पाउलखुणांचा मागोवा

पाउलखुणांचा मागोवा

‘युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाउलखुणा’ हे डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिहिलेले पुस्तक नावाप्रमाणेच युरोपातील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीतील पाउलखुणांचा मागोवा

असहमतीचे आवाज
पेशी शेती तंत्राचा वापर करून मांस निर्मिती
‘96 मेट्रोमॉल’ समजावून घेताना…

‘युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाउलखुणा’ हे डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिहिलेले पुस्तक नावाप्रमाणेच युरोपातील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीतील पाउलखुणांचा मागोवा घेणारे आहे. डॉ. गंगावणे यांनी म्हटल्याप्रमाणेच युरोपीय तत्त्वज्ञानाचा आवाका प्रचंड मोठा आहे. या पुस्तकात उमटलेल्या पाउलखुणांचा मागोवा घेत जर कुणाला तत्त्वज्ञानाच्या विस्मित करून टाकणाऱ्या क्षेत्रात आणखी प्रवास करावासा वाटला तर या पुस्तकाचे उद्दिष्ट सुफल संपूर्ण झाले असे म्हणता येईल. अशा विस्मित करणाऱ्या पाउलखुणा वाचकाला या पुस्तकात जागोजागी भेटतात. तत्त्वज्ञानाची साधारण अडीच हजार वर्षांच्या कालखंडाची ओळख मर्यादित पृष्ठसंख्येत करून देणे सोपे नाही. परंतु डॉ गंगावणे यांनी त्यासाठी तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या प्रश्नांचे सूत्र वापरले आहे. ‘काय आहे’ आणि ‘ते कळते कसे’ हे प्रश्न तत्त्वचिंतकांना फार पूर्वीपासून पडले आणि त्यांनी त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्या त्या काळात, त्या त्या संस्कृतीत केला. बहुतांशी याच दोन प्रश्नांचे बोट धरून आपण या पाउलखुणा तपासतो. तत्त्वज्ञानात चर्चिले जाणारे आणखीही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. नीती म्हणजे आचरणविषयक विचार हा तत्वज्ञानातील मोठा प्रांत आहे. त्याचे देखील विवेचन कालौघात जिथे महत्त्वाचे ठरले तिथे केलेले आहे. त्या त्या काळात आपला अमीट ठसा उमटवणा-या तत्त्वचिंतकाच्या विचारांचा परामर्श घेत हे विवेचन पुढे जातं. असं करत असताना त्या त्या काळाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक चित्र उभे करून त्या चित्राशी तत्त्वविचाराचा संबंध स्पष्ट केलेला असल्याने तत्त्वविचारांचा व्यापक संदर्भ वाचकाच्या लक्षात येतो.
तत्त्वज्ञानाच्या प्रवासातील वाटसरूची वाट खरेतर कधी न सरणारी. आपण आत्ता जिथे उभे आहोत ते स्थळ आणि काळ दोन्ही एकमेवाद्वितीय असते. प्रत्येक काळाचे प्रश्न निराळे, प्रत्येक ठिकाणचे सांस्कृतिक संचित निराळे. असे असताना किंचित मागे वळून पाहिले तर ज्या दऱ्याखोऱ्यातून निबिड अरण्यातून हा विचार करण्याचा, चिंतनाचा मार्ग आपल्यापर्यंत पोचला हे पाहून एक धीरगंभीर जाणीव माणसाला होते. कदाचित त्या जाणीवेसाठीच हे पुस्तक लिहिले गेले.
डॉ गंगावणे सांगतात त्याप्रमाणे, हे पुस्तक मराठीतून लिहिण्याचे एक विशेष प्रयोजन होते. महाविद्यालयात, विद्यापीठात अनेक विद्यार्थी असे असतात की ज्यांना तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून घ्यायची असते. तत्त्वज्ञान म्हणजे गंभीर काहीतरी असे म्हणून सोडून न देता या विद्यार्थ्यांना असे वाटत असते की आपल्या मनातील काही मूलभूत प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी या विषयाची मदत होईल. भारतीय तत्त्वज्ञानविषयक विपुल माहिती त्यांच्याकडे परंपरेने चालत आलेली असते, स्वभाषेत त्याविषयी पुष्कळ वाचायलाही मिळते. परंतु इंग्रजीची अडचण असणारे अनेक विद्यार्थी पाश्चात्य विचार जाणून घेण्यात कमी पडतात. याचे एक महत्वाचे कारण असे की मराठीतून आपला सांधा जोडला जाईल अशा प्रकारे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचलेली नसते किंवा अत्यल्पप्रमाणात पोचलेली असते. याबाबतीत जेवढे काम होईल तेवढे कमीच. प्रस्तुत लिखाण हे याच प्रयत्नाचा भाग आहे.
विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त वाटेलच परंतु हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांपुरते सीमित नाही. तत्त्वज्ञानविषयक कुतुहल असणाऱ्या कुणालाही हे पुस्तक उचलून वाचावेसे वाटेल याचे कारण यात डॉ गंगावणे त्यांच्या परिप्रेक्ष्यातून ही ओळख घडवतात. दीर्घ वाटचालीचा आढावा घेताना आपल्याला ठिकठिकाणी त्यांच्या विचारदृष्टीची झलक मिळते. त्या म्हणतात, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एका मागोमाग एक उदयाला आलेले विचार-पंथ किंवा तत्त्वज्ञ यांची कामगिरी केवळ वर्णनात्मक पद्धतीने मांडणे म्हणजे इतिहास जाणून घेणे नव्हे, तर त्यात या सगळ्यांचा अर्थ लावण्याचा आणि त्यांचे मूल्यमापन करण्याचा प्रयासही अंतर्भूत असतो. या प्रकारचे अर्थनिश्चितीकरण आणि मूल्यमापन अभ्यासकाच्या कळत नकळत गृहीत धरलेल्या सांकल्पिक आणि वैचारिक चौकटींमधून केले जात असते आणि त्याच वेळी या चौकटींना या अभ्यासातून धक्केही बसत असतात; त्यांचेही मूल्यमापन घडत असते. अशा अभ्यासातून तत्त्वज्ञानाला पुढची दिशाही गवसण्याची शक्यता असते.
तशी दिशा गवसणे ही आजच्या कालखंडातील मोठी गरज आहे. आपण माणूस आहोत म्हणजे काय आहोत हे आपल्याला पुरेसे कळण्याआधीच असे तंत्रज्ञान जन्माला आले आहे की जे आपल्यातील माणूसपणाशी खेळ करू शकते, आपल्याला जोखू शकते, आपल्याला त्याच्या हातातील बाहुले किंवा पाळीव प्राणी बनवून ठेवू शकते. हे इतक्या वेगाने आणि इतक्या सूक्ष्मपणे चालू आहे की आपल्याला त्याचे भानही रोजच्या व्यवहारांमधे येणे शक्य नसते आणि असले तरी त्याविषयी विशेष काही करता येत नाही अशी अनेकांची स्थिती असते. तत्त्वज्ञानातील वर उल्लेखलेल्या महत्वाच्या प्रश्नांची, म्हणजे ‘काय आहे’ आणि ‘कळते कसे’ या प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला विज्ञानातून मिळतात. परंतु मिळालेली उत्तरे आपल्यासाठी आणखी प्रश्न निर्माण करतात. खरंच का माणूस म्हणजे केवळ मेंदू पेशी, त्यांच्यातील जोडण्या आणि रसायनांचा खेळ? हा असाच एक प्रश्न. यातील कोणताही प्रश्न उचलून वाटचाल पुढे चालू ठेवणे म्हणजे माणसाच्या माणूसपणाची जाणीव जागृत ठेवण्यासारखे आहे. तशी वाट चालताना, डॉ गंगावणे यांच्या भाषेत, तत्त्ववैविध्यांचा समृध्द वारसा आपल्या पाठीशी आहे ही जाणीव नक्कीच सुखावणारी.
अर्थात हे पुस्तक सोप्या भाषेत करून दिलेली ओळख असे म्हणता येणार नाही. डॉ गंगावणे यांचे मराठी भाषेवरील प्रेम, प्रभुत्त्व आणि अध्यापनाची शिस्त हे पाहता या पुस्तकाची भाषा आजच्या सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टीने सोपी आहे असे खचितच म्हणता येणार नाही. सर्वसामान्य वाचक म्हणजे काय आणि त्यांच्यासाठी आशय किती प्रकारे सांगायचा याचे काही एक उत्तर असणार नाही. परंतु, काठी ठिकाणी केवळ टाळता येणार नाही म्हणून एकेका वाक्यात विचाराची अथवा तत्त्वज्ञाची ओळख आलेली आहे तिथे अधिक विवेचन उपयुक्त ठरले असते. मांडणीतील वेगळेपणा साधून आशय अधिक परिणामकारकरित्या पोचवता येतो तसा प्रयत्न देखील स्वागतार्ह ठरला असता. ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकात लिहिलेल्या लेखमालिकेचे हे पुस्तक रुपांतर आहे. या विषयावरील अनेक पुस्तकांना जन्म देणारे हे लेखन आहे. मराठीवाचकांसाठी असा सघन आशय पुरवणारे लिखाण कलासक्त आणि डॉ गंगावणे यांच्याकडून अधिकाधिक पुरवले जाईल अशी अपेक्षा.

युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाउलखुणा
डॉ. दीप्ती गंगावणे
प्रकाशक- कलासक्त, पुणे
पृष्ठसंख्या- १८०
किंमत- २५०/- रुपये

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0