डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथे घरी शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
आमटे कुटुंबीय आणि महारोगी सेवा समितीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे वृत्त आले होते. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हीडीओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. नंतर हा व्हीडीओ त्यांनी काढून टाकला होता.
त्यानंतर डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून शीतल आमटे यांच्या आरोपांशी सहमत नसल्याचे सांगितले होते. आरोप तथ्यहीन असल्याचे म्हंटले होते. या पत्रकात डॉ. शीतल आमटे या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हीडीओमध्ये सुद्धा अशी कबुली दिल्याचे या पत्रकात म्हंटले होते.
शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे पत्रक देण्यात येत असल्याचे आमटे कुटुंबीयांनी म्हंटले होते.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठ रुग्णांवर उपचार करण्यासाठी महारोगी सेवा समिती स्थापन केली होती.
COMMENTS