणी करायची, कॉमेंट करणाऱ्यांशी अकारण वाद घालायचा या प्रवृत्तीला ऊत आलाय. असे उद्योग करणारे लोक सोशल मीडियात ‘ट्रोल’ म्हणून कुख्यात आहेत. कहर म्हणजे जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आयटी सेलच्या गोंडस नावाखाली पगारी (पेड) ट्रोल आता आपल्या पदरी बाळगलेत. अगदी राष्ट्रीय पक्षांपासून ते किरकोळ प्रादेशिक पक्षांपर्यंत सगळे या चिखलात रुतलेले आहेत. भाजपचा आयटीसेल इतरांच्या तुलनेत अधिक मोठा आणि अधिक सक्षम, सक्रीय आहे.

संघटीत आणि सुनियोजित पद्धतीने ट्रोल्स हाताळले जात असल्याने दिवसेंदिवस याला अधिक बीभत्स, ओंगळवाणे, हिंस्त्र स्वरूप येतेय. वाईट बाब अशी की ट्रोल्सना आवर घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम कोणताही राजकारणी मनापासून करताना दिसत नाहीत.

सोशल मीडियातून जे पेरले तेच आता उगवत आहे. आधी बेगुमान वापरलेलं हे हत्यार आता कुणाच्याच नियंत्रणात नाही. पराकोटीचा द्वेष, हिंसा यांनी आता सामान्य लोकांनाही ग्रासले आहे, वाईट बाब अशी की जे सुशिक्षित आहेत, माध्यमप्रवण आहेत तेच लोक इतरेजणांना हिंसक बनवत आहेत. स्मृती इराणी यांना आपल्या मुलीला झालेल्या वेदना निश्चित जाणवल्या असतील. ट्रोल्सकडून सर्रास महिलांना लक्ष्य करताना जी अभद्र भाषा वापरली जाते त्यावरही त्या चिंतन करतील काय? ट्रोल्सना पोसणाऱ्या राजकीय नेत्यांना, पक्षांना त्या सुनावतील काय याचे उत्तर काळच देईल. हे झाले सोशल मीडियाचे.

पण वास्तव जगातही आता ट्रोल्स दिसू लागलेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना भारताने जिंकला त्या दिवशी ऐन मध्यरात्रीस उन्मत्त झालेल्या टोळक्यांनी असा काही हैदोस घातला की सार्वजनिक शांतता, रहदारीचे अडथळे, गोंगाट यांचं काहीच भान त्यांना उरलं नव्हतं. भारतीय संघाने जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचा हरेक भारतीयास अभिमान असायलाच हवा पण आनंदावर विरजण पडेल असं लोक वागू लागतात तेव्हा तेही एक सार्वजनिक ट्रोलिंगच असते. याचाही एक दिवस विचार करावा लागणार आहे. तोवर सार्वत्रिक झालेल्या ट्रोलचा भस्मासूर जे काही गुण उधळेल ते मुकाट पाहावे लागेलच !

समीर गायकवाड, सामाजिक घटनांचे विश्लेषक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: