मुंबईः शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार
मुंबईः शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचे नियोजन असून अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जून अखेर लागेल निकाल
मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे.
या संदर्भात माहिती देताना प्रा. गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना विभागातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी,
पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ बैठकांद्वारे चर्चा केली आहे.
सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने आली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अध्यापनासाठी आपण विविध उपक्रम केलेले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इयत्ता दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली असल्याचे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष असे-
- विद्यार्थ्यांचेइयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
- विद्यार्थ्यांचेदहावीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण.
- विद्यार्थ्यांच्या इयत्तानववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण( इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश)
हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोरोना पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (नववीचा) निकाल कोरोनापूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांनी कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.
पुनर्परीक्षा आणि श्रेणी सुधार
पुनर्परीक्षार्थी (Repeater Student), खाजगी ( फॉर्म नं. १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने (Class Improvement) अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील. राज्यातील इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार आम्ही सदर धोरण तयार करताना केला आहे.
अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा
विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इयत्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) सीईटी घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
COMMENTS