अमित शहांकडून दिल्ली पोलिसांचे कौतुक, पण वास्तव वेगळेच

अमित शहांकडून दिल्ली पोलिसांचे कौतुक, पण वास्तव वेगळेच

राजधानीत उसळलेल्या दंगलीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिल्ली पोलिसांची पाठराखण केली असली, तरी दंगलींना दोन आठवडे उल

एकाधिकारशाहीची संसदेत स्पष्ट झलक
सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर हाकलले जाईल – अमित शाह
लवासा यांचे व्यक्तिगत हितसंबंध तपासण्याचे आदेश

राजधानीत उसळलेल्या दंगलीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिल्ली पोलिसांची पाठराखण केली असली, तरी दंगलींना दोन आठवडे उलटल्यानंतरही ईशान्य दिल्लीतील वातावरणात तणाव आहे. चिंताजनक बाब म्हणजे दंगलग्रस्त पोलिसांकडे सर्वाधिक संशयाने बघत आहेत.

५३ जणांचे प्राण घेणाऱ्या या दंगलींनंतर मुस्लिमांना जेवढी भीती हिंदुत्वाचा बुरखा पांघरून हिंसाचार करणाऱ्यांबद्दल वाटत आहे, तेवढीच पोलिसांबद्दलही वाटत आहे. गुंडांनी आपल्या घरांवर-दुकांनावर हल्ले चढवले, जाळपोळ केली तेव्हा पोलिस केवळ हाताची घडी घालून बघत होते, २४ फेब्रुवारीच्या रात्री तीन बसेसमधून आलेल्यांना या पोलिसांनीच सुरक्षित निसटून जाऊ दिले, असा दंगलग्रस्तांचा दावा आहे.
म्हणूनच पोलिसांनी ३६ तासांत दंगल आटोक्यात आणली या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावर त्यांचा अजिबात विश्वास नाही.
कर्दमपुरी एक्स्टेन्शनमध्ये राहणाऱ्या ६० वर्षांच्या किश्मथून यांचा २६ वर्षांचा मुलगा फैझान या हिंसाचारात मारला गेला. त्याहून वाईट म्हणजे फैझान दंगलखोरांनी केलेल्या हिंसाचारामुळे नाही, तर पोलिस कोठडीत झालेल्या दुखापतींमुळे प्राणाला मुकला असे किश्मथून यांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर पडून रक्तबंबाळ अवस्थेत राष्ट्रगीत म्हणणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात फैझान होता. पोलिस या तरुणांना रायफलीने ठोसून ‘आझादी’ हवी आहे का असे विचारत होते. त्यानंतर त्याला ज्योती कॉलनी पोलिस ठाण्यात नेल्याचे त्याच्या आईला कळले. मात्र, या ठाण्यात दोन-तीनदा चकरा मारूनही पोलिसांनी त्यांना फैझानला बघू दिले नाही. त्यांनी आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्याची मदत घेतली. अखेर किश्मथून आणि आणखी दोन मुलांच्या मातांना तीनेक दिवसानंतर पोलिस ठाण्यात बोलावून मुलांचा ताबा दिला. या मुलांना चांगल्याच दुखापती झालेल्या होत्या. किश्मथून सांगतात, “फैझान ३६ तास कोठडीत होता याचा पुरावा देणारे काहीच आम्हाला मिळाले नाही. मुलगा मिळाला हेच उपकार समजा, असे पोलिस म्हणाले. फैझान खूप अस्वस्थ होता. त्याला वैद्यकीय मदतही वेळेवर मिळाली नाही. अखेर पोलिसांनी सोडल्यानंतर २४ तासांच्या आतच त्याचा मृत्यू झाला.”
२० वर्षांपूर्वी नवऱ्याचा एका अपघातात मृत्यू झाल्यानंतर किश्मथुन यांनी हिमतीने मुलांना वाढवले. त्यात फैझानच्या मृत्यूमुळे त्यांचे विश्व पुन्हा उद्ध्वस्त झाले आहे.

कर्दमपुरीपासून जवळच नवीन मुस्तफाबादमध्ये चांदबाग ही छोटी, निम्न-मध्यमवर्गीयांची वसाहत आहे. चांद बाबा सय्यद यांची मझार (समाधी) येथे आहे. पोलिस चौकीपासून जेमतेम १५ फुटांवर असलेल्या या मझारीला दंगलखोरांनी लक्ष्य केले. पोलिस हे का थांबवू शकले नाहीत, हा प्रश्न आहे.
जवळच आणखी एक जाळलेली इमारत दिसत होती. जळकी संत्री रस्त्यावर पसरलेली दिसत होती. या इमारतीतील दुकाने भुरे खान फलवाले या फळव्यापाऱ्याच्या व त्याच्या भावांच्या मालकीची आहेत. इमारतीत या कुटुंबाचे फळांचे दुकान, ज्युस सेंटर व चिकनचे दुकान आहे. पहिल्या मजल्यावर भुरे खान व त्यांची बायको-मुले राहतात. भुरे खान यांचे घर आता केवळ जळक्या व तुटक्या भिंतींपुरते उरले आहे.
“दंगलखोर ‘जय श्रीराम’ अशा गर्जना करत दगड फेकताना आम्ही पाहिले. त्यांनी माझी कार, मोटरसायकल पेटवली. घरात अश्रुधुराची नळकांडी फोडली. पोलिसही दंगलखोरांच्या सोबत होते. येथे राहून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही हे ओळखून आम्ही सगळे पळून गेलो. आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला पण त्यांनी सगळे काही खाक झाल्यानंतर आठ तासांनी मदत पाठवली.” भुरे खान यांच्यासारखाच अनुभव सांगणारे आणखी ४-५ जण आम्हाला भेटले.
आजूबाजूची अनेक दुकाने जाळलेली दिसत होती. मात्र, हिंदू नावे असलेली दुकाने सुरक्षित होती. हा हिंसाचार बेछूट नव्हता- तो काळजीपूर्वक आखलेला होता आणि मुस्लिम लक्ष्यस्थानी होते. अनेक भागांत प्रचंड हिंसाचार होऊनही पोलिस पोहोचलेच नाहीत, असा अनेकांचा दावा आहे.
शहीद भगतसिंग कॉलनीतही केवळ मुस्लिमांच्या घरांना लक्ष्य केल्याचे दिसत होते. येथे तर मशिदीलाही आग लावण्यात आली. एक ऑटोरिक्षावाला तर या भागात जायलाही घाबरत होता. दाढीवाले लोक या भागात जायला घाबरत होते. अखेर दाढी न राखलेले दोघे आमच्यासोबत आले.
या भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. दंगलीचा आणखी एक परिणाम म्हणजे सफाई कामगारांनी दंगलग्रस्त भागांतील कचरा उचलणे थांबवले आहे. अर्थात स्वच्छता ही आता येथे राहणाऱ्यांसाठीही फारशी महत्त्वाची नाही, महत्त्वाचे आहे ते जिवंत राहणे.
भगतसिंग कॉलनीतील एका गल्लीत हिंदूंची शंभरेक घरे आहेत, तर मुस्लिमांची पाच किंवा सहा. यातील कोणत्याही मुस्लिम घरावर ते दर्शवणाऱ्या आकृत्या किंवा मजकूर दिसत नाही. तरीही नेमक्याच याच घरांतून वॉशिंग मशिन्सपासून ते चमच्यांपर्यंत सर्व काही बाहेर फेकलेले दिसत होते. मुस्लिमांची घरे ओळखणे फारसे कठीण गेले नसावे. शेजाऱ्यांनी सांगितले असावे किंवा त्यांना दारू वगैरे पाजून माहिती काढून घेण्यात आली असावी, असा कयास बरोबरच्यांनी बोलून दाखवला. याच गल्लीतील ‘अल्लाह-वाली मशिदी’च्या चार मजली इमारतीचेही नुकसान करण्यात आले आहे. मशिदीच्या भिंतीवर हनुमानाची प्रतिमा बसवण्यात आली आहे.
खरा धक्का बसला मशिदीच्या इमारतीच्या आतमध्ये गेल्यानंतर. सगळीकडे केवळ राखच राख होती. छतावरील प्लास्टरही सोलून काढले होते. अनेक तास धगधगणारी आग शमवण्यासाठी कोणीही आले नाही. जळण्यासारखे काही उरले नाही तेव्हा, आग स्वत:हूनच विझून गेली.
या गल्लीतील वयोवृद्ध नागरिक राम कृपाल सांगतात, “आम्हाला दंगलखोर दिसले तेव्हा आम्ही आमच्या मुस्लिम शेजाऱ्यांना पळून जायला सांगितले. आम्ही बहुसंख्येने आहोत तरीही भीतीच्या सावटाखालीच जगत आहोत. हिंदूंनी येथे येऊन दंगल केली. उद्या मुस्लिम आले आणि त्यांनी बदला घेतला तर?”
या गल्ल्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम अनेक वर्षे सौहार्दाने राहिले आहेत खरे पण तेच आता एकमेकांकडे संशयाने बघू लागले आहेत. घरे आणि मशिदी पुन्हा बांधल्या जातील पण भंगलेल्या विश्वासाचे काय हा खरा प्रश्न आहे.
जुन्या मुस्तफाबाद भागातील अल हिंद रुग्णालय दंगली झाल्यापासून रुग्णांनी भरलेले आहे. अनेक खासगी क्लिनिक्स बंद असतानाही, डॉ. एम. ए. अन्वर यांचे रुग्णालय सुरू होते. त्यांनी दंगलग्रस्तांवर उपचार तर केलेच, शिवाय विस्थापितांनाही मदत केली. डॉ. अन्वर सांगतात, “येथे आलेल्या दंगलग्रस्तांपैकी ७५ टक्के लोकांना फायरआर्म्सच्या जखमा होत्या. आम्ही शक्य तेवढे प्रथमोपचार केले.”
या १५ बेड्सच्या रुग्णालयात आत्तापर्यंत शेकडो दंगलग्रस्तांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. इमारतीच्या खालच्या मजल्यावर दंगलीत बेघर झालेल्यांना आसरा देण्यात आला आहे. टेलरिंगचे काम करणाऱ्या इर्शादने बायको आणि दोन मुलांसह येथेच आसरा घेतला आहे. त्याच्या भागातील ३५-४० मुस्लिमांची घरे खाक झाली. काहीच उरले नाही, असे तो म्हणाला. भागिरथी विहारमध्ये दोन मुलांसह राहणाऱ्या शन्नोच्या घरावर २४ फेब्रुवारीच्या दुपारी हल्ला झाला. “एक जमाव काही लोकांना ‘जय श्रीराम’ असे म्हणायला लावत होता. जे म्हणत नव्हते, त्यांनाही मारत होते आणि म्हणत होते त्यांनाही मारत होते. मी कसाबसा जीव वाचवून पळाले. मुलांना शाळेतूनच घेतले आणि त्या भागातून दूर गेलो,” शन्नो सांगते. ही हकीकत ईशान्य दिल्लीतील प्रत्येक कोपऱ्यात ऐकायला मिळत होती.
दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हिंदूही आहेत पण मुस्लिमांमध्ये झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीशी त्याची तुलनाही होऊ शकत नाही. शिवविहारमधील डीआरपी शाळेची इमारत (मालक हिंदू) हिंसाचार शमला तोपर्यंत ओळखण्याच्या पलीकडे गेली होती. ओळख पटलेल्या ५१ मृतदेहांपैकी १५ हिंदूंचे आहेत, असे अधिकृत आकडेवारी सांगते. पोलिस कॉन्स्टेबल रतनलाल आणि गुप्तचर विभागाचे क्षेत्र अधिकारी अंकित शर्मा या हिंसाचारात मारले गेले. दंगलीत मारलेे गेलेले अनेक जण रोजंदारीवरील मजूर होते आणि ते मारले गेले आहेत हे त्यांच्या कुटुंबियांना कळण्यास बरेच दिवस लागू शकतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मृतांचा अधिकृत आकडा ५३ असला, तरी प्रत्यक्षात तो बराच अधिक आहे, असा काहींचा दावा आहे. एका मोठ्या उघड्या गटारातून पंचवीसेक मृतदेह बाहेर काढले जात असताना पाहिल्याचे काहींनी सांगितले. अर्थातच या दाव्यांसाठी कोणाकडेही ठोस पुरावे नाहीत.
अर्थात मृतांच्या आकड्यापलीकडे, किती घरे आणि दुकाने जाळली गेली, व्यवसाय उद्ध्वस्त झाले याची मोजदादच करायला काही महिने लागतील. राजधानीचा हा मोडका-जळका भाग पुन्हा उभा करण्यासाठी किती वर्षे लागतील हे तर कोणीच सांगू शकत नाही.

सीमी पाशा या ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0