पल्लेदार वाक्ये व पोकळ घोषणा , काँग्रेसची टीका

पल्लेदार वाक्ये व पोकळ घोषणा , काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : २०२०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ भाषणबाजी, पल्लेदार वाक्ये असून यात रोजगाराचा उल्लेख नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निराश करणारा असून अर्थव्यवस्थेतील मंदी दूर करण्यासाठी रोजगारावर भर देण्याबाबत या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याची टीका केली. देशापुढे खरी समस्या बेरोजगारीची आहे. आणि देशाच्या इतिहासात अर्थमंत्र्यांचे हे सर्वात लांबलचक भाषण होते पण या अर्थसंकल्पात ठोस असे काही नाही, जुन्याच गोष्टींना पुन्हा पुन्हा सांगण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना सुमारे अडीच तास चाललेल्या या भाषणाचा मोठा भाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारा होता. देश आर्थिक मंदीने ग्रासलेले असताना अर्थसंकल्पात पंतप्रधानांचे कौतुकच दिसत होते, असे त्यांनी ट्विट केले आहे.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांच्या शैलीत सरकारवर बोचरी टीका केली. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न सरकारने सोडले असून रोजगार निर्मितीवर काहीच भर यामध्ये नाही असे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांतील हे सर्वात मोठे भाषण आहे. हा अर्थसंकल्प १६० मिनिटे मांडण्यात आला पण यातून २०२०-२१ साठी देशाला काय संदेश द्यायचा होता हे लक्षात आले नाही. या अर्थसंकल्पात लक्षात राहील असा कोणताही विचार, घोषणा नव्हती. परकीय गुंतवणुकीला आत्कृष्ट करणे, रोजगार निर्मितीची आशाच सरकारने सोडली आहे. अशी टीका चिदंबरम यांनी केली. आपला देश आर्थिक संकटात आहे, हे सरकारला मान्य नाही त्यामुळे सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत नाही. कालच मांडलेले आर्थिक सर्वेक्षण अर्थमंत्र्यांनी वाचले नसावे. जनतेला असा अर्थसंकल्प देणे योग्य नव्हे, या अर्थसंकल्पासाठी जनतेने भाजपला मत दिले नव्हते, असे चिदंबरम म्हणाले.

दिवाळखोर अर्थसंकल्पअखिलेश

या दशकातला पहिला दिवाळखोर अर्थसंकल्प अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी टीका केली आहे. या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही बदल होईल असे दिसत नाही. गरीबांचे दिवस बदलतील असे आढळून येत नाही. रोजगारनिर्मितीचे प्रयत्न यात दिसत नाही. उ. प्रदेश राज्याला या अर्थसंकल्पात दुर्लक्षित करण्यात आले आहे. उ.प्रदेशात गुंतवणूक यावी म्हणून पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री प्रयत्नशील होते तरीही राज्याला काहीच मिळालेले नाही, असे यादव म्हणाले.

बिनकामाच्या गप्पा : माकपची टीका

माकपने टीका करताना हा अर्थसंकल्प म्हणजे बिनकामाच्या गप्पा होत्या, असे म्हटले आहे. या अर्थसंकल्पातून सामान्य जनतेचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. रोजगारनिर्मितीच्या योजना नाहीत, शेतकऱ्यांसाठी काही नाही. त्यांच्या समस्याच सुटू शकणार नाही. केवळ गप्पा व जुमले आहेत, अशी टीका सीताराम येचुरी यांनी केली.

COMMENTS