घाणीचेच खत होईल!

घाणीचेच खत होईल!

अपुऱ्या झोपेच्या ग्लानीत सकाळी दरवाजा उघडला. दाराला अडकवलेल्या पिशवीत दूध होते. पेपरही आला होता. म्हणजे आपल्याकडे कर्फ्यू नाही. दंगलीची दहशत नाही. ..क

‘१९८४’ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही – दिल्ली हायकोर्ट
दंगल रोखू शकत नाही – सरन्यायाधीश बोबडे
जहांगिरपुरी दंगलीमागे भाजपचः आपचा आरोप

अपुऱ्या झोपेच्या ग्लानीत सकाळी दरवाजा उघडला. दाराला अडकवलेल्या पिशवीत दूध होते. पेपरही आला होता. म्हणजे आपल्याकडे कर्फ्यू नाही. दंगलीची दहशत नाही. ..किती छान! ..काय काय स्वप्नं पडत होती रात्री! टी. व्ही. वरील दिल्लीच्या त्या बातम्या, जाळपोळीची ती भयंकर दृष्ये, ज्यांची मुले मारली गेली त्या आयांचा आकांत, निर्ममपणे तुटून पडलेला जमाव वा पोलीस, खाली याचना करणारा रक्तबंबाळ युवक, हॉस्पिटलच्या शवागारासमोर प्रेते ताब्यात मिळण्यासाठी उभी असलेली उद्ध्वस्त चेहऱ्याची भिन्नधर्मीय माणसे. वस्त्यांत अल्पसंख्य परधर्मीयांना आधार देणारी, वाचवणारीही माणसे कुठे कुठे होती; माणुसकीच्या एकाकी पणत्यांसारखी!

रात्री जेवताना हे सारे पाहत होतो. घास अडकत होता. टी. व्ही. बंद केला. जेवण उरकले. घरचे सगळे नीट परतलेत याची खात्री केली. आडवा झालो.

बराच वेळ झोप येईना. बाबरी मशीद कोसळवल्यानंतरची ९२-९३ च्या हिंसाचारातली शिवाजी नगर, धारावीतली दृष्ये समोर फेर धरू लागली. गल्लीतला रक्ताचा सडा, पोलीस स्टेशनबाहेर गायब झालेल्या नवऱ्याचा-मुलाचा तपास लागतो का हे पाहण्यासाठी छोट्या लेकरांना घेऊन बसलेल्या हताश बाया. ज्यांची घरेदारे खाक झाली, त्यांचे त्या राखेत पिशाच्च होऊन काही सापडते का म्हणून चिवडत बसणे, ज्याचे सगळे कुटुंबच मारुन टाकले होते, त्या १२ वर्षाच्या मुलाचे भकास, कोरडे डोळे. …धारावी, शिवाजी नगर या आम्हा कार्यकर्त्यांच्या नेहमीच्या पायाखालच्या वस्त्या यावेळी भ्रमंती करताना मात्र जी.एंच्या कथेतले अपरिचित नगर झाल्या होत्या.

आता रात्री जी.एंच्याच ‘इस्किलार’ कथेतला ‘अरिबा’ माझ्या पोटातून कुरतडत पाठीतून बाहेर पडत होता. मी त्या कैद्याप्रमाणे किंचाळत, आक्रंदत होतो. धडपडून जागा झालो. …हुश्श! ते स्वप्न होते. मी ठीक होतो. घरातलेही शांत झोपले होते. परत झोपलो. पण पुन्हा त्याच मालिकेचा पुढचा भाग सुरू. अर्धवट झोपेत असताना बेल वाजली. कामवाल्या बाई आल्या. सकाळ झाली होती. उजाडले होते. दाराला लटकलेल्या पिशवीतले दूध, पेपर घेतला. आमच्याकडे सगळे शांत होते.

सवयीप्रमाणे कामाला लागण्याआधी किमान हेडलाईन पाहाव्या म्हणू पेपर उघडला. लोकसत्तेची पहिल्या पानावरची पहिली बातमी होती – ‘साहित्यप्रेमींसाठी आज ‘अभिजात’ काव्योत्सव!’ यात सादर व्हावयाच्या कवितांची यादी बातमीत होती. विंदांची ‘माझ्या मना बन दगड’ ही कविताही त्यात होती.

विंदा माझे आवडते कवी. आतून घुसळवणारे, त्याचबरोबर दिलासा आणि आधार देणारे. कारुण्याचे आवंढे गिळायला लावून अन्यायाविरोधातल्या संवेदना झडझडून जाग्या करणारे. हा अन्याय दूर करायला प्रेरित करणारे. पुन्हा पुन्हा वाचत राहाव्यात, स्मरणात येत राहाव्यात अशा त्यांच्या कवितांतली ही एक – ‘माझ्या मना बन दगड!’

या कवितेतल्या या काही पंक्तीः

ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!
हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

…इथपर्यंत ठीक वाटते. मी काही करू शकत नाही. ही दृष्ये सहन करायला शिकायला हवे. माझे काही जात नाही. दूध आले. पेपर आला. दिनक्रम सुरू झाला. पण पुढच्या ओळी या संदेशाशी मेळ खात नाहीत. त्या काही निराळे सांगतात. काही वेगळे होईल असे सांगतात. त्या वाचूया.

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड

…म्हणजे आशा आहे. या घाणीचे खत होईल. लाल धूळ उडू लागेल. त्यामागून स्वार येईल. तो अन्याय दूर करील. सगळे नीट होईल.

यात मी काय करायचे? अशा स्वाराची वाट पाहायची? ..हे ‘यदा यदाही धर्मस्य’ झाले. कोणा लोकोत्तर महामानवाची अन्यायाच्या परिमार्जनासाठी वाट पाहायची.

विंदांना हे खचितच म्हणायचे नाही. लाल धूळ उडवण्यात मला सामील व्हायचे आहे. अन्यायाचे खत करण्यात मला सहभाग द्यायचा आहे. यातूनच समाजमन म्हणजेच तो धार लावणारा स्वार तयार होणार आहे.

मग दिल्लीच्या आक्रोशाचे विस्मरण व्हायला, माझ्या मना बन दगड ऐकून माझ्या अस्वस्थतेचे विरेचन करायला, मन ताजेतवाने व्हायला आज मी कविता ऐकायला अभिजात काव्योत्सवाला जाऊ? …की लाल धूळ उडवण्यासाठीच्या प्रयत्नांतला एक लाखांश हिस्सा उचलायला लोकांत जाऊ?

वास्तविक असा पर्यायांत विचार करणे आवश्यक आहे का? मी दोन्ही करु शकत नाही का? आधी लोकांत जाऊ, तिकडून नंतर काव्योत्सवात जाऊ! शक्य आहे, लोकांत गेल्यावर कदाचित वेळ होणार नाही तिकडे जायला. पण डोक्यात ठेवेन. प्रयत्न तर नक्कीच करेन!

– सुरेश सावंत[email protected]

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: