व्यवस्थेला जागं करण्यासाठी आम्ही संप पुकारला आहे!

व्यवस्थेला जागं करण्यासाठी आम्ही संप पुकारला आहे!

जेंव्हा स्वीडनच्या एका सोळा वर्षीय युवतीला हवामान-बदलाबाबत कृती करण्यासाठी चळवळ उभारावी वाटते..

नव्या जीवनशैलीसाठी तयार राहा
हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड
एका हिमनदीची प्रेतयात्रा

मंगळवारी ‘डेमोक्रॅसी नाऊ’च्या अमेरिकेतील स्टुडिओत घेतलेल्या तिच्या पहिल्याच विस्तारित मुलाखतीनिमित्त आम्ही एक सोळा वर्षीय स्वीडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग सोबत तब्बल तासभर चर्चा केली. ग्रेटा थनबर्ग हिने जगभरातील पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या लाखो लोकांना प्रोत्साहित केले आहे. मागच्या वर्षी  तिने हवामानबदलाबाबत संप पुकारला. दर शुक्रवारी शाळेतून रजा घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन थांबणे हा तिच्या साप्ताहिक संपाचा नित्यक्रम आहे. हवामानबदलासारख्या भयंकर आपत्तीविषयी कृती करण्याची सक्त गरज तिला वाटते आणि तिचा हा संप हेच अधोरेखित करण्यासाठी आहे.

तिचा हा निषेधार्थ संप लगोलग जगभर पसरला आहे. शेकडोंच्या संख्येने शालेय विद्यार्थी त्यांच्या स्थानिक शाळांत अश्याच प्रकारचा संप पुकारात तिला साथ देत आहेत. २०१८ ला सुरू झालेल्या तिच्या या संपामुळे ती पर्यावरण चळवळीत एक अग्रगण्य व्यक्तिमत्व बनली आहे. युरोपातील अश्या अनेक संपांमध्ये तिने सहभाग नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेत तसेच युरोपियन युनियनच्या संसदेत तिची वर्णी लागली आहे. या विषयासंदर्भात तीने पोप यांचीही भेट घेतली आहे आणि आज ती न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राइक’मध्ये सहभागी होण्याकरीता आली आहे. ती २३ सप्टेंबररोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामानविषयक शिखर परिषदेसही हजर राहणार आहे. मागील काही वर्षांपासून विमानप्रवास न करण्याचा निर्णय घेणाऱ्या ग्रेटाला न्यूयॉर्कला येण्यासाठी झिरो-इमिशन नौकेतुन ट्रान्सॅटलांटिक प्रवास करावा लागला. सांटिअगो आणि चिलीला होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक शिखर परिषदेस हजर राहण्याचा तिचा विचार आहे.

एमी गुडमन- “ग्रेटा थनबर्ग, डेमोक्रॅसी नाऊ च्या स्टुडिओत तुझं मनापासून स्वागत!”

ग्रेटा- “धन्यवाद”

एमी- “तर ग्रेटा, तुझ्या नावाच्या उच्चारावरून बरेच वादविवाद आहेत, तू आमच्यासाठी तुझं पूर्ण नाव उच्चारून दाखवशील?”

ग्रेटा- “ग्रीएटा टूनबार्ज”

एमी- “आणि असे असते स्वीडिश भाषेत उच्चारणे!”

ग्रेटा- “हो”

एमी- “तू अमेरिकेत आल्यापासून येथील लोक तुला वेगवेगळ्या नावाने बोलवत आहेत, याला तू कसं जुळवून घेत आहेस?”

ग्रेटा- “कधी ते टूनबर्ग तर कधी थनबर्ग असं असतं. प्रत्येक जण याचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने करतो, आणि हे खूप मजेशीर आहे. कोणी याचा उच्चार चुकीचा केला तरी माझी काही हरकत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने उच्चार करतो, उच्चाराची कोणती एक पद्धत अशी चुकीची नाही.”

एमी- “अच्छा, तर तुझ्या आईवडिलांनी तुझं नाव ठेवलं ते पुन्हा एकदा आम्हाला सांगशील.”

ग्रेटा- “ग्रीएटा टूनबार्ज”

एमी- “ग्रेटा, आज इथे तुझे मनापासून स्वागत! तर आम्हाला सांग, तु पर्यावरण विषयक कृती-कार्यक्रमामध्ये कशी गुंतलीस? तुला हवामानबदलाच्या संकटासंबंधित गंभीरता कोणत्या वयापासून वाटू लागली?”

ग्रेटा- “माझ्यामते मी पहिल्यांदा या समस्येबद्दल ऐकलं तेंव्हा मी सात-आठ वर्षांची होते. त्यानंतर मी वयाच्या दहा-बारा वर्षी याबाबत अधिकाधिक वाचत गेले तेंव्हा मला याचं महत्व आणि या समस्येची गंभीरता समजली. जेंव्हा मी तेरा वर्षांची झाले त्यावेळी मी पर्यावरणविषयक चळवळीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता मी एक कार्यकर्ता आहे. मी माझ्या रिकाम्या वेळेत या विषयावर प्रात्यक्षिके करण्यासाठी ठिकठिकाणी जात होते, काही चळवळीत सहभागी झाले आणि काही संस्थांशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. पण तेंव्हा ते सगळं खूप संथ गतीने चालू होतं. मग मी स्वतः यात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. कदाचित याचा काही उपयोग होईल न होईल परंतु प्रभाव नक्कीच पडू शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी पर्यावरणासाठी शालेय संपापासून सुरुवात केली.”

एमी- “तू जेंव्हा आठ वर्षांची झालीस तेंव्हा तुझ्या आयुष्यात एक प्रसंग आला. त्याबद्दल काही सांगशील?”

ग्रेटा- “होय, जेंव्हा मी याबद्दल वाचत होते आणि मला हळूहळू समजत होतं की हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यावेळेस मी अत्यंत निराश झाले. जेंव्हा तुम्हाला कळतं की हा विषय कसा महत्वाचा आहे, परंतु आजूबाजूला कोणीही याबाबतीत गंभीर नसतं, “विषय महत्वाचा आहे परंतु मी माझ्या आयुष्यातही व्यस्त आहे”, अश्या प्रतिक्रिया मिळतात तेंव्हा कळतं की कोणीही तार्किक वागत नाहीये म्हणून हे सगळं मला विचित्र वाटत होतं.”

एमी- “तर्कशुद्ध विचार काय असायला हवा?”

ग्रेटा- “काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्या समाधानी जीवनपद्धतीतून बाहेर पडून हे लक्षात घेतले पाहिजे की आपण आजपर्यंत जसे राहत आलोय तसे न राहता काही कठोर पावलं उचलणे गरजेचं आहे, जेणेकरून आपण योग्य दिशेने पुढे जात राहू. पण हे कोणी करताना दिसत नाही. माझे आईवडील, माझे वर्गमित्र-मैत्रिणी, नातेवाईक सर्व जस चालू आहे तसच राहत होते. कोणालाही या विषयाच्या गांभीर्याची काळजी नव्हती आणि हे खूप निराशाजनक होतं.”

एमी- “आणि तू नैराश्याच्या गर्तेत गेलीस.”

ग्रेटा- “हो, अर्थात! याच्यामागे बरीच कारणं होती पण सगळ्यात मोठं कारण हेच. कारण याबाबत कोणीच काहीच का करत नाही हा विचार करून मला दुःखी वाटत. सगळंच खूप विचित्र आणि विषण्ण करणारं होतं. यानंतर मी किमान एक वर्ष तरी निराशेच्या गर्तेत गेले.”

एमी- “तू बोलणं बंद केलं”

ग्रेटा- “हो, मी बोलणंही बंद केलं होतं. मला सीलेक्टिव्ह म्युटीजम आहे.. म्हणजे होता. असं म्हणतात की ही समस्या हळूहळू निघून जाते. – मी काही निवडक लोकांशीच संवाद करू शकते जसं की माझे शिक्षक, माझे आईवडील, कुटुंबातील काही व्यक्ती, इत्यादी. मी जवळजवळ जेवण करणं सोडून दिलं होतं आणि ही खूप मोठी समस्या होती. नैराश्यामुळे माझं बरचसं वजन उतरलं, कारण त्यावेळी काहीच महत्वाचं वाटत नव्हतं.

पण मी नव्याने उभी राहिले, आणखी चांगलं बनण्यासाठी. मी खूप काही करू शकते ही प्रेरणाच याच्यामागे होती. एकेठिकाणी बसून वेळ घालविण्यापेक्षा आपणही प्रभाव पाडू शकणारं काम करू शकतो. म्हणून मी पर्यावरण कार्यकर्ता बनले. याने खरंच खूप मदत झाली. जितक्या प्रामाणिकपणे मी या चळवळीत स्वतःला गुंतवून ठेवते आहे तितकं मला आनंदी वाटतं, कारण मला जाणवत राहतं की मी महत्वाचं, अर्थपूर्ण काम करते आहे.”

एमी- “अच्छा, तर एकवर्षापूर्वी तू जे काही केलं त्याबद्दल बोलूया. तू त्यावेळी पंधरा वर्षांची होतीस. सुरुवातीला तू रोज स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन बसत होतीस का?”

ग्रेटा- “हो, प्रत्येक शालेय दिवस असे पूर्ण तीन आठवडे मी संसदेसमोर जाऊन बसत होते. स्वीडनच्या निवडणूकांनंतर थांबण्याचा माझा निर्णय होता. परंतु जेंव्हा आपण प्रत्यक्षात  एक प्रकारचा प्रभाव समाजात तयार करत आहोत तर असं थांबायचं का? आपण हे चालू ठेऊ शकतो असा विचार करून मी आणि इतर शाळेतील संप करणारे विद्यार्थी यांनी मिळून दर शुक्रवारी हे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, ती तारीख ७ सप्टेंबर. “फ्रायडेज फॉर फ्युचर” असं आम्ही या चळवळीला नाव दिलं आहे.”

एमी- “एक पंधरा वर्षीय युवा, पूर्ण दिवस स्वीडिश संसदेच्या पायऱ्यांवर बसून असते या सगळ्याला स्वीडनच्या खासदारांनी कशी प्रतिक्रिया दिली?”

ग्रेटा- “सुरुवातीला कोणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, ते सरळ निघून जात”.

एमी- “तू काही चिन्ह सोबत बाळगत होती का?”

ग्रेटा- “हो, लाकडापासून बनलेलं एक मोठं चिन्ह”..

एमी- “आणि त्यावर काही लिहलं होतं?”

ग्रेटा- “होय, “Skolstrejk för Klimatet.” -‘पर्यावरणासाठी शालेय संप’…आणि सोबत मी काही पत्रकं वाटत असे. ज्यावर “आम्ही लहान मुले सहसा जसं तुम्ही सांगाल तसं वागत नाही, जसे तुम्ही वागता तसे वागतो आणि तुम्ही माझ्या भविष्याबाबत चिंतीत नाही तसेच मीही तुमच्याबाबत नाही म्हणून मी पर्यावरणाखातर शालेय संप पुकारला आहे”.. त्या पत्रकांच्या मागे मी अनेक तथ्य लिहण्यात बराच वेळ खर्च केला जेणेकरून सगळ्यांपर्यंत वस्तुस्थिती पोहचेल. पण सुरुवातीला कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. सर्व सरळ निघून जात. जेंव्हा संसदेसमोर काही माणसं हळूहळू जमू लागली तेंव्हाही सांसद, नेतेमंडळीनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. एक वेळेस ते सगळं खूप हास्यास्पद वाटू लागलं, कारण मी रोज अगदी रोज त्यांना पाहत होते, नंतर दर शुक्रवारी पाहत होते. पण त्यांच्यापैकी कोणीही येऊन मला विचारलं नाही. मग हळूहळू “हाय, गुड मॉर्निंग!” म्हणायला त्यांनी सुरुवात केली. मीही त्यांना “गुड मॉर्निंग” करत असे, याव्यतिरिक्त काही नाही. आणि जेंव्हा हे सर्व प्रकाशझोतात येऊ लागले, प्रसिद्ध होऊ लागले तेंव्हा साहजिकच त्यांनी याचा फायदा उचलायला सुरुवात केली, “आम्ही ग्रेटा आणि इतर संप करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समर्थनच करतो” यासारखे वक्तव्य करून फायदा मिळवत होते.”

एमी- “तू त्या पत्रकांच्या मागे कोणती तथ्यं लिहत होती, ते तुला आठवत आहे का?”

ग्रेटा- “हो, अर्थात! आज ती तथ्य अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. ती अश्या स्वरूपाची होती- वनस्पती आणि प्राण्यांच्या दोनशे प्रजाती दररोज नष्ट होत आहेत, आज आपण सहाव्या मोठ्यास्वरूपातील नामशेष होण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीला उभे आहोत. स्वीडनचे कार्बन उत्सर्जनच्या मानक, प्रत्येक स्वीडिश नागरिक सरासरी एक वर्षात किती कार्बन उत्सर्जित करतो याबाबत काही आकडे.. असे काही तथ्य मी मांडत होते.”

एमी- “एक सोळा वर्षीय युवा पर्यावरण कार्यकर्ता आपल्यासोबत आहे जिने मागच्या वर्षी तिच्या शालेय जीवनात पर्यावरण रक्षणहेतू संप पुकारला. हवामानबदल सारख्या भयंकर आपत्तीवर ठोस कृती करणेबाबत मागणीसाठी दर शुक्रवारी शाळेपासून रजा घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर निदर्शन करण्यासाठी थांबायचे सातत्यपूर्ण प्रयत्न तिने केले आहेत. येत्या शुक्रवारी (२० सप्टेंबर १९) ती व्हाईट हाउस समोरही निदर्शने करणार आहे.

तर, ग्रेटा तू जगभर प्रसिद्ध होण्यापूर्वी तुला आम्ही पोलंड मध्ये भेटलो होतो. तिकडे येण्यापूर्वी आम्ही तुझ्या ट्विटर फीड वरील ट्विट्स आणि हॅशटॅग पाहिले होते. त्यावेळी तू पंधरा वर्षांची होती. एक पंधरा वर्षांची युवा कार्यकर्ता जी ‘Asperger’ या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे निदान केंव्हा झाले? तुझ्या या पर्यावरणसंबंधित तुझ्या कामात हे सर्व तुला कसे मदत करते?”

ग्रेटा- “जेंव्हा मला कोणत्या गोष्टीत रस निर्माण झाला तर मी त्या गोष्टीत अत्यंत बारकाईने लक्ष केंद्रित करते. या विषयावर नवनवीन शिकत राहण्यासाठी मी न थकता अगदी तासन्तास याबाबतीत वाचन करण्यात घालवू शकते. हे औटीजमच्या स्पेक्ट्रम वरील माणसांत सामान्य गोष्ट आहे. आणि हेच कारण आहे ज्यामुळे मी इतरांच्या तुलनेत पर्यावरणाच्या विषयाला गंभीरतेने घेत आहे. सर्व जण म्हणत की हा विषय महत्वाचा आहे तरीही याकडे दुर्लक्ष करून सर्व स्वतःच्या आयुष्यात मग्न राहू शकत होते याच परस्परविरोधी गोष्टींत बिंदू जोडण्यात मला कठीण वाटत. तुम्ही काय बोलता, काय करता, कसे वागता आणि तुम्हाला असलेली माहिती याबाबत परस्परविरोधी भूमिका घेणे ही दुहेरी नैतिकता मला समजत नाही. हेच माझ्यासाठी ‘संज्ञानात्मक अनियमितता’ (cognitive Dissonance) आहे. मला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती मी करते. म्हणून हो, याने मला मदतच झाली.”

एमी- “या औटीजम स्पेक्ट्रम ला तू तुझी सुपरपॉवर मानते. ते का?”

ग्रेटा- “कारण हे मला माझ्या आयुष्यात एक वेगळा दृष्टीकोन देतो. मी त्या वेगळ्या दृष्टीने पाहते जे इतर नाही पाहू शकत. मला ही गोष्ट इतरांपासून वेगळी बनवते. म्हणून ही माझी सुपरपॉवर आहे. मला माझं हे असं वेगळं असण्याचा अभिमान आहे. आजच्या समस्यांवर आऊट ऑफ बॉक्स विचार करणे गरजेचे आहे. आजच्या घडीला असे आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे, वेगळ्या दृष्टीकोण बाळगणारे लोक आपल्या व्यवस्थेत असली पाहिजेत. हे एक सुपरपॉवर नेहमीच ठरते असं नाही. त्याचा त्रासही होतो, जो बऱ्याच लोकांना होत नाही. हा त्रास सहन करणे गरजेचे असते कारण हव्या त्या परिस्थितीत जगणे सर्वाना शक्य होत नाही, माझी नव्हती. पण आता आहे. “

एमी- “तर, ग्रेटा आम्हाला सांग तू काय विचार केला आहेस तुझ्या भविष्याबद्दल? तू तुझं जीवन कशाप्रकारे पाहतेस? अर्थात आता तू दर आठवड्याला पर्यावरण कार्यकर्ता या नात्याने संप पुकारतेस. तुझ्या अमेरिकेतील कामाबद्दलही बोलू, पण त्याआधी तुझ्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांबद्दल काही सांग, जसं की तू काय खाते?, कोणते कपडे वापरते?, कसा प्रवास करते?”

ग्रेटा- “माझ्यामते मी तीन-चार वर्षे झाली विमान प्रवास करणे सोडून दिले आहे. कारण हवेतून होणाऱ्या प्रवासाचा वातावरणावर होणारा परिणाम! विमानव्यवसायाचा  वातावरणावर जागतिक पातळीवर गंभीर परिणाम दिसून येतो. आणि माझ्या या गोष्टींचा माझ्या कुटुंबावर ही परिणाम होतो, त्यांना सुट्ट्यांत बाहेर जाण्यात अडचणी येतात. मी खरोखर एक त्रासदायक मुलगी आहे.. पण नंतर मी त्यांनाही विमानप्रवास न करण्यास मनविण्यात यशस्वी झाले. सर्वात आधी माझी आई, बाबा आणि बहीण..

मी नंतर पूर्ण शाकाहारी(vegan) बनले. गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करणे आणि वापरणे यावर मी स्वतः बंधनं घातली आहेत. ही ‘गरज’ अत्यंत निकडीची असेल तरच खरेदी यावर अवलंबून आहे. अश्या छोट्या छोट्या गोष्टींतुन मी पर्यावरण विषयक समस्यांना माझ्या दैनंदिन जीवनात अधोरेखित करत असते.”

एमी- “पूर्ण शाकाहारी(vegan) असणे म्हणजे नेमके काय ते आम्हाला सांग”

ग्रेटा- “याचा अर्थ मी असे कोणतेही प्रॉडक्ट्स वापरत नाही जे प्राण्यांपासून येतात”.

एमी- “कोणतेच प्रॉडक्ट्स नाही?”

ग्रेटा- “नाही, कोणतेच नाही. नैतिकता आणि पर्यावरण या दोन्ही कारणांमुळे मी कोणतेही असे प्रॉडक्ट वापरत नाही.”

एमी- “तू कधीच नवे कपडे खरेदी करत नाही?”

ग्रेटा- “नाही, एकतर मी वापरलेले कपडे खरेदी करते अथवा कोणाचेतरी कपडे मिळतात ते वापरते, स्वतःचेही कपडे जपून ठेवते, नाहीतर माझ्या बहिणीचे वापरते किंवा माझ्या आईचे जुने कपडे किंवा माझ्या वडिलांचे जुने कपडे वापरते.”

एमी- “आम्ही तुला दक्षिण पोलंडच्या काटोवाईज शहरात भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक शिखर परिषदेत पाहिले होते. आम्हाला सांग तू तिथे कशी पोहचली? आणि तू विमानप्रवास करत नाहीस, तर तू कशी प्रवास करते याबद्दलही सांग.”

ग्रेटा- “मी बस, ट्रेन, इलेक्ट्रिक कार आणि बोटीतून प्रवास करते आहे. असा प्रवास खूप वेळखाऊ आहे पण जर माझ्याकडे असा प्रवास करण्याची संधी असून तो मी का करू नये? मी असंही म्हणत नाही की सर्वांनी विमानप्रवास करणे टाळून बोटीतून प्रवास करावा, पण मला तो शक्य आहे.

एमी- “दक्षिण पोलंडच्या काटोवाईज शहरात भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक शिखर परिषदेत आम्ही तुला भाषण करताना पाहिलं होतं. ज्यामध्ये तू संयुक्त राष्ट्राच्या जनरल सेक्रेटरी यांना आणि तेथे उपस्थित सर्व सदस्यांना उद्देशून काही सांगू इच्छिते आहे.”

ग्रेटा- “आज आपण दररोज शंभर मिलियन(दहा करोड) बॅरल्स तेल वापरतो. या तेलवापरावर काही राजकीय उपाय उपलब्ध नाही. ते तेल जमिनींत राहण्यासंदर्भात कोणतेही नियम नाहीत. आपण फक्त नियमांच्या जोरावर या जगाला वाचवू शकत नाही. नियम हे काळानुसार बदलले पाहिजेत. आम्ही येथे जागतिक नेत्यांना आमच्या भविष्याची काळजी करा म्हणून विनंती करायला आलेलो नाही. त्यांनी आमच्याकडे याआधीही दुर्लक्ष केलं होतं, यापुढेही करतील. त्यांना आवडो अथवा न आवडो बदल होणार, भविष्यात येणाऱ्या समस्यांना दोन हात करण्यासाठी आणखी लोक येतील. जर आज हे नेते लहान मुलांसारखे वागत असतील, तर आम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल जी त्यांनी खूप पुर्वीच घ्यायला हवी होती. हेच सांगायला आज आम्ही येथे आलो आहोत. धन्यवाद.”

एमी- “ही आहे पंधरा वर्षांची युवा कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग! तर ग्रेटा, तू हे भाषण करताना हसत होती ते का?”

ग्रेटा- “ज्याप्रकारे मी हे सर्व बोलत होते, हे सर्व मला मजेशीर वाटत होतं. हे भाषण खूप क्रांतिकारक झाले आहे- संयुक्त राष्ट्रांच्या जनरल सेक्रेटरींच्या उपस्थितीत असं काही बोलणेच मुळात क्रांतिकारक आहे. मला हे भाषण चांगलंच आठवतं, कारण मी जेंव्हा याची तयारी करत होते, तेंव्हा माझ्या वडिलांनी हे वाचलं होतं. त्यांच्यामते, “तू असं काही सर्वांसमोर बोलू शकत नाही, हे खूपच क्रांतिकारक आहे. तू असं बोलून स्वतःला आणि सर्वांना लाजिरवाणी परिस्थिती आणशील, तू हे नाही बोलू शकत”, आणि मी फक्त ओके म्हणाले आणि भाषण अर्धवट ठेवलं.”

एमी- “तुला आणखी काय म्हणायचं होतं?”

ग्रेटा- “आपण फक्त नियमांनुसार चालून या जगाला नाही वाचवू शकत. याही पुढे जाऊन मी असं म्हणणार होते की- जर पुढे हे जग असेल की नसेल याची शाश्वती नाही तर मी माझ्या भविष्यासाठी अभ्यास का करू? आणि असं बरच काही. मी हे वाक्य त्या लिखाणात टाकलं नाही, जेणेकरून माझे वडील ते पाहतील. त्यांनी या भाषणाचा खूपच ताण घेतला होता. पण मी पुढची वाक्यं लक्षात ठेऊन घेतली आणि भाषणादरम्यान म्हणली सुद्धा”.

एमी- “तू पोलंड नंतर पुढेही जागतिक आणि प्रादेशिक संस्थांना संबोधित करत राहिलीस. जसे की, एप्रिलमध्ये तू युरोपियन युनियनच्या संसदेतील सभासदांसमोरही हा मुद्दा उपस्थित केला आहेस. जेंव्हा पॅरिसमधील नोत्रे-दाम चर्चला आग लागली होती तेंव्हा संसदेत यावर कृती कार्यवाहीची जशी घाई केली गेली तशी घाई याही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी करावी अशी तू विनंती केली आहेस.”

ग्रेटा- “पॅरिसमधील नोत्रे-दाम जळताना काल अख्ख्या जगाने अत्यंत दुःखद भावनेने पाहिलं. काही इमारती फक्त इमारती नाहीत, नोत्रे-दाम पुन्हा एकदा उभं राहील. नोत्रे-दाम चा पाया मजबूत आहे अशी मला आशा आहे. पण आमच्या विचारांचा पाया आणखी मजबूत आहे अशीही आशा आहे. पण तो नाहीये याची मला भीतीही आहे.”

एमी- “तुझ्या युरोपियन युनियनच्या संसदेपर्यंतच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांग”

ग्रेटा- “हो नक्कीच! मी ट्रेनने प्रवास करत तिकडे पोहचले. मला तेथील भाषण व्यवस्थित आठवतं. ते मी आदल्या रात्री पुन्हा लिहलं होतं कारण, भाषणाच्या आदल्या संध्याकाळीच नोत्रे-दाम ला भीषण आग लागली होती आणि याचा माझ्या भाषणात उल्लेख करणे मला आवश्यक वाटले. ती एक तणावपूर्ण रात्र होती. मला आठवतं, – त्याच भाषणात मी भयंकर अस्वस्थ झाले होते आणि मला रडू कोसळले कारण मी ज्या विषयावर बोलत होते ते सर्व खूपच भावनिक होतं, जैवविविधतेचे आणि जंगलांचे होणारे नुकसान, महासागरांत वाढणारी आम्लता, इत्यादी. मी त्यावेळी अचानक दुःखी आणि निराश झाले होते.”

एमी- “चला, दुसऱ्या एका व्हिडीओ क्लिपकडे वळू”

ग्रेटा- “सतत होणारी जंगलतोड, विषारी वायूप्रदूषण, कीटक आणि वन्यजीवांच्या प्रजातींचा होणारा नाश, महासागरांत वाढणारी आम्लता हे सर्व आपल्या अर्थसंपन्न अश्या जीवनशैलीमुळे बनलेल्या हेकेखोर स्वभावाचे विनाशकारी परिणाम आहेत.

यानंतर मी रोमला गेले.”

एमी- “म्हणजे तू पोप यांना भेटण्यासाठी म्हणून रोमला गेली”

ग्रेटा- “हो, रोम, इटलीच्या लोकसभेला आणि पोप यांना भेट देण्यास गेले होते. यानंतर मी लंडनला गेले.”

एमी- “तू जेंव्हा पोप यांना भेटली, तेंव्हा तू त्यांना काय म्हणालीस? आणि त्यांनी हवामान बदलावर काय प्रतिक्रिया दिली?”

ग्रेटा- “हो, या विषयावर बोलणारे पोप हे पूर्वीपासूनच एक स्पष्टवक्ते आहेत. ते याविषयावर बोलतात ही खरोखर चांगली गोष्ट आहे. त्यांनी मला मी जे करत आहे ते असेच सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आणि माझे समर्थन केले. मला त्यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांच्यासोबत बोलण्याची मौल्यवान संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.”

एमी- “तू जेंव्हाही अशी भाषणं देतेस, तेंव्हा कोणाचा सल्ला घेते? तुला आम्ही जेंव्हा पोलंडमध्ये पाहिलं होतं तेंव्हा तुझ्यासोबत त्या कार्यक्रमात एक प्रसिद्ध हवामान-वैज्ञानिक होते, केव्हीन अँडरसन. अगदीच स्पष्टपणे बोलायचं झालं तर, त्यांचं असं म्हणणं होतं की, तुला जास्तीत जास्त बोलायला वेळ मिळायला हवा, त्यांच्यादृष्टीने त्यांच्यापेक्षा तू जास्त महत्वाची व्यक्ती आहेस. तुम्ही दोघेही सोबतच बसला होतात. तू कधी हवामान-वैज्ञानिकाशी बोलली आहेस?”

ग्रेटा- “हो, अनेकदा. मी त्यांना सल्ले विचारत असते जसे की, कोणतेही हवामान विषयक तथ्य मांडताना ते कसे मांडावेत, तथ्यांबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये अश्या भाषेत ते मांडणे जरुरीचे असते, माझ्या भाषणातील तथ्ये अचूक आहेत याबाबत सल्लामसलत करण्यासाठी त्यांना मी माझी भाषणं वाचायला देते. कित्येकवेळा मी त्यांना ईमेल किंवा मेसेज करून मजकूर पाठवते आणि ते मला त्वरित उत्तर देऊन खूपच मदत करतात.”

एमी- “ग्रेटा, तुला हवामानबदल आणि त्याला न्याय देणे याबाबत काय वाटते हे आम्हाला विस्तृतपणे सांग”

ग्रेटा- “माझ्यामते या मुद्द्याला वेगवेगळ्या पद्धतीनेही मांडता येऊ शकते. पण सर्वात महत्वाचा मुद्दा हा की, ज्यांच्यामुळे ही समस्या वरचेवर वाढत जाऊन एक गंभीर रूप घेत आहे त्यांना याची झळ सर्वात कमी बसते किंवा बसतही नसते असं म्हणता येईल. या समस्येची झळ ज्यांना सर्वात जास्त बसते त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आपण मदत त्यांना केली पाहिजे.”

एमी- “तर, ग्रेटा तू जगभरातील अश्या प्रेरणादायी चळवळींचा भाग आहेस. तू ब्रिटनला जाऊन ब्रिटिश संसदेत हा विषय मांडलास, तिथल्या ‘एक्सटींशन रिबेलीयन प्रोटेस्ट’मध्येही तू बोललीस, त्याबद्दल आम्हाला सांग.”

ग्रेटा- “आपण सध्या अस्तित्ववाद, पर्यावरणीय आणि हवामानबदलाच्या संकटांना तोंड देत आहोत, जे पूर्वी संकट म्हणूनही पाहिले जात नसत, जे विषय दशकांपासून दुर्लक्षित आहेत. माणसं आणि त्यांचे नेतेमंडळींनी ही संकटं बरीच वर्षे नजरेआड केली आहेत. पण यापुढे ती दुर्लक्षित होणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेऊ.”

एमी- “ग्रेटा, तू ‘एक्सटींशन रिबेलीयन’मधील एका गटाला संबोधित करत होतीस. आम्ही जेंव्हा पोलंडमध्ये होतो तेंव्हा या चळवळीची अगदीच सुरुवात झाली होती. ते त्यावेळी ब्रिटनमधील एक्झोनमोबीलचे मुख्यालय यासारख्या इतर महत्वाच्या जागांवर स्वतःला जमवत होते. अश्या चळवळींचे महत्व आणि त्यांची गरज याबद्दल आम्हाला सांग.”

ग्रेटा- “होय, ‘एक्सटींशन रिबेलीयन’ ही चळवळ मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण करणारी ठरली. ते सामाजिक पातळीवर अज्ञाभंग करणे हे प्रभावी साधन म्हणून वापरत होते. त्यांचे म्हणणे होते की, ‘आम्ही जर का असे केले नाही तर आमच्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष देणार नाही’. ते जे करत आहेत ते अविश्वसनीय आहे. याचबरोबर ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ आणि इतर अनेक अश्या चळवळी एकत्रितपणे काम करू शकतात. माझ्यामते, आम्ही पर्यावरणविषयक समस्यांना प्राथमिकता देण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे आणि हे या सर्व चळवळींचा एकत्रित परिणाम आहे. माणसांना आता हळूहळू ही समस्या किती गंभीर आहे हे समजू लागले आहे आणि हे एक चांगले लक्षण आहे. अर्थात हे पुरेसे नाही, परंतु तरीही काहीच नासण्यापेक्षा काहीतरी असणे महत्वाचे असते.”

एमी- “ग्रेटा थनबर्ग आज आपल्यासोबत डेमोक्रॅसी नाऊच्या स्टुडिओत उपस्थित आहे. ती न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राइक’मध्ये सहभागी होण्याकरीता अमेरिकेस आली आहे. २३ सप्टेंबररोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामानविषयक शिखर परिषदेसही ती हजर राहणार आहे. काही वर्षांपर्यंत हवेतून प्रवास न करण्याचा निर्णय घेणाऱ्या ग्रेटाला न्यूयॉर्कला येण्यासाठी झिरो-इमिशन नौकेतुन ट्रान्सॅटलांटिक प्रवास करावा लागला आहे.

ग्रेटा तुझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला सांग.”

ग्रेटा- “मी झिरो-इमिशन नौकेतुन प्रवास करत इकडे आली आहे. हा एक खूप चांगला अनुभव होता. जास्तीत जास्त लोकांनी अश्या प्रकारच्या प्रवासाची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला वाटत असेल की, हा प्रवास धडकी भरविणारा अत्यंत कठीण असा असावा. परंतु मी सांगू इच्छिते की मला अजिबात तसे वाटत नाही. या दोन आठवड्यांच्या प्रवासादरम्यान मला जराही आजारी पडल्यासारखे वाटले नाही. आम्ही बऱ्याच वेगात आलो. आम्ही ३० नॉट चा वेग दोनवेळा गाठला होता, जो एका नौकेसाठी अति-वेगवान आहे.”

एमी- “तुझ्यासाठी महासागरातून प्रवास हा नवीनच असेल, तुझ्या या प्रवासाबद्दल थोडं सांग”

ग्रेटा- “हो”

एमी- “बहुतेक लोक असा प्रवास कधीच करत नाहीत.”

ग्रेटा- “नौकेतून प्रवास करण्यापूर्वी मी स्वतःशी ठरवून घेतलं होतं की कोणत्याच अपेक्षा करायच्या नाहीत आणि पूर्णपणे याचा  आनंद लुटायचा. त्यामुळे माझ्यासाठी हा पूर्ण प्रवास एक चांगला अनुभव ठरला.”

एमी- “तू संपूर्ण प्रवासात समुद्रामुळे आजारी नाही पडलीस?”

ग्रेटा- “नाही. भरपूर डॉल्फिन मासे आणि इतर वन्यजीव पाहात, हा प्रवास माझ्यासाठी एक विस्मरणीय अनुभव ठरला. रात्रीच्या शांततेत आकाशातील तारे अगदी स्पष्टपणे दिसतात, आपण अगदी आपली आकाशगंगाही पाहू शकतो. संपूर्ण प्रवासात असं डिसकनेक्टेड राहणं मला अत्यंत आवडलं. अर्थात गरज पडल्यास सॅटेलाइट फोन होताच सोबतीला.”

एमी- “तुझ्या काळ्या रंगाच्या नौकेवर पांढऱ्या अक्षरात ‘युनाईट बिहाइंड सायन्स’ (विज्ञानासाठी/मागे एक व्हा) असं लिहलं होतं. तू हे का निवडलं?”

ग्रेटा- “मी ते वाक्य निवडलं. आपण एका प्रवासाला निघालो आहोत असं म्हणत त्यांनी मला नौकेवर काहीतरी लिहण्याची संधी दिली आणि मी लगेच म्हणाले, हो का नाही!. पण काय लिहावं हे समजत नव्हतं. मी हा वाक्यप्रयोग वापरला कारण मला असं वाटतं, लोकांनी हेच करावं. त्यांनी विज्ञानाची कास धरून एकत्र यावं. तेच करण्याची गरज आहे.”

एमी- “ग्रेटा, न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्रात अभिप्रायपर लेखांचा एक स्तंभ असतो, यावेळी तिथे ख्रिस्तोफर काल्डवेल यांनी ‘पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गच्या क्रियाशिलतेतील समस्या: लोकशाहीच्या विपरीत जाणारा तिचा क्रांतिकारक दृष्टीकोण’ या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध केला आहे. काल्डवेल लिहतात, ‘मिस थनबर्ग या लोकशाहीच्या मंचावर वादविवाद करण्यास अपात्र आहेत’ त्यांनी लेख संपवताना लिहले आहे, ‘योग्य वेळेची वाट पाहणे आणि निरीक्षण करणे या दोन गोष्टी लोकशाहीमध्ये आवश्यक असतात. संयम आणि चिकाटी अंगी बाळगणे हे लोकशाहीतील अत्यंत महत्वाचे सद्गुण आहेत. हवामानबदल ही महत्वाची समस्या आहेच, परंतु आपण घाई केलीच पाहिजे असं म्हणणे म्हणजे आणखी गंभीर समस्येला आमंत्रण आहे.’ तुला याबद्दल काय म्हणायचे आहे?”

ग्रेटा- “विज्ञानाची कास धरून एकत्र व्हा, याव्यतिरिक्त मी त्यांना काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी मीच सांगत आहे असे नाही, माझेच ऐकले पाहिजे असंही काही नाही आणि मी हे वारंवार सांगत आली आहे. मी फक्त एवढेच सांगते आपल्याला वैज्ञानिकांचे ऐकले पाहिजे.”

एमी- “त्यांनी त्यांचा लेखाचा शेवट सर्वांनी वाट पहावी असं लिहून केली आहे”

ग्रेटा- “हो, आपण गेल्या ३० वर्षांपासून वाटच पाहतो आहोत, अत्यंत संयमाने आपण सर्व परिस्थितीचं निरीक्षण करत आलो आहोत. माझ्यामते आता ती वेळ आली आहे जेंव्हा आपण या समस्येची निकड समजून घेऊन काहीतरी ठोस केलं पाहिजे.”

एमी- “एकीकडे ट्विटरसारख्या सोशल मीडियावर लोकांकडून तुझी वाहवा होत असताना दुसरीकडे तुझ्यावर कठोर टीकाही होत आहेत. तुला या कठोर टिकांबद्दल काय वाटतं?”

ग्रेटा- “तुम्ही याला वेगळ्या दृष्टीकोनातुन पाहू शकता. लोकं प्रत्यक्ष काही चांगलं काम करण्यापेक्षा असा वेळ घालवतात, अर्थात हे दुःखद तर आहे. परंतु तुम्ही या गोष्टीकडे सकारात्मक दृष्ट्याही पाहू शकता, जसे की तुमचा समाजावरील प्रभाव इतका मोठा आहे की काही लोकांच्या आत्मविश्वासाला धक्का लागतो आणि याचा अर्थ तुम्ही बदल आणत आहात. माझ्यामते या चळवळीने बराच फरक पडला आहे नाहीतर इतक्या लोकांनी त्यांचा मूल्यवान वेळ आमची थट्टा आणि बदनामी करण्यात घालविला नसता.”

एमी- “मला आता पर्यावरण कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल बोलायचं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवी-हक्क विभागाच्या हाय कमिशनर आणि चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचलेट यांनी तुझ्यासह इतर कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल वक्तव्य केलं आहे.”

मिशेल बॅचलेट- “पर्यावरणविषयक मानवी-हक्क रक्षणकर्ते यांच्यावर सगळीकडून विशेषतः लॅटिन अमेरिकेतून होणाऱ्या हल्ल्यांची कार्यालयाने आणि विशेष अधिकाऱ्यांनी नोंद घेतली आहे. मी या हिंसेने आणि जे स्वतःच्या व येणाऱ्या पिढीवर येऊ घातलेल्या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्य करणारे ग्रेटा थनबर्ग व इतर युवा कार्यकर्ते यांचेवर होणाऱ्या शिवीगाळमुळे अत्यंत निराश झाली आहे. पर्यावरणविषयक हक्क-रक्षणकर्ते आणि इतर कार्यकर्त्यांनी ज्या मागण्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत त्या लक्षवेधक आहेत. आपण त्यांच्या हक्कांचा आदर, रक्षण आणि त्यांची पूर्तता केली पाहिजे.”

एमी- “या होत्या मिशेल बॅचलेट, संयुक्त राष्ट्राच्या मानवी-हक्क विभागाच्या हाय कमिशनर आणि चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष, जिथे यावर्षी डिसेंम्बरमध्ये संयुक्त राष्ट्राची पर्यावरणविषयक शिखर परिषद(COP25) आयोजित केली आहे. ग्रेटा याठिकाणी उपस्थित असणार आहे. ही परिषद ब्राझीलमध्ये होणार होती, परंतु या देशाचे अति-उजवे, हवामानबदल नाकारणारे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी परिषदेचं यजमानपद मागे घेतलं.

ग्रेटा, मिशेल बॅचलेट यांनी कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात बोलताना तुझा विशेष उल्लेख केला आहे, याबद्दल तुला काही बोलायचे आहे? आणि तुझ्या शिखर परिषदेसाठी भविष्यातील योजना काय आहेत?”

ग्रेटा- “हो, बऱ्याच हवामान आणि पर्यावरण कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. काही घटनांमध्ये त्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत या प्रकरणांमध्ये आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, माझ्यावर नाही. ज्या गोष्टींना आपण गृहीत धरले पाहिजे ते म्हणजे- एक सजीव जग आणि त्याचे कार्यशील वातावरण आणि आपण याचसाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहोत हे भयानक आहे. लोकांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत आहे याचा विचारही करवत नाही. मला असे बरेच कार्यकर्ते माहित आहेत ज्यांच्यावर ऑनलाईन हल्ले होतात, ज्यांची काही नेते मंडळींकडून आणि प्रसिद्ध पत्रकारांकडूनही थट्टा उडवली जाते. अश्या कार्यकर्त्यांवर हल्ले कसे काय करू शकतात हे मात्र मला समजत नाही.”

कधी कधी हे कार्यकर्ते यासगळ्यामुळे निराश होतात, दुःखी होतात. या सगळ्याचा इतका परिणाम होतो की ही लढाई इथेच थांबविण्यापर्यंत त्यांची मनस्थिती बिघडून जाते आणि हाच उद्देश असतो या अश्या हल्ल्यांच्या मागे. म्हणून मी आणि इतर कार्यकर्ते आम्ही एकमेकांना आधार देत राहतो. ‘तुम्ही जे काही कार्य करत आहात ते चांगले कार्य आहे आणि हे थांबविण्याहेतूच असे हल्ले होत आहेत, यात तुमची शक्ती आणि वेळ दोन्ही वाया जातो. अश्या लोकांचा फार विचार करू नका’, असं सांगून आम्ही एकमेकांचे सांत्वन करत असतो.”

एमी- “तूझ्या अलीकडच्याच ट्विटमध्ये ऍमेझॉन कंपनीचे ९०० कामगारही २० सप्टेंबरला संपावर जाणार आहेत अशी माहिती आहे. – हे पहिल्यांदाच होत आहे.”

ग्रेटा- “हो”

एमी- “हे तुझ्यादृष्टीने किती महत्वाचे असेल?”

ग्रेटा- “माझ्यासाठी आणि आमच्या चळवळीसाठी हे खरंतर अत्यंत महत्वाचे आहे. कारण असे बरेच युनियन आमच्या संपर्कात आहेत जे संप पुकारणार आहेत. म्हणजे प्रौढ व्यक्तीही आता कामापासून रजा घेऊन संप पुकारणार आहेत. याचा अर्थ- हे काय फक्त लहान मुले आणि युवा पिढीचाच विषय नाही, हा प्रत्येकासाठी महत्वाचा विषय आहे. आम्ही व्यवस्थेला खडबडून जागं करत आहोत. याचा परिणाम सकारात्मक आणि चांगला निघेल अशीच आशा करते.”

एमी- “अच्छा, तर तू येत्या दिवसात काय काय करणार आहेस याबद्दल थोडं बोलूया. तू आता राजधानी वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेस. येत्या शुक्रवारी म्हणजे १३ सप्टेंबरच्या शुक्रवारी तुझे काय नियोजन आहे?”

ग्रेटा- “हो, या येत्या शुक्रवारी मी वॉशिंग्टन डीसीतील एका शालेय निदर्शनात सहभागी होणार आहे. हे निदर्शन व्हाईट हाउसच्या समोर होईल.”

एमी- “तू दर शुक्रवारी निदर्शनं करतेस?”

ग्रेटा- “हो”

एमी- “अगदी जगात कुठेही असलीस तरी?”

ग्रेटा- “हो अगदी बोटीत सुद्धा. मी कुठेही असले तरी हा संप मी सुरू ठेवते. संसदेसमोर अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयासमोर मी पर्यावरणविषयक संप आणि निदर्शन करते”

एमी- “तर या १३ सप्टेंबरच्या शुक्रवारी तू व्हाईट हाऊस समोर उभी राहशील?”

ग्रेटा- “होय”

एमी- “तू मागच्या आठवड्यात बुधवारच्या संध्याकाळी अमेरिकेत उतरली होतीस आणि शुक्रवारी तू संयुक्त राष्ट्रासमोर होतीस.”

ग्रेटा- “हो”

एमी- “ज्यांना तू प्रेरित केले त्यांच्याबरोबर आणि जे जवळजवळ वर्षभर अनेक आठवड्यांपर्यंत संयुक्त राष्ट्रांसमोर आंदोलन करीत होते. पुढच्या आठवड्यात, २० सप्टेंबरचे तुझे काय नियोजन आहे? आणि जगभरात लोकांचे काय नियोजन आहे याबद्दल आम्हाला सांग”

ग्रेटा- “होय, आम्ही या २० सप्टेंबर रोजी जागतिक संपाचे नियोजन करीत आहोत. आम्ही सर्व वयोगटातील लोकांना यात सहभागी होण्यासाठी सांगत आहोत. मी स्वतः २० तारखेला न्यूयॉर्कमधील संपामध्ये सहभागी असेन. २७ सप्टेंबर रोजी आणखी एक जागतिक संप पुकारला आहे.”

एमी- “आणि शेवटी डिसेंम्बर मध्ये तू चिलीला जाशील, तिकडे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेसाठी. सप्टेंबर ते डिसेंम्बर दरम्यानच्या काळात तुझ्या प्रवासाचे नियोजन कसे आहे?”

ग्रेटा- “डिसेंम्बरमध्ये मी संतीअगो मधील संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहे आणि ते इथून बरेच दूर आहे. त्यामुळे मला वेळेत इकडून निघावे लागणार आहे. मला उत्तर आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडाचा प्रवास करावयाचा आहे. हा प्रवास कठीण आहे. मला सध्या काही कल्पना नाही हे सर्व मी कसे पार पडणार आहे. परंतु मला तिथे भाषण करण्यास बोलावले आहे. त्यानंतरच पुढील नियोजन होईल.”

एमी- “आणि आता सगळ्यात शेवटी, तू जगभरातील तरुणांना काय संदेश देशील – जे कदाचित नियमित मत देत नाहीत- परंतु या जगात स्वतःची अशी जागा निर्माण करू इच्छितात- त्यांना तू काय सांगशील?

ग्रेटा- “जगातील सर्व तरुणांना मी हेच सांगू इच्छिते की, आपण सध्या अस्तित्ववाद, हवामानबदल, पर्यावरण या तीन संकटांना सामोरे जात आहोत. यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव आहे आणि भविष्यात असणार आहे. यामुळे आपण स्वतः आता व्यवस्थित जागं झालं पाहिजे आणि आपल्या प्रौढ पिढीलाही जाग केलं पाहिजे. कारण या समस्यांची सुरुवात त्यांच्यापासून झाली आहे, यासाठी त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. सत्ताधाऱ्यांनी आपलं, येणाऱ्या पिढीचं आणि पृथ्वीवरील असंख्य प्रजातींचं केलेलं भयंकर नुकसान याची त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. आपण आता आपला राग उपयोगात आणणे महत्वाचे झाले आहे आणि आपल नेमकं काय धोक्यात आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. मग आपण त्या रागाचे क्रियेत रूपांतर करणे आणि एकत्र उभे राहणे आणि कधीही हार न मानणे आवश्यक आहे.

एमी- “तर ही होती सोळा वर्षीय स्वीडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग! जिच्या सोबत आम्ही तब्बल तासभर चर्चा केली. ग्रेटा थनबर्ग हिने जगभरातील पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या लाखो लोकांना प्रोत्साहित केले आहे.  ‘डेमोक्रॅसी नाऊ’च्या अमेरिकेतील स्टुडिओत तिची ही पहिली विस्तारित मुलाखत. मागच्या वर्षी  तिने हवामानबदलाबाबत संप पुकारला. दर शुक्रवारी शाळेतून रजा घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन थांबणे हा तिच्या साप्ताहिक संपाचा नित्यक्रम आहे. हवामानबदलासारख्या भयंकर आपत्तीविषयी कृती करण्याची सक्त गरज तिला वाटते आणि तिचा हा संप हेच अधोरेखित करण्यासाठी आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0