हिरवे पान पिवळे .. पिवळे पण पुन्हा हिरवे..

हिरवे पान पिवळे .. पिवळे पण पुन्हा हिरवे..

स्त्री जीवनातील एक मोठं स्थित्यंतर म्हणजे रजोनिवृत्ती. १८ ऑक्टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती दिवस’ साजरा केला जातो कारण जगभरातील विविध स्तरातील स्त्रियांना हा कालावधी कसा हाताळावा हे समजत नसत. कारण त्यावेळेस मनात अनेक प्रकारे गोंधळ झिम्मा- फुगडी घालत असतात. त्याबद्दलची अधिक जागृती व्हावी. यासाठी या दिवसाचे प्रयोजन.

गुन्ह्यांत गुंतलेल्या अमेरिकेचं दर्शन-आयरिशमन
‘भाजपच्या १२१ नेत्यांची फाईल ईडीला सोपवू’
मराठवाड्यात अतिवृष्टीः १२ ठार, १०० जणांना वाचवले

‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ या बालकथेत मुग्धा खिडकीतून आलेल्या पिवळ्या पानाबरोबर अलगद उडत जाते व मनसोक्त भटकते. काही वेळाने एके ठिकाणी पिवळं पानं खाली उतरत म्हणते, “मला गेलं पाहिजे. आज आमच्या झाडाला नवीन पानं येणार आहेत, त्यावेळी हजर राहायला हवे. मुग्धा विचारते, “पण मग तुझे तिथे काय काम? नवीन पाने आली तर आली.” म्हणजे काय? मी त्यावेळी हजर राहिलो नाही तर मला पुन्हा हिरवे होऊन येताच येणार नाही. झाडावर काम करून आम्ही दमलो आणि पिवळे झालो, की आम्ही सुट्टी घेतो आणि काही दिवसांनी पुन्हा हिरवेगार होऊन परत येतो. अग हिरवा पिवळा रंग महत्त्वाचा नाही. प्रत्येक पिवळं पण कधी तरी हिरवं होतंच आणि प्रत्येक हिरवं पण पिवळं होणारच..

स्त्री जीवनाचं असंच आहे. रजस्वला ते रजोनिवृत्ती हा काळ हिरवेपणातून पिवळ्या पानांकडे जाणारा प्रवास. पिवळे होऊन परत हिरवे होण्यासाठी मधला काही काळ विश्रांतीची गरज असते. शरीर- मनावर होणाऱ्या वेगवेगळ्या बदलाला स्वीकारायला वेळ हा लागतोच. पण त्या नंतर पिवळ्या रंगाकडून हिरवेपणाकडे जाण्यासाठी लागणारा विधायक प्रतिसाद हा खरा गरजेचा.

चाळीशी म्हणजे आयुष्याची मध्यान्ह. तारुण्याचा आवेग कमी होऊन व्यक्तिमत्वाला समजूतदारपणाची आलेली झळाळी हे खरं तर चाळिशीचे वैशिष्ट्य. आयुष्यात स्थिरता आलेली, अनुभव गाठीशी, आयुष्याकडे तृप्तीने बघण्याचा टप्पा सुरू असतानाच मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. तक्रारीचा पाढा वाढत जातो. आणि एक विस्कळीतपणा स्त्रीला जाणवायला लागतो.

१८ ऑक्टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती (मेनोपॉज) दिवस’. स्त्रीच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या स्थित्यंतराबद्दलच्या जागृतीबाबतचा दिवस. त्याबद्दलची माहिती व जागृती ही केवळ स्त्रीवर्गासाठीचं नव्हे तर पुरुषवर्गासाठी, घरातील लहान-थोर व्यक्तीपर्यंत पोहचवायला हवी. कारण ती स्थित्यंतरे स्त्रीविश्वात फार मोठी उलथापालथ करत असतात. अशा वेळी तिला समजून घेणे. तिच्या या नाजूक काळात तिला आख्या घराने तिच्या सोबत असणे गरज असते.

जुन्या काळच्या धर्मशास्त्रात मुलींचे वर्गीकरण केले आहे. आठ वर्षाच्या मुलीला ‘गौरी’ म्हटले जायचे. नवव्या वर्षीच्या मुलीला ‘रोहिणी’ म्हटले जायचे. दहा वर्षानंतरच्या कन्येला ‘रजस्वला’ म्हटले जायचे. रजस्वला म्हणजे ऋतुप्राप्त झालेली. लहान मुलगी वयात येण्याचे कारण तिचे बीजांडकोष ( ओव्हरीज) कार्यान्वित होणे हा होय. ही मासिक पाळी पुढे २५ ते ३० वर्ष म्हणजे वयाच्या ४०-४५ वर्षापर्यंत चालू असते. त्यानंतर हे बीजांडकोष आपले जीवनकार्य संपवितात. त्यामुळे ४०-४५ वर्षी स्त्रीच्या शरीरात काही बदल निसर्गतःच घडून येतात. या बदलाचे परिणाम दीर्घकाळ राहतात.

स्त्रीबीज निर्मितीशी जोडलेली दोन संप्रेरके म्हणजे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. या दोन्ही हार्मोन्सचे बदलते प्रमाण व मुख्यतः अभाव स्त्रीला अनेक प्रकारे त्रासाचा ठरतो. डिप्रेशन, मायग्रेन, थकवा सारख्या गोष्टी उद्भवतात. तर इस्ट्रोजेनच्या अभावाने निरुत्साह, नैराश्य, चिडचीड, अचानक दरदरून घाम सुटणे, डोकेदुखी, विस्मरण, झोपेचे प्रमाण कमी होणे, सांधे- स्नायू दुखणे, छातीत धडधडणे, वारंवार रडू येणे, लघवीला त्रास होणे, संभोगाची इच्छा कमी होणे व त्यात त्रास जाणवणे.

इस्ट्रोजेनचे संरक्षक कवच नाहीशे झाल्यामुळे पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांना देखील हृदयविकार होण्याची शक्यता निर्माण होते. शरीरातील हाडे बळकट व घन राहण्यासाठी कॅल्शिअम, ‘ड’ जीवनसत्त्व आणि इस्ट्रोजेन जरूरीचे असते. मेनोपॉजनंतर हाडांची घनता कमी होऊन फॅक्चरचे प्रमाण वाढते.

याखेरीज स्त्रीला या काळात एक मोठी पोकळी जाणवायला लागते. शारीरिक त्रासाबरोबर काही मानसिक त्रास सुरू होतात. मुलं मोठी होऊन आपापल्या उद्योगाला, संसाराला लागलेली असतात. आपले स्त्रीत्व लोप पावते आहे, या जाणिवेने ती कमालीची अस्वस्थ होते. एकटेपणाची जाणीव वाटत असताना, खूपदा आवाज, कलकलाट देखील नकोसा होतो. सतत एक अनामिक चिंता तिला सतावत असते. इस्ट्रोजेनच्या बदलत्या पातळीनुसार स्त्रियांचे मूड हेलकावे खात असतात. तिचे झपाट्याने होणारे भावनिक उतार चढाव घरच्यांना गोंधळात टाकतात. त्याचा त्रास देखील होतो. पण हा सर्व केमिकल लोच्याचा परिणाम असतो. ‘तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी’ या ओळी वेगळ्या अर्थाने जाणवायला लागतात.

आपल्याला होणाऱ्या या त्रासाबद्दल स्त्रीने देखील घरच्यांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगायला हवे. त्यावर घराच्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. आतापर्यंत सर्व जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या देहाला- मनाला अशावेळी विश्रांतीची फार मोठी गरज असते. त्याचवेळी भावनिक ऊबेची गरज असते. अशावेळी जोडीदाराने कधी तिच्या पित्याची तर कधी आईसारखी काळजी करावी.

रजोविराम हा स्त्रीच्या आयुष्यातील अटळ टप्पा आहे. त्याबद्दल तिची संमिश्र भावना असते. काही महिलांसाठी एक कटकट बंद झाली असे असते. तर काही जणींसाठी न्यूनगंडाची भावना निर्माण होते. याला कारण रजोनिवृत्तीबद्दल आधीच विचार केलेला नसतो.

स्त्रीने स्वतःला देखील या रजोनिवृत्तीची मानसिक तयारी ठेवावी. त्याबद्दलची माहिती घेऊन, डॉक्टरांच्या सल्ला घेऊन हा काळ सुसह्य बनवता येतो. मेनोपॉजनंतर देखील बरेच आयुष्य जगायचे असते. मग तो काळ अधिक चांगला घालविण्यासाठी आधीपासून तयारी करून ठेवायला हवी.

व्यायाम आणि सकस आहार गोष्टींचा अंतर्भाव केल्याचा चांगला परिणाम जाणवतो. घरकाम म्हणजे व्यायाम नव्हे आणि सुगरण असणे म्हणजे आहाराविषयीचे संपूर्ण ज्ञान आहे या भ्रमात न राहता. त्याबद्दलची अधिकृत विश्वसनीय माहिती करून घेणं अधिक योग्य.

हा शेवटी निसर्गचक्राचा भाग आहे व तो सकारात्मक भावनेने स्वीकारायला हवा. त्रासदायक काळ हा तात्पुरता असतो. त्यानंतर अधिक आत्मविश्वासाने जगण्याची नवीन खिडकी उघडायची असते.

बोगद्याच्या अंधाऱ्या प्रवासात दुसऱ्या टोकाला छानसा उजेड आहे. त्या उजेडात आपल्या व्यक्तिमत्वाला नवी झळाळी प्राप्त होऊ शकते. ‘मी काय करू शकते? मला काय आवडते? असा विचार करून जगण्याला नवा अर्थ प्राप्त करण्याचा मानस बाळगायला हवा. स्वतःबद्दलची नवी व्याख्या करून स्वतःला नवीन स्वरूपात बघायला हवे. आजवर अव्यक्तच राहिलेल्या, मागे पडलेल्या गोष्टी व्यक्त करणे, पूर्ण करणे रजोविराम नंतर सहज शक्य आहे. आयुष्य नैसर्गिकरित्या बदलत असते. त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे आपणच ठरवायला हवे.

कार्ल युंग म्हणाले तसे, ‘मानवी आयुष्याची मध्यान्हाची वेळ आपण सकाळसारखी कशी घालवू शकतो? तिच्यासाठी वेगळे कार्यक्रम नकोत का? जर आपण वयानुसार आपल्या आयुष्याचे उद्देश बदलले नाहीत, तर आयुष्य निरस वाटायला लागेल. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर काही गोष्टी नैसर्गिकरित्याच बदलल्या जातात. आयुष्याचा व्यापक अर्थ समजतो.

आयुष्याचा आनंदाचा एकदा का शोध लागला की शारीरिक मानसिक अनेक तक्रारी कमी होतील. हे सर्व बाहेर शोधायची गरज नाही ते आपल्या जवळ आपल्या अंतरंगात असत. ते कधी आपण शोधलेलं नसते.

एका आजारी स्त्रीसाठी एक परी तिच्या मुलाला आनंदाचे प्रतीक असलेला सोनेरी पक्षी शोधून आणायला सांगते. अनेक कठीण परिस्थिती, संकटे येतात. खूप शोधूनही तो सोनेरी पक्षी काही दिसत नाही. शेवटी दुःखीकष्टी होऊन मुलगा घरी परत येतो तर घरातच सोनेरी पक्षी बसलेला आढळतो. तो मुलगा आईला म्हणतो, “ज्याचा शोध घेत दूरदूर भटकलो. इतका त्रास सहन केला, तो सोनेरी पक्षी तर आपल्या घरातच सदैव होता. आपल्याला कधीच दिसला नाही.” आई म्हणते, “मी घरात असून मला ही कधी तो दिसला नाही. पण आता समजले तू बाहेर शोधला तुला मिळाला नाही. मी घरात होते मला दिसला नाही. कारण आपल्याला सोनेरी पक्षी म्हणजे दुर्मिळ गोष्ट वाटते आणि म्हणून आपण तिला शोधायला जात नाही.”

असेच आहे. सोनेरी पक्षी म्हणजे स्व-ओळख. स्वतःला ओळखा. स्वतःला न्याय द्या. आयुष्याच्या संध्याकाळचे रंग आसमंतात उधळून दिले तर ती संध्याकाळ कातर न भासता अधिक रंगतदार भासेल. सुयोग्य नियोजन, विधायक दृष्टिकोन ठेवला तर रजोविराम हा रडगाणे न बनत सुरेल गाणं बनू शकत अगदी आपल्या मुग्धाच्या गोष्टीतल्या पानासारखं. हिरवे पान पिवळे होईल.. पिवळे पान हिरवे होईल..

हिंदी कवयित्री चित्रा देसाई यांनी रजोनिवृत्तीबद्दल हृद्यगत विचार मांडले आहेत. त्या म्हणतात, “कोणतीही महिला ४०-४५ची झाली की तिला आपलं आयुष्य निरस वाटायला लागते. आता तिला करायला काही राहिलं नाही, ना आपण पहिल्यासारखे दिसतो, ना कोणाला आपली गरज राहिली आहे. आपले महत्त्व कमी झाल्यासारखे तिला वाटते. पण तिने असे वाटून नको घ्यायला. आपल्या स्वतःबद्दल तिच्या मनात सन्मान असायला हवा. हा कालावधी फाल्गुन महिन्यासारखा आहे. सर्वात शेवटचा असला तरी धरतीवरील सर्वात सुंदर महिना. ५० नंतरचे वय वानप्रस्थाचे. वानप्रस्थ म्हणजे वनात जाऊन राहणे नसून स्वतःकडे वळणे असा आहे. जबाबदारी मोकळं झाल्यामुळे स्वतःच्या मनासारखं जगण्याची हीच खरी वेळ.

त्यांची याविषयीची कविता-

आज कल मैं मन का करती हूँ 

हाथो को काफी से 

और रूह को फैज की नज़मो से सींचती हूँ 

आज कल मैं मन का करती हूँ 

हर सुबह पेपर में छपी खबरों पर 

इत्मीनान से बहस करती हूँ 

सरसों का साग बथुये की रोटी 

कभी गुड और कभी हरी मिर्च से कुतरति हूँ 

अपनी खिड़की पर 

गमलो मे बसी खेती को पानी से सींचती हूँ 

शाम को आवारगी से घूमती 

पेड़ो की कलगी पर 

चिड़ियों का कलरा सुनती हूँ 

दोपहर को दोस्तो का हाथ पकड़ 

गली मुहल्लों की बातो से निपटती हूँ 

बचे खुचे पेड़ो पर पंछी नीड़ बना पाए 

ऐसी कोशिश मे शामिल होती हूँ 

साँझ ढाले दूर से ही 

अपने खेतो को आँखो से सहलाती हूँ 

मेरे दोस्त कहते हैं आजकल मैं कुछ नहीं करती 

क्योंकि आजकल मैं मन का करती हूँ 

(शास्त्रीय माहिती- ‘मेनोपॉज’ या पुस्तकातून)

देवयानी पेठकर शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0