विद्या बाळ यांचे निधन

विद्या बाळ यांचे निधन

स्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्यातून आधार देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.

स्त्रीवादाच्या प्रत्यक्ष कार्यकर्त्या, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या ‘नचिकेत’ या त्यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दुपारी २ ते ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची प्रत्यक्ष मांडणी करत महिलांच्या उन्नतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्यभर काम केले. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांच्या जाण्याने महिला चळवळीचा आणि पुरोगामी चळवळीचा भक्कम आधार गेला आहे. स्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्याचा आधार देत समाजाला जागे करण्याचा प्रयत्न विद्या बाळ यांनी केला.

विद्या बाळ यांनी अनेकांना प्रेरणा दिली, आधार दिला आणि संस्थात्मक कार्याचा वटवृक्ष उभा केला. त्यांनी १९८१ मध्ये ‘नारी समता मंच’ या संस्था-संघटनेची स्थापना केली आणि स्त्रियांना आणि स्त्री चळवळीला पाठबळ दिले.

ग्रामीण स्त्रियांचे भान जागृत करणारे ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८२ मध्ये महाराष्ट्रातील गावांमध्ये ‘मी एक मंजुश्री’ नावाचे प्रदर्शन भरवले आणि स्त्रियांचा आवाज पुढे आणण्यास मदत केली. त्यासाठी पुढे ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांसाठी २००८ मध्ये ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले.

विद्याताई म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या विद्या बाळ यांचा जन्म 12 जानेवारी १९३७ रोजी झाला. त्यांनी १९५८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. विद्या बाळ यांनी पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून दोन वर्षे काम केले. १९६४ ते १९८३ या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादिका झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात त्या मुख्य संपादिका होत्या. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरु केले.

त्यांची ‘वाळवंटातील वाट’, ‘तेजस्विनी’ या कादंबऱ्या प्रसिद्ध असून, जीवन हे असं आहे, रात्र अर्ध्या चंचाची, या कादंबऱ्या त्यांनी अन्वडीत केल्या आहेत. यांशिवाय त्यानी ‘कमलाकी’ हे डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र लिहिले आहे. अपराजितांचे निःश्वास (संपादित), कथा गौरीची (सहलेखिका – गीताली वि.मं. आणि वंदना भागवत), डॉटर्स ऑफ महाराष्ट्र, तुमच्या माझ्यासाठी, मिळवतीची पोतडी (संपादित, सहसंपादिका मेधा राजहंस), शोध स्वतःचा, संवाद, साकव, हे त्यांच्या स्फुट लेखांचे संकलन प्रसिद्ध झाले आहे.

नारी समता मंच, मिळून साऱ्या जणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष उवाच अभ्यासवर्ग, पुरुष संवाद केंद्र या संस्थाच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना ‘आगरकर पत्रकारिता पुरस्कार’, ‘कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार’, ‘कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार’, ‘सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार’ मिळाले होते.

COMMENTS